डिनर सेट!

Submitted by kulu on 13 September, 2015 - 12:05

डिनर सेट!

चार दिवसावर गणपती येणार! घरात आवरा आवरी सुरु झाली. त्यात आईनं स्वच्छता करायचं फर्मान सोडलं... उगीचच! घराची स्वच्छता करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे हे मी लाखवेळा सांगून पण तिला कधीही पटलेले नाहीच. स्वच्छता केल्यावर दोन तीन दिवस ते स्वच्छ राहणार मग परत कोळी, मुंग्या, पाली वगैरे येणार ते येणारच! परत पाली , मुंग्या वगैरे म्हणजे मुलं-बाळं असलेल्या सवाष्णीसारख्या; त्याना असं सणासुदीला घराबाहेर बाहेर काढू नये असं इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करून पाहिलं पण काही उपयोग झाला नाही. मुलांचे लॉजिकल सल्ले ऐकणे वगैरे गोष्टी आई या व्याख्येत येत नाहीतच! तर त्यामुळे स्वच्छता!

आज पहिला दिवस हॉल स्वच्छ करायचा ठरला. सुरुवात शोकेस पासून. आमच्या शोकेस मध्ये मी साठवलेले शिंपले, लहानपणीची खेळणी, कधीकाळी आईने पेंट केलेल्या मुर्त्या, चांदीचे गणपती, ग्लास सेट , मेणबत्त्या अन असल्या एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या अनेक वस्तू सुखनैव नांदत असतात! आज त्यातल्या नको असलेल्या बऱ्याच गोष्टी भंगारात द्यायला काढल्या मी. "अरे जुनं झालं म्हणून काय लगेच सगळं भंगारात काढायचं, उद्या मला पण भंगारात टाकशील" "अरे ते तुला नववीत मिळालेलं मेडल आहे , ते तरी टाकू नको" "अरे तो जुना फोटो टाकू नको" असं आईचं बोलण चालू होतं, आणि त्यावर "अगं तुला भंगारात टाकून कसं चालेल, मग माझ्या डझनभर पोराना कोण सांभाळणार, मला न माझ्या बायकोला प्रायव्हसी हवी असेल त्यावेळी", "अगं ते गंजलय मेडल आता", "तो फोटो मोबाईल मध्ये घेतलाय ग ममडे मी, नवा करून आणू " अशी उत्तरं सुरु होती!

त्याच शो केस मध्ये एक डिनर सेट पण आहे. जुना , बराच. अगदी पेशव्यांच्या काळातला. जुनं प्लास्टिक ते. आता त्याची पुटं निघत होती! एकतर हॉल च्या शोकेस मध्ये डिनर सेट का हे लॉजिक मला काय झेपलेलं नाही. मी कधी विचारलेलं पण नाही म्हणा. पण आज साफ करताना लक्ष्यात आलं की केवढ जुनाट कायतरी आहे म्हणून हे पण भंगारात टाकूया असं मी म्हणताना नुसता "भं" म्हणून होईपर्यंत आईनं तो डिनर सेट माझ्या हातातून काढूनच घेतला! "हे मात्रं आजिबात भंगारात द्यायचं नाही! फार महत्वाचं आहे हे!"... असं जेव्हा जनरली लग्नं झालेल्या बायका कायतरी जपून ठेवतात तेव्हा ते माहेरचं कायतरी असतं. आमच्यात केस जरा उलटी आहे, आमची आई सासरच्याच जुन्या घरातल्या गोष्टी जपून ठेवते!

"लग्न होऊन महिनाच झालेला बाबा मला. तुमचं मोऱ्यांचं खानदान गंगावेशीत एकदम श्रीमंत. माझं यादवांच गरीब माहेर. शेजार्यापाजार्यान्च्यात बघून माहीत असलेल्या गोष्टी संसारात प्रत्यक्ष वापरायला मिळत होत्या. त्यात तुझे पप्पा रसिक " लग्नाला ३८ वर्षे झाली तरी पप्पांचा उल्लेख आला की मम्मीच्या डोळ्यांत लकाकी येते भारी एकदम! "कधी कुठली गोष्ट मागायलाच लागली नाही, सगळ्या गोष्टी हजर. पहिला रेडिओ, त्याला ती इडली एवढी मोठी बटनं. बिनाका गीतमाला ऐकायला मिळाली पहिल्यांदा स्वतःच्या रेडिओवर. टीव्ही आला त्यावेळी आख्ख्या शुक्रवार पेठेत कुणाकडे नव्हता तो, रामायण बघायला माणसं यायची हारतुरे घेऊन..!" कोल्हापुरी ठसका बरं का इथे!

