हायवे - हिंदी चित्रपट

Submitted by दिनेश. on 11 October, 2015 - 06:10

हायवे, हा इम्तियाच अलीचा गेल्या वर्षी आलेला चित्रपट. मायबोलीवर शोध घेतला, तर कुणी यावर लिहिलेले दिसले नाही, म्हणून लिहितोय.

कथानकात नाविन्य नाही पण त्याच्या हाताळणीत आणि अभिनयात नक्कीच आहे.

उद्या परवावर लग्न आहे वीराचे. आणि अश्यात रात्री ती आपल्या नियोजित नवर्‍यासोबत भटकंतीला जाते. शहरापासून लांब. तो रस्ता सुरक्षित नाही असे तो वारंवार सांगत असतो तरीही आणखी पुढे आणखी थोडा वेळ
असे ती सांगत राहते.. आणि काहीही ध्यानीमनी नसताना तिचे अपहरण होते.

अपहरणकर्त्याला जेव्हा कळते कि ती एका बड्या बापाची मुलगी आहे तेव्हा तो आणि त्याचा बॉस हडबडतात, पण अपहरणकर्ता ठाम राहतो आणि तिला घेऊन भटकत राहतो.

अश्या कथानकात त्या मुलीचे अपहरणकर्त्यावर प्रेम बसणे, हे आपण नेहमीच बघतो.. पण त्या प्रेमाचा एक वेगळाच पोत या चित्रपटात दिसतो. आणि तो पोत पुढे पुढे आणखी घट्ट होत जातो, पण कुठेही हिंदी चित्रपटाच्या
पारंपारीक प्रेमाचा रंग घेत नाही.

तिला आधी नेमके काय होतेय याचे भानच नाही असे वाटते. भ्रमिष्टासारखी बडबड करत राहते ती. आणि तोही
नेहमीसारखा क्रूर वागत राहतो. तिला एके क्षणी तो जा पळून जा असे सांगत मोकळा सोडतो, पण त्या वाळवंटात
ती कुठे पळून जाणार ? आणि पुढे एकदा संधी असूनही ती पळून जात नाही.

बंदीस्त जागेत तिचा जीव घाबरतो. त्यामूळे ती काही सवलती मागून घेते. आणि मग एका क्षणी तिच्या भितीचे कारण उघड करते. तिला पळवून नेण्यामागचा त्याचा हेतूही तिला माहीत असतो, त्याच्या हातून तीन खून झालेले असतात. तरीही त्याच्या एका वेगळ्याच पैलूचे तिला दर्शन होतेआणि या या दोन धाग्यांनी त्यांचे नाते अधिकाधिक गहीरे होत जाते.

या कथेचा शेवट काय होणार हे आपल्याला माहित असतेच, आणि तो तसा होतोही पण त्यानंतरही चित्रपटाची कथा पुढे जाते, आणखी उंचीवर.. (आतपर्यंत हा चित्रपट चॅनेलवर दाखवलाही असेल, पण तूम्ही बघितला नसेल तर अवश्य पहा )

रेहमाने संगीत आहे आणि त्याने बहुतांशी लोकसंगीताचाच वापर केला आहे. ते ज्या भागातून प्रवास करतात त्या भागातील लोकसंगीताशी त्यां गाण्याचे नाते जुळून गेलेय आणि ती गाणी वेगळी अशी जाणवतही नाहीत पण त्याचवेळी लक्षही विचलित करत नाहीत.

चित्रपटासाठी निवडलेली लोकेशन्स अप्रतिम आहेत. खरे तर ती इतकी अप्रतिम आहेत कि कॅमेरामनला केवळ
स्पष्ट चित्रीकरण करण्याचेच काम करावे लागलेय.. मला माहीत आहे असे म्हणणे, कॅमेरामनवर अन्याय आहे, कारण त्यानेही निव्वळ तेच काम आणि तेही अप्रतिम रित्या केलेय. कुठेही फ्रेम वगैरे घडवण्याचा प्रकार केलेला नाही.

चित्रपटात दोघांची बाँडी लँग्वेज ही एक खास लक्ष द्यायची बाब आहे. मला आधी चित्रपट बघताना हे जाणवले नाही पण नंतर श्रेयनामावलीत वाचले तेव्हा कळले कि त्यावरही मेहनत घेतलीय. सगळ्याच प्रसंगातून ते जाणवते, तरी एक प्रसंग लिहितोच. तिला दोन दिवस उपाशी ठेवल्यावर जेवण देण्यात येते. त्यात जाडजूड रोटी, कसलीतरी पालेभाजी आणि लालभडक चटणी आहे. तिला अश्या अन्नाची सवय नाही हे नक्कीच पण भूकही लागलेली आहे. त्या प्रसंगात काहिही न बोलता,तोड वेडेवाकडे न करता, ठसका न लागता ती खाते, पण तिचे हातवारे बरेच काही बोलतात.

दोघांच्या तोंडातली भाषा पण लक्ष देऊन ऐका. त्याची शिवराळ आणि तिची इंग्रजी शब्दांचा वापर असलेली.
तिही दोघांना शोभेल अशीच.

