उकडगरे (कच्च्या फणसाची भाजी)

Submitted by प्रज्ञा९ on 1 June, 2015 - 07:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कच्च्या फणसाचे आठळांसकट गरे १५ ते २०
तिखट
मीठ
गूळ
हळद

फोडणीसाठी:
तेल
मोहरी
हिंग
हळद
मध्यम चिरलेला कांदा आणि लाल मिरच्या - ऐच्छिक

क्रमवार पाककृती: 

फणसाचे पदार्थ हे शास्त्रीय संगीताच्या मैफिलीसारखे असतात. म्हणजे हाताशी निवांत वेळ असताना आस्वाद घ्यायचे. (शिवाय फणसाची 'टेस्ट' डेवलप झाली नसेल तर आवडणं कठीण!) कारण फणस निवडून गरे काढणं हे तसं वेळकाढू किचकट काम. एकेक गरा निवडायचा म्हणजे वेळ लागणारच!
माझ्या आजोळी फणस निवडणं हा सोहळा असायचा. दारचाच फणस हेरून ठेवायचा. कच्चा असेल तर भाजीसाठी(कापा किंवा बरका, कोणताही), पिकलेला बरका असेल तर रस काढून घारगे, सांजण वगैरे करण्यासाठी. तर असा हेरलेला फणस वेळ झाली की झाडावरून काढायचा. मामा किंवा बाबा हे काम करणार. मग आई, मावशी, मामी सगळी तयारी घेऊन येणार. तयारी म्हणाजे भरपूरशी रद्दी अंगणात अंथरायची. विळ्या, कोयती आणि भाजीचा फणस असेल तर आठळ्या ठेचायला चांगलासा दगड, बत्ता किंवा वरवंटा, खोबरेल तेलाची बुधली. मग रद्दी अंथरली की सगळ्या आयुधांना आणि हाताला खोबरेल चोपडायचं भरपूर. फणस आडवा धरून मधोमध कोयतीने घाव घालून २ भाग करायचे. मग त्या भागांचे चकत्या (!) करून अजून लहानलहान भाग करायचे, म्हणजे फणस निवडायला सोपा जातो. एकेक भाग निवडयला घ्यायचा. त्यातून एकेक गरा वेगळा करायचा. त्याला लागून भरपूर चीक येणार. मग, सहाणेवर गंध उगाळताना जसा हात गोलगोल वळवतो तसा तो गरा हातात धरलेला हात अधांतरीच गोलगोल वळावून चीक सुटा होऊ द्यायचा आणि मग गरा वेगळा काढायचा. गरा सोलून आठळ वेगळी काढायची. हे काम मामाचं आणि बाबांचं. मग असे गरे चिरायला महिलामंडळ तेलमाखल्या हातांनी आणि विळ्यांनी तयार असेच. आमच्यापैकी कुणी लुडबुड करत असेल तर आठळ ठेचायचं काम आमच्याकडे. आम्हीपण हाताला तेल लावून बसकण मारायचो आठळ्या ठेचायला. आठळ मात्र नीट सोलून घ्यावी लागते. प्लास्टिकसदृश साल म्हणजे कोशिटा पूर्ण निघाला पाहिजे. आतून असलेलं बदामी रंगाचं साल तसंच राहिलं तरी चालतं. अशी सोललेली आठळ ठेचायची. फणस किती मोठा आहे त्यानुसार २ मोठ्या भांड्यांधे पाणी घेऊन एकात सोलून चिरलेला गरा आणि एकात ठेचलेली आठळ असं टाकत जायचं. गरा निवडणं, चिरणं आणि आठळ ठेचणं हे पॅरलली चालायचं. असं करून सगळा फणस चिरून झाला की महिला मंडळ स्वयंपाकघरात जाई नि उरलेली जनता मागची आवराआवरी करे. ३-४ माणसं असली तर हातभर लांब, गुटगुटीत फणसरावांना इहलोकातून मुक्त व्हायला २ तास लागत. Proud आवरून झालं की आम्ही मुलं पेरूच्या झाडावर मुक्काम करत असू. मग मोठी १० फुटी गरकी (म्हणजे पुढे आकडा असलेली फळं-फुलं काढायची गरकाठी) घेऊन बाबा तयार पेरू काढून देत कधीकधी. आमचा पेरू झाड कार्यक्रम आटोपेपर्यंत स्वयंपाक तयार होई आणि मग अंगतपंगत बसे.
या फणस निवडणे सोहळ्याचा २०-२५ वर्षं जुना फोटो कुठल्यातरी अल्बममधे आहे, पण माझ्याकडे नाहिये. नाहीतर दिला असता इथे.
तर ते असो. आता क्रमवार कृतीकडे वळू.
--ठेचलेल्या आठळा पाणी घालून कढईत शिजत ठेवायच्या. वर झाकण ठेवायचं.
या सोलून ठेचलेल्या आठळा.
IMG_7758.JPG

