निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग तीन

Submitted by किंकर on 9 July, 2015 - 13:44

निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551
निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन - http://www.maayboli.com/node/54561
संत साहित्य म्हणजे आपल्या मातृभाषेला लाभलेली ईश्वरी देणगी आहे. वेद ,उपनिषद, मंत्र विविध संहिता यांचा शास्त्रोक्त आभ्यास करून, ज्या निष्कर्षाप्रती पंडित पोहचतात, ते सार सोप्या शब्दात भक्तांच्या पर्यंत सहजतेने पोहचवण्याचे अलौकिक कार्य, संत त्यांच्या रचनांमधून करताना दिसतात .

सततच्या प्रयत्नाने ,परिश्रमपूर्वक एखादी गोष्ट केल्याने, कितीही अवघड असणारे उद्दिष्ट गाठता येते .हे व्यवस्थापनातील तत्व संतांनी सामन्य भक्तांच्या पर्यंत नेण्यासाठी, कशाचा आधार घेतला असेल तर तो नामाचा.

या ठिकाणी नाम म्हणजे जप. आणि मुखात सातत्याने देवाचे नाम जपणे म्हणजेच सद्विचार ,सदाचार , सद्सद्विवेक यातील सातत्य जपणे .पण जर हा संदेश अवघड करून सांगितला तर ,तो समजणे कठीण आणि स्वीकारणे तर दुरापास्त .मग यावर संतांनी शोधलेला तोडगा म्हणजे नाम .म्हणूनच कि काय एखाद्या एखाद्या अवघड समस्येवर, जेंव्हा सर्वमान्य तोडगा समोर येतो, तेव्हा त्यास नामी उपाय म्हणत असावेत.

या नाम महिम्यावर विचार करून त्याचे महत्व भक्तांना सांगण्याचे कार्य, या संत परंपरेतील प्रत्येकाने केल्याचे दिसते.संत ज्ञानेश्वर यांनी नाम महिमा समजावून देताना ,तो आचरणात आणताना ,भक्तांनी ते अन्तः प्रेरणेतून करणे जरुरीचे आहे हे नमूद केले आहे . म्हणजेच नाम जप केव्हा करा, जेव्हा तो तुम्हाला करावा, असे आतून वाटेल तेंव्हा करा. या तत्वाची प्रचीती भक्तांना यावी यासाठी ते म्हणतात -

एकतत्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसि करूणा येईल तूझी ॥१॥

या रचनेत पुढे ते म्हणतात ,या सहज नाम जपात सोपेपणा आहे ,यासारखे योग्य दुसरे काही नाही .पण याचे पालन करताना प्रदर्शनाची बिलकुल जरुरी नाही म्हणून शेवटी ते सांगतात -

ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं,
धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥

आणखी एका रचनेत त्यांनी नाम जपत असताना, त्यातील तल्लीनता कशी असावी, तर तुम्ही फक्त नाम जपत राहा, त्याच्या फळाची गणती सुरु ठेवू नका हे सांगण्यासाठी -

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्‍ति चारी साधियेल्या ॥१॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

इतक्या सोप्या शब्दांचा सहज सुंदर वापर केला आहे .

संत तुकाराम नाम महात्म्य सांगताना देवाची विविध रूपे ,अनेक नावे असली तरी तत्व एकच कि भक्तीत सातत्य राखणे जरुरीचे . हे नाम जपाचे कार्य अखंडीत व्हावे यासाठी पांडुरंगाला साकडे घालताना म्हणतात, हे ईश्वरा! तुझाच छंद लागून राहावा म्हणून, तूच आमच्या कडे लक्ष दे ,आमच्या हातून व्रत वैकल्ये ,तप ,दान यासारखे पुण्यकर्म होत नसले ,तरी यामुळे लाभणारे प्रेम नाम जपातून मिळत राहू दे . किती सहजतेने हे उतरलंय या रचनेत -

राम कृष्ण गोविंद नारायण हरी ।
केशवा मुरारी पांडुरंगा ॥१॥

लक्ष्मीनिवासा पाहें दीनबंधु ।
तुझा लागो छंदु सदा मज ॥२॥

तुझे नामीं प्रेम देईं अखंडित ।
नेणें तप व्रत दान कांहीं ॥३॥

तुका म्हणे माझें हें चि गा मागणें ।
अखंड ही गाणें नाम तुझें ॥४॥

या प्रकारे नाम महती सांगण्याचा प्रयत्न अनेक संतांनी केला आहे . पण नाम या विषयी सर्वाधिक भाष्य आणि सहज सुंदर रचना यांचा परमोच्च कळस म्हणजे संत नामदेव . मला तर कधी कधी वाटते कि त्यांना नामदेव हि मिळालेली उपाधी असावी आणि ती त्यांच्या नाम प्रभुत्वा मुळे त्यांना प्राप्त झाली असावी. कारण त्यांच्या 'नाम महती' च्या रचना म्हणजे साक्षात्कार आहे.

