हायवे - हिंदी चित्रपट

Submitted by दिनेश. on 11 October, 2015 - 06:10

हायवे, हा इम्तियाच अलीचा गेल्या वर्षी आलेला चित्रपट. मायबोलीवर शोध घेतला, तर कुणी यावर लिहिलेले दिसले नाही, म्हणून लिहितोय.

कथानकात नाविन्य नाही पण त्याच्या हाताळणीत आणि अभिनयात नक्कीच आहे.

उद्या परवावर लग्न आहे वीराचे. आणि अश्यात रात्री ती आपल्या नियोजित नवर्‍यासोबत भटकंतीला जाते. शहरापासून लांब. तो रस्ता सुरक्षित नाही असे तो वारंवार सांगत असतो तरीही आणखी पुढे आणखी थोडा वेळ
असे ती सांगत राहते.. आणि काहीही ध्यानीमनी नसताना तिचे अपहरण होते.

अपहरणकर्त्याला जेव्हा कळते कि ती एका बड्या बापाची मुलगी आहे तेव्हा तो आणि त्याचा बॉस हडबडतात, पण अपहरणकर्ता ठाम राहतो आणि तिला घेऊन भटकत राहतो.

अश्या कथानकात त्या मुलीचे अपहरणकर्त्यावर प्रेम बसणे, हे आपण नेहमीच बघतो.. पण त्या प्रेमाचा एक वेगळाच पोत या चित्रपटात दिसतो. आणि तो पोत पुढे पुढे आणखी घट्ट होत जातो, पण कुठेही हिंदी चित्रपटाच्या
पारंपारीक प्रेमाचा रंग घेत नाही.

तिला आधी नेमके काय होतेय याचे भानच नाही असे वाटते. भ्रमिष्टासारखी बडबड करत राहते ती. आणि तोही
नेहमीसारखा क्रूर वागत राहतो. तिला एके क्षणी तो जा पळून जा असे सांगत मोकळा सोडतो, पण त्या वाळवंटात
ती कुठे पळून जाणार ? आणि पुढे एकदा संधी असूनही ती पळून जात नाही.

बंदीस्त जागेत तिचा जीव घाबरतो. त्यामूळे ती काही सवलती मागून घेते. आणि मग एका क्षणी तिच्या भितीचे कारण उघड करते. तिला पळवून नेण्यामागचा त्याचा हेतूही तिला माहीत असतो, त्याच्या हातून तीन खून झालेले असतात. तरीही त्याच्या एका वेगळ्याच पैलूचे तिला दर्शन होतेआणि या या दोन धाग्यांनी त्यांचे नाते अधिकाधिक गहीरे होत जाते.

या कथेचा शेवट काय होणार हे आपल्याला माहित असतेच, आणि तो तसा होतोही पण त्यानंतरही चित्रपटाची कथा पुढे जाते, आणखी उंचीवर.. (आतपर्यंत हा चित्रपट चॅनेलवर दाखवलाही असेल, पण तूम्ही बघितला नसेल तर अवश्य पहा )

रेहमाने संगीत आहे आणि त्याने बहुतांशी लोकसंगीताचाच वापर केला आहे. ते ज्या भागातून प्रवास करतात त्या भागातील लोकसंगीताशी त्यां गाण्याचे नाते जुळून गेलेय आणि ती गाणी वेगळी अशी जाणवतही नाहीत पण त्याचवेळी लक्षही विचलित करत नाहीत.

चित्रपटासाठी निवडलेली लोकेशन्स अप्रतिम आहेत. खरे तर ती इतकी अप्रतिम आहेत कि कॅमेरामनला केवळ
स्पष्ट चित्रीकरण करण्याचेच काम करावे लागलेय.. मला माहीत आहे असे म्हणणे, कॅमेरामनवर अन्याय आहे, कारण त्यानेही निव्वळ तेच काम आणि तेही अप्रतिम रित्या केलेय. कुठेही फ्रेम वगैरे घडवण्याचा प्रकार केलेला नाही.

चित्रपटात दोघांची बाँडी लँग्वेज ही एक खास लक्ष द्यायची बाब आहे. मला आधी चित्रपट बघताना हे जाणवले नाही पण नंतर श्रेयनामावलीत वाचले तेव्हा कळले कि त्यावरही मेहनत घेतलीय. सगळ्याच प्रसंगातून ते जाणवते, तरी एक प्रसंग लिहितोच. तिला दोन दिवस उपाशी ठेवल्यावर जेवण देण्यात येते. त्यात जाडजूड रोटी, कसलीतरी पालेभाजी आणि लालभडक चटणी आहे. तिला अश्या अन्नाची सवय नाही हे नक्कीच पण भूकही लागलेली आहे. त्या प्रसंगात काहिही न बोलता,तोड वेडेवाकडे न करता, ठसका न लागता ती खाते, पण तिचे हातवारे बरेच काही बोलतात.

दोघांच्या तोंडातली भाषा पण लक्ष देऊन ऐका. त्याची शिवराळ आणि तिची इंग्रजी शब्दांचा वापर असलेली.
तिही दोघांना शोभेल अशीच.

