"गर्भसंस्कार"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 26 September, 2015 - 10:39

डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. अरुण गद्रे
गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा
आपलं मूल गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं, ही पालकांची नैसर्गिक इच्छा. नेमक्या याच इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, पण त्यामागे शास्त्रीय पुरावे नाहीत. उलट गर्भसंस्कार म्हणजे भयंकर सापळा आहे भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. पालकांनो, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून तुम्ही बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
ग्णांकडून हळूहळू कानावर यायला लागलं, प्रश्न येऊ लागले. अमुक बाबा, तमुक देवी, बापू यांच्यातर्फे गर्भावर संस्कार होण्यासाठी पुडय़ा मिळू लागल्या होत्या.. त्या घेतल्या तर चालेल? आम्ही सांगत होतो की, या बाबा, बापू, देवींपैकी कुणीही आयुर्वेदातले तज्ज्ञ नाहीत. नका घेऊ! काळ पुढे गेला अन् आजूबाजूला गारुडय़ाची एक पुंगी वाजू लागली. नुसती वाजली नाही, तर आयुर्वेदात शिक्षणसुद्धा न घेतलेले अनेक जणसुद्धा ती आयुर्वेदाच्या नावाने वाजवू लागले. ही पुंगी होती व आहे ‘गर्भसंस्कार’ या जादूई नावाची. बघताबघता भरभक्कम व्यापार मांडला गेला गल्लीबोळात. रुग्ण आपापल्या निवडीप्रमाणे भरपूर पैसे भरून गर्भसंस्कारांचा क्लास लावू लागले. डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता!
या गर्भसंस्काराच्या बाजाराने आता पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं आहे; पण गंमत म्हणजे आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये आम्ही विचारणा केली, तर आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यात आला की, ‘गर्भसंस्कार? काय भानगड आहे बुवा?’ मग आम्ही ही भानगड काय आहे ते अभ्यासायचं ठरवलं. कारण संत तुकारामांनीच म्हटलं आहे, ‘बुडती हे जन देखवे ना डोळा. येतो कळवळा म्हणोनिया!’
बाजार नेहमीच मोहमयी स्वप्ने विकतो. गर्भसंस्कारांबद्दल हे निव्वळ खरं आहे. कुणा आईबापाला असं नाही वाटणार की, आपलं मूल हे सुंदर, गुटगुटीत, हुशार आणि कर्तृत्ववान व्हावं? नैसर्गिकच आहे ही इच्छा. नेमक्या याच नैसर्गिक इच्छेचा मायावी वापर करत गर्भसंस्कारांची दुकानं गावोगावी उघडली गेली आहेत, हजारो रुपये फी घेतली जात आहे, महाग पुस्तकांची जाहिरात आणि धडाक्याने विक्री होते आहे; पण शास्त्रीय पुरावे? अहं! काहीही शास्त्रीय पुरावे नाहीत. गर्भसंस्कारांची अमुक एक व्याख्यासुद्धा नाही. ज्याची त्याची आपापली व्याख्या व पद्धती! फक्त उदाहरणे दिली जातात मोघम. इकडून तिकडून गोळा केलेली संस्कृत वचने शास्त्र म्हणून माथी मारली जातात. काही आयुर्वेदातले सर्वसाधारण उल्लेख असतात. मुख्य म्हणजे हे गर्भसंस्कारवाले उदाहरण देतात अभिमन्यूचे! बघा, आईच्या पोटात असताना आईबापाचं बोलणं अभिमन्यूनं ऐकलं अन् चक्रव्यूह कसा तोडायचं ते समजलं महाराजा, आहात कुठे? ठीक आहे. आपण असंच उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांचे. त्यांचे अलौकिक कर्तृत्व ही तर ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे! जिजाऊ जेव्हा गर्भवती होत्या, त्या अक्षरश: मोगल पाठीवर ठेवत घोडय़ावरून पळापळ करत होत्या. त्यांच्या वडिलांची, भावाची हत्या झाली होती त्या कालावधीत! रणधुमाळी होती. त्यांना ना हे गर्भसंस्कारांचे व्यापारी भेटले ना त्यांनी काही गर्भसंस्कार केले! तरीही शिवाजी महाराजांसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व घडले. खुद्द जिजाऊंनी लहान शिवबावर संस्कार केले म्हणून ते घडले; पण हे संस्कार झाले शिवाजी महाराजांची जडणघडण होताना, ते आईच्या पोटात असताना नाही.
ठीक. आपण थोडे वर्तमान काळात येऊ.
भारतात जिथे गर्भसंस्कार होण्याची तार्किक शक्यता आहे त्या भारताला किती नोबेल पारितोषिके मिळाली? रवींद्रनाथ टागोर,चंद्रशेखर वेंकट रामन, अमर्त्य सेन आदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी! किती सुवर्णपदके मिळाली ऑलिम्पिकमध्ये, तीही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच अन् बाहेरच्या जगात जिथे गर्भसंस्काराचे नावसुद्धा माहीत नाही तिथे? शेकडोंनी नोबेल पारितोषिके अन् हजारोंनी ऑलिम्पिक सुवर्णपदके.
बरं आपण महाराष्ट्रात येऊ.
आज गर्भसंस्कार विकत घ्यावे लागतात हजारो रुपये मोजून. ते परवडतात फक्त शहरी सधन वर्गाला. दुसरीकडे असंही एक जग आहे ज्यांच्यासाठी जगणं हीच रोजची लढाई आहे. कविता राऊत अशीच एक ग्रामीण मुलगी. आज दीर्घ पल्लय़ाची यशस्वी धावपटू आहे, पण तिच्या कुटुंबाला गर्भसंस्कार माहीतही नाहीत.
डॉ. प्रकाश व मंदा आमटेंच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीकडे जाऊयात. तिथे शिकलेला डॉ. कन्ना मडावी हा आमच्यासारखाच स्त्रीरोगतज्ज्ञ! कांदोटी या आजही दुर्गम असलेल्या गावात जन्मलेला, १९७६ साली लोकबिरादरी प्रकल्पात प्राथमिक शाळेत दाखल झाला अन् पुढे स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. अशी तिथली अनेक उदाहरणे आहेत. अर्धनग्न, अर्धपोटी अन् अशिक्षित आईबापांपोटी जन्मलेली ही मुले. प्रकाशाची पहिली तिरीप तिथे पोचली ती १९७३ साली डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या रूपाने आधुनिक वैद्यकाची. अशा परिस्थितीत या मुलांच्या आयांवर गर्भसंस्कार कसे होणार? कन्ना मडावी गर्भसंस्कारांमुळे नाही घडला. तो घडला बाबा, प्रकाश व मंदा आमटेंच्या मदतीच्या हातांनी!