कढईत शिजतायत.

IMG_7760.JPG

--बोटचेप्या शिजल्या की, पाणी पूर्ण आटू न देता त्यात गरे घालायचे. त्यासाठी हवं तर थोडं पाणी घालायचं पुन्हा कढईत.

IMG_7761.JPG

--गरे आठळांपेक्षा लवकर शिजतात, आणि आठळा आधीच गिर्र मऊ नाही करायच्या, कारण त्या गर्‍यांबरोबर पुन्हा शिजणार असतात.
--अशा प्रकारे गरे आणि आठळा व्यवस्थित मऊ शिजल्यावर त्यात चवीला तिखट, मीठ, हळद आणि गूळ घालायचा. ही भाजी काचर्‍या गटात मोडते त्यामुळे अधिक पाण्याचा थेंबही नको रहायला. आणि भाजी तर मऊ शिजली पाहिजे. यासाठी लागेल तसा पाण्याचा हबका मारायचा गरे शिजताना.

IMG_7762.JPG

--तर, आता या शिजलेल्या भाजीवर मोहरी, थोडी हळद, हिंग आणि हवं तर कांदा आणि लाल मिरच्या अशी चरचरीत खमंग फोडणी घालायची. या फोटोत कांदा-मिरची असलेली फोडणी नाहिये, साधीच आहे.

IMG_7766.JPG

वर सढळ हाताने ओलं खोबरं-कोथिंबीर घालायची. आणि भाजी नीट हलवून घ्यायची.

IMG_7767.JPG

ही भाजी तांदळाच्या भाकर्‍या किंवा पोळी याबरोबर तर मस्तच लागते, पण अस्सल हौशी लोक कांदेपोह्यांसारखी डिशमधे घालून खातात. म्हणजे मीही खाते! Happy

या जेवायला! आमरस-पोळीआहेच, फणसाचे घारगे आणि पातळ भाजी शेजारच्या काकूंनी दिली.

IMG_7768.JPG

वाढणी/प्रमाण: 
फोटोत दिलेली तयार भाजी तिघांना पुरली.
अधिक टिपा: 

नुसती शिजलेली भाजी डब्यात काढून डीप फ़्रीजमधे ठेवून ४-५ दिवसांनी पुन्हा वापरता येते. घेताना अर्थातच फोडणी वरून घ्यायची घालून.
फणस सोलायचा वेळ पाकृत धरलेला नाही. लागणारा वेळ हा नुसता शिजायचा आहे. आणि तो अंदाजे आहे, कारण आठळा आणि गरे किती कठीण आहेत शिजायला त्यावर बदल होईल.
नुसती भाजी खरंच सुंदर लागते. Happy

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक कोकणी प्रकार. फोटोतल्या भाजीची शेफ आई. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटून दुसरा फोटो जहबहरीही!!!!!! तोंडाला पाणी सुटले.
पण फणसाबरोबर कांदा बिग नो नो...

पण अस्सल हौशी लोक कांदेपोह्यांसारखी डिशमधे घालून खातात. म्हणजे मीही खाते! स्मित>>> +१००.

