हिरवं कुरण

Submitted by mi_anu on 18 July, 2015 - 12:06

किर्ती:
किर्ती सकाळी चालून कानातल्या इयर फोन वर गाणी ऐकत गेटमध्ये शिरायची तेव्हा तिला गाडीवरुन किंवा गाडीतून भरधाव जाताना ती दिसायची. तिचा रुबाब पाहण्यासारखा असायचा. वयाला, रंगाला, पदाला शोभतील आणि वेगळे उठून दिसतीलअसे ब्रँडेड कपडे,इटालियन ब्रँडची पर्स, पायात कपड्याच्या स्टाईलला साजेसे चप्पल/बूट्/स्पोर्ट्शूज,कपाळावर गॉगल.एखाद्या महागड्या ऑफिस फॉर्मलचे पोस्टर जणू. दोघी एकमेकींना हसून बाय करायच्या आणि दोघींचे दिवसाचे वेगवेगळ्या दिशांना जाणारे प्रवास सुरु व्हायचे. किर्तीच्या डोक्यातल्या विचारांची चक्रं परत नव्याने चालू व्हायची. "आपण का नाही राहत हिच्या सारखं छान? हां, पण आपण ही सर्व ब्रँडपंचमी करुन करुन करणार काय? घरातल्या सोफ्यावर बसणार की फर्निचरवरची धूळ पुसणार की गवार निवडत बसणार? पण जरा जाड झालीय ना ही?आणि चेहर्‍यावर कितीही महागडा मेकप लावला तरी वय लपत नाहीये.लूक्स नाहीत पण उगीचच महागड्या कपड्यांच्या जोरावर टेचात असते.काय अगदी मोठ्ठी सी इ ओ असल्यासारखा उगीचच स्टाईलभाईपणा करते." इथे किर्ती मनातल्या मनात ओशाळली. आपल्या मनात हे 'बिची' विचार केव्हापासून यायला लागले? आपण सहा वर्षापूर्वी नोकरी सोडून घरी बसलो तेव्हाच मनाशी ठरवलं होतं ना, की या किटी पार्टी गॉसिप मध्ये आणि निंदासत्रात आपण अडकायचं नाहीये.

सकाळची कामं हातावेगळी करण्यात, आर्यनच्या मागे ओरडून ओरडून त्याची तयारी करुन त्याला शाळेत सोडून येण्यात साडेनऊ वाजलेच.ती घरात शिरली तेव्हा शशांक बूट घालत होता. "बरं झालं भेटलीस. तो शिवशरण येतोय अकराला. त्याच्याकडून सगळे इन्व्हेस्ट्मेंट प्लॅन्स नीट ऐकून घे आणि मला संध्याकाळी सांग. आणि माझा केवायसी मी भरुन टेबलवर ठेवलाय.पासपोर्ट तिथेच आहे. त्याची कॉपी कर आणि त्याला जोडून बँकेत देऊन टाक.चल निघतो, दुपारी फोन करतोच." किर्तीने तोंड उघडेपर्यंत शशांक दोन जिने उतरला पण होता. "सिंप्लेक्स कम्युनिकेशनः एकाच बाजूने कायम ट्रान्समिशन." बर्‍याच वर्षापूर्वी शिकलेले धडे तिला आठवले आणि हसू आलं.आता याच्या पैशाला कुठे कधी कसं गुंतवायचं याचे प्लॅन मी ऐकायचे, समजावून घ्यायचे, लक्षात ठेवायचे आणि त्याला संध्याकाळी समजावून सांगायचे.हे झालं की बूट चपला घालून ऑफिस बॉय च्या भूमिकेत शिरायचं, झेरॉक्स च्या दुकानावर वेळ घालवून मग बँकेत परत सर्व रामायण कोणीतरी परीटघडी टाय ला ऐकवायचं आणि घरी यायचं. ठीक आहे. प्लॅन समजावून घेण्यात निदान आपल्या एम बी ए चा उपयोग तरी होतोय. तितकंच काहीतरी महत्वाचं काम केल्याचं समाधान.

