रेलकथा २ - पासहोल्डर राण्या, रणरागिण्या वगैरे..

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आज लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या १८ पासहोल्डर महिलांवर बोईसर स्थानकात कारवाई केल्याची बातमी वाचली पेपरमधे. जागा धरणे, ठराविक जागांवर हक्क समजणे आणि त्यातून होणारी भांडणे, अरेरावी हे सगळं त्या कारवाईच्या मुळाशी होतं असं बातमीमधे आहे. हे वाचून अनेकांची प्रतिक्रिया ’बरी खोड मोडली!’ अशी असणार. आणि त्यात चुकीचे काही नाही. पासहोल्डर्सचा असा अनुभव आलेले खूप जण असणार. मी पण होते की एकेकाळी पासहोल्डर असूनही नवखी असल्याने कळपातली जागा निश्चित नव्हती. मग मलाही इकडून तिकडे हुसकले जात असेच बसायच्या जागेसाठी. मनापासून राग यायचा त्यांचा.

मग कधीतरी हा राग थोडासा निवळायला लागला. मुंबईकडे चाललेल्या गाडीत कुणीतरी कुणालातरी विचारलं ’तू आजच परत जाणारेस का संध्याकाळी?’ तिने उत्तर दिले ’नाही आज नाही. आता उद्या. दादरला चढेन. मला जागा ठेवा.’ दुसर्‍या दिवशी दादरला परतीची गाडी पकडणार्‍या ताई सायन हॉस्पिटलात नर्स होत्या. डेक्कन क्वीनने पुण्याहून निघून, हॉस्पिटलात पोचून, ड्युटीचे कपडे वगैरे घालून त्या दुपारी त्यांची शिफ्ट सुरू करत ती रात्रीपर्यंत. मग तिथेच कुठेतरी झोप काढून पहाटे दुसरी शिफ्ट सुरू करत ती दुपारी संपे. मग परत कपडे बदलून परतीची गाडी गाठत. रात्री १०:३० - ११:०० ला घरी पोचत. घरी दोन दिवसांच्या पोळ्या बडवणे, एक दिवसाची भाजी करणे, दुसर्‍या दिवशीच्या भाजीचे चिरणे/ निवडणे करून ठेवणे असं सगळं मॅनेज करून त्या परत दुसर्‍या दिवशी सकाळची डे क्वी पकडत. हे सगळं का? तर अर्थातच पोटासाठी. पुण्यातल्या हॉस्पिटलात बदली करून मिळत नव्हती काही कारणाने आणि नोकरी सोडणे परवडण्यासारखे नव्हते मग लटका.

एक मैत्रिण होती. तिची तिच्या बँकेच्या मुंबई ब्रांचला बदली झाली होती. मैत्रिणीचं माहेर पुण्यात. सासर नाशिकला. नवर्‍याची नोकरी बदली करून घेण्यासारखी नाही. बदली घेतली नाही तर नोकरी सोडायला लागायची परिस्थिती. ते शक्य नाही. नाशिकला मुलीला सांभाळणारे कोणी नाही. मग मैत्रिण मुलीला घेऊन चक्क माहेरी रहायला आली. आठवडाभर तिची आई सांभाळे मुलीला आणि ही रोज पु-मु अपडाऊन. शनिवारी नवरा पुण्यात येत असे या दोघींना भेटायला किंवा कधी ही जात असे. माहेरी रहायचं, मूल आईच्या भरवश्यावर सोडायचं या सगळ्याचं नाही म्हणलं तरी दडपण येतंच. मग ते कमी करायला माहेरी जेवढा वेळ घरात असे तेवढा वेळ जास्तीत जास्त घरातली कामं करायची. पैशाने मदत करायची वगैरे आलंच. ती सांगायची पासमुळे मिळेल ती गाडी, मिळेल तिथे बसून पुण्याला परत येता येते. बसायला नीट सीट मिळाली तर तेवढाच आराम मिळतो. नाहीतर मग दारात, कधी कुठल्या लांब पल्ल्याच्या तीन टियरवाल्या एक्स्प्रेसच्या वरच्या बर्थवर किंवा दोन सीटसच्या मधोमध जमिनीवर असं कुठेही बसून यावे लागते.

