उकडगरे (कच्च्या फणसाची भाजी)

Submitted by प्रज्ञा९ on 1 June, 2015 - 07:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कच्च्या फणसाचे आठळांसकट गरे १५ ते २०
तिखट
मीठ
गूळ
हळद

फोडणीसाठी:
तेल
मोहरी
हिंग
हळद
मध्यम चिरलेला कांदा आणि लाल मिरच्या - ऐच्छिक

क्रमवार पाककृती: 

फणसाचे पदार्थ हे शास्त्रीय संगीताच्या मैफिलीसारखे असतात. म्हणजे हाताशी निवांत वेळ असताना आस्वाद घ्यायचे. (शिवाय फणसाची 'टेस्ट' डेवलप झाली नसेल तर आवडणं कठीण!) कारण फणस निवडून गरे काढणं हे तसं वेळकाढू किचकट काम. एकेक गरा निवडायचा म्हणजे वेळ लागणारच!
माझ्या आजोळी फणस निवडणं हा सोहळा असायचा. दारचाच फणस हेरून ठेवायचा. कच्चा असेल तर भाजीसाठी(कापा किंवा बरका, कोणताही), पिकलेला बरका असेल तर रस काढून घारगे, सांजण वगैरे करण्यासाठी. तर असा हेरलेला फणस वेळ झाली की झाडावरून काढायचा. मामा किंवा बाबा हे काम करणार. मग आई, मावशी, मामी सगळी तयारी घेऊन येणार. तयारी म्हणाजे भरपूरशी रद्दी अंगणात अंथरायची. विळ्या, कोयती आणि भाजीचा फणस असेल तर आठळ्या ठेचायला चांगलासा दगड, बत्ता किंवा वरवंटा, खोबरेल तेलाची बुधली. मग रद्दी अंथरली की सगळ्या आयुधांना आणि हाताला खोबरेल चोपडायचं भरपूर. फणस आडवा धरून मधोमध कोयतीने घाव घालून २ भाग करायचे. मग त्या भागांचे चकत्या (!) करून अजून लहानलहान भाग करायचे, म्हणजे फणस निवडायला सोपा जातो. एकेक भाग निवडयला घ्यायचा. त्यातून एकेक गरा वेगळा करायचा. त्याला लागून भरपूर चीक येणार. मग, सहाणेवर गंध उगाळताना जसा हात गोलगोल वळवतो तसा तो गरा हातात धरलेला हात अधांतरीच गोलगोल वळावून चीक सुटा होऊ द्यायचा आणि मग गरा वेगळा काढायचा. गरा सोलून आठळ वेगळी काढायची. हे काम मामाचं आणि बाबांचं. मग असे गरे चिरायला महिलामंडळ तेलमाखल्या हातांनी आणि विळ्यांनी तयार असेच. आमच्यापैकी कुणी लुडबुड करत असेल तर आठळ ठेचायचं काम आमच्याकडे. आम्हीपण हाताला तेल लावून बसकण मारायचो आठळ्या ठेचायला. आठळ मात्र नीट सोलून घ्यावी लागते. प्लास्टिकसदृश साल म्हणजे कोशिटा पूर्ण निघाला पाहिजे. आतून असलेलं बदामी रंगाचं साल तसंच राहिलं तरी चालतं. अशी सोललेली आठळ ठेचायची. फणस किती मोठा आहे त्यानुसार २ मोठ्या भांड्यांधे पाणी घेऊन एकात सोलून चिरलेला गरा आणि एकात ठेचलेली आठळ असं टाकत जायचं. गरा निवडणं, चिरणं आणि आठळ ठेचणं हे पॅरलली चालायचं. असं करून सगळा फणस चिरून झाला की महिला मंडळ स्वयंपाकघरात जाई नि उरलेली जनता मागची आवराआवरी करे. ३-४ माणसं असली तर हातभर लांब, गुटगुटीत फणसरावांना इहलोकातून मुक्त व्हायला २ तास लागत. Proud आवरून झालं की आम्ही मुलं पेरूच्या झाडावर मुक्काम करत असू. मग मोठी १० फुटी गरकी (म्हणजे पुढे आकडा असलेली फळं-फुलं काढायची गरकाठी) घेऊन बाबा तयार पेरू काढून देत कधीकधी. आमचा पेरू झाड कार्यक्रम आटोपेपर्यंत स्वयंपाक तयार होई आणि मग अंगतपंगत बसे.
या फणस निवडणे सोहळ्याचा २०-२५ वर्षं जुना फोटो कुठल्यातरी अल्बममधे आहे, पण माझ्याकडे नाहिये. नाहीतर दिला असता इथे.
तर ते असो. आता क्रमवार कृतीकडे वळू.
--ठेचलेल्या आठळा पाणी घालून कढईत शिजत ठेवायच्या. वर झाकण ठेवायचं.
या सोलून ठेचलेल्या आठळा.
IMG_7758.JPG

कढईत शिजतायत.