बँकेतली कामं करुन घरी आली तेव्हा साडेबारा वाजलेच होते. आता जेवण केलं, जरा पाठ टेकली की लगेच आर्यन ला घेऊन यायचं आहे.आजचा निवांत वेळ फुकट त्या शिवशरणच्या चरणी गेला. शहाण्याला इतके घोळ कशाला घालायला हवे होते? मी याच्या जागी असते तर हे सगळं १० वाक्यात सांगितलं असतं. पण याच्या चेहर्‍यावर अविश्वास दिसत होता का जरा? अगदी प्रत्येक गोष्ट दोन दोन तीन तीन वेळा समजावून सांगत होता कळलं म्हटलं तरी. आणी शेवटी जाताना विचारलंच गोड नम्रतेत घोळवून, "व्हेन विल सर बी अव्हेलेबल?आय विल एक्स्प्लेन हिम इन मोअर डिटेल्स." हो रे गण्या..बरोबर आहे. 'मॅम' घरी बसल्या आहेत. त्यांच्याकडे पैसा नाहीय. त्यांना उद्योग नाही म्हणून तुझी पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सांगायला तुला घरी बोलावलंय.शेवटी 'सर' ऐकतील आणि 'सर' डिसीजन देतील तेव्हाच खरं.

आवराआवर करुन जरा डोळा लागतो न लागतो तोच फोन वाजला. हां, प.पू. सासूबाई. त्यांना हल्ली दुपारी झोप लागत नाही आणि टिव्हीवर हा अर्धा तास काहीही सिरीयल चांगली नसते तेव्हा सगळ्या नातेवाईकांना फोन करतात. साबांचा आवाज नेहमीप्रमाणे उत्साहाने निथळत होता. "काय गं, काय चालू आहे? बरेच दिवसात काही फोन नाही, इकडे चक्कर नाही,अगं ती कमी भेटली होती परवा.तिच्या दुसर्‍या नातवाचं बारसं होतं.आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो. खूप गप्पा मारल्या.आता सगळ्या म्हणत होत्या फक्त विभाकडेच दुसर्‍या नातवंडाची न्युज राहिलीय.मी त्यांना म्हटलं बाई, असली तर काही लपणार नाही. आमची किर्ती घरी असते. ती नक्कीच घेईल दुसरा चान्स.हल्लीच्या नोकरीवाल्या पोरींसारखी थेरं नाहीत हो तिची, मॅटर्निटी लीव्ह घेतली, करीयर बरंच मागे गेलं, आता परत जरा ग्रोथ आहे तर दुसरं मूल आणून परत सगळं रिसेट नाही करायचंय आणि यांव आणि त्यांव." किर्तीला आता या विषयात पडून परत डोकं गढूळ करुन घायचं नव्हतं. तिने "हॅलो, हॅलो, काही ऐकू येत नाहीये, रेंज नाही, परत फोन करते, हॅलो,हॅलो" म्हणून फोन बंद करुन टाकला.

आपण घरीच आहोत, त्यामुळे दुसरं मूल जन्माला घालणं हे आपलं आद्य कर्तव्यच आहे, आता आर्यन आजी आजोबांना भेटेल तेव्हा त्याला पद्धत शीर पणे पढवलं जाईल, "आता आईला सांगायचं, मला खेळायला बेबी पाहिजे, मला बेबी आण " म्हणून. आपण घरीच आहोत, सणवार, आलेगेले सांभाळण्यात कुठेही कुचराई होता कामा नये, सर्व सण नीट साजरे झाले पाहिजेत. आपण "आज ऑफिसात खूप काम आहे,यावेळी चैत्रगौरीचं हळदीकंकू फक्त शेजारणीला बोलावून करु" असं म्हणू शकत नाही. आपण घरीच आहोत, आर्यन चा अभ्यास, त्याची शाळेची तयारी, त्याला शाळेत सोडणं आणणं हे आपलं कर्तव्य आहे अगदी शशांक थोडा आधी निघून त्याच रस्त्यावरुन जाताना त्याला शाळेत सोडू शकत असला तरी. आपण घरीच आहोत, त्यामुळे एका टोकाला जाऊन पासपोर्ट ची कॉपी काढणे, दुसर्‍या टोकाला बँकेत ती देऊन येणे आणि तिसर्‍या टोकाला जाऊन भाजी आणणे (आणलेली कालच आहे पण शशांकला दुधी, कार्लं, पडवळ, भोपळा, दोडकं, शेपू,भोपळी मिरची आवडत नाही त्यामुळे आज परत जाऊन एक मेथी आणि उद्या डब्यासाठी भेंडी आणणं गरजेचं आहेच.) आपण घरी का आहोत? आपल्यासाठी? जरा थांबून आयुष्य नीट घडवण्यासाठी?काहीतरी शिकण्यासाठी? नाही, आपण एक नॉन बिलेबल रिसोर्स आहोत जो सगळ्या टिम्स मध्ये कामं करतो आणि कागदोपत्री त्याला श्रेय एकाही कामाचं मिळत नाही. आर्यनच्या जन्मापासून आपण घरी आहोत. सासू सासर्‍यांना स्वतःची मुळं ज्या गावात रुजली ते गाव सोडून दुसरीकडे यायचं नाही.शशांकला पाळणाघरात मुलं ठेवणं पसंत नाही.आज सासू सासरे इथे असते तर? आता नोकरीत निदान २-३ पोस्ट वर असते.

