पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ८ कोईकोडे - हजार किमी पार

Submitted by आशुचँप on 26 May, 2015 - 15:57

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी

http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड

http://www.maayboli.com/node/53330 - दिवस ४ अंकोला

http://www.maayboli.com/node/53394 - दिवस ५ मारवंथे

http://www.maayboli.com/node/53751 - दिवस ६ मंगळुरु

http://www.maayboli.com/node/53944 - दिवस ६ पय्यानुर

=======================================================================

कालच्या दमणूकीनंतर आज जरा आराम मिळेल असे वाटले होते पण कुठले काय..आज तर तब्बल १३५ किमी अंतर पार करायचे होते. म्हणजे प्रवासातील पाचव्या क्रमांकाचा मोठा पल्ला..
तसे आम्ही सगळे आता सिजन्ड झालो असे म्हणायला हरकत नव्हती. पार्श्वभाग पण रोजच्या रगडपट्टीला सरावले होते. व्हॅसलीन आणि सोफ्रामायसिनचा प्रभावी मारा काम करत होताच पण आता झोंबणे, दुखणे आदी प्रकार अभावानीच होत होते. त्यामुळे आता फक्त उकाडा आणि सायकल चढउतारावरून नेणे इतकेच आव्हान आमच्यासमोर होते. अर्थात ते काय कमी आव्हानात्मक होते असा काय प्रकार नव्हता.

दरम्यान, शेवडे मामा घरी परतल्यामुळे अध्यक्षपदाची माळ अनुभवी घाटपांडे काकांच्या गळ्यात पडली. पण मामांचा जसा दरारा होता तसा काकांचा नव्हता. ते आम्हाला आमच्यातलेच वाटत आणि वात्रटपणा करण्यात आम्ही अजिबात संकोच करत नसू. त्यामुळे अध्यक्ष झाल्यावरही आम्ही त्यांना जुमानु किंवा त्यांची चेष्टा उडवणार नाही असे व्हायची शक्यता जवळपास नव्हतीच. हे त्यांनाही माहीती होतेच आणि त्यांनी मस्त खिलाडूपणे ही धुरा निभाऊन नेली.

आज आता मोठा पल्ला आणि वाटेत थलासरीचा किल्ला करायचा म्हणून पहाटे लवकर निघावे असा एक प्रस्ताव निघाला पण आता सगळ्यांचा सरासरी वेग वाढला होता आणि रस्ते अनोळखी, भाषा परिचयाची नाही त्यामुळे उगा अंधारात चाचपडण्यापेक्षा नेहमीच्या वेळीच निघू पण वाटेत फार टाईमपास न करता लवकर जाऊ असा तोडगा निघाला.

पण याला अपवाद बाबुभाईंचा. त्याचे दोन्ही गुढगे दुखायला लागल्यामुळे तो सगळ्यांच्या बरोबर स्पीडने येऊ शकेल अशी त्याला शाश्वती वाटेना त्यामुळे त्याने सगळ्यांच्या लवकरच निघण्याचा बेत जाहीर केला. पण तो काहीसा माझ्याच पंथातला असल्यामुळे आमच्याच बरोबर येईल असा विश्वास होता. पण मला सकाळी धक्काच बसला जेव्हा कळले की आम्ही उठे उठे पर्यंत बाबुभाई आवरून निघाला पण होता. आता असेही सुसाट आणि स्लो ग्रुप असे काय विभाजन नसल्यामुळे एकटे युडीकाका सोडले तर बाकी सगळे जवळपास पाच दहा मिनिटांच्या फरकाने मागे पुढे असे चालवत राहत.

तर सकाळी पावणेसातच्या सुमारास केके रेसिडन्सी सोडले आणि वाहत्या ट्रॅफिकमधून मार्ग काढत हायवे ला लागलो. सुदैवाने रस्ता चांगला होता पण तब्येतीत चढ उतार होते. केरळमध्ये सगळे सपाट रस्ते असतील असा जो समज होता तो चांगलाच चुकीचा होता. थेट कोकण इथे उतरले होते. तसेच चढ उताराचे रस्ते, तशीच नारळी-पोफळीच्या बागा, त्यातून डोकावणारी कौलारू आणि काही पक्क्या बांधकामाची घरे, मधून मधून लागणारे नेत्रसुखद असे कालवे, दुतर्फा झाडी वातावरण तर झकास होते.