IMG_7760.JPG

--बोटचेप्या शिजल्या की, पाणी पूर्ण आटू न देता त्यात गरे घालायचे. त्यासाठी हवं तर थोडं पाणी घालायचं पुन्हा कढईत.

IMG_7761.JPG

--गरे आठळांपेक्षा लवकर शिजतात, आणि आठळा आधीच गिर्र मऊ नाही करायच्या, कारण त्या गर्‍यांबरोबर पुन्हा शिजणार असतात.
--अशा प्रकारे गरे आणि आठळा व्यवस्थित मऊ शिजल्यावर त्यात चवीला तिखट, मीठ, हळद आणि गूळ घालायचा. ही भाजी काचर्‍या गटात मोडते त्यामुळे अधिक पाण्याचा थेंबही नको रहायला. आणि भाजी तर मऊ शिजली पाहिजे. यासाठी लागेल तसा पाण्याचा हबका मारायचा गरे शिजताना.

IMG_7762.JPG

--तर, आता या शिजलेल्या भाजीवर मोहरी, थोडी हळद, हिंग आणि हवं तर कांदा आणि लाल मिरच्या अशी चरचरीत खमंग फोडणी घालायची. या फोटोत कांदा-मिरची असलेली फोडणी नाहिये, साधीच आहे.

IMG_7766.JPG

वर सढळ हाताने ओलं खोबरं-कोथिंबीर घालायची. आणि भाजी नीट हलवून घ्यायची.

IMG_7767.JPG

ही भाजी तांदळाच्या भाकर्‍या किंवा पोळी याबरोबर तर मस्तच लागते, पण अस्सल हौशी लोक कांदेपोह्यांसारखी डिशमधे घालून खातात. म्हणजे मीही खाते! Happy

या जेवायला! आमरस-पोळीआहेच, फणसाचे घारगे आणि पातळ भाजी शेजारच्या काकूंनी दिली.

IMG_7768.JPG

वाढणी/प्रमाण: 
फोटोत दिलेली तयार भाजी तिघांना पुरली.
अधिक टिपा: 

नुसती शिजलेली भाजी डब्यात काढून डीप फ़्रीजमधे ठेवून ४-५ दिवसांनी पुन्हा वापरता येते. घेताना अर्थातच फोडणी वरून घ्यायची घालून.
फणस सोलायचा वेळ पाकृत धरलेला नाही. लागणारा वेळ हा नुसता शिजायचा आहे. आणि तो अंदाजे आहे, कारण आठळा आणि गरे किती कठीण आहेत शिजायला त्यावर बदल होईल.
नुसती भाजी खरंच सुंदर लागते. Happy

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक कोकणी प्रकार. फोटोतल्या भाजीची शेफ आई. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी इथे फणसाची पोळी खाल्ली आहे पण मला ती फार आवडली नाही जितके मी त्याबद्दल ऐकले होते.

इथे फणस बारोमास उपलब्ध असते. शिवाय बाजारात रसाळ गरे कधीही असतातच. इतके विपुल प्रमाणात असतात की तो वास नसानसात भिनतो, अंगाला, कपड्याला आणि आठवणीला चिकटतो.

प्रज्ञा मस्त लिखाण आणि रेस्पी तर भारीच!! तू म्हणतेस तशी ही भाजी माझे वडील नुसती प्लेटमधे घेऊन खायचे.
या भाजीची एक सोप्पी कृती ...माझ्या कोकणातल्या वहिनीच्या रेस्पीने::
फणस नीट कापून त्यातलं भाजीचं मटेरियल डायरेक्ट कुकरात अगदी कमी शिजवून घ्यायचं.
मग तेलात सांडगी मिरच्या(भरलेल्या) नीट तळून घ्यायच्या. त्या बाजूला ठेवायच्या आणि थंड झाल्या की हातानी छान कुस्करायच्या.
मग त्याच तेलात मोहोरी, जिरं, हळद, भरपूर हिंग, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढिलिंब घालून मस्त फोडणी करायची. त्यात अर्धवट शिजलेली फणसाची भाजी घालायची. त्यावर तळून कुस्करलेल्या सांडगी मिरच्या घालायच्या. मिरच्यात मीठ असतेच त्या अंदाजाने मीठ घालायचं. भरपूर ओलं खोबरं घालून एक दणदणीत वाफ काढायची. वरून भरपूर कोथिंबीर. भाजी तय्यार!

आमच्याघरी फणसाला शाकाहारी मटण समजतात. त्यामुळे, मी बालपणी फणसाच्या भाजीचा धसका घेतला होता. मग एकदा खाल्ले आणि नंतर हव्यास वाढला.