का वैतागतोय आपण? हे असे काही घाईचे,आल्यागेल्याचे आणि सणवारांचे दिवस सोडले तर आयुष्य चांगलं चालू आहे. स्वतःचे निर्णय आहेत. आर्यनला गणपतीत बर्‍याच स्पर्धांना बक्षिसं मिळतात. घर चकाचक असतं, आजूबाजूच्या बायका कायम स्तुती करत असतात, माझी उदाहरणं गप्पाटप्पात देत असतात. "पोरासाठी इतकी चांगली नोकरी सोडली." सोसायटीत भरपूर जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्यात. झुंबा क्लासच्या मैत्रिणींबरोबर कधीकधी मजा करुन येतो,अजून वयाच्या मानाने फिगर चांगली आहे. २-३ वर्षं तरुणच दिसतो आपण.एक नोकरी याशिवाय काय कमी आहे आयुष्यात? आर्यनला चित्र रंगवायचं पुस्तक देऊन शेजारी बसलेल्या किर्तीचे विचार मात्र बर्‍याच दूर गेले होते.

आर्यनने रात्री हट्ट करुन करुन बनवायला सांगितलेला पुलाव खाल्लाच नाही.शशांक घरी येताना जेवूनच आला.आज अचानक पार्टी ठरली म्हणे. 'अचानक' म्हणजे किती अचानक? एक दोन तास आधी पण माहिती नसावं इतकं अचानक?आधी सांगितलं असतं तर तितका वेळ निदान काहीतरी छान वाचन केलं असतं, फिरुन आले असते.पण हे बोलायचं नाही..परत "अगं ऑफिस टिम बाँडिंग असतं..नाही म्हणता येत नाही..तू घरीच असतेस म्हणून तुला वाटतं..पण यु डोन्ट नो हाऊ मच आय अ‍ॅम गोईंग थ्रु." हो रे सोन्या.."गोईंग थ्रु सिच्युएशन्स" फक्त तु एकटाच असतोस. ऑफिसातून आल्यावर बदललेले कपडे पण आपणहून वॉशिंग मशिनला टाकत नाहीस, आर्यनचा होमवर्क मीच घ्यायचा..तु फक्त सोफ्यावर पसरुन बस..टिव्हीच्या रिमोटची बटनं दाब..आणि मग दमून झोप..मग तुझ्याहीपेक्षा दमून मी झोपायला आले की स्वतःचा श्रम परिहार कर.कारण तु नोकरी करतोस. ब्रेडविनर आहेस. मी 'घरीच' आहे. माझ्याकडे काय, या सर्व प्रायोरीटीज संपल्यावर केव्हाही लक्ष देता येईल. प्रेम तू करतोस रे माझ्यावर..मला माहित आहे. पण तुझ्यासाठी मी आता "शिळी बातमी" आहे. तुझ्या आयुष्यात,नोकरीत खूप काही घडत राहतं..त्यापुढे तुला माझा दिवसभराचा पाढा आता नीरस वाटतो.म्हणून तू जेवणाची हाक येईपर्यंत लॅपटॉप वर वेळ काढतोस.जेवण झालं की लगेच परत चूळ भरुन लॅपटॉप च्या सेवेसी हजर होतोस.तुला बायको नक्की का हवी? एखादी जेवण बनवणारी आणि ताटात वाढून देणारी स्वयंपाकीण पण चालेल की! किर्तीने हे सगळं नेहमीप्रमाणे मनातल्या मनात बोलून घेतलं.

"देवा, या आयुष्याबद्दल तक्रार नाही पण, एक वर्षं, फक्त एकच वर्षं मला प्रीती बनायचं आहे.माझी क्षमता परत सिद्ध करायची आहे. परत एक नवं जग, आठ तास स्वतःचं वेगळं विश्व,नवी आव्हानं हवी आहेत.मनापासून काम करायचं आहे. ब्रँडेड कपडे घालून ऑफिसला जायचं आहे.गंजतंय माझं शिक्षण, माझी हुशारी आणि माझे इंटर पर्सनल स्किल्स.मला कंटाळा आलाय या संथ पाण्याचा."