अशा हजारो कहाण्या. सगळ्या नोकरीपायी धावणार्‍या, घरातून बाहेर पडायची आणि पोचायची वेळ अशी की कुणाशी काही संवाद व्हायची सोय नाही पण घरच्या जबाबदार्‍या पार पाडल्या नाहीत तर टोमणे हाणायला सगळे तयार. बहुतेक सगळ्या जणी निम्नमध्यमवर्गीय ते मध्यममध्यमवर्गीय स्तरातल्या त्यामुळे घरातली कुठलीही जबाबदारी मोलाने देणं यासाठी मानसिकता व खिसा दोघांची परवानगी नाही. सुट्टीचा दिवस हा अपराधभावाने केवळ घरासाठी लिहून दिलेला. शरीराला विश्रांती, मनाला विश्रांती ही फक्त रेल्वेच्या प्रवासात.

बसायची जागा मिळणे आणि तिथे थोडावेळ शांतपणे बसता येणे, सगळं काही विसरता येणे, आपल्यासारख्याच बाकीच्या सगळ्यांबरोबर थोडेसे हास्यविनोद करता येणे हे एकमेव सुखनिधान आयुष्यातलं. ते कुणी काढून घेतंय म्हणल्यावर तडफड होणारच. कायदा, नियम माहिती असले तरी चिडचिड होणार. जी समोरच्याला समजणार नाहीच. मग यातून येत असेल ती बसायच्या जागेची अरेरावी वगैरे. खरंतर अर्ध्या अधिक जणी थोड्या थोड्या वेळाने जरा वेळ तू बस गं. मग अमुक स्टेशनला मी बसेन परत वगैरेही करतात एकदा तुम्ही त्यांच्या आतल्या ग्रुपच्या जवळपास पोचलात की.

शेवटी कधीतरी जाणार्‍याला एकदाच तीन चार तास बसायचे असते सीटवर आणि यांच्यासाठी रोजची लढाई. अरेरावी, इतरांना बसू न देणे वगैरे गोष्टी नियमबाह्य, समाजासाठी अयोग्य वगैरे ठिकच. त्याचे समर्थन नाही पण या सगळ्यांच्या आयुष्यातल्या एकमेव विश्रांतीचे काय? प्रश्न बाकी राहतोच...

- नी

रेलकथा १

विषय: 
प्रकार: 

सुंदर लिहीले आहे. एकदम संतुलित. वागण्याचे समर्थन नाहीये आणि पार्श्वभूमी दिल्याने थोडीफार कल्पना येते.

यातून गाड्या लेट वगैरे झाल्या तर आणखी वैताग येत असेल. तरी डेक्कन ला पूर्ण रूट वर प्राधान्य असते, ते आजकाल त्या गाडीच्या मूळच्या स्टेटस पेक्षा अप डाऊन वाल्यांच्या सोयीसाठी जास्त असावे. व्हीटीवरून संध्याकाळचे वेळापत्रक बघितलेत तर डबल फास्ट लोकल्स ज्यांना म्हणतात - ज्या ठाणे/डोंबिवली/कल्याण पर्यंत "फास्ट" असून पुढे सगळ्या स्टेशन्स वर थांबतात, त्या सगळ्या डेक्कन गेल्यावर आहेत. डेक्कन ला फास्ट वाली लाईन पूर्ण क्लिअर असते. सकाळी ही मोठी गॅप आहे त्या वेळेत. त्यामुळे लेट झाली तर पावसाने किंवा ट्रॅकवर काही झाले तरच होत असेल.

मात्र पावसाळ्यात कधी कल्याण तर कधी दादर पर्यंत नेउन मग वळवतात तेव्हा हे लोक काय करतात कल्पना नाही.

अशा काही कहाण्या विरार, कर्जत, कसारा वगैरे वरून रोज फोर्ट ला येणार्‍यांच्याही ऐकल्या आहेत. मला तरी मुंबईतील कार्यालयांचे विकेन्द्रीकरण हाच एक उपाय दिसतो. नाहीतर ट्रेन्स, मेट्रो ई सोयी कितीही केल्या तरी येणारा लोंढा त्यावरताण असेल.