दोघांची कॅरेक्टर्स उभी राहतात ती अश्या गोष्टीतून. त्यासाठी दिग्दर्शकाला तिच्या चेहर्‍याचे सुंदर क्लोज अप्स, तिचे ओलेती दृष्य, त्याचे शर्ट काढलेले दृष्य अश्या बाबींची गरज वाटलेली नाही.

एका प्रसंगाबद्दल लिहिल्याशिवाय रहावत नाही. उगाचच भटकत असताना, एका पहाडावर तिला तिच्या स्वप्नातले घर दिसते, तिला लगेच तिथे रहावेसे वाटते. ती मॅगी शिजवायला लागते, त्याला सांगते हातपाय धुवून ये. घराबाहेर काढते, त्याला तिची काळजी वाटते, तो खिडकीतून बघत राहतो. ती जेवणाच्या तयारीला लागते, झाडलोट करते, ताटे घेते आणि त्याला हाक मारते. तो दारातच थबकतो, त्याला आत जायचा धीर होत नाही, दोनदा परत फिरतो.. तोंडावर पाणी मारतो आणि त्याला त्याच्या आईची आठवण येते, त्याला रडू अनावर होते, त्यानंतर ती त्याची समजूत काढते. दू:खाने त्याचे गदगदणे आणि आपल्या नाजूक हातांनी तिने त्याला कवेत घेणे.... हा प्रसंग दोघांनी इतक्या उत्कटपणे सादर केलाय कि आपलेही डोळे पाणावतात.

मुख्य भुमिकात आहेत रणदीप हुडा आणि आलिया भट.. त्यांची इमेज सोडा, त्यांचे रुप बघूनही कुणी त्यांना
नायक नायिका म्हणून चित्रपटात घेईल अशी कल्पनाही मी केली नव्हती. पण इथे दोघे आपापल्या भुमिकांत अगदी चपखल आहेत. इतर सर्वच लहानसहान भुमिकांतील कलाकारांचा अभिनय अगदी यथायोग्य आहे.

रणदीपला अगदी छान रोल मिळालाय. आणि त्याने तो खुपच छान साकार केलाय. हा महाबीर साकार करायला, त्याला हाणामारी, अ‍ॅक्शन, गोळीबार, पाठलाग.. असले काहीही करावे लागलेले नाही.

पण या चित्रपटातले खरे सरप्राईज आहे ते आलिया भट. मला ती स्टूडंट ऑफ.. आणि टू स्टेटस मधे अजिबात आवडली नव्हती. त्यात ती नेहमीच्या हिंदी चित्रपटातील कचकड्याच्या बाहुल्यांप्रमाणेच वाटली होती. पण इथे मात्र तिने कमालीचा उत्कट अभिनय केलाय. ( जवळजवळ मेकपशिवाय वावरलीय ) मूर्खासारखी बडबड, महाबीरचा मुकाबला, त्याच्यावरची माया, घरच्यांवरचा राग.. हे सगळेच तिने कमालीच्या सफाईने सादर केलेय.

अगदी अवश्य पहाच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगल लिहिलेय

माझा हा चित्रपट पाहायचा राहून गेलाय
आता पुन्हा टी व्ही वर आल्यास पाहणार आहे

माझा खूप आवडता चित्रपट!! त्या डोंगरातल्या घराचा प्रसंग खूप सुंदर आणि संयत घेतलाय. आलिया खरंच सरप्राईज पॅकेज आहे यात, क्लायमॅक्स मध्येही तीने कमाल केली आहे..

रॉक माय बॉडी म्हणत ती ट्रकच्या बाहेर नाचते, त्यावेळी क्लीनर असलेल्याचे expressions ची आलियाची एकंदर देहबोली हा प्रसंग जबरदस्त उभा राहिलाय.

छान लिहिलयं तुम्ही !

माझा बघायचा राहिला होता हा चित्रपट ..गेल्या आठवड्यात पाहिला. खूप आवडला! तो डोंगरावरच्या घरातला प्रसंग खूप सुंदर झालाय. तुम्ही लिहिल्याप्रमाणे त्या दोघांची बॉडी लँग्वेज अतिशय बोलकी आहे .पुर्ण चित्रपटात दोन्ही कॅरॅक्टर्सचं एकमेकांशी बोलण अगदी मोजकचं आहे तरीही त्यांच्या नात्याचा प्रवास त्यांच्या बदलत्या बॉडी लँग्वेजमधून उलगडत जातो.

आलिया खरचं सरप्राइज पॅकेज आहे यात. वीराची बडबड, निरागसता, समजूतदारपणा सगळचं छान उभं केलय तीने. आणि रणदीप हुडा नेहमीच चांगला अभिनेता वाटतो. त्याने केलेला महाबीर अगदी खराखूरा वाटलाय. महाबीरचं वागणं, बोलणं,चेहर्‍यावरचे भाव ,भाषेचा लहेजा खूपचं नैसर्गिक उभं केलयं त्याने... चित्रपटाच्या शेवटाकडे एका प्रसंगात तो आलियाला परत जायला सांगतो त्यात त्याच्या चेहर्‍यावर इतकी हतबलता दिसते की तेव्हा इतर चित्रपटांमधे सनकी व्यक्तिरेखा करणारा हाचं तो माणूस हे खरं वाटत नाही

अगदी संपूचं नये असा वाटणारा प्रवास आहे हायवे..

