बोंड

Submitted by टीना on 7 October, 2015 - 05:42
bond
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. कद्दू / काशिकोहळं
२. कणिक
३. गुळ
४. तळण्यासाठी तेल
५. शिजवण्यासाठी जरासं पाणी

क्रमवार पाककृती: 

तर....
लगित दिस झाले मनात व्हत हि रेश्पी टाकाचं..

पुण्याहून घरी आली तवा बोंड खा चे हाय, बोंड खा चे हाय याची भुणभुण लावलीच होती आईच्या मांग पण नेमी गावावरुन घरी आणतो ते कवळे संपले व्हते म्हणुन जरा दमानं व्हत काम.. पण गणेशचतुर्थी झाल्यावर आईसोबत बाजारात चक्कर टाकल्यावर हवं तसं कवळं / काशिकोहळ दिसलं अन लगेच एक बुक केल आपलं हे खरेदी करुन टाकलं (ऑनलाईन कामाचा तोटा Wink )..

बाबो फुकटात मिळणार्‍या येवडूश्या कवळ्याले ५० रुपे मोजताना लय जीवाकडं आलतं पण का करावं..अडला हरी न... असो.. तर खाली सांगतो त्याप्रमाणं करा..

१. पयले एक काशिफळ घ्या .. ( युजर फ्रेंडली रेश्पी देतेय.. आप बी क्या याद रखोगे )..

२. त्याची साल खरवडून घ्या म्हणजे छिलुन घ्या..

३. त्याचे मोठ्ठाले तुकडे करुन कुकर मधे अगदी थोड पाणी (बुडी लागू नये म्हणुन टाकतो तेवढ) टाकुन ३ शिट्ट्या होऊ द्या..

४. कुकर थंड झाल्यावर ते तुकडे एका कोपरामधे काढून त्यातल पाणी झारुन घ्या.

५. शिजलेल्या तुकड्यांना स्मॅश करुन घ्या.. फोटोत दिलेल्या काशिफळाला जवळपास अर्धा किलो गुळ लागेल. अर्धा किलो गुळ किसुन त्यात घाला आणि साधारण छोटे छोटे भज्याएवढे बोंड तयार करता येईल इतपत त्यात कणीक घालुन मिसळा. मी आणलेलं काशिफळ जवळजवळ १ ते सव्वा किलोचं होत ज्यात मला दिड ग्लास कणिक टाकावी लागली.

६. तळणासाठी घेतलेल तेल कढईत कडकडीत तापवा आणि त्यात भज्याएवढ्या आकाराचे बोंड टाका. लालसर खरपुस तळून घ्या. थोडेसे थंड झाल्यावर खायला घ्या.

वाढणी/प्रमाण: 
आवडीवर अवलंबुन आहे ;)
अधिक टिपा: 

१. गरमगरम तोंडात घालु नका रे बा. पुडचे चार दिस कशाचीच चव लागणार नाई.. चिपकुन बस्ते बर.. सांगितलं नाई म्हणुन म्हणानं नाई तं..

२. शिळे लय म्हणजे लय्यच टेश्टी लागते.

३. कराले लागणारा येळ खाण्यात पुर्रा वसुल होउन जाते.. Happy

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेशेपी भारी पण लिखाण त्याहून भारी हाये रे बाबौ!:खोखो:

अधिक टिपा:
१. गरमगरम तोंडात घालु नका रे बा. पुडचे चार दिस कशाचीच चव लागणार नाई.. चिपकुन बस्ते बर.. सांगितलं नाई म्हणुन म्हणानं नाई तं..>>>>:हहगलो:

टीना, तू पुण्यात असतेस ना? पुढील भारतभेटीत तुझ्याकडेच येते बोंडं खायला!
तोंपांसु दिसताय ती बोंडं.
टीपा दिल्यास ते बर केलस Wink विशेषत: पहिली.

बोंड ?? काय भारी नावे. आमच्या फुडकोर्टात वेजिटॅबल बोंडा मिळतात Happy

नक्की करुन पाहिन, पण अर्थात एवढे मोठे काशीफळ नाही घेणार..... Happy

छानच.. आमच्याकडे पण घारगेच करतात. गावाला दिवाळीत तयार झालेला भोपळा, मे महिन्यापर्यंत आमच्यासाठी राखून ठेवत असत.

हे खाल्ले होते पूर्वी कुणाकडे तरी. डिश समोर आल्यावर आधी ते भजी/ पकोडे आहे असे वाटून उचलले अन खाल्ल्यावर गुळाची चव आल्यावर मेजर डिसपॉइन्टमेन्ट झाली होती Happy त्यामुळे आवडला नव्हता हा प्रकार!

सिंडरेला, गुलगुले श्रीरामपूरमधेच खाल्ले पहिल्यांदा. गोडना, नवऱ्याला आवडला तो प्रकार. मला तिखट भजी नाही म्हणून Sad झालं. Lol

आम्हीपण घारगे करतो भोपळ्याचे. हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला.

साऊथकडे भजीच्या बर्‍याच आयटम्सना बोंडा म्हणतात. या अशा गोड भज्या मंगलोर बोंडा नावाने फार फेमस आहेत. पण भोपळा घातलेल्या भज्या मात्र पाहिल्या नाहीत. कधीतरी लेकीसाठी करायला हव्यात.

आम्ही घारगे करतो भोपळ्याचे +१ आणि आम्हाला ते आवडतात पण फार्र...
बाकी हा प्रकार सुद्धा मस्तच दिसतोय, कोणी करून दिला तर आवडेल हा ही Happy

अर्रे, सही! किती दिवसांनी ह्या पाककृतीमुळे बोंडांची चव आठवली. मस्तं लिहिलंय, टीना!

ओळखीतल्या एकजण शिळ्या बोंडांची करी करायच्या. दुसर्‍या दिवशी तिखटजाळ तर्रीदार रश्श्यात ही बोंडं सोडून उकळी आणायची. गोड बोंडं आणि तिखट रस्सा हे काँबिनेशन भन्नाट लागतं.

टीना, मस्तच पाकृ आणि फोटो. काशीकोहळ्याचा फोटो दिला ते बर केलस त्याला आम्ही भोपळा म्हणतो. हा शिजायला खूप वेळ घेतो. तीन शिट्टयावाली आयडीया भारी आहे. नक्की करेन.

मस्त लिहिलंय.
हे घारग्यांचं भावंडं दिसतंय. नाव ऐकलं होतं, पण हे गोड चवीचं असतं हे माहिती नव्हतं.
थोड्या प्रमाणात एकदा करून बघेन.

Pages