NCPA, SOI आणि उस्ताद झाकीर हुसैन - ते अविस्मरणीय पाच दिवस

Submitted by आशयगुणे on 4 November, 2015 - 00:28

नमस्कार! ह्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दक्षिण-मुंबईच्या NCPA ला जाउन एक अनोखी मैफल आणि त्याची पूर्व-तयारी अनुभवण्याचा योग आला. कलाकार होते उस्ताद झाकीर हुसैन आणि पाश्चात्य ऑर्केस्ट्रा कंडक्टर झेन दलाल.

त्याबद्दल डायरीच्या थाटात लिहिलेले हे अनुभव:

दिवस पहिला - २२ सप्टेंबर

हा आठवडा NCPA च्या दौऱ्यावर आहे. कलाकार त्याची कला कार्यक्रमाच्या दिवशी पेश करतो, आपण त्याला दाद देतो, खुश होतो. आपल्याला कार्यक्रम आवडतो. पण ही कला तिचे रूप धारण करताना कोणत्या प्रक्रियेने जाते हे पाहणे फार आनंद देणारे असते. भारतीय शास्त्रीय संगीताचा गाभा राग-संगीत आहे. त्याचे काही लिखित स्वरूप नाही. कारण त्या क्षणी सुचेल तशी बढत करणे ही त्यातील प्रक्रिया असते. त्यामुळे 'बसवून सादर करणे' हे त्यात नसते. परंतु पाश्चात्य संगीत हे लिखित स्वरूपाचे असते. ऑर्केस्ट्रा मधील कलाकारांच्या समोर त्यांचा वाजवण्याचा मजकूर लिहिलेला असतो आणि तसाच त्यांना तो वाजवायचा असतो. त्यामुळे कार्यक्रम सादर होण्याआधी त्यांना सामूहिक रियाझ करावा लागतो आणि एकमेकांमधील समन्वय साधायचा असतो आणि ही प्रक्रिया सोपी नक्कीच नसते. येत्या शुक्रवार आणि शनिवार ह्या दोन दिवशी NCPA मधल्या Symphony Orchestra of India ह्यांच्या बरोबर उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचे वादन आहे. आज त्या साऱ्या कलाकारांचा ( उस्तादजी सहित) सराव पाहण्याचा योग आला. तिथे मी कसा पोहोचलो ही एक वेगळी कथा आहे जी एका वेगळ्या पोस्ट मध्ये सांगीनच.
ज्या Composition चा आज सराव झाला ती सगळी उस्ताद झाकीर हुसैन ह्यांनी लिहिली आहे. ती पाश्चात्य आहे. झाकीरजी हे केवळ तबलावादक नाहीत तर ते संगीतकार आहेत. १९९६ च्या ओलिंपिक्स खेळांच्या Opening Ceremony चे संगीत त्यांनी दिले आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. आजचे वैशिष्ट्य म्हणजे ती जवळ जवळ एक तासाची Composition झाकीरजींनी मार्च मध्ये तयार केली आणि त्यात स्वतःचा तबला देखील विशिष्ट जागांमध्ये समाविष्ट केला. त्यानंतर जगभरात असंख्य कार्यक्रम करून ह्या आठवड्यात ते मुंबईत आले आहेत. परंतु त्यांना ती तासाभराची अख्खी रचना - तबल्याच्या विशिष्ट जागांसकट पाठ आहे. सारे कलाकार समोर वही घेऊन बसलेले असता हे मात्र वाजवणे ही एक सहज प्रक्रिया असल्या सारखे वाजवत होते. त्या अनेक वायोलिन, चेलो, ट्रंपेट, बेस चेलो, फ्लूट वाद्यांमध्ये तबला असा काही बेमालूम मिसळला की आपण भारतीय किंवा पाश्चात्य संगीत ऐकत नसून एक वैश्विक संगीत ऐकत आहोत असाच अनुभव आम्हाला झाला.