मला ही भाजी अतिशय आवडते. आमच्या गावी फणस होत नाही त्यामुळॅ गावी गेले की दुसरीकडे जाऊन फणस शोधायचे काम करावे लागते मला.

पण आमच्यात ही भाजी ताटात वाढलेली दिसतेय तितकुशी खात नै कै, ताट भरुन फक्त भाजीच असते. बाकी सोबत काही असण्याची गरज पडत नाही Happy Happy

आमच्यात पण कांदा अजिबात घालत नाही. सोललेले गरे उभे कापलेले असतात, मिरचीही उभी कापुन भाजी केली जाते, वरुन थोडे खोबरे. भाजी साधारण उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसारखी दिसते. पण खायला यम्म्म्म्मी....

असल्या रेस्प्या टाकून चिडचिडाट करायला लावू नये.. टाकल्यास बरोबर लाळेर्‍यांचेही फोटो टाकावा..

यात कांदा ऑप्शनल आहे आणि लसूण अजिबात नाहिये. तळकोकण-राजापूर पट्ट्यात काही ठिकाणीच कांदा घालतात. आई चिपळूणकडची आणि बाबा राजापूरकडचे त्यामुळे कांदा-बिनकांदा दोन्ही व्हर्जन्स आम्ही करतो.

साधना, म्हणून तर म्हटलं नुसती खायची तरी छान लागतेच! Happy
आणि पानात वाढलेली दिसतेय त्याच्या तिप्पट भाजी मी एकटीने खाल्ली असेन. Wink
प्रतिसादांसाठी आभार! Happy

अवांतरः
हल्ली निवडलेल्या गर्‍यांचे वाटे मिळतात बरेच ठिकाणी. प्रस्तुत फणसाचे गरे बाबांना रत्नागिरीतल्या गोखले नाका नामे गजबजलेल्या ठिकाणी मिळाले. एक वाटा म्हणजे १८ गरे होते. साधारण मध्यम-मोठे. अगदी टिचके नव्हते.

ही भाजी असेल तर चक्क आमरस उपेक्षित राहू शकतो.

माझी आवडती भाजी. चवीच्या मानाने खटाटोप कमीच वाटतो ( मला तरी. ) मुंबईत जवळजवळ ६ महिने असा गर्‍याचा फणस मिळतो. त्याचे तूकडेच विकायला असतात. त्यातले गरे काढणे सोपे जाते.

दिसतेय खूप मस्त पण शेवटून तिसरा फोटो पाहून एक आठवण झाली.

मला फणसाची भाजी प्रचंड आवडते. आमच्याकडे दाणे घालून करायचे आणि त्यातला फणस थोडा चिकन-मटणासारखा लागायचा. एकदा माझ्या एका मैत्रिणीकडे गेले असता तिच्या आईने आज फणसाची भाजी आहे, दाणे घालून करतात पण आमच्याकडे कशी मुलींना आवडत नाही असं सांगितलं. मी मला आवडते म्हटल्यावर त्यांनी लगेच वाटीतून खायला दिली. पण त्यांच्याकडची भाजी चक्क दाणे घातलेल्या दुधीच्या भाजीसारखी लागत होती Uhoh थोडीच दिली होती म्हणून मी संपवू शकले नाहीतर कठीण होते सगळी खाणे. मुलींना आवडत नाही त्याचे नंतर आश्चर्य वाटले नाही.

त्यांच्याकडेही बहुतेक गावातूनच फणस यायचे. कदाचित बाजारात मिळणार्‍या / कॅनमध्ये मिळणार्‍या आणि घरुन आलेल्या फणसाच्या जातीत फरक असेल किंवा कोवळेपणात फरक असेल. पण ती भाजी ह्या वरच्या भाजीसारखी दिसत नाही. अशी दिसते.

अगो, ती फणसाच्या पार्‍याची भाजी. तो वेगळा भाजीचा फणस असतो. आमच्याकडे तो साकटा/ पार्‍याचा/ कुयरीचा फणस म्हणून ओळखला जातो.