प्रीती:
सकाळी किर्तीला बाय करुन प्रीती निघाली. घरात कितीही वादळं झालेली असू दे- बाहेर पडल्यावर सगळं मागे टाकून चेहर्‍यावर एक लख्ख हसू आणायचं आणि त्या तालात दिवस उत्साहाने सुरु करायचा हे ती कटाक्षाने पाळायची. आज सकाळी पण तेच. दूध संपत आलंय, पातेल्याच्या तळाशी टेकलंय हे माहित असूनही काल घरातल्या कोणीही दूध आणलं नव्हतं. तिला आठवणही केली नव्हती. आज सकाळी उठल्या उठल्या सर्वांची वाकडी तोंडं आणि महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने नेहमीची जवळची सर्व दुकानं बंद. सकाळच्या घाईत सर्व सोडून चांगला दोन किलोमीटरचा वळसा घालून डेअरीतून दूध आणलं तेव्हा कुठे दिवस चालू झाला. तिने सासू सासर्‍यांजवळ त्रागा दाखवला नाही तरी सुबोधला खोलीत तणतणून म्हणालीच, "यांना दिवसातून तीन तीन वेळा सोसायटीत वॉक करायचा असतो, कट्ट्यावर सिनीयर सिटीझन मंडळात तासभर बसायचं असतं, घरात सगळीकडे बारीक लक्ष असतं, पण तीच वॉक ची चार पावलं गेट बाहेर जाऊन दूध मात्र आणता येत नाही आणि त्या दूधवाल्या आठवणीचा फोन पण करता येत नाही .ठीक आहे आणायचं नाही तर नाही एका शब्दाने आठवण करुन द्यायला काय हरकत होती काल? रात्री फिरत फिरत जाऊन आणलं असतं." सुबोध नेहमीप्रमाणे चढ्या आवाजात म्हणाला "ते आधीच वेदाला दिवसभर सांभाळून दमतात.तुला बिनपगारी नोकर राबायला हवे असतात तुझ्या नोकरीसाठी, पण त्यांनी एक दिवस वयोमानाने, थकव्याने चिडचीड केली तर ते समजून घेण्याची तयारी नाही.बोलले काही, तुझ्या अंगाला भोकं पडतात का? आणि तशी पण सकाळी काही पंचपक्वान्नांचं जेवण करत नाहीस.घरकामाला बाया आहेत.असे काय मोठे कष्ट झाले गं दूध आणायला?" प्रीतीला वाद वाढवायचा नव्हता.प्रश्न काम कुणी करायचं याचा नाही, प्रश्न योग्य वेळी योग्य त्या गोष्टी कम्युनिकेट करण्याचा आहे हे त्याला सांगून पटलं नसतंच, मग शब्दाने शब्द वाढत भांडण बाहेरच्या खोलीत गेलं असतं आणि सुबोधला "अरे तू गप्प बस ना, लोकं ढीग भांडतील, काही जणांना सवयच असते भांडणं उकरुन काढायची!! आपण शांत राहायचं" इ. मानभावी सल्ले मिळाले असते.

आज नेहमीप्रमाणे ट्रॅफीक तुंबलं होतं. लोकं पुढचं तुंबलेलं ट्रॅफिक बघून गाड्यांना यु टर्न मारुन ट्रॅफिकचा बोजा यथाशक्ती वाढवत होते. प्रीती मनातल्या मनात अपडेट मीटिंगला काय बोलायचं याचे मुद्दे तयार करत होती. समोरचा गाड्यांचा महासागर पाहून तिला आज चारचाकी आणल्याचा पश्चात्ताप झाला. तिने पटकन मोबाईलवरुन साहेबाला घाईत चार ओळी इमेल खरडलं. "कार ब्रेक डाऊन झाल्याने मीटींगला उशीर होईल, गोष्टी शेअर्ड एक्सेल मध्ये भरल्या आहेत." कार ब्रेक डाऊनची सबब आज झाली आहे. आता परत उशीर झाल्यावर जरा नवं कारण शोधायला पाहिजे. सगळीकडे पाच मिनीटं उशिरा पोहचणं हे आपलं नशिब आहे. इतरांच्या वायफळ गप्पात आणि फोनवर कॉन्फरन्स सेटअप मध्ये भले पंधरा मिनीटं जाऊदे, पण प्रीती उशिरा आली की त्यावर काहीतरी टोमणा किंवा जोक आलाच पाहिजे. मारेनात का जोक, अजून लग्नं नाहीत, जबाबदार्‍या नाहीत,सकाळी नवाला ऑफिसात येऊन बसतात आणि रात्री आठला निघतात.आपण यांच्या दिनक्रमाला पाळत नाही.यातल्या काही जणांना आपण "नवर्‍याची मोठी नोकरी असून उगीचच एक जागा अडवून ठेवणारी आगाऊ बाई" वाटतो, त्याला आपण काही करु शकत नाही. आपलं काम चांगलं करुन "आगाऊ बाई आहे" या मताला "तशी ओळख झाली की स्वभावाने चांगली आहे.कामात सिन्सीयर आहे" या मताने न्युट्रलाईझ करण्याचा अखंड वसा प्रीतीला जपायचा असायचा.

