नारळाच्या पोळ्या

Submitted by अंजली on 8 July, 2015 - 15:22
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पारीसाठी:
१ मेझरींग कप कणिक, किंचीतसे मीठ, चमचाभर तेलाचे मोहन

सारणासाठी:
१ मेझरींग कप खवलेला नारळ / नारळाचा चव
१ मेझरींग कप पंढरपुरी डाळ्याचे अगदी बारीक केलेले पीठ
३/४ मेझरींग कप पीठीसाखर
स्वादासाठी वेलची पूड, थोडे केशर
पाव कप दूध
तूप

क्रमवार पाककृती: 

पारीसाठी लागणारे साहित्य घेऊन पोळ्यांसाठी भिजवतो तशी कणीक भिजवून घ्या. फार घट्ट नको किंवा फार सैलही नको.
नारळाचा चव अगदी थोडासा परतून घ्या. त्यात पंढरपुरी डाळ्याचं पीठ, पीठीसाखर, वेलची, केशर घालून नीट मिसळून घ्या. सारण कोरडं वाटलं तर अगदी थोडे थोडे दूध शिंपडून पुरणाप्रमाणे मऊ (कंसिस्टन्सि?) करून घ्या. आता कणकेचा उंडा घेऊन त्यात पुरणाच्या पोळीला भरतो तसे सारण भरून तांदळाच्या पिठीवर हल्क्या हाताने लाटून घ्या. तव्यावर तूप सोडून भाजून घ्या.

वाढणी/प्रमाण: 
५-६ पोळ्या
अधिक टिपा: 

काहीही नाहीत. एकदम सोपी पाककृती. या पोळ्या टिकतातही छान. थोSSडीशी खव्याच्या पोळीसारखी चव लागते. बंगलोरलाही खाल्ल्या होत्या पण त्या नुसत्या नारळाच्या होत्या. नारळी पौर्णिमेला कधी साखरभाता ऐवजी बदल म्हणून छान लागतात.

माहितीचा स्रोत: 
आत्या. तिने फार वर्षांपूर्वी टिव्हीवर एका कार्यक्रमात पाहिल्या होत्या.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटतायत.
पंढरपुरी डाळ्याचं पीठ >>> याला इथे काय म्हणतात? इंग्रो मधून नेमकं काय आणायचं?

पंढरपुरी डाळ्याचं पीठ>>> आपण चिवड्यात घालतो ते डाळं. त्याला आमच्यात पंढरपुरी डाळं म्हणतात. त्याचं मिक्सरवर बारीक पीठ करून घ्यायचं.

अरे वा .. फोटो छान आहे .. Happy

डाळ्या चं पीठ घरी केलं का? की तसं ते बाहेर मिळतं? ओलं खोबरं आणि डाळं हे कॉम्बिनेशन कसं लागेल ह्याचा अंदाज येत नाहीये अजून ..

डाळ्या चं पीठ घरी केलं का?>>> हो. बाहेर मिळणार नाही. डाळं आणून मिक्सरमधे / कॉफी ग्राईंडर मधे किंवा मॅजिक बुलेट मधे बारीक करायचं. पटकन होतं.

ओलं खोबरं आणि डाळं हे कॉम्बिनेशन कसं लागेल ह्याचा अंदाज येत नाहीये अजून ..>>> You will be surprised. मस्त लागलं पोळ्यांची चव मला थोडी खव्याच्या पोळ्यांसारखी लागली.

हो तू म्हंटलं आहेस वर .. मी जे रवा बेसन लाडू करते त्यात सगळं जमून आलं की अशीच खव्यासारखी चव लागते बेसनाची रव्याच्या टेक्स्चर मध्ये ते आठवलं ..

मुहूर्त लागला की करून बघते ..

ओळ्या खोबर्‍याच्या असूनही टिकतात का? दूधही आहे त्यात ..