पाश्चात्य असल्यामुळे सारे कलाकार स्टेजवर बूट घालून बसणं हे काही गैर नाही आणि नवीन देखील नाही. परंतु उस्तादजी जेव्हा स्टेजवर चढताना बूट काढून, स्टेजच्या पाया पडून स्टेजवर गेले तेव्हा नक्कीच वेगळी, मिश्र भावना मनात निर्माण झाली. आणि त्यानंतर जो तबला वाजला त्याचे वर्णन माझ्याकडून शब्दात होणे नाही. विशेष म्हणजे तबल्याचे बोल हे पाश्चात्य रचनेत बसतील आणि तसे वाजतील अशाप्रकारे वाजवले गेले. पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे काही अलिखित नियम आहेत. म्हणजे ते वाजवताना पायाने, हाताने किंवा मानेने लय धरणे हे अपेक्षित नसतं. ह्याचे कारण ते 'सुट-बूट' मधले संगीत आहे आणि सामान्यांचे नाही असा त्याचा मिजास आहे. परंतु आज जो तबला वाजला तो साऱ्यांना घायाळ करणारा होता. असा ताल ह्या लोकांनी कधीही ऐकला नव्हता. त्यामुळे हळू हळू ह्या कलाकारांनी हाताने, पायाने, मानेने आणि काही प्रसंगी वायोलिनच्या 'बो' ने ताल धरायला सुरुवात केली. 'बंधनं' तुटली आणि मंडळी तालाला शरण गेली.
ह्या पाश्चात्य संगीतकारांमध्ये बऱ्याच देशातील लोकं आहेत. अगदी चीन, जपान इथपासून कझागिस्तान,रशिया, युरोपीय देश आणि अमेरिका इथपर्यंत. Rehearsals मध्ये देखील ते तबला वाजल्यावर टाळ्या वाजविणे थांबवू नाही शकले. माझी ओळख करताना 'हा संगीतावर बोलतो आणि लिहितो' अशी केली गेली. उस्तादजींनी मला 'Mr. Writer' केले होते. जाताना देखील 'चला मिस्टर रायटर, उद्या भेटूया' असे अगदी आवर्जून सांगितले. तिथे जमलेल्या जवळ जवळ पंधरा-वीस आमंत्रितांमध्ये माझ्या सारख्या छोट्या माणसाची त्यांनी दखल घेतली हे त्यांचे मोठेपण! उद्या पुन्हा तिथे जायचे आहे. गुरुवारी एक खास चर्चासत्र आहे. त्यात देखील सहभागी होयचे आमंत्रण मिळाले आहे. मी अर्थातच जातोय! smile emoticon शुक्रवारी आणि शनिवारी अर्थात कार्यक्रम आहे. हा आठवडा समृद्ध होण्याचा आहे.
मी ज्या मित्रांना सांगितले नाही किंवा बोलावले नाही त्यांनी कृपया राग मानू नये. हे सारे Strictly by Invitation असल्यामुळे माझा देखील नाईलाज आहे. परंतु मला 'नशीबवान' वगेरे सुद्धा म्हणू नका. इथपर्यंत पोहोचण्यासाठी गेल्या तीन ते चार वर्षांची माझी ही मेहनत आहे. तरीही नियतीचे धन्यवाद!