संध्याकाळ पर्यंत स्वतःचे इश्युज तिच्या टिमवर ढकलणार्‍या बर्‍याच गव्यांना मुद्देसूद पुराव्यांसहित ते इश्युज परत करुन प्रीती पर्स आवरायला घेणार तेवढ्यात चाट विंडो चा टोन वाजला.अमेरिकन साहेबाला "शो स्टॉपर" नामक एक पेटता निखारा नेमका आताच प्रीतीच्या पदरात घालून एक तासात त्या इश्युचं बाळंतपण कोणत्या टिमच्या गळ्यात आहे याचा अहवाल पुराव्यांसहित पाहिजे होता. आपण एक मिनीट आधी 'अवे' स्टेटस न लावल्याचा प्रीतीला मनापासून पश्चात्ताप झाला.आता हे सर्व करण्यात बाहेर सूर्य मावळणार,वेदा आज सकाळीच म्हणाली होती, "आई आज तू लवकर ये, आपण गार्डनला जाऊ." शनिवार रविवार गेलं तरी खूप गर्दी असते, बागेतल्या झोके घसरगुंड्यांवर मानासारखं खेळता येत नाही म्हणून वैतागलेली असते बिचारी. हिच्या नशिबी आपल्यासारखी लवकर यायचा शब्द कधीच न पाळू शकणारी आई आहे त्याला ती तरी काय करणार?

सर्व पुराव्यांसहित मेल लिहून अमेरिकन साहेबाला त्याच्या साहेबाबरोबर मिटींगमध्ये बोलायला आवाज मिळवून देऊन प्रीती निघाली तेव्हा मजला सुनसान होता.हाऊस किपींग वाल्यांच्या व्ह्यॅक्युम क्लीनरची घरघर चालू झाली होती.ऑफिसच्या साफ सफाई वर शेवटचा हात फिरवून काचा पुसून त्यांचा आजचा दिवस संपायला अजून १-२ तास होते.एक दोन व्ह्यॅक्युम क्लीनरं तिच्या कडे वळून नजरेत बरंच काही घेऊन पाहायला लागली तसे प्रीतीने मजल्यावर असाच अमेरिकन प्रोजेक्टवर असलेला आणि त्याच्या साहेबाबरोबर चाटवर डोकं खाजवत असलेला एक समदु:खी प्राणी शोधून त्याच्याशी उगीच त्याच्या मुलांच्या शाळेबद्दल चार शब्द उकरुन काढले आणि त्याच्याचबरोबरच बाहेर पडली. आठवड्यातून अशा सुनसान रात्री एक दोन तरी यायच्याच.भयाण पार्किंग कडे जाताना प्रीतीच्या मनात बरेच अभद्र विचार येत होते. "मयत सोअँड सो कंपनीत डेव्हलपर चं काम करत असे.रात्री पार्किंगकडे जाताना तिचा खून झाला.अजूनही तिचा आत्मा या वास्तूत भटकतो.रात्री थांबून कामं ईमानदारीने पूर्ण करणार्‍या बायाबापड्यांचं रक्षण करतो." प्रीतीने पटकन भानावर येत इकडे तिकडे बघत चालीत बेफिकीरी आणत सर्व विचार झटकून टाकले. आता फॉर्म्युला वन ला शोभेल अशा वेगाने पण सुरक्षीतपणे गाडी चालवत तिला घरी पोहचायचं होतं आणि वेदाच्या "पॅरेंट चाईल्ड अ‍ॅक्टिव्हिटी" ला उद्या देण्यासाठी सुंदर बटनांचा मोर बनवायचा होता. त्या आधी उशिरा पोहचल्याबद्दल अनेक आडून आडून उद्गार जेवताना काना आड करायचे होते. सुबोध लवकर घरी आला असेल आणि मूडात असेल तर त्याला रात्रीचा "टॅक्स" देऊन गोडीगुलाबीत सकाळचं भांडण मिटवून पण आपले मुद्दे सौम्यपणे पटवून द्यायचे होते.अंगात त्राण राहिलं आणि वेदाने लवकर झोपण्याचं सहकार्य दिलं तर स्टिफन किंगच्या कादंबरीची शेवटची पाच पानं मोबाईलवर डार्क मोड ठेवून सुबोध आणि वेदाच्या डोळ्यावर प्रकाश पडणार नाही अशारितीने पूर्ण करायची होती. "आपला दिवस कधी संपतो? कधी चालू होतो?रात्री सहा तास निवांत झोप आणि आवडत्या पुस्तकाची काही पानं वाचणं, सकाळची दहा मिनीटं निवांत बनून चांगला बनलेला चहा पिणं(तोही सासूबाई पाऊण तास आंघोळीला गेलेल्या असताना,या घरात अजून "चहा हे विष" वालं स्वातंत्र्यपूर्व कालीन वातावरण आहे, चहा प्रीती प्यायला लागलीच की नाकं मुरडली जाऊन घरातल्या कोणाला तरी काहीतरी शोधून दे वाली कामं त्याचवेळी आठवलीच म्हणून समजा) या छोट्या छोट्या गोष्टी पण इतक्या कठीण का बनाव्या?"

