मी नाशिकची...

Submitted by पल्लवी अकोलकर on 27 July, 2015 - 07:12

Hello, MH 15
नमस्कार मंडळी,
सध्या पुण्यात रहात असले तरी, मुळात (मनाने) नाशिकची असल्याने आज या कट्ट्यावर तुमच्याशी गप्पा मारायला सामील झाले आहे.
त्यामुळे गप्पांच्या नादात, नाशिकवरच्या प्रेमाने, एक्साईटमध्ये काही कमी जास्त झाले तर चिडू नका बरं का...
सांभाळून घ्या.
नाशिक म्हणले की डोळ्यासमोर येते ते म्हणजे,
आपली पवित्र गोदावरी नदी, संध्याकाळी आरतीच्या वेळी तिच्या पाण्यात सोडले जाणारे द्रोणातील दिवे, रामसेतु, रामकुंड, सांडव्यावरची देवी, पुराचे मोजमाप करणारा दुतोंड्या मारूती, दर १२ वर्षांनी उघडणारे गंगेचे मंदिर, अहिल्याबाई होळकर (व्हिक्टोरिया) पुल, गांधीज्योत, गंगेच्या काठावर भरणारी वसंत व्याख्यान माला, आणि भाजीबाजार, सीतागुंफा, सरकारवाडा, जुन्या नाशकातली असंख्य मंदिरे जसे कपालेश्वर, काळाराम, गोराराम, तिळभांडेश्वर, भद्रकाली मंदिर, सुंदर नारायण मंदिर, मुरलीधर, बालाजी कोठ, नाशिकरोडचे मुक्तीधाम.
त्या मंदिरांइतकेच, प्रसिद्ध असे ”बुध्या हलवाईचे” दुकान, त्या दुकानासमोरच्या आजही असलेल्या लोकांच्या रांगा, गुलालवाडी, पांडेंची (जरा जास्तच मोठ्ठा ग्लासवाली) लस्सी, भगवंतराव, कोंडाजीचा (आणि माधवजी व मकाजीचा सुद्धा) सुप्रसिद्ध चिवडा, भिंगेंची द्राक्ष, सि.बी.एस., दामोदर, विजयानंद, चित्रमंदिर थिएटर्स, परशुराम साईखेडकर आणि कालिदास नाट्यमंदिर, सा.वा.ना., त्याशेजारचे नेहरु गार्डन, नवश्या गणपती सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर...
त्यात नाशिकला लाभलेली, दादासाहेब फाळके, श्री.वसंत कानेटकर, कुसूमाग्रज, दत्ता भट सारखी थोर मंडळी आणि त्यांच्याबरोबर, अर्थातच आपल्यासारखी खाऊन पिऊन सुखी असणारी साधीसुधी माणसं...

बाप रे, नाशिकबद्दल किती बोलू किती नाही असं होतंय...
आता तर काय, यावर्षी कुंभमेळाच आहे, म्हणजे गप्पांचे अजुन एक वेगळेच पान तयार होईल.

बाकी, जुन्या नाशकातल्या गल्ली बोळांची गम्मत म्हणजे, कुठल्याही गल्लीत शिरलात आणि हरवलात तरी गोल फिरुन मेन रस्त्याला लागणारच. घाबरण्याचे कारणच नाही. (बुध्याची जिलबी खाण्यासाठी तेवढा त्रास सहन करु शकतो)
आणि हो, गल्ल्यांची नावं सुद्धा मजेशीरच बरं का...
तिळभांडेश्वर लेन, हुंडीवाला लेन, घनकर लेन, फावडे लेन, सोमवार पेठ लेन, कानडे मारुती लेन.

हं, पण आता नाशिक फारच वाढतंय बुवा...
दरवेळेस नवीनच काहीतरी डेव्हलपमेंट झालेली दिसते.
अरे वा, मस्तच! अय्या हे कधी झालं? नवीनच बांधलेलं दिसतंय, अशी दरवेळी आमच्यासारख्यांची प्रतिक्रिया उमटते.
अजुनही पुण्यात गाडी चालवता चालवता, कधी शेजारुन MH 15 गेली तर आत कोणी ओळखीचं तर नसेल ना ?अशी अगदी नकळतच आमची प्रतिक्रिया होते...

चकचकीत रस्ते, मोठमोठ्ठाल्या मॉल्स, पिझ्झा हट, डोमिनोज...आपल्या नाशिकमध्ये सुध्दा...?
सुखद धक्काच असतो, म्हणा ना दरवेळी.
कोणी विचारतं, शौकीनची भेळ खाल्लीस का?
किंवा, कोणी सांगतं, एम.जी रोडवरच्या अभ्यंकर प्लाझा मधल्या, खरे बाईंची मुगभजी खाऊन बघ..अजुन तीच चव आहे.
अरे हो, ’मामा’जची पावभाजी पण खायची आहे.
”ए, साधनाची चुलीवरची मिसळ पुढच्या ट्रिपला नक्की बरं का” ! यावेळी मखमलाबाद नाक्यावरची, किंवा ’अंबिका’ची खाऊ.
काही वेळेस, मी सांगते, डेअरी डॉनचे आईसक्रिम, आता पुण्यातही आलंय बरं का.

