सांगता - निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- आठ

Submitted by किंकर on 26 July, 2015 - 16:58

निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551

निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन - http://www.maayboli.com/node/54561

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग तीन- http://www.maayboli.com/node/54583

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग चार - http://www.maayboli.com/node/54599

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- पाच- http://www.maayboli.com/node/54630

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग सहा - http://www.maayboli.com/node/54629

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- सात - http://www.maayboli.com/node/54748

दिंडी आता पंढरीस आली . नाम गजराने नगरीचा काना कोपरा दुमदुमला . काही उद्दिष्ट अशी असतात , काही प्रवास असे असतात कि त्याच्या पूर्तीने मन सैरभैर होते . आपण हे गाठ्लेय , आपल्या कडून खरच याची पूर्ती झालीय, यावर आपलाच विश्वास नसतो .

या संभ्रमित अवस्थेने मनास जी बेचैनी येते,त्यास कोणता उपाय .म्हणून अनेकदा प्रत्यक्ष उद्दिष्ट गाठण्यात मिळणाऱ्या आनंदापेक्षा त्याच्या पूर्ततेचा प्रवास अधिक आनंददायक असतो .पालखी सोहळा काहीसा असाच आहे . उन पाऊस, सोयी सुविधा यासर्व परिस्थितीवर मात करत केलेला प्रवास, हाच भक्ताला ईश्वराच्या सानिध्यात नेणारा असतो .

त्यामुळे काही वारकरी दिंडी पंढरीस येताच विठ्ठल दर्शनासाठी रांगेत थांबून, त्याच्या दर्शनाशिवाय कसलाच विचार करत नाहीत ,काही चंद्रभागेत स्नान करून कीर्तनी तल्लीन होतात ,तर काही पायरीचे ,काही कळसाचे दर्शन घेवून तृप्त होतात .

तीन तीन आठवडे चालून फक्त कळसाचे दर्शन ? मग वारी हवीच कशाला ? तीन तीन दिवस रांगेत थांबून आषाढी एकादशीचा मुहूर्त दर्शना साठी लाभेल का याची चिंता ? काय चूक काय बरोबर ? या प्रश्नांच्या जंजाळा तून सुटका कोण करणार ? तर यासाठी पुन्हा एकदा मदतीला धावून येतात संत.

अर्थात संतांचे सांगणे हे फक्त वारीच्या पुर्तेते पुरते मर्यादित नाही . प्रत्यक्ष जीवनात देखील आपपर भाव कसा जपला पाहिजे , भक्तीतून मनः शांती कशी मिळवावी याची प्रचीती देणाऱ्या रचना अनेक आहेत.

संत जनार्दन महाराज आपल्याला भक्ती मार्ग समजावून सांगताना भजन कसे करावे तर आपले मन प्रसन्न ठेवून, हा करतो ते चूक , याची पद्धत जास्त योग्य ,यांचा विचार करत बसू नये . तुम्ही साध्याच्या मागे लागताना साधनांना महत्व देत राहू नका. हा कानमंत्र देताना ते म्हणतात -

देह शुद्ध करुनी भजनीं भजावे ।
आणिकांचे नाठवावे दोष-गुण ॥१॥

साधनें समाधी नको पां उपाधी ।
सर्व समबुद्धी करी मन ॥२॥

म्हणे जनार्दन घेई अनुताप ।
सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥

दिंडी, वारी, पालखी हि भक्तीची नैमित्तिक रूपे . पण ईश्वर भक्ती कशी असावी तर ते कार्य तुमच्या कडून झोकून देवून होणे अपेक्षित आहे . एखाद्या कामातील तळमळ किंवा त्यातील गुंतणे जसजसे वाढत जाते, तसे त्यातील तल्लीनता वाढती असते .
मग इतर लोक अशा मग्न व्यक्तीस अनेक नावे ठेवतात . कधी छंदिष्ट,कधी नादिष्ट ,म्हणतील कधी त्याचा रागरंग बरोबर नाही , तर कधी तो असा वागेल हे ध्यानी मनी पण नव्हते.पण माणसाच्या वागण्याच्या या बिरुदावल्या स्वतः कडे घेत, त्यांचा अचूक वापर करीत भक्ती कशी असावी याचे सुरेख पदर उलगडताना संत एकनाथ महाराज म्हणतात -

आम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु
हृदपरी विठ्ठलु मिळतसे ॥१॥

आम्हां धातु विठ्ठल मातु विठ्ठलु
गातु विठ्ठलु आनंदे ॥२॥

आम्हां राग विठ्ठलु रंग विठ्ठलु
संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥

आम्हां ताल विठ्ठलु मेल विठ्ठलु
कल्लोळ विठ्ठलु कीर्तने ॥४॥

आम्हां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु
मत्ता विठ्ठलु वदनी ॥५॥

आम्हां मनी विठ्ठलु ध्यानी विठ्ठलु
एका जनार्दनी अवघा विठ्ठलु ॥६॥

ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे , हे तत्व अनेक प्रकारे अनेक पद्धतीने सांगितले जाते. असे आहे तरीही पंढरीची ओढ संपत नाही मग भक्ती आणि दिनक्रम यांची गल्लत संपत नाही यावरील चर्चा जेंव्हा कुळधर्म ,कुळाचार यापाशी येते तेंव्हा भक्ती औपचारिकतेत अडकून राहताना दिसते .

मग भक्तीचे नित्यक्रम का नित्यक्रमात भक्ती याचा उलगडा भक्तास होत नाही . यावर लिहताना संत एकनाथ म्हणतात ,सर्वत्र असलेला विठ्ठल ठायी ठायी आहे . तोच आमचा धर्म आहे . तोच आमचा कुळाचार आहे . त्याच्या चिंतनाने मी इतका प्रभावित आहे कि ,मला त्याने पूर्णता विठ्ठलमय केले आहे . मी विठ्ठल रुपात इतका भरलो आहे कि ,पंढरीचा विठूराया हा म्हणजे माझ्यातून उरलेला विठुरायाचा अंश आहे . म्हणजे आपल्यातील ईश्वरी अंश जाणून घ्या आणि मग पंढरीच्या विठूरायास शरण जा हे त्यांचे सांगणे असे उतरते शब्दात -

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान ।
नाहीं आम्हां चिंतन दुजियांचे ॥१॥

आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत ।
कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥

विठ्ठलावांचुनी नेणों क्रियाकर्म ।
विठठलावांचुनी धर्म दुजा नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठल भरला ।
भरुनीं उरला पंढरीये ॥४॥

ईश्वर रूप कसे ओळखावे याबाबत एक इंग्लिश कथा पूर्वी वाचनात आली होती . एक भक्त ईश्वरास प्रसन्न करण्यात यशस्वी होतो . मग ईश्वरास वर मागताना तो म्हणतो ,हे देवा तू माझ्यावर कृपा कर आणि आनंद असो संकटे येवोत तू नेहमी माझ्या बरोबर राहा . त्याच्या या इच्छेवर ईश्वर भक्तास म्हणतो,काही काळजी करू नकोस मी नेहमीच तुझ्या बरोबर असेन .

ईश्वराच्या या आशीर्वादावर भक्त त्यास म्हणतो ,तू माझ्या बरोबर असशील हे ठीक पण मला ते समजणार कसे ? तेंव्हा ईश्वर म्हणतो ,तू चालत असताना बाजूला तुला माझ्या पाऊल खुणा दिसत राहतील . इतके बोलून ईश्वर अंतर्धान पावतो . भक्ताचा दिनक्रम सुरु होतो .दिवस आनंदात जात असतात . भक्ताच्या मार्गक्रमणात बाजूला दिसणाऱ्या पाऊलखुणा त्यास नेहमीच सुखावत असतात
.
काही काळानंतर भक्ताचा कठीण काळ सुरु होतो . अनंत अडचणींवर मत करीत त्याचा प्रवास सुरु राहतो . तेंव्हा त्याला पुन्हा ईश्वराची आठवण होते . मागे वळून पाहता त्याला एकच पाऊल खूण दिसते. तेंव्हा तो पुन्हा देवाचा धावा करून म्हणतो , हे ईश्वरा माझ्या मदतीला धावून ये . तो धावा ऐकून ईश्वर समोर येत त्याला म्हणतो, अरे मी तुझ्याच बरोबर आहे .

त्यावर रागावून भक्त त्यास म्हणतो, जर तू म्हणतो आहेस कि मी तुझ्याच बरोबर आहे, तर मी पाहतोय पण मला दोन पाऊल खुणा दिसत नाहीत .त्यावर ईश्वर हसून त्यास म्हणतो ,तू म्हणतोस ते बरोबर आहे कारण तुला जी पावले दिसत आहेत ती माझी आहेत .

या संकट काळात तू चालू शकणार नाहीस म्हणून मी तुला उचलून घेतले आहे . त्यामुळे तुझ्या पाऊल खुणा दिसत नाहीत . हे ऐकून भक्त त्यास शरण जात माफी मागतो .