हायला मस्त रेसीपी अन वर्णन. Happy
आई नेहेमी फणसाची भाजी करतांना कांदा घालते पण फोडणीत. इथे फणस नाहीच मिळत फारसा Sad

मस्तं पाककृती आहे. तयार भाजीचा आणि वाढलेल्या ताटाचा फोटो भारी!

ही भाजी खायला मिळण्याची, करण्याची शक्यता शून्य असल्यामुळे फोटोवरच समाधान मानावं लागेल.

आमच्याकडेही अंगणात एकत्र जमून फणस चिरण्याचा सोहळा असाच असायचा. बाकी दिलेले डिटेल्स माहित नव्हते.
फणस नुसता खायला आवडत नाही. फक्त भाजी आणि चुलीतल्या आठळ्या खायला आवडतात.

अहाहा.. मस्त. फणसप्रेमी असल्याने वर्णन, फोटो फारच आवडलेले आहे. फणसाची भाजी या आठवड्यात करायचा विचार होताच. आता उत्साह दुणावला. आमच्याकडे वसईवाला भाजीच्या फणसाची गरे, आठळ्या काढून देऊन मस्त सोय करतो. कुयरीची भाजीही ओले काजू किंवा हरभरे, शेंगदाणे घालून आवडते.

दादरच्या जिस्पीमधे फणसाची बिर्याणी मिळते तिचीही या निमित्ताने आठवण झाली.

सुरेख वर्णन.

आमच्याघरी अकोल्याला फणसाची भाजी नेहमी मसाल्याच्या वाटणात करतात. अशी सुकी भाजी नाही करत कुणी.

घारगे अप्रतिम दिसत आहेत. त्याचीची कृती लिही प्लीज.

>>दादरच्या जिस्पीमधे फणसाची बिर्याणी मिळते
सही!

ह्यावरून कुठल्यातरी थाई रॅस्टॉरंटमध्ये खाल्लेल्या, फणस घालून केलेल्या नूडल्स आठवल्या. म्हणून गुगल केल्यावर ही एक पाककृती सापडली:

http://www.laweekly.com/restaurants/spork-foods-peanut-ginger-jackfruit-...

बी, फणसाचा रस डीप फ्रिजात आहे, त्याचे घारगे होतात की सांजणंच होतात त्यावर रेस्पी अवलंबून आहे. पण तरी दोन्ही द्यायचा नक्की प्रयत्न करते.

फणसाच्या पार्‍याची भाजीपण डीप फ्रिजात रहाते ४-५ दिवस. आईचा जेव्हा पुणे प्लॅन असतो, बाजारात पारा असतो तेव्हा ती दाणेबिणे घालून भाजी शिजवून डीप फ्रिजात ठेवते. रात्री प्रवासाला जस्ट निघताना डबा पिशवीत जातो. पहाटे माझ्याकडे आल्यावर लगोलग पुन्हा डीप फ्रिजात. मग जेवायच्या आधी थॉ करण्यापुरती भाजी बाहेर काढून मग वर फोडणी.

मस्त! Happy

मी पिकलेल्या (पूर्णपणे नाही पण गरे तयार झालेल्या फणसाची फार खाल्ली नाहीये ..)

पण व्हेज चिकन उर्फ पार्‍याची मात्र अनेक वेळेला खाल्ली आहे आणि अतिशय आवडती आहे .. मलाही अशी नुसती खायला आवडते .. (इतकी की एकदा प्रमाणाबाहेर खाऊन अपचन ओढवून घेतलं होतं .. :खोखो:)

आमच्यात ही कांदा नाही ..

प्र९ तू म्हणतेस फोडणीत कांदा नाही पण शेवटून तिसर्‍या फोटोतल्या कढल्यात काय दिसतंय ते? की तो भाजीवर फोडणी घालून झाल्यानंतरचा फोटो आहे?

(प्र९ तुझी नवरत्न भेंडी ही माझी खुपच आवडती ..)

की तो भाजीवर फोडणी घालून झाल्यानंतरचा फोटो आहे? >>> येस! फोडणी घातल्यावरचा फोटू.