अशा रितीने, नाशिकच्या दौर्‍यावरचा अजेंडा ठरलेला असतो. मग त्या अजेंड्यात कधी श्रावणातली त्र्यंबकेश्वराची फेरी असते, तर कधी वणीच्या देवीचे दर्शन, कधी विजय ममताला एखादा सिनेमा, तर कधी सिटी सेंटर मॉलला मारलेली चक्कर, कधी मुद्दाम केलेला गंगेवरचा भाजीबाजार तर कधी आमच्या शाळेला भेट.
कधी पांडवलेणीवरची छोटी सहल, तर कधी ’सुला’ची (बघ्याच्या भुमिकेतील) भेट.

एकंदरीत काय तर, काही न काही तरी कारण काढून नाशिकला पळायचे, तिथल्या गल्ली बोळांत, रस्त्यांवर रेंगाळायचे, जुने दिवस आठवायचे, माहेरच्या अंगणात विसावायचे.
आणि परत पुढच्या वेळी आल्यावर, ’काय काय करायचे’ ची यादी करुन भरल्या मनाने पुण्याला परतायचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे?सर्वठिकाणी फिरता येते का?कुंभमेळ्याची सिक्युअरटी कधी सुरू होते?

पल्लवी (आणि इतर सर्वच) तूम्ही अगदी बारिकसारीक गोष्टींची आठवण करुन दिलीत.. चला मी पण सांगतो आठवतेय का बघा.. रवीवार पेठ रोडवर (अशोक स्तंभ ते रवीवार कारंजा) लोकमान्य हॉटेल मधली तर्ररीवाली मिसळ, समोरच अमृततूल्य चहा..
आणि म्हसोबा लेनच्या तोंडावर असलेला "मोठ्या अंगठ्याचा" चांभार..! बसमधुन प्रत्येकाने नक्की पाहीलेले असणार त्याला..आठवतोय?
बोहोपट्टीतून खाली उतरले की सोन्यामारूती मंदिराखाली एक भेळेचे दुकान होते, (आता आहे की नाही कुणास ठाऊक) तिथली भेळ (कैरी, कांदा वाली) भन्नाटच..
सुरतीची कढी-भेळ चा उल्लेख वर नाही दिसला..
अजुन बरंच काही, आपण मागे नाशिकची खादाडीवर बोललो आहोत..

srd.... tumhi ya nasik aapla cha aahe. Four wheeler asel tar parking jara dur karavi lagel. payi firayala kahi problem nahi.

फेब्रुआरीत आलो होतो.नाशिक स्टे-पंचवटी बसने -पंचवटी डेपो -रामघाट-काळाराम मंदिर-उत्तर दरवाजापाशी -लक्ष्मी फास्ट फुडमध्ये वालेचा यांचा समोसा खाल्ला -नंतर स्टेशन जवळच्या शिवाजीनगर मधल्या नातेवाइकाकडे जाऊन परत रेल्वेने .

पायी फिरून पाहण्यासाठी आणखी कोणत्या भागात जावे ?

मागे एकदा फक्त पांडवलेणी आणि परिसर फाळके स्मारक ,बुद्ध विहार पाहिला आहे.

"पुण्याची मिसळ खाऊन माला पस्तावच zala.. farsan रस्सा आणि पाव खाल्ल्या सारख् वाटत होत" सात वर्षा पूर्वीचा माझा अनुभव असाच काहीसा होता :ड

दोन आठवड्यापूर्वी सार्वजनिक वाचनालयात लागलेल्या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली..मस्त वाटले.. कित्येक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मेजवानी मला तिथेच मिळायची...

मूळचा नाशिककर असल्याचा सार्थ अभिमान आहे. आताही जमेल तसं नासिकला पळत असतोच. आमचे सगळे नातेवाईक देखील 'नाशकात'च असतात. वर उल्लेखलेली जुन्या नाशकातली सारी ठिकाणे आमच्या व मामाच्या घराच्या आसपासच आहेत. भद्रकाली जवळची ओम टी हाउसची मिसळदेखील खूप छान असते.