अवांतर :

फारएण्ड,

>> डेक्कन ला पूर्ण रूट वर प्राधान्य असते, ते आजकाल त्या गाडीच्या मूळच्या स्टेटस पेक्षा अप डाऊन वाल्यांच्या
>> सोयीसाठी जास्त असावे. व्हीटीवरून संध्याकाळचे वेळापत्रक बघितलेत तर डबल फास्ट लोकल्स ज्यांना
>> म्हणतात - ज्या ठाणे/डोंबिवली/कल्याण पर्यंत "फास्ट" असून पुढे सगळ्या स्टेशन्स वर थांबतात, त्या सगळ्या
>> डेक्कन गेल्यावर आहेत.

पटेश. संध्याकाळी फक्त एकच जलद गाडी राणीच्या आधी सुटते. ती म्हणजे पाचची अंबरनाथ. ठाण्याच्या पुढे धीमी होते. तिच्या मागे राणी लागलेली असते म्हणून फक्त मध्ये दादरला थांबा आहे. ठाण्याच्या पुढे ज्या गाड्या धिम्या होतात त्या ठाणे स्थानक येऊन गेल्यावर मग वळवतात. मात्र ही गाडी ठाणं येण्याच्या आगोदर मनोरुग्णालयापाशी धीम्या मार्गावर घेतात. कारण तेच. राणीचा खोळंबा टळावा म्हणून! Happy

आ.न.,
-गा.पै.

ती म्हणजे पाचची अंबरनाथ. ठाण्याच्या पुढे धीमी होते. तिच्या मागे राणी लागलेली असते म्हणून फक्त मध्ये दादरला थांबा आहे. ठाण्याच्या पुढे ज्या गाड्या धिम्या होतात त्या ठाणे स्थानक येऊन गेल्यावर मग वळवतात. मात्र ही गाडी ठाणं येण्याच्या आगोदर मनोरुग्णालयापाशी धीम्या मार्गावर घेतात. कारण तेच. राणीचा खोळंबा टळावा म्हणून! >>> येस, माझ्या आईकडून ह्या गाडीविषयी खूप ऐकले आहे. 'बडा फास्ट' म्हणतात हिला बहुधा. कॉलेजहून येताना ही गाडी पकडायची आई आणि तिच्या मैत्रिणींची गडबड असायची. फक्त दादरला थांबत असल्यामुळे आणि डेक्कन क्वीनचा वाघ मागे लागत असल्याने ही गाडी प्रचंडच धडधडत यायची. ह्या मुली त्या वेगाची नशा अनुभवायला फुटबोर्डवर अगदी पुढे उभ्या राहून वारा खात प्रवास करायच्या.
ठाण्याजवळ गाडी आली की ती एका सिग्नलला कधी थांबायची तर कधी थांबायची नाही. थांबली तर तिथून आईचं घर जवळ पडायचं. स्टेशनवरुन यायचा वळसा वाचायचा. म्हणून ह्या मुली तयारीत राहायच्या. काही सेकंद जरी गाडी थांबली तरी पटकन उडी मारायची. असल्या ह्या थरारक आठवणी ! ( नीधप, ह्याच आठवणी तुला तुझ्या काकूकडून ऐकता येतील Happy )
मी आईला विचारायचे की हे असे स्टंट्स मी केले तर चालेल का तुला आता ? Wink

पुणे है द्राबाद अप डाउन मी चार वर्शे केले आहे. १९८५ - १९८९. पुण्याहून निघताना केडगावाला दोन मिनिटे, मग दौं ड ला कॉफी. सोलापूरला डिनर. रात्रीत कधीतरी वाडी. पहाटे सनतनगर ला उठून तयार व्हायचे. बेगम पेठला उतरायचे एक दोन मिनिटात. जास्त सामान असले की त्रेधा होत असे. मग अहोंबरोबर स्कूटर वरून घरी. त्याच्या समोर बाकरवडी,
आंबाबर्फी, जनसेवाचा कच्चा चिव्डा ठेवला व चहा केला की हैद्राबाद चालू. पुण्याचे पाणी पन किती छान लागते हा नेहमीचा संवाद. पुण्याला म्हातारे आईबाबा. आजारपणे, नर्सिंग व त्यांची कामे करणे, साधा स्वयंपाक करणे इत्यादि. हैद्राबादला उतरले की समोर अहोंचा हसरा चेहरा. पुण्याला घरी गेले की आईबाबांचे थकलेले पण आनंदी चेहरे. ह्यात आपण
कुठला तरी एक्स फॅक्टर आहोत. असे वाट्त असे.

