मी नाशिकची...

Submitted by पल्लवी अकोलकर on 27 July, 2015 - 07:12

Hello, MH 15
नमस्कार मंडळी,
सध्या पुण्यात रहात असले तरी, मुळात (मनाने) नाशिकची असल्याने आज या कट्ट्यावर तुमच्याशी गप्पा मारायला सामील झाले आहे.
त्यामुळे गप्पांच्या नादात, नाशिकवरच्या प्रेमाने, एक्साईटमध्ये काही कमी जास्त झाले तर चिडू नका बरं का...
सांभाळून घ्या.
नाशिक म्हणले की डोळ्यासमोर येते ते म्हणजे,
आपली पवित्र गोदावरी नदी, संध्याकाळी आरतीच्या वेळी तिच्या पाण्यात सोडले जाणारे द्रोणातील दिवे, रामसेतु, रामकुंड, सांडव्यावरची देवी, पुराचे मोजमाप करणारा दुतोंड्या मारूती, दर १२ वर्षांनी उघडणारे गंगेचे मंदिर, अहिल्याबाई होळकर (व्हिक्टोरिया) पुल, गांधीज्योत, गंगेच्या काठावर भरणारी वसंत व्याख्यान माला, आणि भाजीबाजार, सीतागुंफा, सरकारवाडा, जुन्या नाशकातली असंख्य मंदिरे जसे कपालेश्वर, काळाराम, गोराराम, तिळभांडेश्वर, भद्रकाली मंदिर, सुंदर नारायण मंदिर, मुरलीधर, बालाजी कोठ, नाशिकरोडचे मुक्तीधाम.
त्या मंदिरांइतकेच, प्रसिद्ध असे ”बुध्या हलवाईचे” दुकान, त्या दुकानासमोरच्या आजही असलेल्या लोकांच्या रांगा, गुलालवाडी, पांडेंची (जरा जास्तच मोठ्ठा ग्लासवाली) लस्सी, भगवंतराव, कोंडाजीचा (आणि माधवजी व मकाजीचा सुद्धा) सुप्रसिद्ध चिवडा, भिंगेंची द्राक्ष, सि.बी.एस., दामोदर, विजयानंद, चित्रमंदिर थिएटर्स, परशुराम साईखेडकर आणि कालिदास नाट्यमंदिर, सा.वा.ना., त्याशेजारचे नेहरु गार्डन, नवश्या गणपती सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर...
त्यात नाशिकला लाभलेली, दादासाहेब फाळके, श्री.वसंत कानेटकर, कुसूमाग्रज, दत्ता भट सारखी थोर मंडळी आणि त्यांच्याबरोबर, अर्थातच आपल्यासारखी खाऊन पिऊन सुखी असणारी साधीसुधी माणसं...

बाप रे, नाशिकबद्दल किती बोलू किती नाही असं होतंय...
आता तर काय, यावर्षी कुंभमेळाच आहे, म्हणजे गप्पांचे अजुन एक वेगळेच पान तयार होईल.

बाकी, जुन्या नाशकातल्या गल्ली बोळांची गम्मत म्हणजे, कुठल्याही गल्लीत शिरलात आणि हरवलात तरी गोल फिरुन मेन रस्त्याला लागणारच. घाबरण्याचे कारणच नाही. (बुध्याची जिलबी खाण्यासाठी तेवढा त्रास सहन करु शकतो)
आणि हो, गल्ल्यांची नावं सुद्धा मजेशीरच बरं का...
तिळभांडेश्वर लेन, हुंडीवाला लेन, घनकर लेन, फावडे लेन, सोमवार पेठ लेन, कानडे मारुती लेन.

हं, पण आता नाशिक फारच वाढतंय बुवा...
दरवेळेस नवीनच काहीतरी डेव्हलपमेंट झालेली दिसते.
अरे वा, मस्तच! अय्या हे कधी झालं? नवीनच बांधलेलं दिसतंय, अशी दरवेळी आमच्यासारख्यांची प्रतिक्रिया उमटते.
अजुनही पुण्यात गाडी चालवता चालवता, कधी शेजारुन MH 15 गेली तर आत कोणी ओळखीचं तर नसेल ना ?अशी अगदी नकळतच आमची प्रतिक्रिया होते...

