मी नाशिकची...

Submitted by पल्लवी अकोलकर on 27 July, 2015 - 07:12

Hello, MH 15
नमस्कार मंडळी,
सध्या पुण्यात रहात असले तरी, मुळात (मनाने) नाशिकची असल्याने आज या कट्ट्यावर तुमच्याशी गप्पा मारायला सामील झाले आहे.
त्यामुळे गप्पांच्या नादात, नाशिकवरच्या प्रेमाने, एक्साईटमध्ये काही कमी जास्त झाले तर चिडू नका बरं का...
सांभाळून घ्या.
नाशिक म्हणले की डोळ्यासमोर येते ते म्हणजे,
आपली पवित्र गोदावरी नदी, संध्याकाळी आरतीच्या वेळी तिच्या पाण्यात सोडले जाणारे द्रोणातील दिवे, रामसेतु, रामकुंड, सांडव्यावरची देवी, पुराचे मोजमाप करणारा दुतोंड्या मारूती, दर १२ वर्षांनी उघडणारे गंगेचे मंदिर, अहिल्याबाई होळकर (व्हिक्टोरिया) पुल, गांधीज्योत, गंगेच्या काठावर भरणारी वसंत व्याख्यान माला, आणि भाजीबाजार, सीतागुंफा, सरकारवाडा, जुन्या नाशकातली असंख्य मंदिरे जसे कपालेश्वर, काळाराम, गोराराम, तिळभांडेश्वर, भद्रकाली मंदिर, सुंदर नारायण मंदिर, मुरलीधर, बालाजी कोठ, नाशिकरोडचे मुक्तीधाम.
त्या मंदिरांइतकेच, प्रसिद्ध असे ”बुध्या हलवाईचे” दुकान, त्या दुकानासमोरच्या आजही असलेल्या लोकांच्या रांगा, गुलालवाडी, पांडेंची (जरा जास्तच मोठ्ठा ग्लासवाली) लस्सी, भगवंतराव, कोंडाजीचा (आणि माधवजी व मकाजीचा सुद्धा) सुप्रसिद्ध चिवडा, भिंगेंची द्राक्ष, सि.बी.एस., दामोदर, विजयानंद, चित्रमंदिर थिएटर्स, परशुराम साईखेडकर आणि कालिदास नाट्यमंदिर, सा.वा.ना., त्याशेजारचे नेहरु गार्डन, नवश्या गणपती सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर...
त्यात नाशिकला लाभलेली, दादासाहेब फाळके, श्री.वसंत कानेटकर, कुसूमाग्रज, दत्ता भट सारखी थोर मंडळी आणि त्यांच्याबरोबर, अर्थातच आपल्यासारखी खाऊन पिऊन सुखी असणारी साधीसुधी माणसं...

बाप रे, नाशिकबद्दल किती बोलू किती नाही असं होतंय...
आता तर काय, यावर्षी कुंभमेळाच आहे, म्हणजे गप्पांचे अजुन एक वेगळेच पान तयार होईल.

बाकी, जुन्या नाशकातल्या गल्ली बोळांची गम्मत म्हणजे, कुठल्याही गल्लीत शिरलात आणि हरवलात तरी गोल फिरुन मेन रस्त्याला लागणारच. घाबरण्याचे कारणच नाही. (बुध्याची जिलबी खाण्यासाठी तेवढा त्रास सहन करु शकतो)
आणि हो, गल्ल्यांची नावं सुद्धा मजेशीरच बरं का...
तिळभांडेश्वर लेन, हुंडीवाला लेन, घनकर लेन, फावडे लेन, सोमवार पेठ लेन, कानडे मारुती लेन.

हं, पण आता नाशिक फारच वाढतंय बुवा...
दरवेळेस नवीनच काहीतरी डेव्हलपमेंट झालेली दिसते.
अरे वा, मस्तच! अय्या हे कधी झालं? नवीनच बांधलेलं दिसतंय, अशी दरवेळी आमच्यासारख्यांची प्रतिक्रिया उमटते.
अजुनही पुण्यात गाडी चालवता चालवता, कधी शेजारुन MH 15 गेली तर आत कोणी ओळखीचं तर नसेल ना ?अशी अगदी नकळतच आमची प्रतिक्रिया होते...

चकचकीत रस्ते, मोठमोठ्ठाल्या मॉल्स, पिझ्झा हट, डोमिनोज...आपल्या नाशिकमध्ये सुध्दा...?
सुखद धक्काच असतो, म्हणा ना दरवेळी.
कोणी विचारतं, शौकीनची भेळ खाल्लीस का?
किंवा, कोणी सांगतं, एम.जी रोडवरच्या अभ्यंकर प्लाझा मधल्या, खरे बाईंची मुगभजी खाऊन बघ..अजुन तीच चव आहे.
अरे हो, ’मामा’जची पावभाजी पण खायची आहे.
”ए, साधनाची चुलीवरची मिसळ पुढच्या ट्रिपला नक्की बरं का” ! यावेळी मखमलाबाद नाक्यावरची, किंवा ’अंबिका’ची खाऊ.
काही वेळेस, मी सांगते, डेअरी डॉनचे आईसक्रिम, आता पुण्यातही आलंय बरं का.

अशा रितीने, नाशिकच्या दौर्‍यावरचा अजेंडा ठरलेला असतो. मग त्या अजेंड्यात कधी श्रावणातली त्र्यंबकेश्वराची फेरी असते, तर कधी वणीच्या देवीचे दर्शन, कधी विजय ममताला एखादा सिनेमा, तर कधी सिटी सेंटर मॉलला मारलेली चक्कर, कधी मुद्दाम केलेला गंगेवरचा भाजीबाजार तर कधी आमच्या शाळेला भेट.
कधी पांडवलेणीवरची छोटी सहल, तर कधी ’सुला’ची (बघ्याच्या भुमिकेतील) भेट.

एकंदरीत काय तर, काही न काही तरी कारण काढून नाशिकला पळायचे, तिथल्या गल्ली बोळांत, रस्त्यांवर रेंगाळायचे, जुने दिवस आठवायचे, माहेरच्या अंगणात विसावायचे.
आणि परत पुढच्या वेळी आल्यावर, ’काय काय करायचे’ ची यादी करुन भरल्या मनाने पुण्याला परतायचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंबू, मी पाववड्याबद्दलच बोलत आहे. अख्खा मऊ लुसलुशीत पाव बेसनात घोळून तळतात तोच...

इकडे मस्त पाऊस पडतो आहे अश्या वेळी पाव वडा आणि तळलेली मीठ लावलेली मिरची!! अहाहा !!!

वत्सला, आपण एकाच नावेत आहोत.. Lol

Pages