दिनेशदा, हायवे माझाही आवडीचा चित्रपट... त्यातली सगळी गाणीसुद्धा आवडती... स्पेशली "माही वे..." जे शेवटी येतं. आलीयाने टू स्टेट्स मध्ये स्टुडंटपेक्षाही बरं काम केलं होतं आणि तिचा "हम्टी शर्माकी दुल्हनिया" चित्रपटपण पाहण्यासारखा आहे. ती अगदीच मख्ख चेहेर्‍याची अभिनेत्री नाही हे तिने या चित्रपटांतून सिद्ध केलंय.

तुम्ही फार मोजकं लिहिलंत, कारण या चित्रपटात समजून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. चाईल्ड अब्यूज, श्रीमंत घरात चालणारी छानछौकीच्या आतलं किळसवाणं वर्तन, स्वतःचा शेवट डोळ्यांनी दिसत असतांनासुद्धा रणदीपचं होणारं परीवर्तन आणि त्याचा होणारा शेवट, त्यामुळे घाबरलेली आणि त्यातूनच लढण्याचं बळ मिळालेली आलीया...

<<<तिला एके क्षणी तो जा पळून जा असे सांगत मोकळा सोडतो, पण त्या वाळवंटात ती कुठे पळून जाणार ? आणि पुढे एकदा संधी असूनही ती पळून जात नाही.>>> या प्रसंगातलं वाळवंटातल्या आकाशातल्या तारकांचं दर्शन, आणि एका अर्थाने आपण खरोखर मुक्त आहोत ही झालेली जाणीव, आपल्याला हेच तर हवं होतं हे जेव्हा आलीयाला समजतं; तेव्हा ती शक्तीपात झाल्यासारखी स्वतःच परत येते... त्यावेळचं गाणं, "तू कूजा" हे ही तितकंच परिणामकारक आहे Happy

अवांतर लिखाणाबद्दल क्षमस्व...

चित्रपटासाठी निवडलेली लोकेशन्स अप्रतिम आहेत. खरे तर ती इतकी अप्रतिम आहेत कि कॅमेरामनला केवळ
स्पष्ट चित्रीकरण करण्याचेच काम करावे लागलेय.. मला माहीत आहे असे म्हणणे, कॅमेरामनवर अन्याय आहे, कारण त्यानेही निव्वळ तेच काम आणि तेही अप्रतिम रित्या केलेय. कुठेही फ्रेम वगैरे घडवण्याचा प्रकार केलेला नाही.>>> म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? कॅमेरामनवर अन्याय म्हणण्याआधी त्याचे काम आधी कृपया समजून घ्या.

ती लोकेशन्स सिनेमामध्ये अप्रतिम दिसत आहेत कारण कॅमेरामननं फ्रेम तशा निवडल्या आहेत. हा सिनेमा टेक्नीकली खूप सुंदर आहे. कॅमेरामनचं सगळ्यांत अफलातून श्रेय यासाठी की इतके अतिप्रचंड वेगवेगळे भौगोलिक भाग असूनदेखील संपूर्ण सिनेमाचा लूक एकसंध राखणं यासाठी त्यानं केलेलं काम.

कॅमेरामनचा ब्रीलीयन्स कुठं दिसत असेल तर तो तू कुजा या गाण्यामध्ये. ती अंधारात धावत सुटते. डोक्यावरच्या चांदण्यांखेरीज प्रकाशाचा दुसरा कुठलाही सोर्स त्या ठिकाणी नाही. त्या संपूर्ण कॅनव्हासवर एकही दुसरा ऑब्जेक्ट नाहीच आहे (ज्यामुळे सावल्या दाखवता येतील) अशावेळी केवळ अंधार प्रकाश न दाखवता एक सलग दुधाळ चांदण्याचा प्रकाश दाखवून कॅमेरामन (आणि त्याची टीम) तिचं धावणं, विफल होणं. तिनं परत येणं तिची असहाय्यता सगळं त्या गाण्यामधून सांगतात. तो तिला बिनधास्त पळून जा म्हणून सांगतो. सुटकेच्या आशेनं ती ंधारात धावत सुटते. इतकी धावते की ती कुठे जातेय तेही तिला समजत नाही. दमून भागून ती अखेर जमीनीवर पडते आणि पडल्यावर तिच्या लक्षात येतं, पळतोय तर खरं पण कुणीकडे? वीरा अक्षरशः त्या दोन तीन सेकंदामध्ये तुटून जाते. सभोवार दूर पसरलेलं वाळवंट आणि अंधार. ती आजूबाजूला बघत राहते. दूरवर दिसणारा प्रकाशाचा एकमेव सोर्स. ती जिथून पळून आली तोच. ती त्याच प्रकाशाकडे परत एकदा पळत सुटते. मघाशी सुटकेसाठी धावणारी वीरा आता परत कैदेच्या दिशेनेच धावत सुटते. रडत भेकत. आरडत ओरडत किंचाळत वीरा परत महाबीरकडे येते. त्याला पाहिल्यावर ती अचानक न राहवून त्याच्या गळ्यात पडते तो धाडकन तिला दूर लोटून देतो.