तेव्हा गर्भसंस्काराच्या समर्थनासाठी दिली जाणारी अभिमन्यूच्या कथेसारखी उदाहरणे फोल आहेत. गर्भसंस्कार विकणाऱ्यांकडे फक्त अशा पुरावा नसलेल्या कथा आहेत, त्याविरुद्ध आहेत हजारो नोबेल व ऑलिम्पिक पदके मिळवणाऱ्यांची वास्तवातली उदाहरणे! गेल्या पाचशे वर्षांत ज्या ज्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी आपले आयुष्य बदलले त्यांच्या मातांनी, आजच्या युगातल्या बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्ससारख्यांच्या मातांनी वा विसावे शतक घडवणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन, डॉ अल्बर्ट स्वाईट्झर, कार्ल मार्क्‍स, सिगमंड फ्रॉईड, चार्ली चॅप्लिन व महात्मा गांधी इत्यादी महामेरूंच्या मातांनी कधी गर्भसंस्कार केले नाहीत अन् नुकतेच राष्ट्राला चटका देऊन अंतराळात विलीन पावलेले आपले लाडके एपीजे अब्दुल कलाम? त्यांच्या आईने कुठे घेतले होते गर्भसंस्कार? तेव्हा अभिमन्यूच्या या भ्रामक उदाहरणाच्या मोहिनीतून आपण आधी बाहेर पडूयात. हा प्रश्न विचारू या की, गर्भसंस्कारात नेमकं काय घडतं?
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही, किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
गर्भसंस्कारातला दुसरा भाग हा मातेला गर्भ तेजस्वी, हुशार, कर्तृत्ववान होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी मंत्र शिकवले जातात! मातेने पोटातल्या गर्भाशी बोलण्यावर भर दिला जातो. हा भाग मात्र वैज्ञानिक पायावर तद्दन अमान्य आहे, साफ अमान्य!
दुर्दैवाने गर्भसंस्कार करणारे आधार घेत असतात आयुर्वेदाचा व त्याला बदनाम करत असतात. आयुर्वेदात गर्भासंबंधी काय आहे? आयुर्वेदात वैज्ञानिक कसोटय़ांवर उतरणाऱ्या बाळंतपण व गर्भारपणासंबंधी अनेक गोष्टी आहेत, ते एक स्वतंत्र वैद्यकशास्त्र आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रसूतीनंतर वार कशी काढायची याचे यथायोग्य वर्णन आहे. गर्भ काढण्याच्या शस्त्रक्रियेचे वर्णन आहे. त्यासाठी राजाची परवानगी घ्या, अशी सूचनासुद्धा आहे. (हल्ली आपण सरकारची घेतो!) आमचा आयुर्वेदाला विरोध नाही. आम्हाला आयुर्वेदातल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या उपचारांबद्दल व्यावसायिक आदरच आहे, पण गर्भसंस्कार हे आयुर्वेदाच्या मुखवटय़ामागे दडवले जात आहेत अन् त्यामुळे आयुर्वेदाच्या गर्भधारणेसंबंधी असलेल्या काही कालबाहय़ निरीक्षणांबद्दल लक्ष वेधणे आवश्यक झाले आहे. अष्टांग हृदय, (वाग्भटकृत) यात शरीरस्थान या प्रकरणात गर्भावस्थेबद्दल काही मजकूर सापडला. त्यातली काही उदाहरणे अशी, जिला आधुनिक विज्ञानाचा पाया नाही. ती म्हणजे, गर्भ आधी तयार होतो व त्यात जीव नंतर येतो, मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी जर संबंध राहून मूल राहिले तर नवरा मरतो, मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी संबंध राहून गर्भ राहिला तर ते मूल मरते. (सार्थ भाव प्रकाश, पूर्व खंड श्लोक १३-१६, वैद्य नानल प्रत), मासिक पाळीनंतर समरात्री (४, ६, ८, १०, १२) समागम केला तर मुलगा होतो व विषम रात्री केला तर मुलगी होते. (मासिक पाळीनंतर पहिल्या दहा दिवसांत गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसते हे शास्त्रीय सत्य आज शाळांमध्येसुद्धा शिकवले जाते!). काही गर्भादान संस्कार आयुर्वेदात आहेत. त्यातल्या एका संस्कारात, ‘अनवमोलन संस्कारात’ होणाऱ्या गर्भपातापासून बचाव कसा करायचा ते सांगितले आहे. हा गर्भपात कोणता? तर पिशाच्च, भूत, ग्रहबाधा यामुळे होणारा! अर्थातच आयुर्वेदाचा आधार घेताना ते शास्त्र तीन हजार वर्षांपूर्वीचे आहे हे लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. खुद्द वाग्भटांने असे नमूद केले आहे की, क्रमवृद्धीच्या नियमांचे पुष्टीकरण करणे हे प्रत्येक आयुर्वेदाचार्याचे कर्तव्य आहे. क्रमवृद्धी म्हणजे नवीन ज्ञानाची भर, जुन्या चुकांची सुधारणा आणि अचूकतेकडे प्रवास. वाईट हे आहे की, आजचे तथाकथित व्यापारी बिनधास्तपणे प्रतिष्ठा मिळवायला हे गर्भसंस्कार आयुर्वेदाच्या नावावर खपवत आहेत.
गर्भसंस्कारांच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, एका गर्भसंस्कार वर्गात वडिलांना बाळाशी बोलायला लावतात. हे बोलणे जर बाळाला कळत असेल तर घरातले कुण्या दोघांचे भांडणही बाळाला कळेल की; दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला दिलेली शिवीदेखील बाळ ऐकेल आणि कदाचित लक्षातही ठेवेल! दुसऱ्या एके ठिकाणी गर्भवती स्त्रीच्या पोटासमोर देवाचा फोटो धरायला लावतात. गाडीतून प्रवास करणाऱ्या गर्भवती स्त्रीसमोर काही काळ एखादे घाण सिनेमाचे पोस्टर आले तर? गर्भसंस्कार करणारे या गोष्टींवर भर देत असतात की, गर्भसंस्कारांमुळे बाळ तेजस्वी होईल. बाळ तेजस्वी असण्यासाठी याची गरजच काय? खरं तर प्रत्येक आईला आपलं बाळ तेजस्वी वाटते! अन् तिच्यासाठी ते असते.
आजचे विज्ञान व समाजशास्त्र गर्भसंस्कारांबद्दल काय सांगते? कारण आज बिनदिक्कतपणे हाही दावा केला जात आहे की, मंत्रांचे गर्भसंस्कार वैज्ञानिक आहेत. आजच्या पुराव्यांनुसार गर्भ चार महिन्यांचा झाला, की तो ऐकू शकतो. म्हणजे त्याला आवाज झालेला कळतो. हे ऐकणे म्हणजे ऐकून समजणे नाही! चौथ्या महिन्याअखेर गर्भाच्या नव्र्हवर (मज्जारज्जूंवर) मायलीनेशन सुरू होते. मायलीनेशन म्हणजे आवरण. हे आल्याशिवाय मज्जारज्जू काम करू शकत नाही. मज्जारज्जूंचे काम संवेदना इकडून तिकडे पोहोचवणे असे असते. जन्मवेळेपर्यंत जेमतेम १२ ते १५ टक्के मज्जारज्जू अशा मायलीनेशनसह असतात. जन्मानंतरही मायलीनेशन होणे सुरू राहाते व वयाच्या तिसऱ्या वर्षांपर्यंत पूर्ण होते.
मायलीनेशनने गर्भाची शिक्षणक्षमता ठरते. मंत्रांनी बुद्धी वाढवण्याचा दावा या पाश्र्वभूमीवर तपासावा लागतो. ३२ आठवडे पूर्ण होताना अगदी प्राथमिक अशी शिक्षणक्षमता गर्भाकडे येते. ती हॅबिच्युएशन पद्धतीची असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणूयात. तो प्रतिसाद नसतो, तर फक्त प्रतिक्रिया असते. अगदी एकपेशीय अमिबासुद्धा त्यावर तीव्र प्रकाशझोत टाकला, तर प्रतिक्षिप्त क्रियेने दूर जातो. पोटातला गर्भसुद्धा कानावर पडणाऱ्या आवाजांना- ओरडणे, बोलणे, मंत्रोच्चार, फटाके, हॉरर मुव्हीतले संगीत, शास्त्रीय संगीत या सर्व उत्तेजनांना (स्टिम्युलसला) एकाच प्रकारची प्रतिक्रिया देतो. तो हलतो. बास! त्याला काहीही समजून तो हलत नाही. तो फक्त आवाजाने दचकून हलतो. गर्भसंस्काराचे प्रणेते नेमके हे त्याचे हलणं? व्यापारासाठी वापरतात. म्हणतात, बघा हा पोटातला हलणारा अभिमन्यू! वास्तविक पाहाता गर्भाशयाच्या बाजूने मोठय़ा रक्तवाहिन्या असतात व त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे प्रचंड आवाज सतत होत असतो, जणू गर्भासाठी सतत एखादी डॉल्बी यंत्रणा वाजत असते. त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. आपण इतिहासात डोकावलो तर अनेक जन्मत: मूकबधिर अशा कर्तृत्ववान व्यक्ती आढळतात. त्यांना तर पोटात काय, बाहेरसुद्धा मंत्र वा बोललेले ऐकू येत नाही! पण यामुळे त्यांचे कर्तृत्व कधी लोपले नाही.