आपण एखादे काम करायचे ठरवतो पण त्यात एकाग्र चित्त होत नाही . सभोवती जे सुरु असते तिथे आपण असतो पण फक्त कायिक स्वरुपात.हि अवस्था का होते ? यावर भक्त म्हणून मी काय करावे ? याची विचारणा पांडुरंगास करताना नाम जपाचे फायदे सांगण्यास मात्र ते अजिबात विसरलेले नाहीत .त्यामुळे अमृता सम गोडी असूनही मी त्याचा आस्वाद घेण्याचे स्थितीत का नाही ? असा प्रश्न ते भगवंताला करताना म्हणतात -

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
मन माझे केशवा का बा न घे ॥१॥

सांग पंढरीराया काय करु यांसी ।
का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥

किर्तनी बैसता निद्रे नागविले ।
मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥

हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती ।
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥

नाम म्हणजे नाव.मग नाम जप करायचा तर तो कोणत्या नावाचा ? हा जन सामान्यांना पडणारा प्रश्न.संत नामदेव यांनी याचा उलगडा करताना, देवाची विविध रूपे , विविध नावे कशी आहेत व असे असले तरी, ती विविधता भक्ताची सगुण भक्ती प्रगट होताना आलेले वैविध्य आहे, हे त्या वेगवेगळ्या नावाचा वापर करीत सांगितले आहे . त्यामुळे कोणते नाव हा प्रश्न नसून एकचित्त ध्यान लागणे आणि त्यात सातत्य असणे हे महत्व पूर्ण ठरते . ते पटवून देण्यासाठी ते म्हणतात -
अच्युता अनंता श्रीधरा माधवा ।
देवा, अदि देवा पांडुरंगा ॥१॥

कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना ।
तूंची नारायणा नाम धारी ॥२॥

मुकुंदा मुरारी प्रद्युम्‍ना केशवा ।
नाम सदाशिवा शांत रूपा ॥३॥

रूपान्तित हरी दाखवी सगूण
निरंतर ध्यान करी नामा ॥४॥

असा हा नाम महिमा आणि दिनक्रम यात कशाला प्राधान्य द्यावे ? वेळ कसा काढावा ? हा संसारात गुतून गेलेल्या भक्त समोर असणारा एक यक्षप्रश्न .
पण जेव्हा निर्धार पक्का असतो तेंव्हा वेळ काढावा लागत नाही तर तो आपोआप मिळतो .कसा ते अगदी अचूकतेने मांडलेय संत जनाबाई यांनी .वेळ कमी पडणे हि सर्वांची तक्रार असली तरी संसारिक जबाबदाऱ्या अधिकच असणाऱ्या स्त्री भक्ताच्या नजरेतून रोजच्या रहाट गाडग्यातून वेळ काढून नाम जप कसा करावा हे सांगताना जनाबाई म्हणतात -

नाम विठोबाचे घ्यावे ।
मग पाऊल टाकावे ॥१॥

नाम तारक हे थोर ।
नामे तरिले अपार ॥२॥

अजामेळ उद्धरिला ।
चोखामेळा मुक्‍तिस नेला ॥३॥

नाम दळणी कांडणी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥

आणखी एक संत सोहिरोबानाथ यांनी भक्तांना सांगितले आहे कि -

हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥

कारण आत्मपरीक्षण कसे करावे हे त्यांनी त्यांच्या या नाम महतीत किती सुंदर सांगितले आहे ते जरूर पाहणे -

हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥

दोरीच्या सापा भिवुनी भवा ।
भेटी नाही जिवाशिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥

विवेकाची ठरेल ओल ।
ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥

संत संगतीने उमज ।
आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥

सोहिरा म्हणे ज्ञानज्योती ।
तेथ कैचि दिवस-राती ।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥

असा हा सल्ला भक्तां साठी विविध संतांनी दिला असला तरी संत एकनाथ म्हणतात त्या प्रमाणे ,मी मात्र पांडुरंग चरणी प्रार्थना करीन कि -

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥

तेणो देह ब्रह्मरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥

तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥

गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, वा, वा..... रविन्द्रजी - काय सुर्रेख नाममहिमा वर्णन केलात - अप्रतिम ....

"नामी" उपाय फारच आवडला ....... Happy