या इंग्लिश कथेतील भक्त एखादा ख्रिश्चन असेल आणि त्याला उचलून नेणारा येशु असेल . पण यातील तात्पर्य जाणारे आपले संत या कथेचे सार पूर्वा पार जाणून होते. त्यामुळे हीच गोष्ट सोपी करून सांगताना तुकोबा आपल्या भक्तांना नमूद करतात आपला विठुराया हा नेहमीच आपला आहे . आनंदात संकटात तो बरोबर आहे आणि राहील आणि त्या साठी ते म्हणतात -

जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।
चालविसी हातीं धरुनियां ॥१॥

चालों वाटे आह्मीं तुझा चि आधार ।
चालविसी भार सवें माझा ॥२॥

बोलों जातां बरळ करिसी तें नीट ।
नेली लाज धीट केलों देवा ॥३॥

अवघें जन मज जाले लोकपाळ ।
सोईरे सकळ प्राणसखे ॥४॥

तुका ह्मणे आतां खेळतों कौतुकें ।
जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥५॥

चराचरातील ईश्वर आणि त्याची विविध रूपे हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असे मानले, तरी त्याच्या अनुभूतीचे भाग्य प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही . संत ज्ञानेश्वर हे असे संत होते कि ,ईश्वर रूप पाहताना त्यांना लाभलेली दृष्टी अलौकिक होती . त्यामुळे त्यांच्या अनेक रचना ह्या हृद्य स्पर्शी ठरतात . त्यामुळे ईश्वर दर्शन म्हणजे काय हे सांगताना त्याची निर्गुण निराकरिता प्रतिपादन करताना ते म्हणत्तात -

अधिक देखणें तरी निरंजन पाहणे ।
योगिराज विनविणें मना आलें वो माये।

तर कधी त्यांना वाटते कि -

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण
ब्रह्म सनातन विठ्ठल हा

इतक्या अर्थपूर्ण शब्दात जेंव्हा ईश्वर रूप असते त्याचा लाभ होणे महत्वाचे .हे मर्म सामान्य भक्तास समजावताना त्यांनी केलेला रूपक अलंकाराचा वापर खूपच सुंदर आहे याबाबत त्यांची ' जवंवरी तंववरी ' हि रचना खूप काही सांगून जाते . जसे कोल्हेकुईचा जोर सिंह गर्जना ऐकेपर्यंत ,वैराग्याच्या गोष्टी रूपवती भेटे पर्यंत ,मैत्री मदत या गोष्टी त्यात आर्थिक व्यवहार येत नाही तोपर्यंत ,असे अनेक दाखले देत शेवटी ते म्हणतात या संसाराचा मोह माया कोठपर्यंत जोवर ईश्वर दर्शन होत नाही तोपर्यंत . किती सुरेख शब्द आहेत -

जंववरी तंववरी जंबूक करी गर्जना ।
जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥१॥

जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी ।
जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप ॥२॥

जंववरी तंववरी मैत्रत्व-संवाद ।
जंव अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप ॥३॥

जंववरी तंववरी युद्धाची मात ।
जंव परमाईचा पूत देखिला नाहीं बाप ॥४॥

जंववरी तंववरी समुद्र करी गर्जना ।
जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाहीं बाप ॥५॥

जंववरी तंववरी बाधी हा संसार ।
जंव रखुमादेविवरू देखिला नाहीं बाप ॥६॥

असे सहज दाखले देतईश्वर प्राप्ती कशी होईल हे इतरांच्या बाबत सांगितले असले तरी त्यांनी स्वः अनुभूती सांगताना ,झालेले विठ्ठल दर्शन ते वेगळ्याच रुपात मांडतात . ईश्वर दर्शन झाल्यावर काय झाले हे सांगताना ते म्हणतात , एखाद्या योग्याला अशक्य असलेले हे देवांच्या देवाचे दर्शन झाल्याने मन भरून पावले आहे . या ईश्वरास मी इतक्या रुपात अनुभवले आहे कि मनातील सर्व संदेह संपले आहेत . आणि यातून हि रचना साकारते -

योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहतां पाहतां मना न पुरे धणी ॥१॥

देखिला देखिला गे माये देवाचा देवो ।
फिटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥

अनंत रूपें अनंत वेषें देखिला म्यां त्यासि ।
बाप रखुमादेवी-वरूं खूण बाणली कैसी ॥३॥

तर अशा या विठ्ठल भक्तीची , पालखी सोहळ्याची सांगता करताना , मन भरून येते आहे . खूप काही सांगावे असे वाटत राहते पण भावना व्यक्त करायला शब्द सुचत नाहीत पण संत तुकाराम म्हणतात -आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें । या उक्ती नुसार त्यांच्याच एका रत्नजडीत रचनेचा आधार घेत म्हणतो -

