डायलॉगबाजी...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मागच्या आठवड्यात एके दिवशी घरी गेल्या-गेल्या लेक मिठी मारून म्हणाली,

'बाबा, सोमवारी मला 'कल्मिनेटींग अ‍ॅक्ट'चे डायलॉग मिळणार आहेत !!!!!'

कल्मिनेटींग अ‍ॅक्ट म्हणजे यांच्या नवीन शाळेत बसवलेली छोटी छोटी नाटके किंवा पथनाट्ये.

मागच्या वेळेस "बाई मलाही डायलॉग देतील देतील" म्हणून खेळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली. अगदी अ‍ॅमेलिया बेडेलिया नाही तरी रस्त्यावरची चिन्हे किंवा आग लागल्यावरच्या सूचनांचे कथन तरी मिळेल! पण शेवटच्या दिवसापर्यंत लागलेली आशा धुळीला मिळालेली. मग भाग घेतलेल्या वर्गमित्रांच्या गप्पांमध्ये सामिल होण्यावाचून हाती काही शिल्लक नव्हते.

आताची बातमी सांगून झाल्यावर आनंदाची भरती जरा ओसरल्यावर मग हळूच म्हणाली की, "पण मला वाटलेच नव्हते, की मला डायलॉग मिळतील! मला वाटले की मला नाही मिळायचे डायलॉग! पण मला पण मिळणार आहेत!!"

तो शनिवार रविवार याच आनंदात गेला.

म्हटले, बरे झाले! एकदाचे मिळाले हिला डायलॉग!

पण सोमवारी शाळा सुटल्यावर, "... बाकीच्यांना दिले आणि मला नाही दिले डायलॉग!" अगदीच आता फोनवर बांध फुटायच्या मार्गावर.

अरे बाप रे !!!! हे काय आता? "पण मला वाटलेच नव्हते, की मला डायलॉग मिळतील! मला वाटले की मला नाही मिळायचे डायलॉग! पण.. मलापण मिळणार!! एवढी मार्गक्रमणा केल्यावर आता हा धक्का कसा पचवायचा? तशी सहसा उघडपणे थयथयाट करत नाही. पण आतल्या आत चालू असते. त्याचा उद्रेक कुठेतरी होतोच एवढे नक्की! शाळेतले पण आधी आशा लावून ठेवतात आणि मग का लटकवतात?

आज परत शाळेतून आल्या आल्या फोन!
"बाबा !!!!!
मला डायलॉग मिळाले !
म्हणजे पेपरवर मिळाले !
माझ्या नावाचा पेपर !!! आणि त्यावर लिहिलेले डायलॉग !!!
म्हणजे ते माझेच आहेत ! म्हणजे चुकून दुसर्‍या कोणाचे तरी मला दिलेले नाहीत !
थांबा, मी वाचूनच दाखवते ! ऐका ! थांबा, आणि फोटो पण काढून पाठवते !!!
आता मी दोन दिवस काही अभ्यास करणार नाही आणि खेळणार नाही ! डायलॉग्जचीच प्रॅक्टीस करणार !
मला आज शाळेतही जरा फ्री वेळ मिळाला तर मी हेच करत बसले होते !

मला तर, मलाच डायलॉग मिळालेत इतका आनंद झाला.

तिचे डायलॉग्ज बघितले तर पाचसहा ओळीच असतील. ते बघून मला "काय हे एवढेसे डायलॉग" असे वाटले. पण मग वाटले की नाही, जो सादर करणार आहे त्याच्यासाठी डायलॉग्जची लांबी किती आहे यावर त्यांचे महत्त्व अवलंबून नसावे. हातात डायलॉग मिळाल्यापासून (नव्हे ते मिळायच्या आधीपासूनच !!) ते सादर करेपर्यंत आणि सादरीकरणानंतर स्टेजवरून पायउतार होऊन त्याची झिंग उतरेपर्यंतचा प्रवास हा दोन ओळीच्या सादरीकरणात आणि दोन पानाच्या सादरीकरणात सारखाच असणार! स्टेजवरचा काळ तेवढा बदलेल.

प्रकार: 

मस्त रे!! हे असंच मी देखिल अनुभवतोय सध्या. मराठी कविता सादर करायची आहे. पाठांतर, अभिनय छान होतोय. पण.. सर काल म्हणाले की कवित 'गातेस' असं वाटतय. मग आम्हाला टेंशन आलंय. सिलेक्ट होऊ की नाही याचं. Happy गेल्या वर्षी सिलेक्ट झाली नव्हती तर खुप वाईट वाटलेलं. म्हणुन यंदा जोरदार प्रॅ़क्टीस केलीये., बघुया.

एवढुश्या लहान बाळांना एवढा ताणतणाव का सहन करावा लागावा ? नाही मिळाली संधी तर घरी, सोसायटीत, मित्रमंडळीत कला सादर करू द्यावी. लहान मुलांचे हिरमुसलेले चेहरे बघवत नाहीत.

अगंगं! काय त्या लहनश्या जीवाची घालमेल.

वाचता वाचता मलाच वाटत राहील हिला dialogue मिळू दे रे देवा शेवटी >>>>>>>>>> +१

मस्त लिहिलेय

माझे असे एक दोनदा हिरमोड झालेत . पण नंतरच्या झिंगेपुढे हिरमोडाना माफ़ करुन टाकलेय

Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
स्वाती, शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

शुगोल, अगदी!

भ्रमरा, गातेय तर मग अजूनच चांगले ना? Happy

हे आजच वाचलं मी.

गजानन, खूप छान लिहीलंयत, अगदी पटलं. आपलं बालपणही आठवलं. असंच काहीसं फिलिंग असायचं आपल्याला नाटकात/नाचात वगैरे सिलेक्ट करणार/करणार नाहीत याची वाट बघताना.