मी तू कुजा या गाण्याला हिंदी फिल्म्समधल्या सर्वोत्कृश्ट रीत्या चित्रित केलेल्या गाण्यांमध्ये नक्की समाविष्ट करेन- इतकं हे ब्रीलीयंट गाणं आहे.

सिनेमाबद्दल:

हा सिनेमा केवळ हयावेवर घडत नाही. तो केवळ दोन व्यक्तीरेखांना एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचवत नाही. हा सिनेमा एक अख्खा प्रवास आपल्याला उलगडून दाखवतो. दोन वेगवेगळ्या ध्रुवावरची लोकं एकत्र येतात, एकमेकांना समजून घेतात, जाणून घेतात. दुसर्‍याला जाणून घ्यायच्या नादामध्ये कधीतरी स्वतःलाच सापडत जातात. हायवे या अशा दोन व्यक्तीरेखांचा सिनेमा आहे. वीरा आणि महाबीर हे एरवी आयुष्यात एकमेकांना कधीही भेटले नसते, पण या प्रवासात ते भेटतात. वीराचा शोध हा वेगळाच आहे. तिचं एक टीपिकल आयुष्य आहे, स्वप्नं आहेत, महाबीर स्पेक्ट्रमच्या दुसर्‍या टोकाला आहे. तरीही दोघांमध्ये समान धागे बनत जातात (या ठिकाणी पोचल्यावर रहमान आणि इर्शाद कामिलचं अप्रतिम सूहा साहा येतं. त्याची जादू गाणं पाहिल्याखेरीज समजणार नाही)

वीरा आणि महाबीरची कथा ही अपेक्षित वळणावरच संपते. संपायलाच हवी, पण जिथं महाबीरचा हा प्रवास संपतो तिथून वीराचा एक वेगळाच प्रवास चालू होतो. महाबीर मरत नाही, तो तिच्या मनामध्ये कुठंतरी जिवंत राहतो.... प्पण घाबरलेली भेदरलेली, स्वतःच्या आयुष्याचं मोल गमावलेली वीरा मात्र हमखास मरते. कायमची.

दिनेश. नंदिनी, हर्शल....

~ तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार मानायला हवेतच हवे. आपल्या अगणित चॅनेल्स आणि वर्तमानपत्रे, नियतकालिकांकडून एखाद्या कलाकाराच्या कलेपेक्षा त्याच्या/तिच्या एरव्हीच्या वागण्यावर अशी काही बडबड करत बसून स्वतःच्या टीआरपीचे भूत नाचवायचे की अमुक एका मुलात तसेच मुलीत काही कलागुणही आहेत आणि आपण त्यावरही आम प्रेक्षकांचे लक्ष वेधले पाहिजे याची तीळमात्र चिंता नसते.

राजेश खन्ना, जितेन्द्र, धर्मेन्द्र, अमिताभ आदी सुपरस्टार्सच्या समोर गोंडे घोळवत त्यांच्या मर्जीनुसार काश्मिर खोरे, सिमला, उटी आदी पर्यटनस्थळी त्यांच्या त्यांच्या कचकड्यांच्या बाहुल्यांना नेऊन तिथे थय्याथय्या (साठी उलटली तरी) करायला लावणे म्हणजे दिग्दर्शन अशी एक जमात होती. त्यातही काश्मिर परिसर म्हटले की शम्मी कपूर ने शर्मिलाच्या मागे धावणे, आशा पारेखने विश्वजीतला झाडाआडून घुमायला लावणे....यासाठीच. पण गेली काही वर्षे दिग्दर्शक म्हणजे सत्य परिस्थितीचे आरसे कसे आणि कोणत्या पद्धतीने समोर आणले पाहिजेत तसेच तंत्राचा विशिष्ट अभ्यास करून त्याद्वारे तीच कला किती परिणामकारक, लक्षवेधी होऊ शकते यांचा सखोल अभ्यास केलेली एक पिढी पुढे आली आहे आणि त्यांच्यात मार्गदर्शनाखाली आजच्या पिढीतील काही तरुण आणि तरुणी आपल्या अभिनयकौशल्यापेक्षाही भूमिकेत शिरून ती कशी उठावदार होईल इकडे काटेकोरपणे लक्ष देताना पाहाणे ही अपार आनंदाची बाब आहे असे माझ्यासारख्या वयाने ज्येष्ठ असलेल्या प्रेक्षकाला वाटते हे सांगणे गरजेचे आहे.