दिवस दुसरा - २३ सप्टेंबर

झरीर हा माझा ज्येष्ठ मित्र. वय वर्ष साठ! एकदा NCPA ला वेंकटेश कुमार ह्यांचे गाणे होते. तिथे माझी आणि ह्याची पहिल्यांदा भेट झाली. कार्यक्रम संपला आठ वाजता आणि त्यानंतर तिथल्या पार्किंग स्पेस मध्ये सहज संगीतावर गप्पा सुरु झाल्या आणि त्या संपल्या तेव्हा साडे दहा वाजले होते. मी मला माहिती असलेले गाण्याचे, वाजविण्याचे, तालाचे, सुराचे जवळ जवळ सगळे विषय चर्चेला बाहेर काढले! प्रसन्न होऊन त्याने माझ्याकडून नंबर घेतला आणि पुढे घरी ये आणि कार्यक्रमांना एकत्र जाऊया असे देखील सांगितले. त्यानंतर काही कार्यक्रम आम्ही एकत्र अनुभवले. ओळख वाढली, गप्पा वाढल्या आणि समजले त्याचे कलाकारां विषयीचे प्रेम! हा माणूस हिंदुस्थानी, कर्नाटिक आणि पाश्चात्य संगीतातील सर्व प्रमुख कलाकारांशी ओळख आणि जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारा आहे. मलिकर्जुन मन्सूर, एम एस. सुब्बलक्ष्मी पासून बाख, बेटोवेनच्या सिम्फनी सर्वच प्रिय! अशी व्यक्ती माझ्यावर प्रसन्न असल्यामुळे मी तर खुशच होतो. शिवाय तो मला सर्व कलाकारांना देखील भेटवत होता.
आज NCPA दौऱ्याचा दुसरा दिवस. दुपारी चार ते सहा कलाकारांचा सराव झाला. आणि सहा वाजता आम्ही स्टेजवर पोहोचलो. काल झरीर ने झाकीरजींना त्यांचा आवडता रंग विचारला होता आणि उद्या आमच्याकडून एक शाल स्वीकारा असा त्यांच्याकडे आग्रह धरला. झाकीरजींनी शेवटी ते मान्य केले. मान्य झाल्या-झाल्या स्वारी माझ्या बरोबर कुलाबा मार्केट मध्ये चांदीची दोन नाणी घ्यायला - एक झाकीरजींसाठी आणि दुसरे त्यांच्या पत्नीसाठी( त्या देखील इथे आल्या आहेत). नंतर आज दुपारी माहीम बाजारातून दोन नारळ, दोन शाल, दोन हार आणि घरातून कुंकू घेऊन त्या चांदीच्या नाण्यांसकट तो NCPA ला हजर झाला. स्टेजवर पोहोचल्यावर झाकीरजींना आणि त्यांच्या पत्नीला शेजारी बसवले आणि ह्याने तिथे जमलेल्या सर्वांसमोर त्यांचा सत्कार सुरु केला. हे सारे माझ्यासाठी नवीन होते. आणि झाकीरजींना तर अगदीच अनपेक्षित. योगायोग असा की आज झाकीरजींचा लग्नाचा वाढदिवस देखील होता. त्यामुळे स्टेजवर एकंदर वातावरण खेळीमेळीचे होते. थोडे संगीताचे विषय, थोडे हास्य-विनोद आणि सत्कार होताना गांभीर्य. असं करता करता अंगावर शाल पांघरायचा शेवटचा विधी आला. आणि तेव्हा मात्र त्याने मला तसं करायचा इशारा दिला. मी ' नाही नाही' म्हणायला लागलो कारण सारी प्रक्रिया तो पार पाडत होता, सारे साहित्य त्याने आणले होते आणि मुख्य म्हणजे असं करण्याची माझी अजिबात पात्रता नव्हती! शेवटी ह्यानेच उस्तादांना सांगितले की ह्या मुला मुळे मला तबला ऐकावासा वाटला. इतके दिवस मी तालाकडे दुर्लक्ष्य करायचो पण ह्याच्याशी फोन वर बोलून मला त्याची गोडी लागली आणि त्यामुळे ते ह्याला करू द्या.
आणि त्या तालसम्राटाला मी शाल पांघरली. अजमेर शरीफला चादर चढवताना कदाचित भक्तांना मला जसे वाटत होते तसेच वाटत असेल.

