शिरवळ्या / शेवया ( सोप्पी पद्धत )

Submitted by इन्ना on 23 October, 2015 - 06:58

मी पाककॄती ह्या सदरात काही लिहीतेय ह्याच मलाच खरतर जाम हसू येतय .
त्यातही हा पदार्थ कोकणातला फार खटाटोपाचा. मुद्दम इथे लिहितेय कारण एक हाती पाऊण तासात बनवून उत्तम ( आजीची आठवण झाली वगैरे कॉम्पीमेंट्स मिळवण्याइतका ) झाला .

दसर्‍याला सहसा बासुंदी करतात आमच्या घरी. ह्यावेळी वेगळ काही कराव म्हणून हा घाट घातला . ( घाट घातला म्हणजे कसं भारदस्त , खूप कठीण पदार्थ जन्माला घातल्याचा फील येतो Wink ) माझ्या स्वैपाकघरातल्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास असल्यानी , आयत्यावेळी श्रिखंड आणायच मनात योजून ठेवल होतं . आता नमनाला घडाभर तेल झाल्यावर मुळ विषयाकडे वळू.

आजची रांगोळी दुर्गेची काढून , दसर्‍याची सुरवात केली
durgaa

कोकणातल्या लोकाना हा पदार्थ माहित असेल , बाकिच्यांसाठी थोडाक्यात वर्णन म्हणजे , तांदळाच्या उकडीच्या शेवया अन नारळाचा गुळ घालून रस.

लागणार साहित्य - शिरवळ्यांसाठी/ शेवयांसाठी
१) तांदळाच पिठ, - ५ वाट्या
२) उकडीसाठी पाणी - ५ वाट्या
३) तेल -४ चमचे
४) चवी पुरत मिठ.
५) सगळ्यात महत्वाचा तो शेवगा उर्फ मोठा सोर्‍या.

साहित्य - रसासाठी
१) कोकोनट मिल्क पावडर ( इथे मॅगीची मिळते)/ तयार नारळाच दुध .
२) कनक गुळाची पावडर
३) वेलची / जायफळ वगैरे जो स्वाद आवडत असेल त्याप्रमाणे.

तांदळाच्या पिठाएवढ पाणी काटेकोर मोजून जाड बुडाच्या पातेल्यात तेल अन मिठ घालून उकळायला ठेवायच. त्यात मोजलेले तांदळाच पिठ घालून वरून झाकण ठेवायच. सुगरणींना सुचना दोन वाफा काढायच्या. पण आपण त्या क्याट्याग्रीत नसल्यानी अन वाफा दोनदा कश्या मोजायच्या ते न कळत असल्यानी , दहा मिनिटानी उकड झाल्याच जाहिर करायच. हवतर त्या मधे दोन दा झाक ण उघडून पहायच , वाफ बाहेर येते. दोनदा. Happy

ही झालेली उकड साधारण अशी दिसते.

ukad

हे झाल की सोर्‍या उर्फ शेवगा असेंबल करून घ्यायचा. खास बेळगाव हून बाबां नी आणलाय. सुरेख पितळी कास्टींग आहे. नट बोल्ट अन पाना सगळ किट अगदी देखणं.

shevagaa 1

असेंबल करून असा दिसतो .

shevagaa 2

हे सगळ करेपर्यंत सोर्‍यात बसतील अश्या आकाराचे उकडीचे लांबट गोळे करून ठेवायचे.
ते साधारण असे दिसतात.
ukaD 3

मग एका पोठ्या पातेल्यात पाणी ककळत ठेउन त्यात हे गोळे सोडायचे. परत सुगरण लोकं हे वाफवून घेतात मोदक पात्रात. पण परत आपण त्या गटात मोडतच नसल्यानी अन वाफ मापक यंत्र नसल्यानी दोन वाफा चार वाफा मोजत बसण्या पेक्षा गटांगळ्या खाणारे गोळे जमतात. हे बुडाला बसलेले गोळे तरंगायला लागले की झाले अस समजायच.

ukaD 4

पहिल्यांदा करताना, उकळून पाणी गढूळ पांढर होउन , बुडाशी दिसणारे गोळे , दिसेनासे होतात.

ukad 5

अरेरे हुकल बहुतेक, आम्रखंडाचे डबे आणायला पाठवाव का ? कशाला नसते उद्योग ओढवून घेते मी ? वगैरे सैर करून आपण येइपर्यंत पहिला गोळा तरंगायला लागतो.

gola

झालेला गोळा असा तुकतुकीत दिसतो.