ह्या सर्व अपडाउन करणार्या मेहनती स्त्रिया त्यांच्या समीकरणातल्या क्ष आहेत. त्यांच्या शिवाय समी करण पूर्न होत नाही. पण त्यांची किंमत ( इमोशनल व्हॅल्यु) कोणी समजून घेत नाही. त्या नसल्या की समीकरण गडबडते. पण त्यांना जेव्हा गरज भासते तेव्हा फॅमिली मागे उभी राहते का? हा प्रश्न महत्वाचा आहे. राहिली पाहिजे. इट शुड वर्क बोथ वेज. नाहीतर ह्या वेळ श्रम बलिदानाला कंट्रोल करून स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे महिलांनी.

अशा काही कहाण्या विरार, कर्जत, कसारा वगैरे वरून रोज फोर्ट ला येणार्‍यांच्याही ऐकल्या आहेत. <<
त्यांचे हाल अजूनच जास्त असणार. लांब पल्ल्याच्या गाड्या जरा ऐसपैस असतात. मधे उठून गाडीतल्या गाडीतच चार पावले चालणे शक्य असते. गाडीत कसे का होईना पण स्वच्छतागृह असते. लोकल गाड्यांना यातली काहीच सुविधा नाही. गर्दी लांब पल्ल्याच्या गाड्यातल्या पासहोल्डर डब्यापेक्षा खचाचख त्यामुळे एकदा जिथे मिळाली जागा तिथे मिळाली. तिथेच पुतळाबाई होऊन बसायचे. आणि स्त्रियांसाठी सार्वजनिक जागी स्वच्छतागृह ही एक भारतीय फिक्शन आहे त्यामुळे लोकलमधे स्व गृ ही त्यापुढची फॅण्टसी.

अगो, काय डेंजर प्रकार करायच्या या त्यावेळेसच्या मुली. काकूकडून ऐकलाय हा किस्सा एकदा. माझा विश्वास नव्हता काकू असे काही थरारक करेल यावर. Happy
मी आईला विचारायचे की हे असे स्टंट्स मी केले तर चालेल का तुला आता ? <<< यावर उत्तर काय मिळाले? Wink

अमा, मस्त अनुभव. समीकरणाचा फंडा एकदम करेक्ट.

अजून एकेकींचे अनुभव येऊद्या.

अवांतर :

अगो,

१.
>> 'बडा फास्ट' म्हणतात हिला बहुधा.

बडा फास्ट पश्चिम रेल्वेवर धावायची. मध्य रेल्वेवर ठाण्याच्या पुढे जलद धावणाऱ्या गाड्यांना डब्बल फास्ट म्हणायचे.

२.
>> थांबली तर तिथून आईचं घर जवळ पडायचं.

ठाण्यात शिरायच्या अगोदर उडी मारायचात तुम्ही. मग तुमचं घर कुठल्या बाजूला? कोपरी की भास्कर कॉलनी?

आ.न.,
-गा.पै.

सीप्झमधे नोकरी करत असताना केवळ मालाडवरुन घरातुन पाय बाहेर ठेवल्यावर सीप्झला पोचायला अडीच तास लागायचे व येताना पण. तेव्हाच प्रचंड दमणुक होत असे, फक्त २२-२३ वय असताना.
या स्त्रीया जे करतात त्यावर त्यांची काय हालत होत असेल याची कल्पनाही करवत नाही. तेही कित्येक वर्षे.
चांगली लेखमालिका आहे.

हा भाग आवडला नी ! कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. Happy
वाचता वाचता वाटले, पुणे- मुंबई ट्रेन प्रवास, लोकल प्रवास दोन्ही केलेत कैक वेळा, तरी माझी कधीच नाळ जूळली नाही त्या अनुभवांशी.