दिवस तिसरा - २४ सप्टेंबर

झरीर हा कलाकारांना ओळखतो आणि त्यांच्याशी खूप चांगले संबंध ठेवून आहे हे आधीच बोललो आहे. NCPA च्या दौऱ्यावरचा तिसरा दिवस देखील अशाच एका चमत्कारिक घटनेमुळे लक्षात राहील. ठरल्याप्रमाणे आम्ही कलाकारांचा सराव अनुभवायला दुपारी ३ वाजता पोहोचलो. दोन दिवस ऐकत असल्यामुळे समोर वाजवली जाणारी Symphony आता ओळखीची झाली होती. त्यामुळे आता त्यातील सूक्ष्म जागा, सुरांचे अलंकार वगेरे जाणवू लागले होते. संगीत अशाच प्रक्रियेत ऐकायचं असतं. तीच गोष्ट वारंवार ऐकत असलो तरीही प्रत्येक वेळेस त्यात काहीतरी नवीन आढळतं. त्यामुळे दुपार अशीच प्रसन्न गेली. आज तिथे बरीच लहान मुलं आली होती. झाकीरजीं बरोबर फोटो काढायला आणि त्यांची सही घ्यायला! मला त्यांच्यात १२ वर्षांपूर्वीचा मी दिसत होतो. माझ्या देखील चेहऱ्यावर त्या वेळेस असेच भाव असणार. मात्र त्यांच्या बरोबर 'सेल्फी' वगेरे घेण्याचे धैर्य माझे आज काय ह्या पुढे देखील कधीच होणार नाही! ह्या मुलांचं तसं नव्हतं! कसलाही संकोच न बाळगता ते 'सेल्फी प्लीज' असं सांगून फोटो काढत होते. उस्ताद देखील त्यांच्या ह्या विनंतीला मान देत होते. शेवटी सेक्युरीटी बोलवावी लागली! त्यात देखील एका साधारण १० वर्षांच्या मुलीला सही न मिळाल्यामुळे तिने रडायला सुरुवात केली. काय करणार …. होतं असं!
संध्याकाळी माझ्या समोर एक इतकं मोठं सरप्राइज असेल ह्याची काहीच कल्पना नव्हती. NCPA Cafe मध्ये चहा-कॉफी प्यायला गेल्यावर झरीर ने आम्हाला एका टेबल भोवती बसायला सांगितले. तिथे एक व्यक्ती बसल्या होत्या. त्या कोण ह्याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. गप्पा-गोष्टी सुरु झाल्या, आमची ओळख करून दिली गेली आणि काही वेळे नंतर आम्हाला एकदम सांगितले गेले, " उस्ताद विलायत खां ह्यांची मुलगी." इतका वेळ आम्ही कुणाशी बोलतोय ह्याची आम्हाला काहीच कल्पना नसल्यामुळे आम्ही हास्य-विनोद वगेरे करत होतो. परंतु हे समजल्यावर त्यांची माफी मागून आम्ही संभाषण पुढे सुरु ठेवले. अर्थात त्यांनी त्यावर काहीच हरकत घेतली नाही. उलट, तुम्हाला दोघांना सरप्राइज देण्याच्या योजनेत झरीर बरोबर मी देखील सामील होते असे सांगितले. मग विषय अर्थात उस्ताद विलायत खां, सतार, सूर, सूराचा ठेहराव ह्या साऱ्याकडे वळला. खरं सांगायचं तर 'उस्ताद विलायत खां ' हा माझ्यासाठी भावनिक विषय आहे. २००२ ह्या वर्षी पन्नासाव्या सवाई गंधर्व मोहोत्सवात खांसाहेबांनी सतार वाजवली होती. परंतु केवळ दहावी ह्या क्षुल्लक ( आणि हो … आता इतक्या वर्षांच्या नंतर नक्कीच खात्री पटली …. क्षुल्लकच!) कारणासाठी मला तिथे जाता आले नव्हते. आणि दोन वर्षांनंतर खांसाहेबांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष ऐकायची संधी गेली ती गेलीच! हे सारे मी काल त्यांना सांगितले. साहजिकच त्या देखील थोड्या भावनिक झाल्या. चहापान संपलं आणि आम्ही पुन्हा ऑडीटोरीयम कडे निघालो.
झाकीरजी आणि झेन दलाल हे ते सादर करीत असलेल्या कार्यक्रमाबद्दल जवळ जवळ दोन तास बोलले. त्यावर इतकेच म्हणीन की Globalization ह्या प्रक्रियेतून संगीत सुटलेले नाही ह्याचीच जाणीव सर्वांना झाली. आणि संगीत ही जर जीवनपद्धती आहे तर ह्या घटनेतून सुटणं अशक्य! ह्यावर कधीतरी लिहीनच. ह्या परिसंवादा नंतर NCPA चे तीन समृद्ध झालेले दिवस संपले. कलाकारांचा सराव, त्यांच्याशी गप्पा, त्यांचा सत्कार, त्यांच्याशी झालेल्या चर्चा
ह्या साऱ्या गोष्टी ह्या तीन दिवसात अनुभवल्या. भारतीय संगीत ह्या विषयावर माझी मतं ( हो … माझी) ऐकायला एका पारसी जोडप्याने आम्हाला बॉम्बे जिमखान्यात चहापानाला देखील आमंत्रित केले. त्यामुळे त्या ऐतिहासिक ठिकाणी जायची संधी देखील ह्याच तीन दिवसात मिळाली. आज आणि उद्या - शुक्रवार आणि शनिवार - प्रत्यक्ष कार्यक्रमाला जायचे आहे. तेव्हा देखील कदाचित काही ओळखी होतील. पण ते तीन दिवस मात्र अगदी अविस्मरणीय!

