निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन -

Submitted by किंकर on 8 July, 2015 - 10:49

निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551
संत परंपरेत लोक जागर केलेले संत खूप आहेत, पण ते स्वतः, स्वतःला संत मानत नव्हते. आपल्या पेक्षा अधिक ज्ञान असणारे व्यक्तिमत्व, यांना संत वृतीने पहिले जात असे. अशा अनेक संतांच्या नजरेत विठ्ठल ,पंढरी कशी होती ते आज आपण पाहू .

संत सेना महाराज यांनी त्याच्या रचनेत पंढरीस जाणे ,विठ्ठल दर्शन घेणे ,भक्तीत तल्लीन वारकऱ्यांना पाहणे हि सुद्धा एक जीवाला मनःशांती देणारी घटना आहे, हेच सर्वांच्या मनावर अतिशय सोप्या भाषेत बिंबवले आहे. त्यामुळे या पंढरीच्या सोहळ्याचे वर्णन करताना ते म्हणतात -
जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची महती सांगताना त्याची तुलना होवूच शकत नाही इतके म्हणून ते थांबत नाहीत तर ते म्हणतात- पंढरपुरी मिळणारे हे सुख इतरत्र शोधून देखील ते गवसलेले नाही. म्हणजेच तुम्हाला जर अतुलनीय सुखाचा परमोच्च आनंद हवा असेल, तर तुम्ही विठुरायाचे दर्शनास या .

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥

बर पंढरीस फक्त विठूराया आहे असे आहे का ? तर तसे नाही, विठूराया तर आहेच, पण त्याच्या नामघोषात तल्लीन वारकरी ,त्यांनी घेतलेल्या पताका, त्यांचा जयघोष तुम्ही अन्यत्र कुठे पहिला आहे का ?

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥

इतके म्हणून संत सेना महाराज थांबत नाहीत, तर पंढरीतील प्रत्येक गोष्ट अशी आहे कि, त्याची अन्यत्र तुलनाच होवू शकत नाही, असे सांगत शेवटी ते म्हणतात , संत माहात्म्यांनी सांगितले आहे कि ,परिपूर्ण मनःशांती म्हणजेच पंढरी होय .

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ।
ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥

सेना म्हणे खूण सांगितली संती ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥

या संत परंपरेतील आणखी एक नाव म्हणजे संत एकनाथ . त्यांच्या नजरेतील पंढरी, अनेक उपमा अलंकारांनी सजलेली आहे . सर्व सामान्य भक्तांना भक्ती मार्गाचे अनन्य साधारण महत्व विषद करताना कधी ते - माझे माहेर पंढरी ,तर कधी काया हि पंढरी, असे सांगतात . पंढरी दर्शनाचे समाधान व्यक्त करताना ते म्हणतात -

या पंढरीचे सुख पाहतां डोळां ।
उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥

म्हणजे एखाद्या योगीराजाने जसा जिव्हाळा व्यक्त करावा, तसे सुख पंढरी दर्शनात सामावले आहे . पण या अनुभूतीचा साक्षात्कार कसा घेतला, हे सांगताना ते म्हणतात ,श्री चरणी लीन होण्यासाठी तन ,मन अर्पून शरण जाताना ,सर्व मनोविकार चंद्रभागेत बुडवून टाकले ,आणि अंगभूत चैतन्याने विठूरायास पुजिले. पण या कृतीचा उलगडा सोप्या शब्दात मांडताना ते लिहतात-

म्हणोनियां मन वेधलें चरणीं ।
आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥

जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं ।
करी वोवाळणी शरीराची ॥३॥

पंढरी म्हणजेच सुखाचा परमोच्च बिंदू असे वाटणारे अनेक संत आहेत त्यातील आणखी एक म्हणजे संत चोखामेळा . ते म्हणतात जिथे प्रत्यक्ष चक्रपाणी आपल्या साठी उभा आहे तेथील सुखाची तुलना कशाशीच होणार नाही त्यामुळे या अभंगात ते लिहतात -

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥

कृष्णा ,गोदावरी, गंगा अशा अनेक पवित्र नद्यांच्या काठी अनेक तीर्थे आहेत . पण अशाच ताकदीचे एक सामर्थ्य शाली तीर्थ म्हणजे पंढरी, जे दक्षिण वाहिनी चंद्रभागेच्या काठी आहे .ते फक्त विठूराया ,पंढरी, चंद्रभागा यांचे महत्व नोंदवून थांबले नाहीत तर या पवित्र ठिकाणी तितकाच महत्वाचा भक्तांचा प्रतिनिधी पांडुरंगाचा लाडका पुंडलिक देखील आहे . थोडक्यात काय तर अगणित सुख देणारी हि पंढरी भोळ्या भाबड्या भक्तांची वाट पाहत आहे . म्हणून ते लिहतात-

त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥

सकळ संतांचा मुकुटमणी देखा ।
पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥

चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥

या पंढरीत असणारा हा सुखाचा सागर ज्यात सामावला आहे, त्या विठ्ठलास विसरून कसे चालेल . त्यामुळे आणखी एका रचनेत संत चोखामेळा पंढरी,पुंडलिक,चंद्रभागा यांच्या विषयी भरभरून लिहताना म्हणतात , सुखाच्या पलीकडे पण सुखच असेल असे ठिकाण म्हणजे पंढरी . त्यांच्या या भक्तीची अनुभूती आपणास या रचनेतून नक्कीच मिळते -

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं ।
पुंडलीकापाठीं उभें ठाकें ॥१॥

साजिरें गोजिरें समचरणीं उभें ।
भक्‍ताचिया लोभें विटेवरी ॥२॥

कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले ।
शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥

चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी ।
चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

आता पालखी आपला मार्ग आक्रमू लागली आहे, म्हणून आपणही पालखीत प्रत्यक्ष नसलो तरी,' पायी हळू हळू चालू मुखाने पुंडलिक वरदा बोलू .'

निमित्त पालखी सोहळ्याचे भाग तीन - http://www.maayboli.com/node/54583

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, रविन्द्रजी काय रसाळ लिहिलेत ..... Happy

या संत साहित्यात अशी काही जादू आहे की ते वाचताना त्या चिंतनात आपण अगदी सहज तल्लीन होऊन जातो... अशा अनुभूतिपूर्ण शब्दांचे जे सुरेख संकलन तुम्ही करुन राहिले आहात त्याला तोड नाहीये.... केवळ अप्रतिम ...

__________/\_________

पुरंदरे शशांक - संत साहित्य जितके सोप्या शब्दात आहे तितकेच ते गहन अर्थाने भरलेले आहे असे मला नेहमीच वाटते . काही प्रमाणात ते समजून घेण्याचा एक अल्प प्रयत्न .
आपले शतशः आभार !