गर्भ पोटात शिकतो या दाव्याचा फोलपणा आता सामाजिक शास्त्रे अजून एका अंगाने उद्ध्वस्त करत आहेत. ऐकलेल्या व बघितल्यापैकी १० टक्के, प्रयोग बघून २० टक्के, प्रत्यक्ष कृती करून ३० टक्के, मनन करून ५० टक्के, शिकलेले ज्ञान वापरून ७५ टक्के व दुसऱ्यांना शिकवून ९० टक्के अशा क्रमाने प्रत्येक व्यक्तीचे शिक्षण घेणे परिपूर्ण होत असते. आपण बघितले त्याप्रमाणे मायलीनेशनच पूर्ण प्रमाणात न झाल्यामुळे आपण ढीग मंत्र शिकवले वा गणितही (शिकवतीलसुद्धा या बाजारात उद्या. अगदी आयआयटीचे सुद्धा भरपूर पैसे घेऊन) तरी गर्भ- वाचन, मनन, प्रयोग अन् ज्ञानाचा उपयोगही करू शकणार नाही. तो शिकूही शकणार नाही! याचा अर्थ असा की, आजचे विज्ञान निर्विवादपणे सांगते की, गर्भसंस्कारांचा जो मूलभूत दावा आहे की, मंत्र बाळाची ‘बुद्धी’ वाढवतात, ती एक अंधश्रद्धा आहे.
मग त्यांचा हा दावा तरी बरोबर आहे का? की आईची मन:स्थिती- भावना व विचारांचा गर्भावर खोल परिणाम होतो? तर नाही. पुरावा आहे- डायझायगोटिक जुळे. आईच्या दोन अंडय़ांचे मीलन वडिलांच्या दोन शुक्रजंतूंशी होते व संपूर्ण वेगळी गुणसूत्रे असलेली दोन भावंडे एकाच वेळी गर्भाशयात वाढतात व जुळे म्हणून जन्म घेतात. हे आता पुराव्याने सिद्ध झाले आहे की, एकाच आईच्या उदरातली ही एकाच वेळी वाढलेली बाळे बुद्धिमत्तेत पूर्ण वेगळी असतात, जरी ती वाढत असता त्यांच्या आईची मन:स्थिती, विचार, भावना एकच असतात आणि जर आपण १६व्या शतकापासून २०व्या शतकापर्यंत प्रतिभावान लेखक, तत्त्वज्ञांनी वा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा अभ्यास केला तर हेही सहज स्पष्ट होते की, कित्येकांच्या माता या हलाखीच्या परिस्थितीत होत्या. त्यांचे जीवन अजिबात प्रसन्न वगैरे नव्हते. तेव्हा गर्भसंस्कारांमुळे आईची मन:स्थिती आनंदी होण्याचा फायदा फक्त तिला आहे, तिच्या पोटातल्या गर्भाला नाही. गर्भासंबंधीचा गर्भसंस्कारांचा हाही दावा बिनपुराव्याचा आहे. अर्थातच आधी प्रतिपादन केल्याप्रमाणे काही मार्गाने आईची मन:स्थिती आनंदी झाली तर विरोध असण्याचे कारण नाही, अजिबात नाही; पण गर्भासाठी त्याचा फायदा नाही.
आता वळू या हातात भरपूर पैसा खेळणाऱ्या सुशिक्षितांकडे, ज्यांना झुकवत या झुकानेवाल्यांचा व्यापार चालला आहे. आज शिक्षणाचा बाजार आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आजचे पालक साहजिकच आपल्या होणाऱ्या मुलाच्या भविष्याच्या चिंतेत असतात! अन् हल्लीच्या इंस्टंट जगात गर्भसंस्कारांचा मोह पडतोच पडतो. काही तोटा तर नाही ना? असा विचार केला जातो. दुर्दैवाने तोटासुद्धा आहे या गर्भसंस्कारांच्या जाळ्यात सापडण्याचा. एक केस तर आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे. अत्यंत श्रद्धेने एका स्त्रीने गर्भसंस्कारांचा मार्ग स्वीकारला, पण ते बाळ आठव्या महिन्यातच पोटात असतानाच दगावले. अत्यंत निराश झालेल्या तिचा सतत प्रश्न होता, ‘मी गर्भसंस्कार करून घेत होते! असं झालंच कसं?’
गर्भसंस्कारांचा स्वीकार असा पैसे टाकून जेव्हा हे होणारे आईबाप करत असतात, कुठे तरी अवास्तव अशा अपेक्षा आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण करत असतात. या बाजारी व्यवस्थेमध्ये सगळं काही पैसा फेकून विकत घेता येते या मानसिक आजाराचे ते मनोरुग्ण होत असतात. पैसा फेका- मंत्रोच्चार शिका, होणारे बाळ? आइन्स्टाइन! पैसा फेका, महागडा क्लास लावा, मुलगा आयआयटीत अन् थेट अमेरिकेत! भयंकर सापळा आहे हा- भ्रमाचा, अतिअपेक्षांचा अन् आपल्या मुलांसाठी त्यांचं व्यक्तिमत्त्वच हिरावून घेण्याचा. त्यांना आपल्या अपेक्षांचा बळी करण्याचा. हा गंभीर तोटा नाही का? आमचे आवाहन आहे की, या जोडप्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारावा की, गर्भसंस्कारांच्या बाजारात शिरून आपण बाळ जन्मण्याआधीच पालकत्वाचा चुकीचा मार्ग तर पकडत नाही ना?
खरं पाहाता पालक म्हणून त्यांना खूप काही करायचंय. जमलं तर सहा महिने निव्वळ स्तनपान द्यायचंय. बाळाचे मायलीनेशन पहिल्या तीन वर्षांत पूर्ण होते. हा कालखंड बाळासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचं पोषण योग्य रीतीने करायचं आहे. बाळाशी ते जसं प्रतिसाद द्यायला लागेल, तसं भरपूर बोलायचंय, आपला मौल्यवान वेळ त्याला द्यायचाय. कारण गर्भावस्थेत मंत्र पुटपुटून त्याला काही फायदा नाही, पण बाळ प्रतिसाद देऊ लागले की, त्याच्याशी भरपूर संवाद करून मात्र बाळाची वाढ छान पद्धतीनं होणार आहे. बाळासाठी स्पर्शाची भाषा हा सर्वात उत्तम संस्कार आहे आणि शेवटी चिरंतन सत्य हेच आहे की, मुलांवर खरे संस्कार फक्त पालकांच्या वागण्यातून/ कृतीतून होत असतात, गर्भसंस्कारांमुळे नाही.
खलील जिब्रानने म्हटल्याप्रमाणे तुमचे बाळ हे तुमच्या हातातून सुटलेला बाण आहे, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तुमची मालमत्ता नाही. गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा तुम्हाला नेमके हेच सत्य विसरावयाला भाग पाडणार आहे. म्हणून विचारी पालक व्हा. गर्भसंस्कारांच्या मोहमयी बाजारापासून सावध राहा. त्यासाठी शुभेच्छा.
गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत.
डॉ. चंद्रकांत संकलेचा -internalos@hotmail.com
डॉ. अरुण गद्रे -drarun.gadre@gmailcom
(दोन्ही लेखक एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गर्भसंस्कार न करुन घेतलेल्यांची मुले वेडी-बागडी होतात की काय अशी भिती वाटत होती ती या लेखामुळे दुर झाली

