काकडीचा कोरोडा

Submitted by सायु on 24 September, 2015 - 05:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कीलो काकडी.
पाउण वाटी डाळीच पीठ.
२ हिरव्या मिरच्या
बारिक चिरलेला कोथींबीर
तेल दोन पळ्या (एक पळी कढवलेल्या तेलासाठी)
फोडणीचे नेहमीचे साहित्य

क्रमवार पाककृती: 

श्रावण - भाद्रपद महिन्यात काकडीला जास्त महत्व, पोळा, गणपती, गौरी ला आवर्जुन प्रसादाला काकडी लागतेच.
या दिवसात काकडी चांगली मिळते देखिल.. शिवाय चातुरमास सुरु झालेला असतो तेव्हा कांदा - लसुण न घालुन सुद्धा एका चविष्ट भाजीची पा.कृ. देते आहे.

तर प्रथम काकड्या धुवुन ,पुसुन, सोलुन घ्या, किसणी नी किसुन घ्या, त्यातल अर्ध्या पेक्षा जास्त पाणी काढुन घ्या.( सगळ पाणी घातल तर खुप आसट होतो, आणि मग खुप डाळीच पीठ पण लागतं)

आता कढईत एक पळी तेल घाला, मोहरी तडतडली की हिरवी मिरची घाला, हिंग, हळद, तिखट घाला, आता
किसलेली काकडी घाला, मिठ घाला आणि ५ , ७ मि.झाकण ठेवुन शिजु द्या, काकडी चांगली शिजली की मग डाळीचे पिठ घालुन, नीट परतवुन घ्या,आणि पुन्हा झाकण ठेवुन दणदणीत वाफ काढा.. सगळ्यात शेवटी बारिक चिरलेली कोथिंबीर घालुन पानात वाढा..:) वरुन कढवलेले तेल नक्की घ्या. (कढवलेल तेल = फोडणीच तेल मोहरी आणि हिंग घातलेलं)

पोळी/ भाकरी, हिरवा ठेचा, कोरोडा आणी भात... मस्तच बेत होतो.. (मग वरणाची गरज नसते)

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जण
अधिक टिपा: 

हिंग आणि कढवलेलं तेल याशिवाय या भाजीला मजा नाही..

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.. साहित्य इथे मिळण्यासारखे आहे, म्हणजे करून बघता येईल.

मी नेहमी असाच करते ..फक्त मिरच्या न घालता लाल तिखट घालते ..आता केला कि फोटो टाकेन इकडे

मस्त लागतो हा कोरोडा. मी वरून वेगळे फोडणीचे तेल न घेता फोडणीतच जरा सढळ हाताने तेल घालते. बेसन जर अगोदर तेलात वेगळे खमंग भाजून घेतले तर आणखी स्वादिष्ट चव येते. भाजणीचे पीठही बेसनाऐवजी वापरता येते.

सायु, मस्त फोटो. पण हेडर मध्येच टाक ना म्हणजे कायमस्वरुपी राहिल पहिल्या पानावर.

रोज त्याच भाज्यांचा कंटाळा आलाच होता..इतक्यात फ्रिजमधे १ काकडी दिसली .. लगेच ही भाजी केली .. मस्त झाली Happy
अकुने सांगितल तसं बेसन भाजुन घातलं