नेपाळी मोमो / मोमोज

Submitted by मामी on 30 September, 2015 - 11:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सारणासाठी :

कोबी, गाजर, पातीचा कांदा, मशरूम्स, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण

सोया सॉस, सिसमी ऑईल

मीठ, मीरपूड

आयत्यावेळी करायचे ठरल्यावर मशरूम्स चटकन उपलब्ध न झाल्याने मी यात वापरले नाहीयेत. पण मशरूम्समुळे खूप छान चव येते.

सारणासाठी प्रमाण असं काही नाही. उपलब्धतेनुसार, आवडीनुसार भाज्या कमीजास्त झाल्यातरी काही फरक पडत नाही. वरचा फोटो पाककृतीच्या प्रमाणासाठी नसून मी ते साहित्य काय प्रमाणात घेतलं आहे त्याकरता आहे.

पारीसाठी :

नेहमीचीच कणिक नेहमीसारखीच मळून किंवा मैदा मळून घेऊन किंवा राईस पेपर

चटणीसाठी :

थोडं पांढरं व्हिनेगर + पाणी एकत्र करून त्यात लाल मिरच्या भिजत ठेवा. हौस असेल तर मिरच्यांच्या बिया काढून टाका. थोड्या लसूण पाकळ्या, सिसमी ऑईल आणि मीठ

क्रमवार पाककृती: 

कोबी भाजीकरता चिरता तसा चिरून घ्या. बारीक कातरकाम करण्याची गरज नाही. ओबडधोबडही चालेल.
गाजर मोठ्या भोकाच्या किसणीतून किसून घ्या.
पातीचा कांदा (पात व कांद्यासकट) कापून घ्या.
मशरूम्स चिरून घ्या.
आलं किसून आणि लसूण बारीक कापून घ्या.

या सर्व भाज्या एका मोठ्या कढईत / वोकमध्ये थोडं नेहमीच्या वापरातील तेल टाकून थोड्या परतून घ्या. आता त्यावर झाकण ठेऊन एक वाफ आणा आणि मग उघड्यावर पाणी आटेपर्यंत परतत रहा. यातच मग आलं, लसूण, मीरपूड, सोयासॉस आणि सिसमी ऑईल घाला.

भाज्या शिजवताना सुरवातीलाच मीठ घाला. मीठ घातल्यानं मशरूम्स आणि कांद्याला पाणी सुटेल ते सुकवायला हवंय. त्यामुळे मीठ सुरवातीलाच घाला. पण मीठ घालताना या भाज्या शिजून कमी होतील हे ध्यानात ठेवा, नाहीतर खारट होईल. वाटल्यास सुरवातीला जरा कमीच मीठ घाला.

भाज्या अति शिजवायच्या नाहीत. जरा शिजल्या की बस्स!

कणिक मळून घ्या आणि अगदी छोटे गोळे करून लहान लहान चपात्या लाटून घ्या. साधारण पुर्‍यांएवढ्या. हौस असेल तर आणखीही लहान लाटू शकता. बाईट साईज मोमोज होतील.

तर या चपात्यांवर थोडं थोडं सारण ठेऊन त्यांचे मोमो बनवून घ्या.

मोमोचा टिपिकल आकार येण्यासाठी सारण भरल्यावर अर्ध्या चपातीच्या कडांना चुणा घालायच्या आणि उरलेला अर्धा मोकळा भाग तिथे आणून त्यांना चिकटवून घ्यायचं. खालच्या फोटोत दाखवलंय तसं. खूप काही नामांकित नाहीये पण कल्पना येईल.

आपल्याला हवा तो आकार द्या. मोदक, करंजी काहीही चालेल. राईस पेपर असेल तर स्प्रिंगरोल सारखे रोल्स करून उकडता येतील. ते ही एक करून दाखवलं आहे.

मग हे मोमोज ताटल्यांना थोडं तेल लावून मग त्यावर ठेऊन इडलीपात्र, मोदक पात्र किंवा कुकर (शिटी न लावता) मधून उकडा. कणकेचे केल्यास निदान २० मिनिटं उकडावे लागतात.

चटणीचं सर्व साहित्य एकत्र मिक्सरमधून काढा. चटपटीत चटणी आणि चविष्ट मोमो तयार.

वाढणी/प्रमाण: 
खा हो किती खायचे ते!
अधिक टिपा: 

१. सारण जरा ब्लँडच असलेलं छान लागतं. त्यामुळे मीठ, मिरच्या, आलं आणि लसूण हात राखूनच घाला.

२. कणिक वापरली तर २० मिनिटे, मैदा आणि राईसपेपर १० मिनिटात उकडून होईल.