सिग्नलवर आता पण भरपूर गर्दी आहे. अरे हो, आज डोंगरमाथ्यावरच्या ग्रामदैवताची जत्रा.प्रीतीच्या समोरुन एक कुटुंब हसत खेळत आपल्याच धुंदीत रस्ता ओलांडून जात होतं. मुलांच्या हातात रंगीबेरंगी पिपाण्या, बायकोच्या हातात बर्‍याचश्या पिशव्या, मुलांची पावलं नाचत होती, डोळे चमकत होते, तोंडं जत्रेतल्या कोणत्यातरी पाळण्याबद्दल सांगण्यात गुंतली होती. आपले डोळे कधी वहायला लागले प्रीतीला कळलंच नाही.हल्ली आपण दिवसातून एकदा तरी रडतोच. आपल्याला पोस्ट पार्टम की कायसंसं डिप्रेशन झालंय का? तोंडावर घोटून बसवलेलं "पी आर स्माईल" सोडून खरं हसू कधी येतच नाहीये.शेवटचं खळखळून हसल्याला किती दिवस झाले?निवांतपणे चार दिवस माहेरी गेल्याला किती दिवस झाले?सुट्ट्या शिल्लक असून स्वतःवरच्या जवाबदार्‍या नीट पूर्ण करायच्या म्हणून आणि पुढे कधीतरी लागतील म्हणून जपून वापरायच्या,शनीवार रवीवार सासू सासर्‍यांना पूर्ण विश्रांती हवी म्हणून सगळीकडे वेदाला घेऊन जायचं, देवी च्या नवरात्रात ऑफिसात नाना युक्त्या करुन मिटींगा दिवसा उशिरावर ढकलायच्या आणि पूर्ण नैवेद्य स्वयंपाक आरती आणि प्रसाद करुनच ऑफिसला यायचं,घरी वेळ कमी पडला म्हणून दिलगीर राहायचं, कमी पडणार्‍या वेळाची भरपाई असलेल्या वेळात जास्तीत जास्त कामं करुन करायची.