दिनेश यानी "हायवे" विषय निवडला आहे हे तर शीर्षक वाचल्याक्षणीच आनंदाची लहर देऊन जाणारी बाब वाटली मला. वाचताना एवढ्यासाठी जास्त बरे वाटले की त्यानी आलिया भट आणि रणबीर यांच्या गुणवत्तेचे यथोचित कौतुक केले आहे. नंदिनी यानी चित्रीकरणाच्या दर्जाबाबत तसेच त्या मागील भूमिकाचेही अगदी अभ्यासूपणे विवेचन केले आहे तेही भावले.

मी "हायवे" ज्यावेळी पाहात होतो त्यावेळी कथानकाविषयी एका ओळीचीही माहिती नव्हती....आलियाला पळवून नेले जात असतानाही इथून पुढे काहीतरी वेगळे घडणार आहे असेही वाटले नाही. पण ज्यावेळी त्या खास ग्रामीण भागातील घरात तिला टाकल्यापासून तिचे वर्तन आणि तिथून पुढील वाटचाल (परत कॅमेरामन आणि जागांची निवड याना गुण द्यावेसे वाटतात) इतक्या विलक्षण वेगाने आणि अनपेक्षितरित्या घडत जातात व त्या पोरगीला स्वातंत्र्य म्हणजे काय हे कैदेत गेल्यावरच समजायला लागते, ही कल्पना तर भन्नाटच.

आलिया भटचा "हायवे" आणि अनुष्का शर्माचा "एन.एच.१०" हे दोन चित्रपट म्हणजे या पिढीतील हे कलाकार कथानकात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करणे आणि तेही अत्यंत प्रभावीरित्या म्हणजे काय
याबाबतचे दोन सुंदर असे नमुने होत.

मस्त पोस्ट नंदिनी, तुम्ही जास्त लिहीले पाहिजे सिनेमांवर व संगीतावर. मला पण आवडलेला सिनेमा. चाइल्ड अब्युज हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. तसेच मायनर मुली च्या नशीबी काय येउ शकते ह्याचा एक वस्तुपाठ. संगीत तर अफलातून आलिया मला आव्डतेच. फ्रेश फेस्ड ब्युटी.

एन एच १० पण उतारा आहे ह्या सिनेमावर. जरूर बघा तो ही.

फेब्रुवारी २०१४ ते फेब्रुवारी २०१५ ह्या वर्षभरात मी बरेच चांगले सिनेमे पाहू शकलो नाही. हायवे त्यातलाच. Sad

रणदीप हुडा सुरुवातीला मला आवडायचा नाही. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, माझं मत बदलत गेलंय आणि मला असं वाटतं की तो एक जबरदस्त अभिनेता आहे. त्याच्याकडे उत्तम शरीरयष्टी आहेच, वजनदार आवाजही आहे आणि मुख्य म्हणजे इतर बॉडीबिल्डर्सप्रमाणे तो ठोकळा तर नाहीच. उलट खतरनाक संवादफेक आहे, त्याच्याकडे असं जाणवतं बऱ्याचदा.

आलिया भट 'स्टुडंट ऑफ द इयर' मध्ये बाहुलीच वाटली होती. पण बहुतेक त्यानंतरचा तिचा दुसराच सिनेमा हाय वे होता. मी हे तिचं काम पाहिलेलं नाही, पण ट्रेलर्स आणि रिव्ह्यूजवरुन हे कळलं की दमदार काम केलंय. 'टू स्टेट्स' मध्ये मला तिचं काम आवडलं होतं. मला वाटतं, आलिया तिच्या अनुभवाच्या मानाने खूप समंजस अभिनेत्री आहे. ज्या प्रकारे तिने तिच्या थट्टेला उत्तर म्हणून स्वत:चीच 'पॅरडी' केली होती, ते दाद देण्यासारखंच !

'हाय वे' पाहणार होतोच. दोघेही आवडते आहेत. आलिया जरा जास्तच आवडते.

धन्यवाद दिनेशदा ! आठवण करून दिल्याबद्दल..!!

ओ हो, इथे येणारे प्रतिसादही एकसो एक आहेत .... ग्रेट, रिअली ग्रेट ....

या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झालीये ......

मला वाटतं, आलिया तिच्या अनुभवाच्या मानाने खूप समंजस अभिनेत्री आहे. ज्या प्रकारे तिने तिच्या थट्टेला उत्तर म्हणून स्वत:चीच 'पॅरडी' केली होती, ते दाद देण्यासारखंच !<<< हो. ते मात्र आहे. स्वतःची स्टार व्हॅल्यु जपत जपत तिनं स्वतःची वेगळी इमेज तयार केली आहे. इतक्याकमी व्यात तिच्याकडे उत्तम सिनेमे निवडायची अक्कल आणि ते पेलायची हिंमत दोन्ही आहे.

मलाही टू स्टेट्स फार आवडला होता. का वगैरे लिहत बसलं की तो वेगळ्या लेखाचा विषय होइल.