हा उत्तम लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

विठ्ठल, आई होण्या आधी आणि नंतर सारखीच उत्तम काळजी घ्यायला हवी. इथे माझं एवढंच म्हणणं आहे, की गर्भसंस्कारांचा अजिबातच उपयोग नाही, हा सूर लावल्याने लेख एकांगी झाला आहे. गर्भसंस्कारांचे एकांगी अवडंबर माजवू नये हे मान्य आहे, मात्र गर्भसंस्कारांना अगदीच निकालात काढू नये.

माझं इतकं आणि एवढंच म्हणणं आहे. Happy

>>गर्भसंस्कारात एक महत्त्वाचा भाग असतो- चर्चा, आहार-व्यायाम याबद्दल मार्गदर्शन, आनंदी राहण्याची सूचना, नवरा व सासूचा सहभाग. या गोष्टी चांगल्या आहेत आणि करायलाच हव्यात. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचे गर्भवतीचे समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी ‘गर्भसंस्काराचा’ मुखवटा घ्यायची गरज नाही; किंबहुना हे माता-संवर्धन आहे, गर्भसंस्कार नाहीत>>

लेखातला हा मुद्दा मुळीच पटला नाही. स्त्रीरोगतज्ज्ञांकडे गेल्यावर फार फार तर १०-१५ मिनिटे चेकप केले जाते. त्यातही आपण काही प्रश्न विचारले तर त्याचे क्लॅरिफिकेशन दिले जाते. कोणाला वेळ आहे हो १-२ तास रुग्णाशी बोलायला?कोणत्याही स्त्रि रोगतज्ञाने 'माता संवर्धन' केल्याचे माझ्या पाहण्यात नाही. अर्थात त्यामुळेच गर्भसंस्कार केंद्रे फोफावली आहेत. गर्भसंस्काराच्या नावाखाली मातासंवर्धन होत असेल तर काय हरकत आहे? काहीतरि बेनिफिशियल घडतय ना.