दिवस चौथा आणि पाचवा - २५ आणि २६ सप्टेंबर

" तुमच्यामुळे …"

चौथा आणि पाचवा दिवस हा प्रत्यक्ष कार्यक्रमाचा होता. तीन दिवस सराव झाला होता. वाजवणारी अनेक वाद्य, त्यांच्या बरोबरीने ( साथीने नव्हे) वाजणारा तबला आणि ह्या सर्वांना सांभाळणारा ऑर्केस्ट्रा कंडक्टर! दोन्ही दिवशी आम्हाला अगदी बेधडक पणे कार्यक्रमानंतर ग्रीन रूम मध्ये शिरून कलाकारांशी बोलता आले. ह्याचे सारे श्रेय झेनला. होय, ऑर्केस्ट्रा कंडक्टर झेन दलाल ह्याला! परंतु आम्ही इथे कसे पोहोचू शकलो, झेनशी आमची ओळख/मैत्री कशी झाली ह्या सगळ्याचे मूळ आहे ह्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात!
फेब्रुवारी महिन्यात एकदा झरीरचा फोन आला आणि बोलता बोलता 'तबला' हा विषय सुरु झाला. त्या दिवशी विषयाची चांगली बढत झाली आणि मी त्याला तालवादन कसे ऐकावे ह्याबद्दल माझे विचार ( थोडेफार निर्माण झाले आहेत ते) ऐकवले. ते ऐकून तो प्रचंड खुश झाला. परंतु हा विषय इथेच थांबला. काही दिवसांनी झरीर ने आम्हाला NCPA ला बोलावले. तिथल्या काही लोकांना त्याला आम्हाला भेटवायचे होते. ठरल्याप्रमाणे भेटी झाल्या आणि तेवढ्यात समोरून एक उंच व्यक्ती आली. माझ्या पाश्चात्य संगीतातील अज्ञाना मुळे मला माहिती नव्हते की ही व्यक्ती एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑर्केस्ट्रा कंडक्टर आहे! त्यामुळे तेव्हा माझी ओळख 'झेन दलाल' ह्याच्याशी झाली. तेव्हा बोलता बोलता तो म्हणाला की सप्टेंबर महिन्यात कधीतरी तो उस्ताद झाकीर हुसैन ह्यांच्या बरोबर कॉन्सर्ट करणार आहे. तेव्हा इतकं मात्र ठरवलेलं की ह्या कार्यक्रमाला आपण जायचं!
काही दिवसांनी झरीरचा फोन आला. " तू त्या दिवशी जे तबल्या बद्दल सांगितलस ते सगळं झेनला सांगशील का? त्याला उस्तादजीं बरोबर वाजवायचे आहे आणि त्यामुळे काही बेसिक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत", तो म्हणाला. हे ऐकून मी उडालोच! मी सांगायच्या? मी त्याला म्हणालो की हे माझे विचार आहेत आणि मी तबला शिकलो नाही आणि त्यामुळे वाजवत देखील नाही. पण झरीरला माझ्यावर विश्वास होता आणि त्याने मला आग्रह केला. इतकंच काय तर चर्चगेटच्या Kamling Restaurant मध्ये आमची भेट निश्चित केली. Lifetime Opportunity असल्यासारखे बोल असं सांगितल्यामुळे मी देखील तयारी करून गेलो होतो. ठरल्याप्रमाणे मी आणि माझा मित्र ( ज्याला पाश्चात्य, हिंदुस्थानी आणि कर्नाटीक संगीताबद्दल खूप चांगलं ज्ञान आहे) बोलायला सुरुवात केली आणि मला त्याच्याशी तबलावादनातील 'पेशकार' ह्या वादन-प्रकाराबद्दल बोलायला मिळाले. ते अशासाठी की ह्या कार्यक्रमाचे नाव 'पेशकार' हेच होते. त्यानंतर पुढील काही महिने तो अमेरिकेत असणार होता आणि तिथे झाकीरभाई ह्यांच्याशी भेटून ह्या साऱ्या कार्यक्रमाची रचना करणार होता. आमची भेट खूप चांगली झाली, बऱ्याच विषयांवर गप्पा झाल्या.
ऑगस्ट महिन्यात त्याचा झरीरला इ-मेल आला आणि त्याच्यात आमच्या दोघांची नावं होती. आमच्यासाठी खास कलाकारांचा सराव पाहण्याची व्यवस्था केली होती आणि उस्तादजींशी भेट हा देखील त्यातला एक भाग होता. गेले तीन दिवस आम्ही NCPA ला होतो ते हेच. पण काल आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला! ग्रीन रूम मध्ये आम्हाला मिठी मारून सर्वांसमोर झेन म्हणाला की त्यादिवशी तुम्ही जे समजावलं त्यामुळे मी भारतीय संगीताशी चांगल्याप्रकारे रिलेट करू शकलो आणि हा कार्यक्रम सफल होऊ शकला! निःशब्द ह्या अवस्थेत आमचे काही सेकंद गेले! " No Maestro, you are indeed very kind", असं मी म्हणालो. त्यावर तो जे बोलला ते अतिशय महत्वाचे आहे. शिवाय मोठे कलाकार हे छोट्या गोष्टींमधून देखील प्रेरणा मिळवतात ह्याचे ते सर्वात मोठे उदाहरण आहे. तो म्हणाला,
It is important to absorb knowledge from everywhere. You may have it, I may have it. But the point is that it is there! Here, I absored it from you!
ऑक्टोबर मध्ये तो आमच्याशी पुन्हा संपर्क साधेल. त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही सांगू त्या मुंबईच्या restaurant मध्ये त्याची गाडी आम्हाला सर्वांना घेऊन जाइल आणि तिथे फक्त संगीत-चर्चा होईल! तो आमच्याकडून अजून ऐकेल आणि आम्हाला पाश्चात्य सिम्फनी बद्दल समजावेल आणि शिकवेल. वाट पाहतोय त्याची. NCPA मधील शिरकाव सफल!