अरे वा, सगळ्यांनाच आवडला होता कि हा. मायबोलीवर कुणी लिहिले असले कि नाव लक्षात राहते. मग सिडीज घेताना ते लक्षात राहते.. ( रसप.. प्लीज नोट )

नंदीनी.. ते दृष्य खरेच रात्री चित्रीत केलेय का ? तसे असेल तर निव्वळ अप्रतिम आहे ते. आपल्याकडे रात्रीचे
शुटींग करत नाहीत सहसा. बहुतेक तेवढ्या मंद प्रकाशात चित्रण करण्यासाठी लागणारे तंत्र नसेल आपल्याकडे. बेबी मधलीपण वाळवंटातील रात्रीची दृष्ये दिवसाच चित्रीत झाली होती. मग फिल्टर लावून रात्रीचा आभास निर्माण केला.
अनेकदा सावल्यांवरून ते कळते पण चलाख कॅमेरामन, सावल्या दिसणार नाहीत याची काळजी घेतात.

प्रियदर्शनच्या सिनेमात कशी प्रत्येक फ्रेम सजवलेली असते, तसे इथे काही मुद्दाम केल्याचे जाणवत नाही. दम लगाके.. मधे तो जेव्हा इंग्लीशच्या पेपरमधे सुईसाईड नोट लिहितो, त्यानंतर कॅमेरा एकदम छतावरून बघतो.
ती फ्रेम खुप सुंदर दिसते, पण मग क्षणभरासाठी त्या गंभीर प्रसंगापासून आपले लक्ष विचलीत होते.

हायवे मधील काही दृष्यांची मुद्दाम आठवण काढतोय. मधे एक सुंदर फ्रेम बर्फाच्छादीत पर्वतांची दिसते आणि नंतर लगेच आलिया एका जागेवरून तिकडे बघतेय असे दिसते. म्हणजे तिला जे दृष्य जसे दिसले असेल तसेच कॅमेराने टिपलेय. तिला कड्यावरून खोर्‍यातून खेचरांसोबत जाणारी माणसे दिसतात, त्यावेळी पण तिला ती
जशी दिसली असतील, तशीच कॅमेराने टिपलीत. ती नदीत एका दगडावर जाऊन बसते आणि मग नदीच्या पाण्यावरून कॅमेरा पॅन होतो, तेही अगदी तिला तो प्रवाह जसा दिसला असेल तसाच. या सर्व फ्रेम्स मुद्दाम
सजवलेल्या नाहीत, आणि यासाठी मला कॅमेरामनचे कौतूक वाटले.

आणखी सगळ्यांच्या लक्षात आले का ? कि हा चित्रपट अर्थातच क्रमवार चित्रीत झालेला नाही, तरीही प्रत्येक
प्रसंगाचा क्रम ( म्हणजे त्यांची बदलत गेलेली मानसिकता ) अगदी सहज जाणवते.

अशोक,

त्या काळी चित्रपट निव्वळ करमणूक म्हणून तयार केले जात आणि प्रेक्षकांचीही तशीच अपेक्षा असे. अर्थात त्याची गरज होती आणि आहेही. पण त्यामूळे चित्रपटसृष्टी हि कायम स्वप्ननगरी बनून राहिली ( आणि अनेकांनी
त्यासाठी मूंबईत येऊन, आयूष्य बरबाद करून घेतले. ) ते चित्रपट कायमच वास्तवापासून दूर राहिले. त्याकाळी
नोकरी करणारी नायिकाही क्वचितच दिसायची.

पण मला खात्री आहे, नर्गिस, नूतन, वहिदा यांना आव्हानात्मक भुमिका जास्त मिळाल्या असत्या तर त्यांनी
सोनेच केले असते. ज्या मर्यादीत संधी त्यांना मिळाल्या, तिथे त्यांनी ते सिद्ध केलेच.

हायवे मधे, खुपच संयत हाताळणी आहे. मुख्य फोकस त्यांच्यातल्या नात्यावरच ठेवलाय. तिचे अपहरण झाल्यावर तिच्या घरी काय झाले, याचे चित्रणही मर्यादीतच ठेवलेय. तिच्यावरच्या अन्यायाचा प्रसंगही फ्लॅशबॅक
मधून दाखवलेला नाही. जे काही कळते ते तिच्या दबलेल्या कथनातूनच. आणि अगदी पहिल्या प्रसंगात ती
रात्री मोकळ्या हवेत जाण्यासाठी का आसुसलेली असते, ( जे त्यावेळी तिची क्रेझ वाटते ) त्याचा खुलासा होतो.

ज्यांनी बघितला नाही, त्यांनी खरेच बघाच.

? कि हा चित्रपट अर्थातच क्रमवार चित्रीत झालेला नाही<<< मी चित्रपटाबद्दल जितके वाचलेय त्यावरून तरी हा त्यांच्या प्रवासानुसार शूट करत गेले आहेत (आऊटडोर्स) कारण इम्तियाझ अलीचा तसा खास आग्रह होता.