उपयोग आहे की. पैसे मिळतात त्या लोकांना.

रिकामा व हापिसचाही वेळ लोकांच्या मागावर राहण्यात, दिवसभर वाहत्या बाफवर कुचाळक्या करण्यात अन डूआयड्या काढून ट्रॉलिंग करण्यातच जातो. मग वेळ काढून काही कन्स्ट्रक्टिव्ह लिखाण कसं काय होणार?

याचीही नीट आकृती काढून पहायला हवी एकदा. Wink

सतत मार्केटिन्ग आणी त्याचे हॅमरीन्ग याने बर्‍याच वेळा नको त्या ठिकाणी पैसे घालवले जातात याचे गर्भसन्स्कार हे उत्तम उदाहरण आहे. मुळात आई-बापच चान्गले सुसन्स्कारीत असतील तर याची काही गरज आहे असे मला वाटत नाही. आई-बापाचे चान्गले वाईट गुण मुला-मुलीन्मध्ये उतरतातच. याला गर्भसन्स्काराची काय गरज? हे फॅड वाढत चाललेय. डॉ. बालाजी ताम्बे ( डॉ?) यानी याचा नको तेवढा उदो उदो केलाय. हे ठीक आहे की आई-वडिलानी घरात चान्गले निरोगी वातावरण ठेवले पाहीजे. पण हे प्रत्येक मुलाचे आईवडील- आजी आजोबा सान्गत असतातच की.

माझ्या मुलीच्या वेळी मी फक्त चान्गले सन्गीत ऐकले. का? तर मला मुळात त्याची आवड होतीच. या पुस्तकापेक्षा जर प्रख्यात न्युट्रीशीअन डॉ. मालती कारवारकर याचे वन्शवेल आणी इतर आहारविषयक पुस्तके वाचली तर दुप्पट फायदा होईल. मी हेच आणले होते. योग्य आहार आणी निरोगी वातावरणात मुल चान्गलेच होईल.

डॉ. कैलास, चान्गल्या लेखाची ओळख करुन दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

निओ श्रीमंत लोकांना, हे जुने संस्कार आहेत असे म्हणून पटवले की झाले. ही लोकं पैसे द्यायला तयार असतात. पण ती लोकं पैसे दिले म्हणजे त्यांचा पूर्ण विश्वास असतो असे नाही, तर" हे ही करून पाहू, फायदा नाही झाला तरी, तोटा तर नाही ना होणार? " अशी भुमीका असते. नेमका हाच "टारगेट ऑडियंस" बघून कुणी दुकान मांडले तर तो त्या दुकान मांडणार्‍यांचा शहाणपणा आहे. आणि हे प्रोडक्ट विकत घेणार्‍यांचा येडेपणा.

गर्भसंस्कार हे बालाजी तांब्यांचे पुस्तक आम्हालाही एका स्नेह्यांनी दुसर्‍या वेळी एकाने भेट दिले होते. पण आम्ही तेंव्हा देशात राहत नव्हतो, त्यामुळे कुणी तुम्ही इथे येऊन क्लास करा असा सल्ला दिला नाही. अर्थात दिला असता तर तो अमंलातही आणला नसता हा भाग वेगळा ! ( ह्या भुमीकेबाबत आपण घरातच आग्रही राहयाला हवे. अन्यथा घरातील वडीलधारेही डोक्यावर बसू शकतात. )

हॅविंग सेड दॅट - त्या पुस्तकात सर्वच टाकावू आहे असेही नाही बहुदा. थोडेफार आम्हाला उपयोगी पडले की नाही हे ठरवता येत नाही, पण हे चाटण करा, ते चाटण चाटा ह्यावर वैयक्तीक माझा विश्वास नसल्यामुळे कुठलेही चाटण चाटवले नाही. पण ते पुस्तक आम्ही मैत्रीनीला दिले तर तिला आवडले.

ती सिडी मात्र मेडिटेशन करायला चांगली आहे. धकधकाची दिवसात, ४० मिनिटे व्यवस्थित मेडिटेशन होऊ शकते. आता ती सिडी मिळते की नाही ते माहित नाही.

सर्वच आयुर्वेद उपचार टाकावू आहेत अशी भुमीका लेखातही नाही. तो लेख इथे लिहिल्यामुळे कैलास गायवाडांचे आभारच.

गर्भसंस्काराच्या नावाखाली पैसे उकळायचा धंदा आहे हा? ज्यांच्या कडे एवढे पैसे नाहित त्यांचे काय?

प्रोडक्ट विकत घेणार्‍यांचा येडेपणा होतो पण येडेपणा न करु शकनारे उगाच झुरतात आपण येडेपणा नाही करु शकत म्हणुन.

डॉ.कडे जरी वेळ नसला तरी सरकारी दवाखान्यात किंवा इतर नर्सिग होम मधे पोस्टर किंवा बोर्ड वर गर्भवती व बाळ-बाळांतिन साठी चांगली उपयुक्त माहिती लिहलेली असते त्याचे पालन केले तरी पुरेस असावे.

उत्तम लेख.

गर्भसंस्कारांचा अजिबातच उपयोग नाही, हा सूर लावल्याने लेख एकांगी झाला आहे. गर्भसंस्कारांचे एकांगी अवडंबर माजवू नये हे मान्य आहे, मात्र गर्भसंस्कारांना अगदीच निकालात काढू नये. >>> निकालात काढू नयेत असे जे मुद्दे आहेत ( गर्भवती स्त्रीचा आहार-विहार, मन प्रसन्न, शांत ठेवणेपासून ते वडील, आजी-आजोबांना बाळाच्या आगमनासाठी तयार करणे पर्यंतचे सगळे पालकसंस्कार. ) ते खरंतर 'गर्भसंस्कार' नाहीयेत हाच तर लेखाचा मुद्दा आहे.
बाळाला पोटात असल्यापासून विशिष्ट प्रकारे प्रोग्रॅम करु शकतो ही कल्पना अगदी सपशेल दिशाभूल करणारी आहे आणि गर्भसंस्कारांचा क्लास काढणार्‍यांचा मूळ उद्देश तोच असतो ना ?