वाह....नुसत वाचुन ...तोंडाला पाणी सुटल...आणि लहानपणीची आठवण झाली...मालवणची...तेव्हा लहानपणी हे फणस काढुन त्याची भाजी करुन खाण ही आमच्याकडे खरच पर्वणी असायची....

महान लिहिलंयस आणि भाजी मस्त दिसतेय.

हे फणसाचं बाळंतपण पूर्वी माहेरी अनेकदा केलेलं पाहिलंय. ट्रेनी सर्जन म्हणून भागही घेतलाय. आता डायरेक्ट कापलेला फणस पाव किलोच घेऊन येते. तोही आठळ्या तयार नसलेला. मला त्या आठळ्या फारशा आवडत नाहीत. बाकी फणसाची भाजी लै आवडते.

मी पण फणसाच्या भाजीची फॅन. आठळ्याही चुलीत भाजून खायला खूप आवडतात. मिठाच्या पाण्यात उकडलेल्या आठळ्यांपेक्षाही भाजलेल्या सोलून खात बसणे मस्त टाईमपास आहे. कोकणात कुणी जाऊन येणारं असलं की "मला आठळ्या आणा" असं टुमणं लावतेच.

प्रज्ञा९, शेवटचे दोन फोटो मस्तच आहेत. तों.पा.सु.
आमच्याकडेपण प्लेटभरून नुसती भाजी खातात. Happy

आमच्याकडे बेडगी मिरची भिजवून ओल खोबर आणि बे. मिरची वाटून भाजी करतात ती मला खूप आवडते. वरची पिवळी भाजीसुद्धा बनवतात पण त्यात तिखट आणि गूळ नाही घालत हि.मि. + भरपूर ओल खोबर घालतात.

चुलीत भाजलेल्या आठळ्या, काजू पावसाळ्यात खायला खूप मजा येते. अश्विनी, मी आठळ्या आणि काजूच्या बिया साठवून ठेवल्या आहेत चुलीत भाजण्यासाठी. कधी भेटते आहे ? मागच्या आठवड्यात मी झाडावर चढून ४ फणस पाडले. Happy

प्रज्ञा९,
फणस साफ करणं हा सोहळाच असतो प्रत्येक कोकण्याच्या घरात.
हि माझी आवडती भाजी.
तसेही फणसाचे सगळे प्रकार मला प्रियच आहेत. आम्ही लाल सांडगी मिरची आणि भरपूर खोवलेलं खोबरं टाकून एकदम कोरडी परततो.

दुसरा प्रकार बटाट्याच्या भाजी प्रमाणे. ओले खोबरं, हिरवी मिरची आणि जीरं वाटून घालायचं. कांदा नाही. आठळाची भाजी मसालेदार प्रकार सुद्धा असतो.
--------

बी, तुम्हाला हवी असल्यास सांदणं रेसीपी लिहिते. सोपी आहे. कालच केलेली.
फणसाचे रसाचे उंबर छान बनतात. मी गेल्याच आठवड्यात लिहिली.

मानुषीताई, गावच्या आमच्या शेजारच्या चुलतसासुबाईपण सांडगी मिरच्यांची फोडणी करतात वरून. कसली मस्त लागते पण रेसिपी कशी ते मी विचारलेच नाही. आता विचारेन.

पण फणसाची भाजी पण अनेक प्रकारे करतात आणि प्रत्येक घराची स्वताची अशी एक रेसिपी असते. मस्त ना .

प्र९, का जळवतेयस?? सही तोंपासु दिसतंय हे प्रकरण
मला कुयरीची भाजी आवडत नाही, मराठी पद्धतीने एकदाच खाल्लीये. बंगाली पद्धतीची तर अगदीच आवडत नाही. पण ही वरची भाजी आवडेल असं वाटतंय

एकदा शाकाहारी खाद्यपर्यटन करायला कोकणात जायची खरंच इच्छा आहे. जाण्याचा बेत ठरलाच तर तुझ्याशी संपर्क साधेनच.

आजोळच्या आठवणी जाग्या झाल्या. गरे तळण्याचा सांग्रसंगीत कार्यक्रम असायचा मे महिन्यात.
फणसाचे सांदण ना (सांजण लिहिलं आहे) भारतातून योजक वाल्यांचं इन्स्टंट सांदण पाकीट आलं आजच. सांदण आणि तळलेल्या गर्‍यांवर ताव मारतोय.

फणसाचे गरे खरच भारी लागतात पण एकदा कूणितरी फणसाचे चिप्स म्हनून काहितरी प्र्चन्ड कडक गळ्यात मारले होते घरी.. इतक चिवट आणी कडक प्रकरण की ज्याच नाव ते!

Pages