शर्मिला +१.

यावर उत्तर काय मिळाले? Wink >>> एक आई जे देईल तेच. अर्थातच 'नाही' ! मातोश्री हुशार आहेत त्यामुळे आम्हाला कशी अक्कल नव्हती, तुमची पिढी सूज्ञ आहे अशा छान शब्दांत समजावले गेले Happy

ठाण्यात शिरायच्या अगोदर उडी मारायचात तुम्ही. मग तुमचं घर कुठल्या बाजूला? कोपरी की भास्कर कॉलनी? >>> हनुमान मंदीर आणि उमा नीळकंठ व्यायामशाळेच्या इथून ह्या मुली आत यायच्या. ब्राह्मण सेवा संघाच्या जवळ घर.

बुलेट ट्रेन वगैरे फालतू गिरी करण्या पेक्षा उपनगरी ट्रेन चा track वाढवणे. जास्त ट्रेन सुरु करणे हे महत्वाचे आहे. पण मग गुजरात पुढे कसा जाईल ? आणि सरकारने स्वताच्या अंगात धमक असेल तरच मेट्रो आणि तत्सम प्रकल्प सुरु करावेत नाहीतर नंतर कोणीतरी अंबानी / अदानी आहेच जनते ला कापायला.

आज खूप दिवसांनी माबो वर!! अगो कडून या धाग्याबद्दल कळले आणि व्हि टी हून संध्याकाळी ५ वाजता सुटणा-या अंबरनाथ फास्ट लोकलच्या आठवणी जाग्या झाल्या!! खरोखर वाघ मागे लागल्याप्रमाणे धडधडत ठाण्यापर्यंत यायची ही ट्रेन. मी आणि माझी मैत्रिण फुटबोर्ड्वर उभ्या राहून प्रवास करायचो. दादरला उतरण्याच्या विरुद्ध दारात उभे राहायचो. म्हणजे ठाण्यापर्यंत नो व्यत्यय!! वाटेत सगळ्या स्टेशन्सवर खच्चून गर्दी असायची!!! त्यांच्या समोरून न थांबता गाडी धड्धडत पुढे जायची धूळ उडवत. काय तो वेग आणि भणभणता वारा!! धुंदी चढायची डोळ्यांवर! ठाण्याला स्लो ट्रॅक वर गाडी आली की दबा धरून बसायचो. सिग्नल नसला की धडाधड उड्या मारायचो. कारण तिथून घर २ मिनिटांवर! त्या जागेला ''मार उडी पॉइंट'' असे नाव दिले होते आम्ही. काही वेळेला उडी मारल्यावर पाय खाली टेकायच्या आधी गाडी सुटलेली असायची!! असे धाडस कसं काय करत होतो याचं आता आश्चर्य वाटतं. मुली कॉलेजला जायला लागल्यावर मात्र असा प्रवास करणं चुकीचं होतं हे जाणवलं!!! Happy
त्यांना तशी परवानगी नाही दिली! नी, माझ्याकडून असा प्रकार घडत होता यावर बसतोय का तुझा विश्वास? Wink

''मार उडी पॉइंट'' >>> :D. ते दारातून अनुभवलेल्या वेगाचे, वार्‍याचे वर्णन अचूक आहे. एकदम डोळ्यासमोर आले. ते डेक्कन चे धडधडत जाणे अनेकदा कल्याण व इतर ठिकाणी पाहिलेले आहे. पूर्वी या गाड्या स्टेशन्स मधूनही सुसाट जात. आजकाल बहुतांश स्लो करून नेतात. कारण ट्रॅक वरून जाणार्‍यांचे प्रमाण खूप वाढले आहे.

डेक्कनही तेव्हा इतर गाड्यांमधे खरोखरच 'राणी' वाटत असे. इतर गाड्या जेव्हा तपकिरी काळपट डब्यांच्या होत्या व पिवळे दिवे आत असत तेव्हा डेक्कन ला ती एकदम उठून दिसणारी पांढरी/निळी रंगसंगती, आत ट्यूबलाईट्स वगैरे, आणि वेग, उशीर झाला तर आसपास असणार्‍या इतर गाड्या बाजूला टाकून तिला पुढे काढणे - सगळ्याची एक जबरी ग्रेस होती. इंजिन ही अनेकदा त्याच रंगाचे असे. आता ती इतर गाड्यांसारखीच दिसते. ब्रिटिशांसारखे आपण जुन्या गोष्टी जतन करत नाही. तरीही वाढदिवस, इंजिन ड्रायव्हर निवृत्त होताना ही गाडी देणे वगैरे अजून आहे.