'विचारी पालक' व्हा असं तर हा लेखही सांगतोच आहे की Happy

tee cd kharach changalee aahe. mee ajunahee tee cd aikate Wink mazyaa mothyaa lekeela tyatalaa Amitabh bachchan cha awaj khup avadato. "this man has very good voice. I like to hear him!" ase tee vayachyaa 4 thyaa varshee mhanalee hotee. arthat tichyavelee pregnant asatana tee CD kadheech aikalee navhatee Wink (mhanaje tase garbhsanskar tichyaavar navhate :D)

malatee karvarkaranche 'vanshvel' kharach khup maahiteepurna pustak aahe. tasach Dr Chorghadenche ek baal sangopana varache pustak khup chaan aahe.

urjita jain che pustak mazyakadun purna vachale gele nahee.

9 mahine (tyatale suruvateeche 2 mahine sodunach dya. pregnancy confirm houn tee sharirane aani manane accept karanyat pahile trimester sampatach yete) mhanaje khara tar 7 mahine garbhasanskar kelyane janmala yenare mul paripurna hote ha kite motha gairsamaj aahe... pudhe 20-25 varshat kaheech sanskar hot naheet?

मनशक्ती चे ३ दिवस शिबीर लोणावळ्याला जाऊन अटेंड केले होते.
एकंदर बरे वाटले, पहिला दुसरा दिवस. ते 'गर्भाला उद्देशून मंत्र' यापुढे बरेच काही सांगतात. (म्हणजे कंटेंट अ‍ॅप्लिकेबल टु ऑल.) तिसर्‍या दिवशी "तुम्ही मनशक्तीला महिन्यातून इतका इतका वेळ दिलाच पाहिजे"(प्रसार किंवा सत्कार्य) अशी कमिटमेंट लिहून कलशात टाकायची होती. तिथे मात्र ती दिली नाही. एकंदर तो तीन दिवसाचा वर्ग आवडला. त्यात एक तास आयुर्वेद, एक तास गोष्ट, एक तास योग असे काहीकाही होते. सगळे आठवत नाही पण त्यावेळी आवडले होते. सर्वात मोठा फायदा म्हणजे सायं संस्कार नावाची सीडी जी एरवी पण खूपदा ऐकतो. शांत वाटते.
उपयोग झाला नाही झाला महित नाही, पण "गुड टु हॅव" मध्ये असायला हरकत नाही.'गर्भसंस्कार' हा खूप एकसुरी शब्द आहे. एरवी ज्या गोष्टी आपोआप केल्या असत्या (शांत मन, चांगला आहार, कमी स्ट्रेस) त्या आता पैसे घेऊन 'अशा करा' सांगतात हा निव्वळ गर्भ संस्कार च नाही तर आर्ट ऑफ लिव्हिंग, आणि बाकी सर्व कल्ट चा धंदा आहे.
"कराच" किंवा "न करणारे अधम पापी" असा ताण न देता चांगल्या गोष्टी पैसे घेऊन कोणी सांगून आपले दुकान चालवत असेल तर माझी काही हरकत नाही. दुकानात जाताना डोळे उघडे ठेवून जायचे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.

त्यामुळे आईने बाहेर काहीही मंत्र पुटपुटले, ती काहीही बोलली तरी ते गर्भाला वेगळे ऐकू येण्याची शक्यताच नसते. ऐकू आले तरी मज्जारज्जूंचे मायलीनेशन न झाल्यामुळे ‘समजण्याची’ गर्भाची क्षमताच नसते. >>
मुळातच मेंदूमध्ये जन्मतः कोणतीही भाषा समजण्याची क्षमता नसते. भाषा ही जन्मानंतर शिकावी लागते. बोलणे - ऐकणे - वाचणे - लिहिणे या सर्व क्रिया शिकाव्या लागतात. जंगलामध्ये वाढलेल्या मानव-पुत्राला बोलत येत नाही हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाषा-केंद्र व उजवेखोरपणा हे मेंदूमध्ये डाव्या अर्धभागामध्ये जन्मानंतर एक वर्षानंतर तयार होते. तेंव्हा गर्भावस्थेमध्ये कसे ऐकू येणार व कसे समजणार ?
सारांश - 'गर्भसंस्कार हे एक थोतांड आहे.'
दुनिया झुकती है , …।
…… एक धुंडो … हजार मिलेंगे !
डॉ. कैलास यांचे आभार !

आताच्या काळातिल ज्या माता भगिनिंनी गर्भ संस्कार करुन मुलांना जन्म दिला आहे व जे असे संस्कार न होता

जन्माला घातलेले मुले आहेत त्यांच्यात काही तुलनात्मक फरक असतो का?

@बाळाजीपंत,

गर्भसंस्कारांचा अजिबातच उपयोग नाही, हा सूर लावल्याने >> लेखात असा सूर वगैरे लावला नसुन तसे ठाम प्रतिपादन केले आहे. Happy

मात्र गर्भसंस्कारांना अगदीच निकालात काढू नये. >> कां?? याची कारणीमिमांसा आपण ईथे अथवा एखादा नविन धागा काढुन केल्यास चांगले. Happy

अतिशय उत्तम लेख.मला जवळच्या १० लोकांनी अग अमक्या तमक्या शिबीराला जा अस कित्येक वेळा सांगितले.ज्यांची दिवसांची फी २०००-४००० अशी होती.हा लेख वाचुन खुप बरं वाटतय की मी कुठल्याच शिबीराला गेले नाही.बहुधा हे सगळे क्लासेस फक्त गर्भवती च मन आनि डोक शांत करण्यासाठी असावे.
माझ्या डॉक चा क्लास मात्र मी लावला,ज्यामधे गर्भ कसा राहतो, कसा डेव्हल्प होतो पासुन नॉर्मल /सिझेरीयन डिलिव्हरी का आनि कशी होते ह्या सगळ्याचे खुप छान लेक्चर्स होते.
माझ्या डॉ,नी स्पष्ट सांगितले होते,तुला जॅझ आवडत असेल तर तेच एक..कोणी सांगते म्ह्णुन न कळणार्या कुठल्याही शास्त्रीय संगीताच्या रचना एकु नकोस. Happy

पण आपण सगळे(च) घरात येणारे बाळ म्हटले की काहीही करायला तयार असतोच ना !
त्याचा फायदा घेतला जातो.