हुश्श ! म्हणून एका ताटात काढायचे. इथून पुढचा कार्यक्रम फास्ट होतो. चला , पानं वाढलीत च्या हाका मारून लोक स्थानापन्न होईपर्यंत आपण पहिला गोळा शेवग्यात घालायचा. दुसर्‍या वेळी बनवता तेव्हा हा गटांगळ्या वेळ रस करायला सत्कारणी लावायचा . तयार नारळाच्या रसाच पाकिट मिळतं अथवा पावडर मिळते. पावडरीच्या खोक्यावर पाणी किती त्याच प्रमाण लिहिलेल असतं . अश्या बनवलेल्या रसात आपल्या चवी प्रमाणे गुळ घालायच. मी कनक गुळाची पावडर वापरते . खडे विरघळायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात गुळ विरघळून रस तयार होतो. मी कोणताही वेगळा स्वाद ह्यात घालत नाही पण वेलदोडा/ जायफळ पारंपारिक कृतीप्रमाणे घालता येइल. ( दालचिनी जर्रा कंटेंपररी Happy )

ras

तर अश्या रितीने तयारी पुर्ण झाल्यावर , शेवग्यातून प्रॉडक्शन सुरु करायच. मग ऑस्ट्रेलियन शेफ च्या कार्यक्रमात कॉन्टेस्टंटा नी पेश करावेत अश्या थाटात आपण शिरवळ्यांची डिश समोर करायची. समोरचेही स्वतः मोठे ज्युरी असल्याच्या थाटातच बसलेले असतात . पण शिरवळ्या अन रसाचा पहिल्या घासाबरोबर नानी याद आती है. Happy ह्या शेवग्यातून शिरवळ्यांचे घाणे काढणे अक्षरशः बच्चोंका खेल आहे. त्याना तो खेळू द्यावा. Happy

shevayaafinished

माझ्या लहानपणी आजी , उन्हाळ्याच्या सुटीत सगळा गोतावळा जमला की हा घाट घालायची. तेव्हा लाकडी शेवगा होता अन त्यातून शिरवळ्या करने हे मजबूत खांदे असलेल्यांच काम असायच. अन नारळाचा रस देखिल नारळ खवून , वाटून , गाळून वगैरे लांबलचक क्लिष्ट अन वेळखाउ कार्यक्रम होता. मागणी अन पुरवठा ह्यात तारांबळ व्हावी इतका गोतावळा असायचा . शेवग्या चे खूर धरायला एक , गोळे घालायला एक अन शिरवळ्या करायला एक, रस करणारी आजी ( बाकीचे सगळे पातळ पुळकावनी करतात अस वाटायच तिला. ) गप्पा, गाणी , चिडवाचिडवी , अन खाउन तुडूंब आहोत तिथेच आडवे व्हावे इतक आग्रहानी खायला घालणारी आज्जी. एक सुरेख अन फुलफिलिंग ( पोट अन मन दोन्ही) कार्यक्रम !
कालच्या शिरवळ्या सोप्प्या होत्या , चव सेम!! फक्त वातावरण निर्मिती करायला गोतावळा नव्हता एवढीच खंत. पोटं भरल पण मनासाठी आठवणीच फक्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषीतै, बेळगावात एक कामत म्हणून आहेत . त्यांच्याकडे मिळतो हा सोर्‍या. त्यांचे डिटेल्स मिळवून सांगते. गोतावळ्यात यायला आमंत्रणच आहे Happy
हर्पेन , Happy

हेच आमचे इडीअप्पम!!! Proud

ज्यांना घाट घालायची भिती वाटतेय आणि चवीला कसे लागतील हे कळत नाहीये अशांसाठीचः बाजारात इन्स्टंट इडीअप्पमची पाकिटं मिळतात. ती आणून गरम उकळत्या पाण्यात पाच मिनिटं ठेवायची. इडीअप्पम तयार. इन्संट पावडरचं नारळाचं दूध तयार करून लगेच चव घेऊन पहा. नक्कीच आवडतील. (इन्स्टंट इतके चवदार, मग मूळ रेसिपीनें किती चवदार लागेल याचे गणित मनाशी करून पहा)

वरच्या फोटोतला सोर्‍या नसेल त्यांनी: अंजलीचा चकलीचा सोर्‍या बिनधास्त वापरा. मस्त शेवया होतात, पण वरच्या सोर्‍याइतक्या बारीक आणि नाजुकसाजुक होत नाही. पण चव येते.