दोघांची कॅरेक्टर्स उभी राहतात ती अश्या गोष्टीतून. त्यासाठी दिग्दर्शकाला तिच्या चेहर्‍याचे सुंदर क्लोज अप्स, तिचे ओलेती दृष्य, त्याचे शर्ट काढलेले दृष्य अश्या बाबींची गरज वाटलेली नाही.

एका प्रसंगाबद्दल लिहिल्याशिवाय रहावत नाही. उगाचच भटकत असताना, एका पहाडावर तिला तिच्या स्वप्नातले घर दिसते, तिला लगेच तिथे रहावेसे वाटते. ती मॅगी शिजवायला लागते, त्याला सांगते हातपाय धुवून ये. घराबाहेर काढते, त्याला तिची काळजी वाटते, तो खिडकीतून बघत राहतो. ती जेवणाच्या तयारीला लागते, झाडलोट करते, ताटे घेते आणि त्याला हाक मारते. तो दारातच थबकतो, त्याला आत जायचा धीर होत नाही, दोनदा परत फिरतो.. तोंडावर पाणी मारतो आणि त्याला त्याच्या आईची आठवण येते, त्याला रडू अनावर होते, त्यानंतर ती त्याची समजूत काढते. दू:खाने त्याचे गदगदणे आणि आपल्या नाजूक हातांनी तिने त्याला कवेत घेणे.... हा प्रसंग दोघांनी इतक्या उत्कटपणे सादर केलाय कि आपलेही डोळे पाणावतात.

मुख्य भुमिकात आहेत रणदीप हुडा आणि आलिया भट.. त्यांची इमेज सोडा, त्यांचे रुप बघूनही कुणी त्यांना
नायक नायिका म्हणून चित्रपटात घेईल अशी कल्पनाही मी केली नव्हती. पण इथे दोघे आपापल्या भुमिकांत अगदी चपखल आहेत. इतर सर्वच लहानसहान भुमिकांतील कलाकारांचा अभिनय अगदी यथायोग्य आहे.

रणदीपला अगदी छान रोल मिळालाय. आणि त्याने तो खुपच छान साकार केलाय. हा महाबीर साकार करायला, त्याला हाणामारी, अ‍ॅक्शन, गोळीबार, पाठलाग.. असले काहीही करावे लागलेले नाही.

पण या चित्रपटातले खरे सरप्राईज आहे ते आलिया भट. मला ती स्टूडंट ऑफ.. आणि टू स्टेटस मधे अजिबात आवडली नव्हती. त्यात ती नेहमीच्या हिंदी चित्रपटातील कचकड्याच्या बाहुल्यांप्रमाणेच वाटली होती. पण इथे मात्र तिने कमालीचा उत्कट अभिनय केलाय. ( जवळजवळ मेकपशिवाय वावरलीय ) मूर्खासारखी बडबड, महाबीरचा मुकाबला, त्याच्यावरची माया, घरच्यांवरचा राग.. हे सगळेच तिने कमालीच्या सफाईने सादर केलेय.

अगदी अवश्य पहाच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप, तुम्ही चित्रपटाशी संबंधित व्यवसाय करता त्यामुळे, त्या विषयाशी निगडीत तुमच्याकडे worth sharing गोष्टी आहेत, ज्या तुम्ही शेअर करता, त्याबद्दल धन्यवाद.

पण हे करताना प्रश्न / विधानकर्त्याला humiliate करण्याचा टोन वापरला नाहीत तर जास्त value add होईल / distraction कमी होईल.

आलिया मलाही आवडली! तिचा वावर सहज आहे बर्‍याच चित्रपटात, जे तिच्या समकालिन नव्या मुलिना, तिच्या जस्ट आधी आलेल्या सोनम्,जॅकलिन्,सोनाक्षि, आनी तिच्या बर्‍याच आधी आलेल्या कत्रिना,करिना वैगरेला अजिबात जमलेले नाही.

चांगला आहे हायवे.
मला शेवटचा सीन आवडला. ती महावीर को बचाना जरुरी है म्हणत असते तितक्यात तिला भुलीचे इंजेक्शन देतात आणि मग शुद्धीवर आल्यावर सर्व स्थिती कळून बदललेली खंबीर ती.

छान चित्रपट ओळख छान चर्चा. वर्षाला मोजके ४-५ च चित्रपट बघितले असल्याने कौतुक कानावर आल्याशिवाय बघत नाही, त्यात हा निसटला. आता योग आला तर बघेन नक्की

श्री, ती जोडी विजोड असल्यानेच, आपण त्यांच्यातले वेगळे नाते स्वीकारू शकतो. अगदी एक दूजे के लिये असते तर मग कथा त्याच त्या वळणाने गेली असती.

आज हा सिनेमा बघण्याचा योग आला.
अप्रतिम सिनेमा..अप्रतिम काम..सुंदर कॅमेरावर्क आणि सगळ्यात सुंदर गाणी (जिओ रहमान).

आलियाला kidnap झाल्यानंतर 'आपल्याला खरं स्वातंत्र्य इथे आहे' ही झालेली जाणीव प्रेक्षकांनाही भिडते.

Pages