महागडे पुस्तक असो अथवा बाळाला काय हवं ते आम्हीच ओळखतो म्हणून सांगणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्या
प्रॉड्क्ट विकत घेणारे येडे आणि विकत घेता येत नाही म्हणून झुरणारे पण येडेच

बा.तां हे आनि सकाळ हे एकमेकांचे एकमेकांसाठी आहेत.बा,ता हे सकाळ वाल्यांचे पिलु आहे.त्यांनी काढलेले पुस्त्क म्हण्जे आनि त्याची फॅ,डॉ ची लेखमालिका यायची गर्र्भसंस्कार वर्,त्याच एकत्रीकरण आहे.अर्थात मी ५०० रु मोजुन जेव्हा वाचले तेव्हा कळले.त्यापेक्षा वंशवेल इथलीच चर्चा वाचुन घेतल होत,त्याचा जास्त फायदा झाला.अजुन ही होतोय.

आताच्या काळातिल ज्या माता भगिनिंनी गर्भ संस्कार करुन मुलांना जन्म दिला आहे व जे असे संस्कार न होता
जन्माला घातलेले मुले आहेत त्यांच्यात काही तुलनात्मक फरक असतो का?
>>>

मुळात अशी तुलना करावीच का?
समजा उद्या असं सिद्ध झालं तर महाग असतनाही करून घेणार का गर्भसंस्कार

कोणत्याही मुलामधे त्याची अशी म्हणून गुण वैशिष्ट्ये असतात ती जाणून घेऊन विकसित करण्याची मानसिकता पालकांमधे निर्माण होत नाही. ज्या समाजामधे, एखाद्या माणसाला भरपूर पैसे मिळवण्याची अक्कल नाही म्हणजे तो निकम्मा, हेच मनात असतं तोपर्यंत कोणीही कितीही प्रबोधन करा अशी दुकाने चालूच रहातील.

मूळ लेखात देखिल
डॉक्टर म्हणून आम्हाला समाधान एवढंच होतं की, आपलं मूल डॉक्टर करण्यासाठीचा त्यांचा रेट थोडा जास्त होता! हे वाक्य आहेच की

अशा पालकांचा आपले मूल डॉक्टर बनवण्यामागे काय बरे हेतू असावा

ह्म्म... माझ्यावेळी याचे इतके फॅड नव्हते. पण माझी त्या नऊ महिन्यातली मनस्थिती आणि माझ्या मुलीची आजवरची मानसिक अवस्था आणि वागणे यात जमिन अस्मानाचे अंतर आहे. त्यामुळे गर्भसंस्कार करुन गर्भावर काही चांगले परिणाम होत असावेत यावर माझा फारसा विश्वास नाही. मुल त्याचा स्वभाव जीन्समधुन घेऊन येते, आजुबाजुचा समाज त्यात भर घालतो.

पण गर्भसंस्काराच्या निमित्ताने आईबाबा होऊ घातलेल्या मंडळींना जर समुपदेशन मिळत असेल तर आजच्या परिस्थितीत ते चांगलेच आहे. हल्ली सगळ्यांनाच अशा वेळी कुठे मिळतो जेष्ठांचा आधार? तेव्हा बाळाच्या जन्मानंतर कुठल्या परिस्थित्तीला तोंड द्यायचे आहे हे पैसे घेऊन कोणी सांगितले तर त्यात फारसे काही वाईट आहे असे मला तरी वाटत नाही.

आता सगळ्याचेच बाजारीकरण झाले आहे. कोणी विज्ञानाचे नाव सांगुन स्वतःची पोतडी भरतो, कोणी पुराणाचे नाव सांगुन. गिर्हाईके दोघानांही मिळतात. दुनिया झुकती है फायनली... तुम्ही काय सांगुन झुकवताय ही तुमची कला.

"कोणी विज्ञानाचे नाव सांगुन स्वतःची पोतडी भरतो, कोणी पुराणाचे नाव सांगुन. गिर्हाईके दोघानांही मिळतात."...

सहमत आहे. हनुमान चालीसा यंत्राची जाहिरात काय, बॉडी बिल्डो पावडरची जाहिरात काय, किंवा हार्ट फ्रेन्डली तेलाची जाहिरात काय. सगळे उल्लु बनवायचेच धंदे. पण गिर्‍हाइकं मिळतातच त्यांना.

परंतु अशा गोष्टींचा उहापोह करणारे लेख सुद्धा महत्वाचेच.

मुळात अशी तुलना करावीच का?>>>>

का करु नये?

तुलनेचे परिणाम बघुन येडेपणा कमी होईल ना.

समजा उद्या असं सिद्ध झालं तर महाग असतनाही करून घेणार का गर्भसंस्कार>>>>

तुलनेचे परिणाम सकारात्मक असतिल तर काय हरकत आहे करायला.

आईच्या पोटात शिकुन तिसर्‍या महिन्यात मुल संस्कृत बोलायला लागले तर नको आहे का.

मी हा लेख लोकसत्ता मध्ये वाचला. इथे छान चर्चा चालू आहे. हा लेख इथे टाकल्याबद्दल डॉ कैलास यांचे आभार..

मला वाटतं इथं दोन वेगवेगळ्या गोष्टींची सरमिसळ होत चालली आहे. लेखामध्ये उल्लेख केलेले गर्भसंस्कार हे थोडेसे महागडे आणि वेगळे आहेत. (याला खरंतर गर्भसंस्कार म्हणण्याऐवजी "डीझायनर बेबीज" असं नाव देऊन काही डॉक्टरदेखील तोच धंदा करत असतात) यामध्ये "आयुर्वेद"वाले कसलीतरी चाटनं, औषधं, मंत्र वगैरेंचा मारा करतात आणि डॉक्टर लोकं "जीन थेरपी" वगैरे. मला दोन्हीमधले गम्य नाही त्यामुळे सविस्तर माहिती कुणी दिली तर बरं. पण नक्की माहित असलेल्या गोष्टी: पैकी डीझायनर बेबीजचं प्रस्थ अतिउच्चभ्रूलोकांमध्ये जास्त आहे (त्यांचे रेट्सह तसेच आहेत) आणि आयुर्वेदवाले नीओरिच लोकांना जास्त टारगेट करताना दिसतात. म्हणून लेखात उल्लेखलेले "डॉ़क्टर बनवण्याचा रेट आणी पैसे फेका आनी मंत्र शिका" वगैरे लिहीलेले आहे. दिनेशदांनी उल्लेख केल्याप्रमाणे कित्येकदा गायनॅकदेखील या असल्या लोकांना सामील असतात आणि स्वतःच रेफर करतात.