इन्ना: मस्त रेसिपी. आमच्याकडे हा प्रकार शेजारी लोकं करतात आणी वानवळा म्हणून देतात. सोबत नारळाचे दूध असलं तर अन्यथा बृयाचदा मटण अथवा चिकनचा रस्सा अस्तो. (खाणार्‍यांनी हाही प्रयोग करून बघा)

तो पितळी सोर्‍या कसला क्युट आणि सही दिसतोय.!!! एकदम हीरो मटेरीअल.

सुंदर कृती आणि फ़ोटो. Happy
इन्ना, तु कृती लिहणार, हे मला वाटलच होतं Proud
कोकणात बालपण गेलं, पण हा पदार्थ कधी खाल्ला नाही. अर्थात मी मालवण परिसरात नव्हते. Happy

शोभा , शिरवळ्या माझ्या साठी नॉस्टॅल्जिआ चा भाग आहे. Wink
अन बर्‍याच जणांचा असेल अस वाटल म्हणून लिहिल. Happy
नंदिनी , इडीअप्पम अन चिकन स्ट्यु मस्त लागत Happy

मस्त आहेत साग्रसंगीत फोटो. रेसिपी पहिल्यांदाच बघितली. ते पुन्हा एकदा उकडून घेतलेले गोळे सोर्‍याला आतमधून भरपूर चिकटत असतील ना?
आणि >>ट बोल्ट अन पान्हा सगळ किट अगदी देखणं.>> पान्हा? Lol पाना म्हणतात ना?

इथे बघायला हवं इडीअप्पम पाकीट मिळते का, मंगलोर स्टोर्स आहेत बरीच, तिथे मिळेल कदाचित. नारळ रस घरीही करता येईल, किंवा तेही बघेन मिळते का (आळशीपणा माझा, दुसरं काय).

शोभा कोकणात सगळीकडे नाही हा पदार्थ करत. मी तर पहिल्यांदा टीव्हीवर बघितला.

शोभा , शिरवळ्या माझ्या साठी नॉस्टॅल्जिआ चा भाग आहे. डोळा मारा
अन बर्‍याच जणांचा असेल अस वाटल म्हणून लिहिल. >>>> माझा आहे . म्हणजे अगदी आमच्या लहानपणी वगैरे म्हणण्या ईतके नाही , कारण आई अजूनही करते .
अशाच नाचणीच्या ही करतात .आईकडे लाकडी सोरा नव्हता मग ती आणि आजी नेहमीचा चकलीचा पितळी सोर्या वापरून करायची .
हे पदार्थ सुट्टीच्या दिवशी करायचे आहेत . दूपारच्या जेवणात खाऊन या शेवया अशा चढतात की झोप अनावर होते.
किन्वा शनिवारी रात्री जेवणाएवजी करायच्या , म्हणजे मस्त ताणून देता येते .
आईला आता कर म्हणून सान्गितले , तर म्हणेल , जरा थंडी पडू दे मग करूया Happy

सुंदर फोटो आणि रेसिपी Happy सोर्‍या भारी. कधी लहर आलीच तर करून बघेन हा पदार्थ. नारळाचं दूध आणि गूळ हे काँबिनेशन कच्च कधी खाल्ल नाहीये त्यामुळे गोडापेक्षा तिखटाचा करेन.

शेवगा कसला भारी दिसतोय।। मला आवडला.

माझ्या लेकिला शिरवाळ्या खुप आवडतात. पण शेवगा नसल्यामुळे मी सरळ तांदळाचे पीठ चविपुरते मीठ घालून भिजवते, चकलीच्या सो-यात बारीक शेवेची चाळण घालून केळीच्या पानावर नाहीतर ओल्या रुमालावर शेव पाडते आणि मोदक वाफवतात तसे स्टीमर मध्ये वाफवते. नारळाचे मात्र दूध पारंपारिक पद्धतीने. तिथे शार्टकट नाही.

लै भारी इन्नाबेन! सुगरण आणि वाफेच्या बाबतीत अगदी अगदी Happy
स्वस्ति, नाचणीच्या कश्या सेम करायच्या की थोडॅ तांपि अ‍ॅड करायचे?

चकलीच्या सो-यात बारीक शेवेची चाळण घालून केळीच्या पानावर मोदक वाफवतात तसे स्टीमर मध्ये वाफवते>>>>>>> हो मीही असेच केले होते.तो शेवगा मस्त आहे.