ते दृष्य खरेच रात्री चित्रीत केलेय का ? तसे असेल तर निव्वळ अप्रतिम आहे ते<<<मेी जितके वाचलेयत त्यावरून तरी रात्रीच चित्रित झाले आहे. आपल्याकडे सर्व प्रकारची हॉलीवूडच्या तोडीस तोड तंत्रज्ञान आधीपासूनच आहेच. सिवाय आता कॅमेराच उत्तम दर्जाचे झाल्यनं आनि सर्वच चित्रीकरण डिजिटल झाल्याने अगदी हौशी फिल्ममेकरसुद्धा रात्री चित्रण करू शकतो.

प्रियदर्शनच्या सिनेमात कशी प्रत्येक फ्रेम सजवलेली असते, तसे इथे काही मुद्दाम केल्याचे जाणवत नाही.<<<दोन्ही दिग्दर्शक पूर्ण भिन्न असल्याने अशी तुलना करणंच योग्य नाही. तसेही हायवे आऊटडोरवर जस्त फोकस असल्यानेन त्याला "फ्रेम सजवाव्या" लागत नाहीत फक्त समोर दिसणार्‍या व्हास्ट कॅन्वासवरील योग्य ती फ्रेम निवडावी लागते. हे किती कठीण आणी कलात्मकदृष्ट्या आव्हानात्मक आहे हे मायबोलीवरचे जाणते फोटोग्राफरदेखील हमखास सांगतील.

छान लिहिलंय दिनेशदा.

नंदिनीच्या आणि इतरही प्रतिसादांतून बरीच माहिती मिळाली. जरा कृपया कोणीतरी सिनेमा कसा पहायचा यावर लिहाच. मी अगदी सरधोपटपणे सिनेमा बघते. मग तो आवडतो किंवा नावडतो. कधीकधी हे माझ्या मूडवर देखिल अवलंबून असतं.

पण डोळसपणे सिनेमा कसा बघायचा? सिनेमॅटोग्राफी, कॅमेराचा अँगल, एडिटिंग ... वगैरे बाबी बाकी सिनेमा बघत असताना कशा काय लक्षात येतात तुमच्या?

खरंच एक असा धागा काढा आणि अमुकतमुक सिनेमात अमुकतमुक सीनमध्ये अँगल कसा योग्य होता वगैरे टाईप टेक्निकल बाबींवर चर्चा सुरू करा. सोबत लिंकाही द्या. माझ्यासारखे अनेक पामर दुवा देतील.

>> चित्रपटासाठी निवडलेली लोकेशन्स अप्रतिम आहेत. खरे तर ती इतकी अप्रतिम आहेत कि कॅमेरामनला केवळ
स्पष्ट चित्रीकरण करण्याचेच काम करावे लागलेय.. मला माहीत आहे असे म्हणणे, कॅमेरामनवर अन्याय आहे, कारण त्यानेही निव्वळ तेच काम आणि तेही अप्रतिम रित्या केलेय. कुठेही फ्रेम वगैरे घडवण्याचा प्रकार केलेला नाही. <<<<
निसर्ग उत्तम असल्याने नुसते फोकसिंग करून भागत असते तर कुणीही उठून सिनेमॅटोग्राफर झाला असता की.
उत्तम निसर्ग पडद्यावर उत्तम दिसायचा असेल तर त्याला फ्रेमिंग करावेच लागते. ते केल्याशिवाय अर्थ नाही. त्यात काही स्पेशल केलेय असे सामान्य माणसाला जाणवणार नाही इतक्या खुबीने करता येणे याचाच अर्थ तो सिनेमॅटोग्राफर उत्तम सिनेमॅटोग्राफर आहे. माफ करा पण तुमचे विधान अगदीच पटण्यासारखे नाहीये. मी फिल्म पाह्यलेली नसल्यामुळे अजून स्पेसिफिक्समधे जाऊ शकत नाही.

>> आपल्याकडे रात्रीचे शुटींग करत नाहीत सहसा. बहुतेक तेवढ्या मंद प्रकाशात चित्रण करण्यासाठी लागणारे तंत्र नसेल आपल्याकडे. <<
अरे देवा.. भारतामधे सर्व अद्ययावत तंत्रे उपलब्ध आहेत. एखादे नवीन तंत्र सुरू झाल्यापासून भारतात यायला कैक वर्षे लागतात वगैरे कधीच्या काळी इतिहासात जमा झालेल्या गोष्टी आहेत.
'डे फॉर नाइट' शूट जिथे केले जाते तिथे ते करण्याचे कारण तंत्रज्ञानाचा अभाव हे नसते. पण 'डे फॉर नाइट' हे अगदीच पर्याय नसल्याशिवाय केले जात नाही.
मुघल ए आझम मधल्या प्यार किया तो डरना क्या गाण्यात भरपूर आरसे वापरलेले आहेत सेटमधे. आणि असे लायटिंग केलेले आहे की लाइटसचे प्रतिबिंब वा सावली कुठेही दिसत नाही. तेच गाइडच्या पिया तोसे नैना लागे रे गाण्याचे. सावली दिसत नाही. १९६० आणि १९६५ मधे आलेल्या या चित्रपटांच्या वेळेस तेव्हाची अद्ययावत तंत्रे उपलब्ध होती तर आता २०१५ मधे तंत्र उपलब्ध नसेल हे अतर्क्य आहे.
मी फिल्म पाह्यलेली नसल्याने मला तुम्ही म्हणताय त्या स्पेसिफिक सीनबद्दल माहिती नाही पण जे नंदिनीने वर्णन केलेय ते शूट रात्रीचे रात्रीच करणे आज आपल्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानात सहज शक्य आहे.