ऑफिसात दर सहा महिन्यांनी "यु नीड टु गो अ‍ॅन एक्स्ट्रा माईल" हे ऐकून घेऊन कमी मार्क हसतमुखाने स्वीकारायचे.तिकडे दिलगीर भाव चेहर्‍यावर अधून मधून आणून लोकांच्या रागाची तीव्रता कमी करायची. वाघीण बनून सतत दिसत राहिलो तर लोक बंदूका घेऊन शिकार करतात, गरीब गाय बनून कायम राहिलो तर लोक कुचकामी बावळट कामाला नालायक समजतात.म्हणून वाघीण आणि गरीब गाय हे मुखवटे सतत बदलत राहायचे..आपण दबलो आहोत सगळ्यांच्या ऋणाखाली. एक यंत्रमानव, घरी असताना अव्याहतपणे कामं उरकेल..कामं करत नसेल तेव्हा झोपलेला असेल..ऑफिसात "सिन्सीयर, पण जास्त प्रिपरेशन न करणारा रोबो",मुलीसाठी "रात्री कधीतरी एक दोन तास भेटणारी आई",सुबोधसाठी "आई बाबांचा म्हणावा तितका आदर न राखणारी, त्यांना अगदी गोड गोड बोलून एंटरटेन न करणारी बायको." सोसायटीवाल्यांसाठी "मुलं बाळं नवरा यांची कर्तव्यं सोडून करीयरच्या आणि पैशाच्या मागे धावणारी बाई"..आपण का नोकरी करतोय? नक्की कोणाला आनंदी करतोय आपण? इतकं तडफडून नोकरी करायचं नडलंय का?सासू सासर्‍यांच्या सर्व लहरी, बोलणं सहन करायचं,कारण डे केअर ने दिला नसता इतका सपोर्ट ते वेदासाठी देतात. त्यांचं वैतागणं पण चूक नाही.आपण हे सर्व सांभाळत रोज मरतोय याच्याशी त्यांना देणं घेणं नाही.तेही दमतायत.नोकरी करणं हा आपला निर्णय आहे.त्यांनी स्वतःला जादा कष्ट देऊन आपलं आयुष्य सोपं करणं आपल्याला कितीही आवडणार असलं तरी सत्य होणारं नाही.

सकाळी किर्ती अगदी साध्या कपड्यात किती छान दिसत होती!अजून पण नवं लग्न झालेली वाटते.बारीक झालीय चालून चालून. केस, स्किन छान ठेवते, नियमीत फेशियल्स करते. सोसायटीतल्या काक्वा तिची स्तुती करताना थकत नाहीत. एम बी ए आहे. घरचं सगळं छान सांभाळते. इन लॉज लांब राहतात, कधीतरी दोन दिवस येतात त्यांच्याशी गोडीगुलाबीने छान राहते. तसेही घरीच असते, सर्व गोष्टांना भरपूर वेळ मिळतो. घर चकाचक. आणि कामं काय म्हणा दुसरी..हिचं आपल्यासारखं नाही, रात्री एक स्क्रब लावून चेहरा धुणं आणि बाकी दिवसभर त्या शरीरावर वाटेल ते प्रयोग..नियमीत स्वस्थ बसून जेवणं नाही, काम वाढलं की कॉफ्या वाढवणं, वेळेत झोपणं नाही, आपण लहानपणी दुकानातून आणायचो त्या सुंदर खोडरबरासारखं आधी छान आणि मग हळूहळू भरपूर वापर होऊन झिजलोय, कुरुप झालोय.सर्वात चांगले कपडे आहेत, मेकअप नीट करतो. पण चेहर्‍यावरचे दमले थकलेले "नारायणा, सोडव प्रपंचाच्या चक्रातून!" वाले भाव लपत नाहीत.अमेरिकेच्या प्रोजेक्टवर आल्यापासून केसात भरपूर चंदेरी तारा दिसायला लागल्यात.हल्ली सकाळी चालणं पण जमत नाही.सकाळपासून शरीर "आला परत एक थकवणारा दिवस" या मोड मध्येच उठतं..रात्रीपर्यंत त्या टिव्हीवर एका सेल ची जाहिरात आहे त्यात धावणारे इतर सेल ढेपाळलेले असतात तशी अवस्था होते. शांत बसून राहावंसं वाटतं.

"देवा, मी निवडलेल्या आयुष्याबद्दल तक्रार करायचा मला हक्क नाही. नोकरीने मला खूप काही दिलंय. पण आयुष्यात एक वर्षं मला किर्तीसारखं आयुष्य जगायचंय..मनापासून स्वत:कडे लक्ष देणारं..मुलीला नीट वेळ देणारं..सतत आयुष्यावर कोणाचे तरी उपकार नसलेलं..स्वतःसाठी थोडा तरी वेळ असलेलं..चेहर्‍यावर तो तजेला असलेलं..आयुष्यातलं एक वर्षं.फक्त एकच वर्षं मला किर्ती बनायचंय..ही ओढाताण नाही सहन होत आता."