इन्ना,
मस्त पाककृती. Happy

मृण्मयी,
इन्स्टंट इडिअप्पम पुण्यामुंबईला मिळतात. विद्यापीठाकडून एनसीएलकडे जाणार्‍या रस्त्यावर एनसीएल मार्केट आहे. तिथे दाक्षिणात्य खाद्यवस्तूंचं एक दुकान आहे, तिथे ही पाकिटं मिळतात. हल्ली औंध-पाषाण-बाणेर या भागांतही अशी दुकानं झाली आहेत, तिथे नक्की मिळतील. माझी आई घरी इन्स्टंट इडिअप्पम करते. तिला कृती विचारून इथे लिहितो.

मस्त रेसिपी , ह्या शेवया डायरेक्ट खायच्या असतात का ? ( म्हणजे नेहमीच्या शेवयांसारखं नि शिजवता)
बायदवे, 'अंजलीचा सोर्‍या' हा काय प्रकार आहे ?

वा! मस्त.

आमची पद्धत अशीच. पण आम्ही खोबरं टाकतो पीठात. नारळाच्या दूधाबरोबरच खातो.

गूळ विरघळवून नारळाच्या रसात घ्यायचा, त्यात वेलची, केसर आणि जायफळ टाकायची.

नाहितर , फोडणी द्यायची भरपूर खिसलेले खोबरे, सुकी लाल मिरची आणि मोहरी फक्त.

अरे ३ लोकांनी विचारुनही ही इन्ना खायच्या कशा सांफ सांगत नाहीये. !! देशावरल्या लोकांना एकदमच इग्नोरस्त्र मिळतय! असो! सही वाटतोय पदार्थ! असही करुन बघण्याची शक्यता नसल्याने कसे का खाईनात लोक! Proud

मस्तं रेसिपी
शेवटच्या फोटोत सर्व केलेल्या फायनल प्रॉडक्टला असे खा-

एक चमचा घ्या.
थोड्याश्या शिरवळ्या त्यात घ्या.
आता शिरवळ्यांसह तो चमचा नारळाच्या रसात बुडवा.
मग तो चमचा - शिरवळ्या आणि रसासह तोंडात घाला आणि खा.

(चॉपस्टिक वापरून शिरवळ्या रसात डीप करून खाऊ शकता.)

मस्तं गावठी प्रकारे खायचं असेल तर एका पसरट प्लेटीत शिरवळ्या पसरा त्यावर रस घाला.
रसात शिरवळ्या जरा डुंबू द्या.
आणि मग हाताने किंवा चमच्याने हादडा.

माझ्या मालवण मधिल घरि जुना लाकडि सोर्या आहे. तो भारि डुगडुगतो. शेवाया छान होतात पन शेवयासाठि गावि जाने नाहि
हा मेटल चा मस्त आहे. मुम्बै मध्ये कुठे मिलेल

>>मृण्मयी,
इन्स्टंट इडिअप्पम पुण्यामुंबईला मिळतात.

चिनूक्स, ते मृणाल १ ह्यांनी विचारलं आहे. Happy पण सुकवलेल्या (उकळत्या पाण्यात घालून फुलवता येण्याजोग्या) असतील तर दुकानाच्या पत्त्याचा मलाही उपयोग होईल. मागवता येतील.

मस्त दिसतोय घाट. मला नाही वाटत मी कधी स्वतः करून पाहिन आणि आधी पण खाल्ला नाही. त्यामुळे कुणी गोतावळा जमवणारं असेल तर त्यात माझं नाव टाका.

हे खास दक्षिण कोकणातले पदार्थ खाण्यासाठीची एक टूर करायला पाहिजे असं अशा पाककृत्या वाचल्या की नेहमी वाटतं. लिहायची स्टाइल पण मस्त आहे इन्ना Happy

मृण, इंग्रोच्या फ्रोझन सेक्शनमध्ये मिळतात इदियप्पम. मिळाल्यास एकमायक्रोवेवेबल डब्यात शेवयाची डिस्क काढायची. डबा बंद करून ४ मिनटे मायक्रो हायवर गरम करायचे. वापरायचे. या प्रकारे शेवयांचा उपमा मस्त होतो.
शेवया फ्लफ्फी आणि मौच हव्या असतील तर चाळणीत घालून वाफवायच्या १५ मिनिटे.
श्री, तिला अंजली ब्रॅण्डचा सोर्या म्हणायचयं.

Pages