मी नाशिकची...

Submitted by पल्लवी अकोलकर on 27 July, 2015 - 07:12

Hello, MH 15
नमस्कार मंडळी,
सध्या पुण्यात रहात असले तरी, मुळात (मनाने) नाशिकची असल्याने आज या कट्ट्यावर तुमच्याशी गप्पा मारायला सामील झाले आहे.
त्यामुळे गप्पांच्या नादात, नाशिकवरच्या प्रेमाने, एक्साईटमध्ये काही कमी जास्त झाले तर चिडू नका बरं का...
सांभाळून घ्या.
नाशिक म्हणले की डोळ्यासमोर येते ते म्हणजे,
आपली पवित्र गोदावरी नदी, संध्याकाळी आरतीच्या वेळी तिच्या पाण्यात सोडले जाणारे द्रोणातील दिवे, रामसेतु, रामकुंड, सांडव्यावरची देवी, पुराचे मोजमाप करणारा दुतोंड्या मारूती, दर १२ वर्षांनी उघडणारे गंगेचे मंदिर, अहिल्याबाई होळकर (व्हिक्टोरिया) पुल, गांधीज्योत, गंगेच्या काठावर भरणारी वसंत व्याख्यान माला, आणि भाजीबाजार, सीतागुंफा, सरकारवाडा, जुन्या नाशकातली असंख्य मंदिरे जसे कपालेश्वर, काळाराम, गोराराम, तिळभांडेश्वर, भद्रकाली मंदिर, सुंदर नारायण मंदिर, मुरलीधर, बालाजी कोठ, नाशिकरोडचे मुक्तीधाम.
त्या मंदिरांइतकेच, प्रसिद्ध असे ”बुध्या हलवाईचे” दुकान, त्या दुकानासमोरच्या आजही असलेल्या लोकांच्या रांगा, गुलालवाडी, पांडेंची (जरा जास्तच मोठ्ठा ग्लासवाली) लस्सी, भगवंतराव, कोंडाजीचा (आणि माधवजी व मकाजीचा सुद्धा) सुप्रसिद्ध चिवडा, भिंगेंची द्राक्ष, सि.बी.एस., दामोदर, विजयानंद, चित्रमंदिर थिएटर्स, परशुराम साईखेडकर आणि कालिदास नाट्यमंदिर, सा.वा.ना., त्याशेजारचे नेहरु गार्डन, नवश्या गणपती सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर...
त्यात नाशिकला लाभलेली, दादासाहेब फाळके, श्री.वसंत कानेटकर, कुसूमाग्रज, दत्ता भट सारखी थोर मंडळी आणि त्यांच्याबरोबर, अर्थातच आपल्यासारखी खाऊन पिऊन सुखी असणारी साधीसुधी माणसं...

बाप रे, नाशिकबद्दल किती बोलू किती नाही असं होतंय...
आता तर काय, यावर्षी कुंभमेळाच आहे, म्हणजे गप्पांचे अजुन एक वेगळेच पान तयार होईल.

बाकी, जुन्या नाशकातल्या गल्ली बोळांची गम्मत म्हणजे, कुठल्याही गल्लीत शिरलात आणि हरवलात तरी गोल फिरुन मेन रस्त्याला लागणारच. घाबरण्याचे कारणच नाही. (बुध्याची जिलबी खाण्यासाठी तेवढा त्रास सहन करु शकतो)
आणि हो, गल्ल्यांची नावं सुद्धा मजेशीरच बरं का...
तिळभांडेश्वर लेन, हुंडीवाला लेन, घनकर लेन, फावडे लेन, सोमवार पेठ लेन, कानडे मारुती लेन.

हं, पण आता नाशिक फारच वाढतंय बुवा...
दरवेळेस नवीनच काहीतरी डेव्हलपमेंट झालेली दिसते.
अरे वा, मस्तच! अय्या हे कधी झालं? नवीनच बांधलेलं दिसतंय, अशी दरवेळी आमच्यासारख्यांची प्रतिक्रिया उमटते.
अजुनही पुण्यात गाडी चालवता चालवता, कधी शेजारुन MH 15 गेली तर आत कोणी ओळखीचं तर नसेल ना ?अशी अगदी नकळतच आमची प्रतिक्रिया होते...

चकचकीत रस्ते, मोठमोठ्ठाल्या मॉल्स, पिझ्झा हट, डोमिनोज...आपल्या नाशिकमध्ये सुध्दा...?
सुखद धक्काच असतो, म्हणा ना दरवेळी.
कोणी विचारतं, शौकीनची भेळ खाल्लीस का?
किंवा, कोणी सांगतं, एम.जी रोडवरच्या अभ्यंकर प्लाझा मधल्या, खरे बाईंची मुगभजी खाऊन बघ..अजुन तीच चव आहे.
अरे हो, ’मामा’जची पावभाजी पण खायची आहे.
”ए, साधनाची चुलीवरची मिसळ पुढच्या ट्रिपला नक्की बरं का” ! यावेळी मखमलाबाद नाक्यावरची, किंवा ’अंबिका’ची खाऊ.
काही वेळेस, मी सांगते, डेअरी डॉनचे आईसक्रिम, आता पुण्यातही आलंय बरं का.