बालाजी तांबे मूळात हंबग माणूस आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल नो कमेंट्स.

इतर गर्भसंस्कार जे मुख्यत्वे गर्भीणीला आहार विहार आणि थोडेफार देवाधर्माचे संस्कार करायचे सल्ले देतात ते इतकेही पैसे मागत नाहीत आणि त्यांचे दावे असले अवास्तवदेखील नाहीत. वंशवेल अथवा इतर पुस्तकं तर उत्तम आहाराचाच सल्ला देतात- असले सल्ले भारतीय समाजामध्ये सासुरवाशिणीला दोन वेळेला कपभर दूध आणि गरमगरम ताजं जेवूखावू घालत असतील तर मला त्या सल्ल्यांचं इतकंही काही वाटत नाही. उलट मी असल्या सल्ल्यांचा प्रचारच करेन.

मुळात अशी तुलना करावीच का?>>>>

का करु नये?>>> अशी तुलना नक्की कशा पदधतीनं करता येईल ते आधी सांगा. एकाच आईवडलांच्या पोटी जन्मलेली जुळी मुलं भिन्न व्यक्तीमत्त्वांची निघतात मग तुम्ही नक्की काय कसोट्या लावून "हे गर्भसंस्कारांमुळे होणारणापरिणाम आणि दुष्परिणाम" शोधणार आहात? वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवूनच काय ते सांगा.

तिसर्‍या महिन्यात मूल संस्कृतच काय कुठलीही भाषा बोलू शकणार नाही हे वर दोन डॉक्टरांनी वय्वस्थितरीत्या समजावलेलं आहेच. ते तुम्ही वाचलेलं दिसत नाही.

>>आता सगळ्याचेच बाजारीकरण झाले आहे. कोणी विज्ञानाचे नाव सांगुन स्वतःची पोतडी भरतो, कोणी पुराणाचे नाव सांगुन. गिर्हाईके दोघानांही मिळतात. दुनिया झुकती है फायनली... तुम्ही काय सांगुन झुकवताय ही तुमची कला.<<
साधना +१

वंशवेल अथवा इतर पुस्तकं तर उत्तम आहाराचाच सल्ला देतात- असले सल्ले भारतीय समाजामध्ये सासुरवाशिणीला दोन वेळेला कपभर दूध आणि गरमगरम ताजं जेवूखावू घालत असतील तर मला त्या सल्ल्यांचं इतकंही काही वाटत नाही. उलट मी असल्या सल्ल्यांचा प्रचारच करेन>>>>>>>+१ सहमत.

तिसर्‍या महिन्यात मूल संस्कृतच काय कुठलीही भाषा बोलू शकणार नाही हे वर दोन डॉक्टरांनी वय्वस्थितरीत्या समजावलेलं आहेच. ते तुम्ही वाचलेलं दिसत नाही.>>>>>>

हो निट वाचले आहे.
आणि हे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवूनच म्हटले( तुलनेचे परिणाम सकारात्मक असतिल तर काय हरकत आहे करायला) कारण असे शक्य नाही हा फोलपणा कळावा. .

हे असे अभ्यासात्मक .तज्ञ डॉ.नी लेख लिहिने आणि तो वाचने याला मी तुलनात्मक अभ्यास म्ह्ट्लेल आहे. हा लेख वाचुन अंकु व इतर एक दोन आय डी चे प्रतिसाद पहा.

मला वाटते दोघिंची मते सारखीच आहेत.:)

>>>> गर्भसंस्कारांचा अजिबातच उपयोग नाही, हा सूर लावल्याने लेख एकांगी झाला आहे. गर्भसंस्कारांचे एकांगी अवडंबर माजवू नये हे मान्य आहे, मात्र गर्भसंस्कारांना अगदीच निकालात काढू नये. <<<< सहमत.

हा लेख शनिवारीच वाचला होता लोकसत्तामधे, तितकासा पटला नव्हताच, अर्थातच.

मात्र हल्ली बरेच आयुर्वेदवाले देखिल ( "अ‍ॅलोपॅथिच्या पावलावर पाऊल ठेऊनच" [हा मुद्दा संपुर्ण लेखात आलाच नाहीये]) दुकानच मांडुन बसलेत हे १००% मान्य.
तरी गर्भ संस्कार होतच नाहीत, वा वयाच्या तिसर्‍या वर्षापर्यंत काही शिकवणेच अशक्य वगैरे बाबी अतिशयोक्त वाटल्या, तशा त्या अनुभवात/अनुभुतीत नाहीत. (मात्र यावर कुंडलीशास्त्र काय म्हणु शकेल याची उत्सुकता जरुर आहे.)
माझ्यापुरते मी "(बातां)बाबावाक्यम प्रमाणम" मानित नाही तसेच "डॉक्टरवाक्यम प्रमाणम" असेही मानित नाही Proud
(याची बरीच कारणे आहेत, पण एक छोटे उदाहरण म्हणजे व्यसनमुक्तिचे उपचार घेत असताना सहाएक महिन्यांनी, व्यसनातुन पूर्ण मुक्त झाल्यावर सहज भेटीस गेले असता "डोके दुखते, चक्करते" असे सांगितल्यावर एका डॉक्टर महाशयांनी फक्त त्यांच्या माहितीतल्या स्कॅनिन्ग केंद्रामधेच जाऊन "मेंदूचा स्कॅन" फक्त अडिच हजार (ते साडेतिन हजार) रुपयात करुन घेण्याकरता कागुद लिहून दिला व पुढे दोनचार वेळेस माझ्याकडे फॉलोअपही केला, तेव्हा तर माझी अ‍ॅलोपॅथीतील डॉक्टरांच्या दुकानदारीची/टक्केवारीची खात्री पटलीच शिवाय, डॉक्टरवाक्यम प्रमाणम असे वागू नये हे ही उमगले - अर्थात वय वर्षे तिन पार होऊन पार पन्नाशी गाठत असताना उमगले हे सांगणे नकोच, आता तिन वर्षाच्या आतिल बाळाला कसले डोम्बलाचे हे शिकवणार मी? Wink !)
असो.
यावर जास्त लिहिण्यात अर्थ नाही, नैतर माझ्या शिक्षणावरुन माझी अक्कल मोजली जाईल व डॉक्टरबिक्टर लोकांच्या पदव्यांपुढे आम्ही पामर काय हो बोलणार? नै का?

Pages