"हे सगळं आप्पांमुळं मात्र! " आप्पा म्हणजे माझे आजोबा, आईचे सासरे. "आप्पा म्हणजे मजेशीरच पण. असा सासरा मिळाल्यावर हुंडाबळी वगैरे कशाला राहतंय रे समाजात! पोरीसारखी माया. बाकीच्या बायकाना सासुरवास होतो. मला माहेराला जायचं म्हणजे माहेरवास वाटायचं, एवढ मस्त सासर. सुनाना पाहिजे ते सगळं आहे काय हे बघायला आधी आप्पा हजर. एकदा असंच घरी टीव्ही वर एका पिक्चर मध्ये रेखा एका डिनर सेट मध्ये जेवायाला वाढत होती म्हणून मी सहज म्हटलं घरी असा एक डिनर सेट पाहिजे. झालं आप्प्पा दुसर्‍यादिवशी डिनर सेट घेऊन हजर. मोती कलर चा सेट होता. गुलाबी निळ्या फुलांची सुंदर नक्षी, प्लेट्स बाउल सगळ्यावर. पालवी फुटल्यासारखी पाने पण त्यावर होती. दिवाळीतच उद्घाटन करायचं ठरवलं मग आम्ही. खर आप्पा खायच्या बाबातीत पण रसिक,.. पण पथ्यं फार सगळी- अल्सर, डायबेटीस आणि ब्लडप्रेशर यामूळ सगळं आळणी खाणार, पण बाकीच्यानी चवीचं खायलाच पाहिजे यावर कटाक्ष!"

आई सगळं अशा आवेगात सांगत होती की , ती कुठे तरी दूर गेल्याचा भास होता, दूर भूतकाळात.... किती सुंदर दिसते ती. जुन्या काळाच्या सोज्वळ सुंदर नितळ त्वचेच्या मराठी अभिनेत्र्यांसारखी. " सारखं त्यामुळं आप्पा किचन मध्ये यायचे आप्पा. आई तर म्हणायच्या या बाबामूळ एखाद्या बाईच नांदणं जायचं! आप्पाना लहान पोरांची आवड. पण घरात नातवंड नाही म्हणून आतल्या आत झुरायचे. माझ्या तर केवढ्याच्या काय थेरप्या ट्रीटमेंट सुरु होत्या. औषधांनी त्रास व्हायचा रे. आणि मला पाहुन आप्पाना. आता नको अजून औषध , इंजेक्शनं घेऊन घेऊन चाळणी झाली गं शरीराची निर्मला, असं म्हणायचे मला. मला कुणीतरी सांगितलं की सोमवारी सकाळी पांढरी वस्त्र नेसून सूर्योदयाच्या आत नदीवर आंघोळ करायची आणि ओल्या साडीनिशी घरात येऊन पूजा करायची. आप्पा न पप्पा नको नको म्हणताना मी करायचं ठरवलं तर दुसर्या दिवशी आप्पा माझ्याबरोबर नदीवर. दर सोमवारी! सांग आता ह्या माणसाला काय म्हणावं! शेजारच्या बायका म्हणायच्या दुसरं लग्नं करां लेकाचं , आप्पा म्हणायचे, माझ्या पोरीला जर मुल नसतं तर तिच्या सासरच्यांनी तिला सवत आणलेली चाललं नसतं मला आणि मी लेकीसारख्या सुनेचं असं करू होय. बघाच तुम्ही, नातवाचं पेढे आधी तुम्हालाच देणार!....... पप्पा तर असं कुणी म्हटलं की मारायलाच निघायचे त्या व्यक्तीला!आणि ऑगस्ट मध्ये भर पावसात तू जन्माला आलास. १२ वर्षानंतर नातू बघितला म्हणून आप्पा तर आनंदानं बेभान झाले होते. सगळ्यात आधी पत्कींच्या दवाखान्यात येऊन डॉक्टरना गिफ्ट दिल आणि भर पावसात सगळीकड पेढे वाटत सुटले. ज्यांनी ज्यांनी मुल होत नाही मुलाच दुसरं लग्न करून टाका असं सल्ला दिला त्या सगळ्यांच्या घरात आधी पेढे दिले. दोन महिन्यात १० किलोनं वजन वाढल आनंदान नुसत्या. नातवाला मांडीवर खेळवलं आता कधीही पांडुरंगाने बोलावलं तर मी जायला तयार असं म्हटले आणि दोन महिन्यांनी दिवाळीत त्याना हार्टऍटॅक आला. सगळ केलं, आप्पा गेलेच.!" आईच्या डोळ्यात कालवाकालव झाली. अश्रू नाहीत पण! अश्रूनी वाहून जाईल एव्हढ साधं दु:ख नसावं ते! बराच वेळ शांत होती!