चकचकीत रस्ते, मोठमोठ्ठाल्या मॉल्स, पिझ्झा हट, डोमिनोज...आपल्या नाशिकमध्ये सुध्दा...?
सुखद धक्काच असतो, म्हणा ना दरवेळी.
कोणी विचारतं, शौकीनची भेळ खाल्लीस का?
किंवा, कोणी सांगतं, एम.जी रोडवरच्या अभ्यंकर प्लाझा मधल्या, खरे बाईंची मुगभजी खाऊन बघ..अजुन तीच चव आहे.
अरे हो, ’मामा’जची पावभाजी पण खायची आहे.
”ए, साधनाची चुलीवरची मिसळ पुढच्या ट्रिपला नक्की बरं का” ! यावेळी मखमलाबाद नाक्यावरची, किंवा ’अंबिका’ची खाऊ.
काही वेळेस, मी सांगते, डेअरी डॉनचे आईसक्रिम, आता पुण्यातही आलंय बरं का.

अशा रितीने, नाशिकच्या दौर्‍यावरचा अजेंडा ठरलेला असतो. मग त्या अजेंड्यात कधी श्रावणातली त्र्यंबकेश्वराची फेरी असते, तर कधी वणीच्या देवीचे दर्शन, कधी विजय ममताला एखादा सिनेमा, तर कधी सिटी सेंटर मॉलला मारलेली चक्कर, कधी मुद्दाम केलेला गंगेवरचा भाजीबाजार तर कधी आमच्या शाळेला भेट.
कधी पांडवलेणीवरची छोटी सहल, तर कधी ’सुला’ची (बघ्याच्या भुमिकेतील) भेट.

एकंदरीत काय तर, काही न काही तरी कारण काढून नाशिकला पळायचे, तिथल्या गल्ली बोळांत, रस्त्यांवर रेंगाळायचे, जुने दिवस आठवायचे, माहेरच्या अंगणात विसावायचे.
आणि परत पुढच्या वेळी आल्यावर, ’काय काय करायचे’ ची यादी करुन भरल्या मनाने पुण्याला परतायचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(परत एकदा)
नमस्कार मंडळी, आणि Hello MH 15
कालच मला, माझे हे वर लिहीलेले ”मी नाशिकची” चे आर्टीकल, एकाचवेळी फेसबूक आणि व्हॉट्स ॲपवर (माझ्या नावाशिवाय) फिरतांना दिसले.
त्यात माझ्या नावाचा उल्लेख नसल्याने वाईट वाटले परंतु कोणाला तरी कॉपी-पेस्ट करावेसे वाटले व वाचणार्‍या नाशिककरालाही, ते तेवढ्याच जिव्हाळ्याने पुढे पाठवावेसे वाटले, यात मला आनंदही आहे.
मी मायबोलीची आभारी आहे, ज्यांनी मला मायबोलीचे सदस्यत्व दिल्यामुळे, मायबोलीचा रंगमंच मला, सहजरित्या लेखनासाठी आणि वाचण्यासाठी उपलब्ध करुन दिला.
तेव्हा धन्यवाद मायबोलीकर !
पल्लवी अकोलकर

व्वाह! सुरेख लिहिलयत. नाशिकबद्दलचा जिव्हाळा अगदी डोकावतोय लिखाणातून.
मला माझे कोकणचे लेख आठवून गेले. Happy
आवडलं. Happy

बाहेर गेल्यावरच नाशिकची किम्मत कळते..<<<<
सगळ्याच गोष्टींबाबत असं होतं, नाही का? अगदी माणसांच्या बाबतीतही हे लागू आहे. Happy

मी फ़ेसबुक आणि whatsappवर नाशिक संबंधी ग्रुप्स वर एक्टिव नसले तरी वाचनमात्र असते... मला अजुन तरी तुमचा लेख कुठे दिसला नाही. आढळल्यास किंवा व्हाट्सएप्प वर कोणी ढकल्ल्यास तुमच्या नावाचा उल्लेख करीनच. असे मायबोलीवरील लेख आणि फोटोबाबतीत पूर्वीही घडले आहे! उदा जागू चे प्रचि. तुम्ही लेखाखाली तुमचे नाव लिहीत जा यापुढे.

खूप छान लेख पल्लवी..!
तुमच्या सारखेच माझेही झाले आहे.. मुंबई बदल.. कारण मी मुळची मुंबईची पण लग्नानंतर नाशिक..
आता नाशिक ही मुंबई इतकच प्रिय आहे..

हाय नाशिककर्स Happy
काय मस्त लिहिलय .. व्वाह ! मजा आ गया !
प्रवीणशी सहमत बरका, मी अगदी तेच म्हणनार होतो. विहार, श्यामसुंदर राहिली म्हणून ...
नासिकची मिसळ खाऊन जे समाधान मिळतं ते कुठे मिळतच नै मूळी..

हो पल्लवी मी तुमचे दोन्हीही (हा आणि इंग्लिश मिडीयमची मुले) लेख Whatsapp वर वाचले. तुमच्या नावाचा उल्लेख आढळला नाही.