आजोबा प्रीतीला उशिर झाला म्हणून वेदाचं होमवर्क घेत होते.
"आजोबा, ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड म्हणजे काय?"
"म्हणजे असं बघ, एका मोकळ्या मैदानात दोन गाढवं असतात. मैदानाला दोन्हीबाजूंनी आरश्याची भिंत असते.एका गाढवाला आरश्यात पलिकडे हिरवंगार गवत दिसत असतं आणि ते सारखं जीवाच्या आकांताने पलिकडे हिरव्या कुरणात जाण्यासाठी आरश्यावर धडका देत असतं.समोर दुसर्‍या गाढवाला पण आरश्यात हिरवंगार लुसलुशीत गवत दिसत असतं.तेपण सारखं आरश्याकडे धाव घेत असतं.मागे फिरुन आपल्या मागचं हिरवं कुरण दोन्ही गाढवांना कधी दिसतच नाही आणि ती दोघं आरश्याला धडका देऊन शेवटी बेशुद्ध पडतात."

वेदाला बरेचदा आजोबांचं "हाय मराठी" डोक्यावरुन जात असे तसं आताही गेलं आणि तिने पटकन पुढच्या प्रश्नाकडे मोर्चा वळवला.प्रीती स्क्रब ने चेहरा धूत होती ते बरंच झालं, कारण तिला पाण्यात मिसळणारं दुसरं खारं पाणी लपवायला वेगळा आटापीटा करावा लागलाच नाही!

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह....काय मस्तं लिहिलय. किती सहजपणे तुम्ही स्टे होम मॉम्स च्या मनात शिरून त्यांचे अंतरंग उलगडून दाखविले आहे. अतिशय सुरेख .
आता 'ती' च्या नजरेने सुद्धा कुरण जास्तं हिरवं दिसतं का हे जाणण्याची उत्सुकता लागली आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

आत्ताच दुसरा भागहि वाचला. खूपच छान झालीय कथा. दोघींच्या मनाची घालमेल अचूक दाखवली आहे.

sahee lihilay..
Needhapa ++.

navare kaam karat nahit, hyat bayakanchihi chook asate.

But if you leave aside work angle from this story, sagalya aaya kayam hya pecha madhe disatat.
At least I am ever since my daughter is born. Its difficult to decide because you want both the things (when I say work, I don't just mean money, its also about satisfaction, your world outside home, meaningful interaction with other folks etc).
At the same time, its so much of peace when you are with your kid and when your kid pleads and asks you not to go - you start feeling as if you are too mean. I spend good amount of quality time with my daughter, but I still always feel I want more.

भारी लिहिलंय.. Happy
सध्या मी "प्रीती" मोड मधे आहे,
पुढे मुलं झाल्यावर "किर्ती" मोड मधे जायचा विचार होता, पण त्यातले अडथळे ही वेळेत लक्षात आणून दिल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद _/\_

मस्त लिहलयं........सगळ्यांच्या अगदि मनातले..

किती छान लिहिलय ग अनु. दोन्ही बाजुची तगमग अनुभवुन झाली आहे त्यामुळे कित्येक नाही प्रत्येक वाक्याला अगदी अगदी झाले.

लेख छाने. मासिकात छापायला हवा होता.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
(म्हणजे 'चरचा' झाली नसती. पण होतेच आहे, तर माझे दोन पैसे, for whatever it is worth)

navare kaam karat nahit, hyat bayakanchihi chook asate.
<<

याच्याशी १००% सहमत.

बायका = फीमेल्स.

१. बाळ्याला भातुकली कधीच आणली जात नाही खेळणं म्हणून इथे सुरू होऊन, आपल्यानंतरसाठी चांगली 'गृकृद' सून त्याची 'काळजी घेण्यासाठी' 'आणण्या' पर्यंत : आई.
२. मी करियर केली तरी मला घरची कामं, सणवार, नातेवाईक, मुलंबाळं हे सगळंच जमायला पाहिजे अशा अट्टाहासात असणार्‍या वॉन्नाबी सुपरमॉम्स.
३. आपसातच ग्रास ग्रीनर ऑन अदरसाईड स्टाईल काँपिटीशन करणार्‍या अगेन, बायका = फीमेल्स

यादी वाढवता येईल.

आजकाल चित्र थोडेफार, रादर फार थोडे, बदलू लागले आहे, हेही शेवटी नमूद करावेच लागेल.

<<<< अजूनही तिचा आत्मा या वास्तूत भटकतो.रात्री थांबून कामं ईमानदारीने पूर्ण करणार्‍या बायाबापड्यांचं रक्षण करतो." >>>

बाप रे.... फु... ट... ले...

हा खास "अनु" ट्च...

बाकी कथा - Superb... one of the best.... very very very realistic..

Pages