अपडाउन वाल्यांनो व इतरांनो, हे पाहा आणि नॉस्टॅल्जिक व्हा :). "जुनी" डेक्कन. अनेकांना हीच जास्त लक्षात असेल.
https://www.youtube.com/watch?v=-e4PRpcdRwk

गाडीचा 'वाढदिवस' व त्यानिमित्त सेलेब्रेशन, हॉर्न्स वगैरे Happy
https://www.youtube.com/watch?v=YV9YjtusTT4

आणि हे 'दादर' च्या त्या चिंचोळ्या ट्रॅक वरून जाणारी. आधीची गर्दी बघितली तर येथून एक गाडी जाणार आहे असे वाटत नाही Happy
https://www.youtube.com/watch?v=ZIaX235auao

अय्या.. बडा फास्टच्या माझ्याही आठवणी आहेत अशाच. आणि उडी मारुन बी कॅबिनच्या इथून घर गाठण्याच्या आठवणीही सेम. माझं घर ब्राह्मण सोसायटीत त्यामुळे रस्ता तोच. जाम थ्रील होतं तशा उड्या मारण्यात. आमच्याबरोबर डब्यात स्टेट बॅन्केत काम करणार्‍या बायकांचा एक भला मोठ्ठा ग्रूप होता. त्या आम्हाला शिकवायच्या बरोब्बर उडी कशी मारायची ते Wink

अपडाउन करणार्‍यांच्या सराईतपणामुळे/सवयीमुळे वेळ वाचवायला आणखी एक पॅटर्न त्यांनी केलेला मी पाहिला आहे. अनेकांना दिसला असेल. सकाळी दादर ला थांबून मग डेक्कन पुढे निघाली की मागच्या डब्यांपासून पुढे इंजिनाकडे बरेच लोक जायला सुरूवात करतात आतल्या आत. बहुधा थांबल्यावर प्लॅटफॉर्म वर तेवढे अंतर चालण्याचा वेळ वाचावा म्ह्णून असेल.

बाकी सिंहगड ने सकाळी जाणारे व येताना डेक्कन ने येणारेही बरेच आहेत बहुतेक.

फारएन्ड, मस्तं वाटले लिंक्स पाहुन. कॉलेज, नोकरीच्या निमित्ताने जवळजवळ ८/१० वर्षे लोकल्सने प्रवास केला आहे. डेक्कनचा हेवा वाटे.

लहानपण लहान गावात गेल्याने पुणे म्हनजे काहीतरी भारी असे वाटे. एकदाच पाचवीत असताना एका लग्नाला पुण्यात गेलो होतो. बहुदा स पे मध्ये होते. तिथे पोस्ट ऑफिस मध्ये बाबांबरोबर गेलो तर गोरे पान पुणेरी लोक शिस्तीत रांगेत उभे होते. कुणी पेपर वाचतोय, कुणी विणकाम करतेय ई . ते पाहून बाबा म्हणाले बघ, पुणेरी लोक कसे असतात. नाहीतर आपले सोलापुरी !

अर्र्र गल्ली चुकलं.

अनिताताई, माझा सुद्धा विश्वास नाही बसत हो!

फा, मस्त लिंक आहेत. डेली अप-डाऊन नाही तरी जेव्हा मुंबईला जायचो तेव्हा राणीनेच. ही धूर सोडणारी इंजीनं बघायला खूप आवडतात.

अनिताताई,

अरे वा, बायकांना सुद्धा दारात उभं राहून वाऱ्याशी मस्ती करायला आवडतं हे वाचून अंमळ मौज वाटली. Happy मला वाटलं की फक्त पुरुषच असे उभे राहतात!

आ.न.,
-गा.पै.

Pages