- आशय गुणे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलाम... एकदम कडक...

ज्यांचा तबला तासन् तास ऐकला तरी कंटाळा येत नाही अश्या झकीरजींच्या बरोबर तुम्ही प्रत्यक्ष आहात हे फार भारी आहे...

सही!
लिहिलंय देखिल सुरेख!
तुमचे तबल्याबद्दल जे विचार ऐकून तुम्हाला ही संधी मिळाली ते इथेही लिहाल का?

माय गुडनेस आशय - कसल्या मोठ-मोठ्या कलाकारांना भेटण्याचे भाग्य लाभले तुला ...... ग्रेट, सिंपली ग्रेट ..

यावर कडी म्हणजे त्यांच्याकडून तुझे कौतुक !! तुझे स्वर-ताल यांचे अनावर प्रेम, संगीत-विषयातले ज्ञान, त्यातली जाण, ते सांगण्याची हातोटी - या सगळ्यामुळेच हे कौतुक झाले.... ब्राव्हो ..... खूप खूप मस्त वाटले हे सारे वाचून ....

अनेकानेक शुभेच्छा .... Happy

भारीच! तुम्ही अतिशय भाग्यवान आहात! ( संगीताबद्दल तुम्हाला असलेले प्रेम व त्यासाठी तुम्ही घेत असलेले कष्ट दोन्हींना मान देऊनही म्हणावेसे वाटते कि तुम्ही भाग्यवान आहात Happy ). झाकिरजींना प्रत्यक्ष सिंफनी बसवताना बघणे हा केवळ अमुल्य अनुभव असणार.
गेल्या महिन्यात झाकिरजी, शंकर महादेवन, लुई बँक्स, संजय दिवेचा आणि डेव्ह हॉलंड ह्याचा भारतीय व पाश्चात्य जॅझ संगीतावरचा कार्यक्रम बघायला मिळाला. त्यात रचना लुई बँक्स व इतरांच्या असल्या तरी झाकिरजी सूत्रधार होते. निव्वळ अप्रतिम अनुभव होता. जॅझ संगीतप्रकारात भारतीय तबला व राग इतके सुंदर गुंफले होते कि मी अक्षरशः अवाक झालो. भारतात हा कार्यक्रम कधी झाला तर जरूर बघा. व होणार नसल्यास तुमच्या मित्राला सांगुन जमवता येतोय का बघा. तो ज्या लेव्हल ला काम करतोय तिथे त्याला नक्किच शक्य असेल असे वाटतय.