याजसाठीं केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥

आतां निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥

कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचें तेणें गुणें ॥३॥

तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी ।
आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥४॥

तर मग या पालखी सोहळ्याची सांगता करीत ,दिंडीचा निरोप घेत सर्वच जण म्हणू या -

" बोल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकराम , पंढरीनाथ महाराज कि जय "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिंडी, वारी, पालखी हि भक्तीची नैमित्तिक रूपे . पण ईश्वर भक्ती कशी असावी तर ते कार्य तुमच्या कडून झोकून देवून होणे अपेक्षित आहे . एखाद्या कामातील तळमळ किंवा त्यातील गुंतणे जसजसे वाढत जाते, तसे त्यातील तल्लीनता वाढती असते . >>> अगदी अगदी, फारच सुंदर लिहिलंय...

ती गोष्टही सुरेख आणि सारे अभंगही गोडच ..

(जरा शुद्धलेखनातल्या गडबडीकडे पहाणार का ?
१] उदिष्ट - उद्दिष्ट,
२] हृदपरी विठ्ठलु मिळतसे ॥१॥ - हृदपदी
३] अर्थात संतांचे सांगणे हे फक्त वारीच्या पुर्तेते पुरते मर्यादित नाही - ??)

तुम्ही साध्याच्या मागे लागताना साधनांना महत्व देत राहू नका. हा कानमंत्र देताना ते म्हणतात - >>>> तुमच्याशी चर्चा करायला आवडेल - माझ्या दृष्टीने साधनशुचिता हवीच.
आणि दुसरे असे की ज्ञानोत्तर भक्तित त्या साधनांची उपयुक्तता पूर्ण लक्षात आल्याने त्याविषयी अजून प्रेम वाढते - उदा. आधी होता संतसंग तुका झाला पांडुरंग | त्याचे भजन राहिना मूळ स्वभाव जाईना || किंवा नामस्मरण असो वा ध्यान-मनन-चिंतन असो..
(कृ गै न)

पुरंदरे शशांक - आपण लेख सविस्तर वाचून दिलेल्या प्रतिक्रिये साठी शतशः आभार !
(जरा शुद्धलेखनातल्या गडबडीकडे पहाणार का ? -नक्कीच पहाणार.
१] उदिष्ट - उद्दिष्ट, - दुरुस्ती केली आहे .
२] हृदपरी विठ्ठलु मिळतसे ॥१॥ - हृदपदी - संत एकनाथ यांचा हा अभंग एक /दोन ठिकाणी मी संकेत स्थळावर पहिला पण त्या सर्व ठिकाणी ' हृदपरी ' असे आहे . कृपया माझ्या साठी नक्की काय अचूक हे पडताळून पाहून सांगणार का ? आपली खात्री झाली कि मला वि पु तून कळवा . मग ती दुरुस्ती करतो . मूळ रचना संत एकनाथ यांची आहे म्हणून हि विनंती
३] अर्थात संतांचे सांगणे हे फक्त वारीच्या पुर्तेते पुरते मर्यादित नाही - ??) -या ठिकाणी मला वारी पूर्ण करणे इतक्याच कृतीशी मर्यादित भक्तीचे रूप नाही असे संतांना वाटते असे म्हणायचे आहे . अर्थात हा मला व्यक्तीशः भावलेला अर्थ .

तुम्ही साध्याच्या मागे लागताना साधनांना महत्व देत राहू नका. हा कानमंत्र देताना ते म्हणतात - >>>> तुमच्याशी चर्चा करायला आवडेल - माझ्या दृष्टीने साधनशुचिता हवीच.
आणि दुसरे असे की ज्ञानोत्तर भक्तित त्या साधनांची उपयुक्तता पूर्ण लक्षात आल्याने त्याविषयी अजून प्रेम वाढते - उदा. आधी होता संतसंग तुका झाला पांडुरंग | त्याचे भजन राहिना मूळ स्वभाव जाईना || किंवा नामस्मरण असो वा ध्यान-मनन-चिंतन असो..
(कृ गै न) - गैरसमज नक्कीच नाही . संत जनार्दन महाराज यांच्या रचनेतील अर्थ समजताना कदाचित माझी गफलत झाल्याने माझ्याकडून 'तुम्ही साध्याच्या मागे लागताना साधनांना महत्व देत राहू नका' असा अर्थ काढला गेला . आपला खुलासा आणि संत तुकाराम महाराज यांचा दाखला नक्कीच योग्य आहे.