भेंडीसाठी पुन्हा ठांकू! Happy

अवांतर पण महत्त्वाचं:
मंडळी, ज्यांना काही कारणामुळे ही भाजी करणं/ खाणं शक्य नसेल त्यांनी उन्हाळ्यात फिरस्तेगिरी करताना रत्नागिरी प्लान करा. इथे यायच्या काही दिवस आधी मला विपु करा. खरंच घरगुती कोकणी शाकाहारी पदार्थ, जे कोकणातल्या हॉटेल्समधेही मिळत नाही (सांजण, उकडगरे, पार्‍याची भाजी, घारगे, आंबेडाळ, पातोळे, पानग्या, घावन हे आणि असे इतर) ते मिळण्याची सोय कदाचित करू शकेन. माझ्या घरी नव्हे, ओळखीच्या केटरर काकूंना विचारून! Wink
त्यांना विचारावं लागेल म्हणून 'कदाचित' असं म्हटलं.
बाकी कोकणात पर्यटक म्हणून न फिरल्यामुळे असे पदार्थ न मिळणं वगैरे विचारही कधी केला नव्हता. परवा पुपुवर गप्पा मारताना हे खूप तीव्रपणे जाणवलं म्हणून हा अवांतरपोस्टप्रपंच! गै स न!

प्र९, अजून एक .. मी "सांदण" असा शब्द ऐकला होता ह्याआधी .. काकडी ची एक जात असते किंवा मग फणसाचंही करतात ते ..

तुझा "सांजण" ही बरोबर वाटतंय कारण त्यात (तांदळाचा असला तरी रवा घातला जातोच म्हणजे तो सांजाच झाला एक प्रकारचा ..)

आणि आमंत्रणाकरता धन्यवाद .. मला रत्नागिरीतल्या (आणि तरवळ) च्या कायदेशीर आजोळी जाऊन आता खूप वर्षं झाली .. पुढच्या ट्रिप मध्ये जावंच आता .. Happy

मस्त भाजी.
फणस कापण्याचे, गरे आठ्ळ्या सोलण्याचे वर्णन वाचुन थेट गावाला गेल्याचा फील आला.
आमच्याकडे गावाला जवळ जवळ एक आड एक दिवशी ही भाजी असते. नाचणीच्या आंबीली बरोबर ही भाजी मस्त लागते.
पण मला अख्या गर्‍यांपेक्षा गर्‍या गोट्यांची भाजी जास्त आवडते. म्हणजे गरे तयार झालेले असतात पण ते चिरता येतील विळीवर एवढे कोवळे असतात. त्या भाजीला आम्ही गर्‍या गोट्याची भाजी म्हणतो.

आम्ही पण कांदा लसूण कध्धी नाही घालत फणसाच्या भाजीत.

त्या भाजीला आम्ही गर्‍या गोट्याची भाजी म्हणतो.>>>> +१
फणसाची कुयरी असते (कोव़ळा फणस) त्याला राईलसणाची फोडणी, थोडुसा कांदा+१-१ १/२ चमचा खोबरे यांचे कच्चे वाटण ,घालून भाजी झकास होते.

मस्त वर्णन आणि फोटो प्रज्ञा.
फणसाचे कुठलेच पदार्थ खाल्ले नाहीत फारसे. त्यामुळे पाहून अप्रुप वाटले. एन्जॉय करा. Happy

बाकी कोकणात पर्यटक म्हणून न फिरल्यामुळे असे पदार्थ न मिळणं वगैरे विचारही कधी केला नव्हता.<<<< व्हय व्हय!! मला पण नाव पत्ता सांगून ठेव. Happy

आमच्याकडे स्वयंपाकाला येणारी योगितामावशी हे सर्व कोकणी पदार्थ मस्तच करते. मला आवडते म्हणून कुयरीच्या फणसाची, गर्‍यांची भाजी केली होती. मला मेलीला तेव्हा फोटो काढायचं सुचलंच नाही. चुलीत भाजलेल्या आठळ्या भन्नाट लागतात.

Pages