आई आई... आशय.. हे काय अफाट घेऊन आलात.
आयुष्यं समृद्धं करणारे क्षण असतात. पण आपण कुणाचं .. कुणा अशा-तशाचं नाही.. आयुष्यं समृद्धं केलं ते त्यांनी आपल्याला सांगणं.. माझ्याच अंगावर काटा आला.
शशांकने लिन्क देऊन वाचच असा आग्रह नाही आद्न्या केल्याने आवर्जून वाचणं झालय.. नाहीतर माझ्या भिन्गिरीत राहून गेला असता ना इतका सुंदर लेख.
शशांक, पुन्हा एकदा ऋणी

प्रसन्न आणि प्रसन्नच सारे. ही खरी आमची दिवाळी म्हणावी....असल्या वाचनाने नजरेसमोर जे चित्र उभे केले आहे आशय गुणे यानी त्याची तुलना कशाशी न करणेच योग्य. दोन दिवस इकडे न आल्याने हा लेख मागील पानावर गेला होता, त्यामुळे हुकतोय असेच झाले; पण आज मायबोली स्नेही आणि एक जागरूक वाचक तसेच संगीतप्रेमी व्यक्ती शशांक पुरंदरे यानी अत्यंत आपुलकीने ह्या लेखाची लिंक देवून वाचनाची शिफारस केली.....ती पूर्ण झाल्यावर अंगी निर्माण झालेल्या आनंदाला पर्याय असेल तर पुन्हा हाच लेख वाचणे.

"..It is important to absorb knowledge from everywhere.... ~ हे वाक्य म्हणजे लेखाचे पताकास्थान झाले आहे.

थॅन्क्स आशय आणि शशांक जी.

वॉव! सुंदर अनुभव! आयुष्य समृद्ध करून टाकणारा! मांडलंयही सुंदरच!
<<<<<<<उस्तादजींनी मला 'Mr. Writer' केले होते>>>>>>> ग्रेट!
आणि हो..................<<<<< तिथे मी कसा पोहोचलो ही एक वेगळी कथा आहे जी एका वेगळ्या पोस्ट मध्ये सांगीनच.>>>>... हेही जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

हिम्स्कूल - धन्यवाद! अगदी योग्य वर्णन केलत! Happy

हर्पेन - धन्यवाद! नक्की लिहिन! विषय डोक्यात घोळतो आहे. काही दिवस जातील मांडायला! Happy

avani, Mo, रंगासेठ, कंसराज - धन्यवाद! Happy

चौकट राजा - हो, भाग्यवान आहेच! Happy तुम्ही सांगत आहात त्या कार्यक्रमाबद्दल ऐकून आहे. यु-ट्यूब वर त्याची झलक देखील पाहिली आहे. झाकीरजींचे कल्पनाशक्ती जबरदस्त आहे! तबला अशा वेळेस एक साथीचे वाद्य राहत नाही, तर त्याला एक स्वतंत्र स्थान मिळते. तालाची एक वेगळ्या प्रकारची गुंफण होते.

शशांक पुरंदरे - खूप खूप धन्यवाद! कुणी आपला लेख दुसऱ्याला वाचायला सांगणे हे खूप आनंद आणि समाधान देणारे असते. तेच तुम्ही करीत आहात. त्यामुळे इथे मायबोली वर देखील मी भाग्यवानच आहे! Happy

दाद - तुमच्याकडून दाद मिळते आहे हे खरंच खूप मोठे आहे. आयुष्य समृद्ध होते हे अगदी खरं आहे.

अशोक - मनापासून धन्यवाद! अशी प्रतिक्रिया मिळाली की नक्कीच दिवस चांगला जातो! Happy

वर्षु नील - धन्यवाद! Happy

मानुषी - धन्यवाद! हो, ते लिहीन काही दिवसात! Happy

फारच छान लेख.

उस्ताद झाकिर हुसेन यांचे तबलावादन (तबल्यामधला त सुद्धा माहित नसलेल्या माझ्यासारख्या ढ लोकांना) तासनतास का ऐकावसं वाटते..काय नक्की जादु आहे त्यांच्या वादनात.. याबद्दल कधीतरी कृपया लिहाल का?
अवांतर..
काही वर्षापुर्वी दूरदर्शनवर "साधना" नावाची एक मालिका आली होती.(शशी कपूर प्रेझेंट करायचे) त्यात झाकिर यांचा एक एपिसोड होता. किती वेळा ऑनलाईन शोधला पण मिळाला नाही. अशा माणसांबद्दल कितीही वाचले/ऐकले तरी कमीच वाटते.