कि हा चित्रपट अर्थातच क्रमवार चित्रीत झालेला नाही, तरीही प्रत्येक
प्रसंगाचा क्रम ( म्हणजे त्यांची बदलत गेलेली मानसिकता ) अगदी सहज जाणवते. <<<
मला क्रमवार शूट होत गेलेला चित्रपट सांगा जरा प्लीज.
एवढे वर्षात शूटींग स्क्रिप्टच्या क्रमाने झालेय हे अगदी क्वचित पाह्यलेय.

http://www.maayboli.com/node/13958?page=1

मामी, हा बीबी बघ. शिवाय फील्म अ‍ॅप्रीसीएशनवर काही बूक्स पण नंतर सजेस्ट करेन.

सिनेमॅटोग्राफी, कॅमेराचा अँगल, एडिटिंग ... वगैरे बाबी बाकी सिनेमा बघत असताना कशा काय लक्षात येतात तुमच्या?<<< शाळेत शिकवल्या होत्या! Proud

Mami, sharmilacha ek dhaga hota tasaa. Mee bahutek cinema cd varach baghato, tyamuLe aaNi headphones asataat, ajibat disturbance nasato.
paN he sagaLe technical Dokyat Thevunach cinema baghayala pahije ase naahee. Yaa sagaLyachya var chitrapaT pohochala pahije.

शाळेत शिकवल्या होत्या! >>> मग बरोबर. मी डायरेक्ट कॉलेजात गेले त्यामुळे उणीव राहिलीये आयुष्यात. Proud

Needhap, maajhe photography varache mooL vaakya parat pahaa please.
mhaNaje, baby chyaa nirmatyakaDe Te night shooting che tantra navhate kaa ? AaNi boyhood, sequentially shoot kelaa hotaa, ase aapale malaa vaaTale, aaNakhee kuThalaa asel, tar maahit naahee. Normaly cinema tase shoot hot maaheet, he malaa chaangalech maahit aahe, aaNi tareehee highway, salag vaaTato he visheSh vaaTale malaa. Baghitalaa nasel tar pahaa.

baby chyaa nirmatyakaDe Te night shooting che tantra navhate kaa ? << ?
डे फॉर नाइट शूट करण्याचे कारण तंत्रज्ञानाचा अभाव हे क्वचितच असते असं म्हणलंय मी. बेबी वाल्यांनी का केले ते मला माहित नाही.

स्क्रिप्टच्या सिक्वेन्सने क्वचितच फिल्मस शूट होतात. चांगली फिल्म असेल तर ती कुठल्याही सिक्वेन्सने शूट केली तरी सलग वाटतेच. अशी उदाहरणे अक्षरशः रग्गड आहेत. किंवा तसे करणे हे फिल्ममेकिंगच्या तंत्रातले ते एबीसिडी आहे.

हा चित्रपट पाहायचा राहून गेलाय. आता फार खंत वाटतेय थिएटरमध्ये जाऊन न पाहिल्याची Sad

नंदिनी, अगं किती सुंदर पोस्ट !! मनःपूर्वक धन्यवाद.

हायवे पहायचा राहून गेलाय अजुन. पण दिनेशदांच्या या धाग्यामु़ळे खुप मस्त चर्चा वाचायला मिळतीये. धन्यु दिनेशदा, नंदिनी आणि नीधप.

नंदिनी आणि नीधप यांनी सांगीतल्याप्रमाणे आपल्या लक्षात येत नाही की सीनेमॅटोग्राफर नक्की काय जादू करतो ते. बरोबर लाईट्स आणि फिल्टर्स लाऊन हिरो -हिरॉइन ला सुंदर दाखवणे, किंवा मग नैसर्गीक प्रकाशाचा वापर करून फ्रेम सुंदर करणे असे दोन टोकांचे निर्णय घेऊन त्याला काम करावे लागते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत तरी आपण कुठे मागे नाही आहोत. फार पूर्वी म्हणजे ६० च्या दशकात जेव्हा नवीन रंगीत चित्रीकरण आले होते तेव्हा ते रात्रीच्या प्रकाशाचे असेल. वरती लिहिलेल्या एन एच १० मध्ये सुद्धा रात्रीचे खुप सुंदर चित्रीकरण आहे. बरोबर कुठल्या बाजूनी दिवा दिसतोय फ्रेम मध्ये त्याप्रमाणे लाईटींग केले आहे. आणि तशाच छाया - प्रकाश दिसतात अनुष्काच्या चेहर्‍यावर. त्यामुळे एक गहिराई येते त्या चित्रपटात.

आता हायवे पहावाच Happy

Pages