आपल्याला नाही सिलेक्ट केले तरी काही वेळातच हे विसरुन जात असू पण आता आपल्या मुलांचं हिरमुसलेपण सहन होत नाही. असं वाटतं की त्यालाही संधी मिळावी.

माझ्या लेकाच्या शाळेत गॅदरिंगच्या वेळी १००% पार्टिसिपेशन हा नियमच आहे. प्रत्येक मुल हे स्टेजवर येऊन पर्फॉर्म करणारच असतं, त्यामुळे असे प्रसंग गॅदरिंगच्या वेळेस तरी येत नाहीत.

लेख आवडला, रिलेट करता आला.

खूप छान लिहीले आहे. खरचं लहान मुलांना पण किती ताण असतो ना ? बघवत नाही.

माझी मुलगी लहान असताना गरबा नाचता येत नाही म्हणुन रडत रडत घरी आली होती. मीच किती हिरमुसली झाले होते. मुलीकडे तर बघवत नव्हते.

पण त्या नंतर तिला नाचाच्या क्लासला घातलं त्यामुळे पुढच्या वर्षी तिला छान गरबा जमला. तेव्हा तिला नाचताना बघुन आम्हाला किती आनंद झाला होता त्याची आठवण आली.

मस्त लिहिलंय गजानन. खरंच मुलांना अशा छोट्या गोष्टीत हिरमुसलेलं बघवत नाही आणि त्यांची समजूत काढायला शब्दही सापडत नाहीत.

मस्त लिहिलंय गजा. आरोहीच्या आनंदाने अख्ख घर आनंदून गेलं असेल. तिला म्हणावं एकदम कॉंफिडंटली म्हण.

धन्यवाद मंडळी. Happy

आशू, तुला काय आठवले आम्हालाही सांग!

बरे, यावेळेच्या अ‍ॅक्टमध्ये खारूताईचा रोल मिळाला आहे.
खारीचा पोषाख काही आमच्या इथे भाड्याने किंवा विकत मिळायची शक्यता आता मावळू लागली आहे.
(अ‍ॅक्ट.. व्हाय ऑलवेज दी जीव हॅज टू गो टू टांगणी.)

मध्ये थोडे दिवसही हातात आहेत, तर घरीच करू या का असाही विचार मनात आला.

तेंव्हा तुम्हाला खारीच्या गेटप करता काही कल्पना डोक्यात असतील किंवा अंमलात आणलेल्या असतील तर कृपया इथेही सांगा. आम्हाला मदत होईल. धन्यवाद.

हे वाचलंच नव्हतं .. छान लिहीलंय .. Happy

मी शाळेत असताना कुमार कला केन्द्र तर्फे (हीच संस्था असावी .. नाव नीट आठवत नाही) आंतरशालेय नाट्य स्पर्धा असायच्या .. शाळेतली "अ‍ॅक्टींग" येणारी नावं ठरलेली होती आणि सहसा तीच असायची शाळेच्या स्पर्धेसाठीच्या नाटकात .. माझी खूप इच्छा होती दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहातल्या स्टेजवर जिथे स्पर्धा होत असे तिकडे स्टेजवर एकदा आपल्यालाही जायला मिळावं .. पण कधी सिलेक्शन झालं नाही .. एका वर्षी नाटकाची मेन थीम अशी होती की शाळेचा एक वर्ग पिकनिक करता गोव्याला जात आहे आणि त्या प्रवासात घडलेलं नाट्य दाखवायचा प्रयत्न केला होता .. कसलेही प्रॉप्स न वापरता हा प्रयोग केला होता आणि प्रयोगाला बक्षीसही मिळालं होतं त्या वर्षी .. तर ह्या नाटकासाठी मास रिकृटमेन्ट केली होती Happy बरिचशी मुलं आमच्यापेक्षा एक वर्ग मोठ्या असलेल्या वर्गातून निवडली होती आणि आगेमागे असलेल्या इयत्तांमधून काही "प्रेझेन्टेबल (?)" चेहरे निवडले होते .. परत एकदा मला खूप आशा होती की किमान ह्यावर्षी तरी स्टेजवर जायला मिळेल (क्राउड मधून) पण नाहीच झालं त्या वर्षीही सिलेक्शन .. माझ्या दोन अगदी क्लोज मैत्रिणींचं सिलेक्शन झालं .. त्यावर्षी एकटीने ऑडियन्स मधून नाटक बघताना खूप हिरमुसले होते .. Happy

(किती लहान वयात असे अनुभव येणं ओके आहे हे मला माहित नाही .. पण शेवटी हे अनुभव येणारच बाहेरच्या जगात .. तेव्हा मनासारखं नाही झालं आणि ते मनासारखं करून घेणं आपल्या कंट्रोल मध्ये नसेल तर ते विसरून "मूव्ह ऑन" करता येणं महत्वाचं .. हा लाईफ एक्स्पिरिअन्स खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं .. :))

ह्यावर्षी खारूताई व्हायला मिळणार हे ऐकून मस्तच वाटलं .. डिस्ने वगैरे सारख्या भारतातल्या थीम पार्क्स मध्ये चिपमंक्स वगैरे चे कॉस्च्युम्स घालून पोरांचं मनोरंजन करणारे असतीलच ना? त्यांच्यासारखा कॉस्च्युम मिळवता येईल का? Happy

छान लिहीलंय !
<< व्हाय ऑलवेज दी जीव हॅज टू गो टू टांगणी.>> लहान मुलांसाठी व पालकांसाठी एक वैश्विक अनुभूतिच असावी ही !!

Pages