अशा रितीने, नाशिकच्या दौर्‍यावरचा अजेंडा ठरलेला असतो. मग त्या अजेंड्यात कधी श्रावणातली त्र्यंबकेश्वराची फेरी असते, तर कधी वणीच्या देवीचे दर्शन, कधी विजय ममताला एखादा सिनेमा, तर कधी सिटी सेंटर मॉलला मारलेली चक्कर, कधी मुद्दाम केलेला गंगेवरचा भाजीबाजार तर कधी आमच्या शाळेला भेट.
कधी पांडवलेणीवरची छोटी सहल, तर कधी ’सुला’ची (बघ्याच्या भुमिकेतील) भेट.

एकंदरीत काय तर, काही न काही तरी कारण काढून नाशिकला पळायचे, तिथल्या गल्ली बोळांत, रस्त्यांवर रेंगाळायचे, जुने दिवस आठवायचे, माहेरच्या अंगणात विसावायचे.
आणि परत पुढच्या वेळी आल्यावर, ’काय काय करायचे’ ची यादी करुन भरल्या मनाने पुण्याला परतायचे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंबू, मी पाववड्याबद्दलच बोलत आहे. अख्खा मऊ लुसलुशीत पाव बेसनात घोळून तळतात तोच...

इकडे मस्त पाऊस पडतो आहे अश्या वेळी पाव वडा आणि तळलेली मीठ लावलेली मिरची!! अहाहा !!!

वत्सला, आपण एकाच नावेत आहोत.. Lol

अज्ञा+1
येणार्या प्रश्र्नांना यथोचित उत्तरे देऊ.

मीसुद्धा Happy
बघुयात किती माबोकर आहेत नाशिकचे!

मी नाशिकची... खरंतर नाशिकरोडची. हा लेख वाचला नव्हता पूर्वी, वर काढल्यासाठी खरंच धन्यवाद. अगदी माहेरी फिरुन आल्यासारखं वाटलं...

गोदावरीत पाणी सोडल्याने ऐन उन्हाळ्यात गोदावरीचे पात्र भरून वाहत असल्याचे सुखद दृश्य टीवीवर पाहायला मिळाले.

नाशिकला घर आहे पंचवटीमध्ये. बरेच नातेवाईक आहेत. नेहमी जाणे येणे असते. सिटी बस घरापासून नाहीत आणि एकंदरीत फारच कमी आहेत शिवाय रिक्षावाले फार लुटतात म्हणून नको वाटते जायला. तिथे राहणारे सगळे स्वतः चे वाहन वापरतात पण आमच्यासारख्या आठ दिवस राहणाऱ्यांची पंचाईत होते. आता खोदकाम केल्यापासून तर गोष्टी अजूनच कठीण झाल्यात.
नवश्या गणपती, सोमेश्वर, पांडव लेणी एकदा बघितले आहे. गंगेवरचा भाजी बाजार आता दुसरीकडे गेला आहे तरी गंगेवर जाणे होते. बुधा,अशोक बेकरी इकडे एक चक्कर होते. टकले बंधूंकडे इमिटेशन ज्वेलरी चांगली मिळते. खाण्याची आवड आहे पण तेवढ्यासाठी कुठे लांब जात नाही.

छान आहेत नाशिकच्या गप्पा, फक्त दोनदा जाऊन आवडलं मला नाशिक. फार फिरणे नाही झालं, एकदा शिर्डी नाशिक केलं तेव्हा पंचवटीत राहिलेलो, मुक्तीधाम पण बघितलं होतं. अजून बरंच बघितलं पण खूप वर्ष झाली.

एकदा आतेभावाकडे दोन दिवस होतो, मी आणि माझ्यासह दोघी, बहिण आणि मैत्रीण तिची. पंतंगा हॉटेलच्या पुढच्या एरियात. तिथून पुढे एक बाग होती, तिथे छोट्या भाच्याला घेऊन गेलेलो, शरणपूर रोड आवडलेला. हे सर्व लग्नाआधी, त्यानंतर हल्ली तीन वर्षापूर्वी त्याच भाच्याच्या लग्नाला गेलेलो, गंगापूर रोडला. कारने गेलो आणि आलो लगेच. फार फरक दिसला, रस्त्याची कामं सुरु होती. सगळं थोडं अनोळखी वाटलं. माझा भाऊ वहिनी मुंबईचेच, नोकरी निमित्याने खरं तर तिथे गेलेले, म्हणून जाणे झालं. बाकी नाशिकमधे कोणी राहत नाही.

मी नाशिक फाटा ...

नवीन Submitted by च्रप्स on 20 April, 2020 - 04:32
>>>
हे म्हणजे तमाम जनता जी मुंबई आग्रा हायवे वर आग्र्यापर्यंत रहाते तीने मुंबई ला रहातो असे सांगण्या सारखे आहे. Rofl

Pages