मुंबईकरांचे अच्छे दिन केव्हा येणार ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 June, 2015 - 16:35

पाऊस सुरू होऊन आठवडा झाला पण त्यात त्याने कोसळायचा मुहुर्त शनिवार रविवार विकांतालाच साधल्याने त्याच्याशी आमनेसामने असे दोन हात झालेच नाहीत,
पण आज पाऊसाने दिवसभर तुरळक संततधार काय लावली संध्याकाळी घरी पोहोचायचे वांधे झाले. नाही हो, छत्री बरोबर होती पण पटरीवरची ट्रेन रखडली होती. कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका. पण सुरूवातीचा ८० टक्के प्रवासाला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ शिल्लक २० टक्के कापायला लागला.

आता ज्यांना हे सवयीचे झालेय ते इथेच धागा सोडून पसार होतील. पण अरे थांबा. आता चालायचंच, म्हणत कधीपर्यंत हे चालवून घेणार. मध्यंतरी सरकारने लोकल ट्रेनच्या भाड्यात वाढ केली होती. थेट दुप्पट केले होते. तेव्हा सारे कसे पोटावर पाय पडल्यासारखे कळवळून उठले होते. मग तसे रोज गळा आवळला जाताना का नाही चवताळून उठत. रोज श्वास घुसमटला जाताना का नाही एखाद्या दिवशी धुमसून बाहेर पडत. स्साला काय लाईफ आहे आपली! वेळेला काही किंमत आहे की नाही आपल्या!.. आहे ना, ओवरटाईमचे तासाला तीनशे रुपये मिळतात! आज पाऊण तास एक्स्ट्राची ट्रेनमध्ये झक मारली. तीच जर ऑफिसच्या एसीमध्ये मारली असती तर सव्वादोनशे रुपये सुटले असते. थोडक्यात सव्वादोनशे रुपयांचे नुकसान झाले.. अन भरपाई शून्य!

तरी बरेय आपला फर्स्टक्लास आहे. उलट्या दिशेच्या ट्रेनला गर्दी कमी आहे. बसल्याजागी थोडे पाय ऐसपैस पसरता येताहेत. पण समोरच्या ट्रॅकवर रखडलेली ट्रेन. तिचा सेकंडक्लासचा डब्बा. आणि दारावर लटकलेले स्त्री-पुरुष!.. हो, पुरुष आणि स्त्री सुद्धा! काय बोलणार त्यांना. या ताई, तुम्ही बसा. मी उठतो. पण आमची ट्रेन तर उलट दिशेला चाललीय. मग तुम्ही तुमच्या घरी कश्या पोहचाल. आपले काय, घरी तासभर लेट पोहोचलो तरी फिकीर नॉट. आयुष्यातील फुकट जाणारा पाऊण तास, बसल्याजागी मोबाईलवर सत्कारणी लाऊ. स्टेशनला ऊतरून वडापाव खात घरी जाऊ. पण आपली चिल्लीपिल्ली वाट बघत असतील. आज आपला कूकर उशीरा लागला तर त्यांनाही जेवण लेट मिळेल. ऑफिसचा लेटमार्क जास्तीचे थांबून भरून काढाल, हा कसा भराल.

काही हरकत नाही. थोडे ऊशीरा पोहोचाल. पण जरा जपून जा. आपला जीव जास्त मोलाचा. थोडी रग लागली हाताला म्हणून दांडा सोडू नका.

बुलेट ट्रेन येतेय आता मुंबईत.. मुंबई ते गुजरात. १८ हजार कोटी! काल पेपरात वाचले. एवढा खर्चा करताहेत, तर कोणाचे तरी भले होणारच असेल. कोणाचे तरी अच्छे दिन येणारच असतील. पण त्यातून मिळणारा थोडा महसूल ईथेही वापरा. ज्या मुंबईतून ही बुलेट ट्रेन सुरू करत आहात त्या लोकल मुंबईकरांचा प्रवासही थोडा सुसह्य करा. अडकलेल्या ट्रेनमध्ये तळमळणार्‍या आत्म्याची ही ईच्छाच समजा. सुखकर नाही, बस्स सुसह्य.