३. गरमागरम मस्तच लागतं पण पुन्हा गरम करायची वेळ आली तर मायक्रोवेव मध्ये एक पाण्याचा ग्लास ठेऊन त्यासोबत एका प्लेटमध्ये घालून गरम करावेत. किंवा एका काचेच्या भांड्यात झाकण ठेऊन १ मिनिटाकरता गरम करावेत.

४. कणकेचे मोमोज उकडून झाल्यावर अर्ध्या मिनिटाकरता तसेच राहू द्यावेत आणि मग काढावेत. सहज निघतात. खूप गरम असताना काढले तर चिकटतात.

५. हा एक अत्यंत व्हर्सटाईल प्रकार आहे. यातच चिकन, खिमा, पनीर वगैरे घालून मांसाहारी मोमो बनतील. इतरही काही पूरक भाज्या घातल्या तरी चालतील.

माहितीचा स्रोत: 
नेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडत्या दहात टाकून ठेवलंय.. मस्त पाकृ.. इस्पेशली कणकेचं ऑप्शन आवडलंय..

आवडीनुसार सारणात बदल करण्यात येईल(च) Wink Proud

कर की रायगड. मी आताच डिनरला पोटभर खाल्लेत. चव मस्त येते या रेस्पीनं. बरोबर स्पिनच सूपही होतं.

आता कॉफी पिण्याचा मूड आहे.

मस्त प्रकार!!
थोडे पाण्याचा हात लावून बंद करता येईल.

एक शंका......

पुन्हा गरम करायची वेळ आली तर मायक्रोवेव मध्ये एक पाण्याचा ग्लास ठेऊन त्यासोबत एका प्लेटमध्ये घालून गरम करावेत.>>> असे का?

घरी राईसपेपर उरलेत खूपसे. त्याचे मोमो करून वाफवून बघावेत असं वाटलं होतं. आता या रेसेपीने करून बघते.

एक शंका: मी कितीही ओला केला तरी दुमडल्यानंतर राइसपेपर सगळ्या बाजूने एकमेकांना चिटकत नाही. एखादी बाजूतरी उघडतेच. तर तसेच वाफवले तर सारण बाहेर येईल का?

पुन्हा गरम करायची वेळ आली तर मायक्रोवेव मध्ये एक पाण्याचा ग्लास ठेऊन त्यासोबत एका प्लेटमध्ये घालून गरम करावेत.>>> असे का? >>> ते कोरडे होऊ नयेत म्हणून. मे बी त्यांवर ओला पेपर नॅपकिन पसरून गरम केले तरी चालू शकेल. मी करून पाहिलंय. छान होतात.

मस्त रेसिपी. इथे ट्रेडर जो मधे बेस्टेस्ट फ्रोझन व्हेज. ग्योझा (मोमो) मिळतात !! तिथेच एक तीळ अन सोया असं घातलेला अफलातून ग्योझा सॉस पण मिळतो. मी कायम ठेवते हे दोन्ही फ्रीझात! आता करून पण बघेन!
त्या ग्योझात बहुधा काफिर लाइम पण असतं या वरच्या भाज्यांसोबत. मस्त लागतात हे. ट्रेडर जो जवळपास असेल तर आणून पहा.

trader Joe gyojha.jpg

मोमोज नावाने एक वेगळाच पदार्थ डोळ्यांसमोर येत राहतो.म्हणून् यास भाज्यांचे कडबू ( अथवा करंज्या ) म्हटले तर चालेल का?

रच्याकने, नेहेमीच मोमोजमधलं सारण हे सपक का असतं? काही खास कारण? की सोबतचा डिपिंग सॉस जरा स्पायसी असतो म्हणून असं.

उगाच टाळक्यात आलेला प्रश्न आहे. अर्थातच, सारण आपल्या चवीचं करण्याचा पर्याय आहेच.

कणकेचे केल्यास बंद करताना चिकटत नसत्ल मैद्यासारखे. त्याला काय उपाय? >> चिकटतात. पाणीही लावायची गरज नाही. जरा दाबले की चिकटतात.

नेहेमीच मोमोजमधलं सारण हे सपक का असतं? काही खास कारण? की सोबतचा डिपिंग सॉस जरा स्पायसी असतो म्हणून असं. >>> असंच असेल.

मस्त फोटो आणि रेसीपी.
हे स्प्रिंगरोलच हेल्दी व्हर्जन वाटल.
मामी, हौस अएल तर काय काय करायला सांगतात. Lol शेवटी वाटल कि आता लिहिनार , हौस असेल तर हे करून बघा. Proud

डिश, वाट्या, चमचे लक्षात ठेवले आहेत , पुढील माबो पाकॄ स्पर्धेत पाकृ कोणाची आहे ते ओळखण्यासाठी Happy

डिश, वाट्या, चमचे लक्षात ठेवले आहेत , पुढील माबो पाकॄ स्पर्धेत पाकृ कोणाची आहे ते ओळखण्यासाठी >>> Lol

Pages