"या सगळ्यात तो डिनर सेट तसाच राहिला. जपून ठेवला मी. अप्पांच्या मायेचा हात म्हणून! बरीच वर्षं तो तसाच न वापरता राहिलाय. तसाच असू दे. आप्पानी प्रेमाने आणलेल्या त्या वस्तूला कशाला आपल्या खरकट्यानं उष्टं करायचं म्हणून ठेवलंय मी" असं म्हणून हातातल्या मलमल च्या कापडानं एकदम प्रेमानं तो सेट पुसायला घेतला, लहान पोराला कुरवाळाव तसं ती आठवणीना कुरवाळत बसली! ती निघालेली पुटं प्लास्टीकची नव्हती , काळाच्या थरांची असावीत! "बाबु, आता तुमच्या पिढीला आमचं हे पटणार नाहीच म्हणा , आईला खूळ लागलंय म्हटलास तरी हा सेट काही भंगारात जाऊ द्यायची नाही मी"

आणि डिनर सेट परत आपल्या नेहमीच्या जागी गेला...आठवणींची एफडीच जणू!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!

मला हे पटले नाही.

मनुष्य आपल्या पुढच्या पिढ्यानी स्थावर्जंगम वापरून सौख्य मिळवावे म्हणून एकेक वस्तू गोळा करत असतो.

त्या वस्तूचा तुम्ही उपभोग घेतला नाहीत तर कष्ट करणार्‍याच्या कष्टांचे चीज झाले नाही असे मला वाटते.

( हे पुर्वीही लिहून झाले आहे. राहवले नाही , म्हणून पुन्हा लिहिले. )

उपभोग घेणे म्हणजे काय यावर ते अवलंबुन आहे.
कुणाला वस्तु शोकेस मध्ये ठेवुन त्या बघत रहाणे म्हणजे उपभोग घेणे वाटते.

जसे झाडारील फुले तसेच राहु देणे, किंवा खुडुन डोक्यात माळणे ...

प्रतिसादाबद्दल सर्वांचे खुप खुप आभार Happy

जसे झाडारील फुले तसेच राहु देणे, किंवा खुडुन डोक्यात माळणे ...>>>>> अप्रतिम! धन्यवाद मानवजी! Happy

लबाड्कोल्हा, आपले या स्पष्टीकरणातुन समाधान झाले असेल अशी आशा करतो! Happy

मस्त रे.. डोळे पाणावले शेवटी... Happy

फार फार हृदयस्पर्षी लिहिलस!
तु ही जपशिल त्या डिनर सेटला. Happy

प्रत्येक वस्तुमागे आठवणी असतात दडलेल्या. आमच्या आईसाहेबही सासुबाईनी दिलेले कॉपरचे वजनदार तपेले, घागरी, घन्गाळे, पितळी मोठी पातेली.. अजिबात मोडमधे देउ देत नाही.

आमच्या आईसाहेबही सासुबाईनी दिलेले कॉपरचे वजनदार तपेले, घागरी, घन्गाळे, पितळी मोठी पातेली.. अजिबात मोडमधे देउ देत नाही.+!११ सेम सेम आम्च्याकडे पण..
रच्याकने मलाही आवडतात पितळेची भान्डी !

फार फार हृदयस्पर्षी लिहिलस!
तु ही जपशिल त्या डिनर सेटला.+!११११११

Pages