व्वा...
छान वाटतंय, एवढे नाशिकप्रेमी बघून...
भगवती, तुमच्या नावाची भेळ सुद्धा प्रसिद्ध आहे बरं का...पतंग हॉटेल खालची.
हो, मिसळीची किती नावं घेऊ?
’शामसुंदर’ आहे, सातपुर जवळची, गंगापुररोड वरची ’विहार’ आहे, पंचवटीतील ’अंबिका’ आहे. आता तर चुलीवरच्या मिसळीचं पेवच फुटलंय नाशिकला.
बाकी, जुन्या गोष्टी म्हणाल तर, महात्मा गांधी रोडवरचे, ”विष्णु संगीत विद्यालय” किंवा, चांदवडकरलेन मधले, मेनरोडच्या चौकातील, लहान मुलांचे कपडे मिळण्याचे, ’सुदर्शन’ नावाचे दुकानही अजुन तसेच आहे.
शानदार पावभाजी असावी बहूतेक अजुनही, पण फावडे लेन मधील ’हरि ओम’ पावभाजी तशीच आहे. (कोल्हापुरी, जास्त तिखट वाली)
कोणी तरी उल्लेख केल्याप्रमाणे, ”सायंतारा’ पण अजुनही तसंच आहे, आणि त्या दुकानात साबुदाणा वडे खाण्यासाठीच्या, प्लास्टीकच्या प्लेट्स ही त्याच आहेत. (म्हणजे, २ वर्षापुर्वी पर्यंत होत्या) पण आता ती वस्ती थोडी बकाल झाल्यासारखी वाटते.
बाकी सराफ बाजाराकडे जातांना, प्रकाश सुपारी वाल्याचं दुकान आठवत असेल तुम्हाला तर तेही तसंच आहे.
आणि, हुंडीवाला लेन मधल्या कुरमुरे फुटाण्याचे दुकान आणि त्यातील या जीन्नसांचे ढिगही (पारख साडी सेंटर समोरचे) तसेच आहेत.
एम जी रोड वरचं, प्रधान पार्क मधलं अन्नपुर्णा हॉटेल तुम्हा कोणाला आठवत असेल, तर ते सुद्धा अजुनही तसंच आहे बरं का...
पण बाकी, अजुन एका नातेवाईकांनी मला खाण्यापिण्याच्या दुकानाची नवीन नावं सांगितली, जी मी या आधी कधीच ऐकली नाहीत.
असो, चालायचेच...
तुमच्या बरोबरच हे सगळं लिहीता लिहीता मी पण नॉस्टॅलजीक झाले आहे.

मिसळ पुण्याचीच..----/ कीरू,
पुण्याची मिसळ खाऊन माला पस्तावच zala.. farsan रस्सा आणि पाव खाल्ल्या सारख् वाटत होत.. कदाचित mazi जागा चुकली असेल.. मी एकदा जोशी वड़ेवाले आणि एकदा हर्षु व्हेज fc रोडला खाल्ली.. /-----

नाशिकला पंचमला पण छान मिसळ मिळते. हल्ली जिकडे तिकडे मिसळचे पेव फुटलय नाशिकला. विहारला अति वेळा गेल्याने अता जावेसे वाटत नाही ..
सायंतारा पण एरिया जरा बकाल zalay.. जावेसे वाटत नाही..

अग मी नाशिकरोडची पण खरेदीसाठी नाशिकलाच जायचो. माझे वडील आम्हाला गंगेवर भेळबत्ता खायला घेऊन जायचे, आणि जर शालिमारला बस नाही मिळाली की गंजमाळपर्यंत तंगडतोड करत जात असू Happy मी आणि माझ्या बहिणीची दिवाळीची खरेदी कायम अप्सरा दुकानातून असायची, सेतावी साडी दुकानाच्या जवळ.

मस्त लेख पल्लवी .थेट नाशकात घेवून गेलीस विनातिकीट !
काही ठिकाणे add करते म्हणजे सायंतारा साबुदाणा वडा, आर के वरचे अननस सरबत आणि नंदन ची पाणीपुरी ,विहार मिसळ ,सागर चे सामोसे ,कचोरी ......खूप मोठी लिस्ट आहे .
खरे मावशी आईची मैत्रीण त्यामुळे तेथे वारंवार जाणे असायचे मुग भाजी आणि पाववडा खायला ! Happy
पण तेव्हडा पुणे -नासिक प्रवास फार बोर आहे .पण आता बायपास रोड आहे तर थोडे बरे आहे .

Pages