या वरच्या पॅराग्राफमध्ये राजकारण शोधायला जाऊ नका. लेखातही शुद्धलेखनाच्या चुका शोधायला जाऊ नका. त्या होतच राहतात. मोबाईलवर लिहीत असल्याने जरा जास्तच असतील. तरीही छोटी छोटी वाक्ये. सोपे सोपे शब्द. छोट्या छोट्याश्याच तुकड्यातील, साधे सोपे आयुष्य. पाऊण तास असा वसूल केला.. चार ओळी खरडून.. मन मोकळे करून.. मूड चांगला लागला असता तर पावसावरच्या चारोळ्याच खरडल्या असत्या.. पण काही हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाईम.. उद्या पुन्हा अडकली ट्रेन तर पुन्हा भेटूया.. तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. ऋन्मेष.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी.., पाऊस पडंत असतांना उघड्यावर जाऊन बसायचंच कशाला टंकफलक बडवण्यासाठी? Wink
आ.न.,
-गा.पै.

हे मुम्बैकर सदान्कदा रडेच......
एरवी ऑफिसला जातात तरी रडतात...
अन आता येवढा चांगला पाऊस पडतोय, रेल्वे बंद आहेत, घरी बसायला मिळालय बायकोपोरांच्यात, तर मस्त भजी, गरम चहा वगैरे घेऊन एन्जॉय कराव.... तर ते नाही, ऑफिसला जायला मिळाल नाही म्हणुन रडणार....
सदा-रडे कुठले... Proud

बिटवीन बातम्यामध्ये प्रवास टाळा अस वारंवार सांगितल जातेय . दुपारी दोन वाजता 4.47 मीटर्सची भरती आहे अस हवामान खात्याकडून सांगितले गेलय

महापालिकेची आणि कंत्राटदारांची मिलीभगत संपत नाही तोवर हे असेच चालू राहाणार. नालेसफाई होत नाही हे उघडे गुपित आहे. मुंबईत मृगाचा पहिला पाऊस पडतो तोच जोरदार असतो आणि वाहत्या पाण्याच्या वेगाबरोबर ठीकठिकाणचा साचलेला कचरा वाहात जाऊन कोठेतरी अडकतो. मग हा सगळीकडून आयता एकत्र झालेला कचरा मोठ्या गाजावाजाने समारंभपूर्वक उचलण्यात येतो. पाण्याच्या वेगामुळे छोटी गटारे आधीच स्वच्छ झालेली असतात. जोपर्यंत मुंबईला स्वच्छ प्रशासन मिळत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही.
पर्जन्यवाहिन्यांत कचरा टाकून त्यांची गटारे करण्याच्या मुंबईकरांच्या सवयीही याला कारणीभूत आहेत. स्टॉर्म-वॉटर ड्रेन्स हे फक्त पुराच्या पाण्यासाठी असतात, सांडपाण्यासाठी नव्हेत हे शासनाच्या आणि जनतेच्या गावीही नसते.
जाता जाता.- आणीबाणीमध्ये मुंबईत पाणी तुंबले नाही. रेलगाड्या एका मिनिटानेही उशीरा धावल्या नाहीत. भालचंद्र देशमुख हे त्या काळात मुंबईचे आयुक्त होते.

तुंबलेल्या मुंबईला फक्त मुम्बैकरच जबाबदार आहेत.
वर्षभर प्लास्टीक , कचरा गटारामध्ये टाकायचा आणि महापालिकेकडून तो स्वच्छ करण्याची अपेक्षा बाळगायची. झोपडपट्ट्यामधून कचर्‍यची विल्हेवाट कशी लागते ? तर गटारामध्ये टाकून.

महापालिकेने स्वछ केलेल्या गटारी दुसर्‍या दिवशी कचर्‍याने भरल्या होत्या.

मुंबई मधे पाणी जायला सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाहिये

महापालिकेने स्वछ केलेल्या गटारी दुसर्‍या दिवशी कचर्‍याने भरल्या होत्या. >>> आणि मग तिसर्‍या दिवशी गटारी साफ नाही केली तर चौथ्या दिवशी ते कचरा कुठे टाकतात?

या गटारीत कचरा टाकणार्‍या लोंढ्याला जबाबदार कोण आहे?