नशिक चा कोन्दाजि चा चिवडा...:)

सुला wines ला एकदा भेट द्यायचि आहे ... बघु कधि आहे योग .,,,

आता (सध्या तरी) नाशिक दृष्ट लागावी इतकं सुंदर झालंय. मोठेमोठे चकचकीत रस्ते, स्ट्रीटलाईटस्, नियोजनबध्‍्द रितीने नव्याने विस्तारलेली उपनगरे आणि यावर कळस चढवलाय नाशिकच्या भोवती असलेल्या हिरव्यागार नऊ शिखरांनी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकही शुध्द, स्वच्छ आणि सुसंस्कृत झालंय. खरंच, कुंभमेळ्याला नाशिकला भेट द्याच.

टोच्या, खुप छान वाटलं हे वाचुन तसच नाशिक धाग्यावर कुणीतरी (माफ़ करा आय डी विसरले) लिहीलय smart city पण होतय न नाशिक?

तुम्हाला जमल्यास फोटो टाकाल का?

छान लिहिले आहे,
मी नाशिकचा नसूनही आवडला लेख.

नाशिकच्या मिसळीबद्दल मध्यंतरी खूप काही ऐकलेले, चांगलेच .. म्हणजे तुमचा जेवढा लेख आहे तेवढीच लांबीची पोस्ट फक्त नाशिक मिसळपुराण होते..

सुखदा,
भोसला आहे ना .. मस्त चालुए .. त्यांनी श्री गुरूजी रुग्णालयाला जागा दिली थोड़ी, तेपण सुरु zalay.. पुढे आहे ते म्हणजे रणगाड़ा ठेवलेल्या गेट पासून नवश्या गणपतीला जायच्या रस्त्यावर आहे..तो पुढचा भाग प्र चं ड डेव्हलप zalay आता..

भगवति,
मी इंदिरानगरला आहे, नासिकरोडला नाही, पण माहिती आहे तिकडचि पण .. Happy

srd,
कुंभमेळ्याचि गर्दी अजुन सुरु नाही अजून, लोक सगळे पर्वणीच्या वेळेस येतील.. आता साधू संत वगेरे आलेत बरेचसे .. सिक्युरिटी भरपूर आहे पण जाऊ देतातच आपल्याला सगळीकडे, तशी काही अडचण नाही..
पावसाळ्यात जायला खूप ठिकाण आहेत.. त्रम्बकेश्वर बाजूला निसर्ग सौंदर्य खूप छान आहे. ब्रम्हगिरि इ ठिकाणी जाऊ शकता.. उलटे धबधबे वगेरे पाहायला मिळू शकतात.
तसेच गावात म्हणाल तर, काळाराम मंदिर आवर्जून पाहा, बाकि सितागुम्फा वगेरे आहेच..

आता नासिकमधे उपयोगी पडतील असे खुप एप्स आलेले आहेत.. ते पण वापरु शकता Happy

मी गौरी,
मी शाकाहारी आहे. पण, मखमलाबाद आणि मातोरी या दरम्यान एक चुलीवरच्या मटणाचं हॉटेल आहे. तेथे जाऊ शकता.

<<तुम्हाला जमल्यास फोटो टाकाल का?>>
वत्सला, नक्की टाकेन. पण कसे टाकायचे मला माहिती नाही.

भगवतीची ब्रांच कॉलेज रोडला उघडलिये नविन. मूळ दुकान गावात आहे.

बरेच रस्ते वगेरे बंद होताएत आता. Uhoh

फ़ोटो टाकतो जमेल तसे.
आज मिसळचा प्लान आहे आमचा.. Happy Happy
या मिसळ खायला..

अरे थांबा..मी पण येतोय या डिसेंबरात..! या वेळी रोज एक खादडायचे ठिकाण करायचेच असे ठरवलेय..
प्रकु.. इंदिरानगरची काय आहे स्थिती?

गेल्या महिन्यात नाशिकला गेले होते तेव्हा खास जाऊन पाववडा खाऊन आले. माझ्या मते पाववडा फक्त नाशिकलाच चांगला मिळतो...

स्नू.. नाशिकला (किंवा नगरजिल्ह्यातही) मिळणार्‍या पाववड्याला पुण्या-मुंबईत 'सँडविच' वगैरे म्हणतात असे बघीतलेय. बर्‍याचदा वडा-पाव आणि पाववडा यात गफलत होते..तुम्ही पाववड्या बद्दल बोलत असल तर..खरच त्याची मजा दुसरीकडे कुठेच मिळाली नाही. अंबडला एका ठिकाणी जंबो-पाववडा मिळायचा. अहाहा.. गरम गरम वडा , आत मसाला (बटाट्याची भाजी म्हणा हव तर), वड्याला दोन कापा मारून वर परत काळा मसाला भुरभुरायचा, वर तळलेली हिरवी मिरची अन कांद्याची फोड.

अरे आवरा! इथे काहितरी बिनचवीच ढकलते आहे आहे आणि तुम्ही लोके ( लेकीचा शब्द) पाववडे आणि काय काय बोलून रहायले... not fair

Pages