अजमेर शरीफ. अगदी अगदी !
किती भाग्यवान आहात. झाकीरजी भेटले म्हणूनच केवळ नव्हे, तर संगीतावर एवढं प्रेम करता त्यासाठीसुद्धा.

साउंड बाबत खूप particular and perfectionist आहेत म्हणे. स्वतः सेटिंग नीट पाहिल्याशिवाय आणि समाधान वाटल्याशिवाय वाजवत नाहीत म्हणे. खरे का ?

साउंड बाबत खूप particular and perfectionist आहेत म्हणे. स्वतः सेटिंग नीट पाहिल्याशिवाय आणि समाधान वाटल्याशिवाय वाजवत नाहीत म्हणे. खरे का ?>>

रैना हे अगदी खरं आहे.. मी, शिवजी आणि त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो.. तेव्हा.. शिवजींच्या संतूरचा आवाज माईक मधून नीट येत नव्हता तेव्हा झकीरजी स्वतः खाली उतरून माईकवाल्या पाशी गेले आणि सेटींग करुन योग्य तसा आवाज येतो आहे की नाही ते बघून, शिवजींबरोबर चेक करुन मगच परत जागेवर जाऊन बसले..

हे वाचूनच अंगावर शहारे आले. झाकीरना तबला वाजवताना बघून हे हाडामासाचे माणूस आहेत यावर विश्वासच बसत नाही. आणि चेहरा तर असा प्रसन्न आणि खट्याळ असतो, कि जणू काही दुसर्‍याच कुणाचे तरी हात तबला वाजवताहेत.

झाकीरजी व शंकर महादेवन ह्यांचा इथे कार्यक्रम झाला तेव्हाचा किस्सा -
झाकीरजींनी कार्यक्रमाची सुरुवात केली व सर्व कलाकारांची ओळख करून दिली. एक एक कलाकार स्टेज वर आला तसा टाळ्यांच्या गजरात स्वागत झाले. सर्वात शेवटी शंकर महादेवन आले व त्यांना सर्वात जास्त टाळ्या आणि प्रेक्षकातून हाका आल्या. झाकिरजींनी माईक घेतला व म्हणाले ,"शंकर खरतर आमच्यातला सर्वात तरूण कलाकार आहे पण जिथे जिथे आम्ही त्याच्या बरोबर जातो तिथे तिथे त्याला अशाच टाळ्या मिळतात व असेच स्वागत होते. एवढ्या तरूण वयात त्याने मिळवलेले यश आणि लोकप्रियता बघून आम्हा सगळ्यांना त्याचा फार अभिमान वाटतो. सद्ध्या "आय" प्रॉडक्टस चे दिवस आहेत, आय पॅड; आय फोन वगैरे.. आणि शंकर खरच एक "आय कॉन" आहे." ह्यावर शंकर महादेवन हातात माईक घेऊन झाकिरजींकडे बोट करून म्हणाले "आणि तुम्ही "आय कॉन प्लस" आहात!" ह्या वाक्यावर ज्या टाळ्या कडाडल्या त्या ५ मिनिटे थांबल्या नाहीत...:)

मस्त लिहिलंय!
मोठे कलाकार नम्र असतात असं म्हणण्यापेक्षा, ते नम्र असतात म्हणून मोठे असतात असं मी म्हणेन.
तुम्हाला एक विनंती आहे,
शक्य झाल्यास, शास्त्रीय संगीतात साथीचा तबला, एकल तबला- हे कसे ऐकावेत? याबद्दल काही ऑडिओ किंवा व्हीडिओ रेकॉर्ड करू शकलात तर फार बरे होईल. तबला ऐकताना बर्‍याचदा 'द्रुत लयीत' वाजवलेलं चांगलं असा सर्वसामान्य श्रोत्याचा समज होत असलेला दिसतो. त्या अनुषंगाने जर कमी लयीतले वादन ऐकताना कोणत्या गोष्टींवर भर द्यावा? असे काही मार्गदर्शन म्हणा, तुमचे विचार म्हणा, ऐकवाल का?

खूप सुंदर!

पण हे फक्त हिमनगाचे टोक दिसले. आम्हाला संपूर्ण हिमनग पहायची मनिषा आहे. तुमचे संगीतावरचे - खासकरून तालवाद्यांवरचे - विचार वाचायला खूपच आवडतील.

आणि असे अविस्मरणीय प्रसंग तुमच्या जीवनात वरचेवर येवोत ही मनापासून सदिच्छा.