हे वॉटरलॉगड वॉटरलॉगड असे बरेच काही ऐकतोय ते काय असते? आधी नव्हते का ते? अनधिकृत बांधकामासाठी समुद्र खाड्या वा जमिनीखालचे अंतर्गत प्रवाह मिटवणे यामुळे हे होते का? ... अज्ञान आणि उत्सुकतेतून आलेले प्रश्न आहेत.

It is 2.30 am .thane station and the entire train track lights just went out.few signals just came up back. Still raining quite hard. Not much traffic on EEH.

या गटारीत कचरा टाकणार्‍या लोंढ्याला जबाबदार कोण आहे?
>>

लोंढ्यांना आवर घाला असे कानी कपाळी ओरडून सांगणार्यांना कूपमंडूक, कोत्या मनोवृत्तीचे आणि देश तोडायला निघाले असे हिणवणारे.

हे वॉटरलॉगड वॉटरलॉगड असे बरेच काही ऐकतोय ते काय असते? आधी नव्हते का ते? अनधिकृत बांधकामासाठी समुद्र खाड्या वा जमिनीखालचे अंतर्गत प्रवाह मिटवणे यामुळे हे होते का?
>>
येस. पावसाचे पाणी वाहून जायचे नैसर्गिकरित्या तयार झालेले मार्ग, म्हणजे झरे, नाले वगरे आपण बुजवले Happy नदीच्या पूररेषेत अतिक्रमण केले.
मग पाणी जाणार कुठे? ते अडकलं की झाल तयार वॉटरलॉग्गिंग!

इंग्रजांनी १०० वर्षाआधी बांधलेले कृत्रिम मार्ग कधीच कालबाह्य झालेत, आता त्याला विस्तारित करायला हवे. पण ते पैसे खायचं कुरण झालंय!
सो हे चालणारच.

पूर्वीच्या मोठ्या ओढ्यांच्या पात्रांमधूनच रस्ते बांधले गेले. पश्चिम रेल् वे वरचे बहुतेक सर्व सब वे हे ओढ्यांवर बांधलेले पूल होते. खालून ओढ्यांच्या पात्रातून पाणी वाहात असे. पुढे डोंगर कापले गेले किंवा त्यावर वस्ती झाली तेव्हा वरून खाली ओढ्यांना येऊन मिळणारे पाणी बंद झाले आणि कोरड्या पडलेल्या पात्राचा आयताच रेल वे खालचा रस्ता म्हणून वापर होऊ लागला. हा वापर इतका वाढला की पुढे हे ओढे पुलाच्या एका बाजूला वळवून, बंदिस्त करून पात्रातली मोठी जागा रस्त्यांना अधिकृतपणे देण्यात आली. गोळीबार, मिलन, आंबोली, मालाड,पोंयसरचा एक पूल ही याची ठळक उदाहरणे आहेत.
हे बंदिस्त आणि अरुंद केलेले ओढे जरी स्वच्छ राखले तरी खूप काम होईल. त्यासाठी दर पंधरवड्याला नालेसफाई केली गेली पाहिजे. जूनच्या पहिल्या आठवड्यात किंग्ज़-सर्कलचा नाला प्लॅस्टिक आणि इतर कचर्‍याने तुडुंब भरलेला होता. अर्थात शीव माटुंगा येथे पाणी साठले तर नवल नाही. पण नालेसफाई ही फक्त पावसाळ्याच्या तोंडावरच करायची असते असा समज बनून गेला आहे. लोकांमध्येही अवेअरनेस नाही. घरामध्ये रिपेअरिंग किंवा सुतारकाम, गवंडीकाम केले तर त्याचे डबर सरळ खाली सोसायटीच्या आवारात किंवा रस्त्यावर आणून टाकतात. कालांतराने ते रस्त्याशेजारच्या पर्जन्यवाहिनीत (स्टॉर्म-वॉटर ड्रेन) आणि नंतर मुख्य ड्रेनेजमध्ये येते. वास्तविक ही जबाबदारी घरात दुरुस्तीकाम करणार्‍या काँट्रअ‍ॅक्टर आणि मालकाची असते. पण जाणून बुजून दुर्लक्ष होते. महापालिकेतही मोठ्या प्रमाणात हेच होते. भ्रष्ट शासनयंत्रणेचा काहीच धाक उरलेला नाही.

Pages