अशाच वातावरणात आम्ही तासाभरात थालिपरांबा येथे पोहचलो. एकेकाळी ब्राह्मणवस्ती असलेले हे शहर आता मुस्लिमबहुल प्रदेश म्हणून ओळखले जाते आणि त्याचा प्रत्यय जागोजागी दिसून येतच होता. मी तर अशा समजात होतो की केरळात ख्रिश्चन लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे चर्चेसऐवजी मोठ्या प्रमाणावर मशिदीच दिसू लागल्यामुळे मी चक्रावलोच. पण नंतर अशी माहीती कळली की उत्तर केरळ किनारपट्टी ही मुस्लिम बहुल आहे तर दक्षिण ही ख्रिश्चनबहुल. असो.

नाष्ट्याला थांबलो ती टपरी इतकी कळकट होती की तिथे काही खायची इच्छाच होईना. बाकीच्यांनी केरळी पराठे मागवले पण इतक्या सकाळी माझ्या घशाखाली तो तेलकट प्रकार जाईना. सुदैवाने उकडलेली अंडी दिसली. मग गपागपा दोन-तीन अंडी हाणली आणि त्यावर कडकडीत कॉफी. अहा आता पुन्हा एक तासभर काही बघायला नको आणि मग ताजेतवाने होऊन अजून एक तासाभरात कनुर गाठले.

हे कनुर आणि कर्नाटकातले कन्नुर यात माझा जाम गोंधळ होता. आणि विकीपि़डीयावर माहीती काढली तेव्हा कुठे बरीच माहीती कळली. त्यांच्या माहीतीनुसार, एकेकाळी कृष्णदेवाचे गाव म्हणजेच कान्हानूर त्याचेच पुढे कनानूर (Cannanore) आणि आता कनुर.
हातमाग आणि लोककथांसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आता भारतातील प्रमुख संरक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे आणि अशियातील सर्वात मोठे नाविक प्रशिक्षण केंद्र कनुरला आहे अर्थात यातले आम्हाला काहीच बघता येणार नव्हते. त्यामुळे नुसत्या माहीतीवरच समाधान मानत आम्ही पुढे सटकलो.

वाईट म्हणजे कनुरपासून सेंट अँजोलो किल्ला केवळ ३ किमी अंतरावर होता आणि मला त्याचा पत्ताच नव्हता. पुण्याला परत आल्यावर जेव्हा स्ट्रॅव्हावर नकाशा तपासत होतो तेव्हा तिथे किल्ला दिसला. जाम हळहळ वाटली.

पण सुदैवाने थलासरी किंवा तेल्लीचेरी किल्ला अगदी वाटेतच होता. आणि किल्ल्याकडे सायकल वळवलीच. आत्तापावेतो आम्ही ६६ किमी अंतर आलो होतो आणि अजून बरोबर तेवढेच अंतर जाणे बाकी होते. टळटळीत दुपार आणि उन्हाने लाही लाही होत होती. त्यामुळे बाकीच्यांनी तर किल्ला दर्शनातून अंग काढून घेतलेच पण मलाही जाणारच आहेस का तु असे विचारले. पण मी हट्टालाच पेटलो होतो. हाकेच्या अंतरावर किल्ला असताना मी तो बघणार नाही हे शक्यच नव्हते त्यामुळे तुम्ही पुढे व्हा मी किल्ला बघुन येतो. वाटेत भेटलो तर ठीक नाहीतर डायरेक्ट कोझीकोडे (उच्चारी कोईकोडे)ला भेटू असे सांगत निरोप घेतला. बाबुभाई वाटेत कुठे सांडला होता माहीती नाही. शेवटपर्यंत त्याची आमची गाठच पडली नाही. असो.

तर तसाच तडफड करत किल्ल्यापाशी गेलो. तिथे रखवालदार नव्हताच त्यामुळे बाजूच्या एका पाण्याच्या नळाला सायकल लॉक लाऊन बंदिस्त केली आणि मौल्यवान वस्तू कॅमेरा आदी बरोबर घेऊन बाकी नशिबाच्या हवाली करत किल्ल्यात प्रवेश केला.

किल्ल्याचे प्रवेशद्वार

किल्ला आहे मात्र छोटासा. गेल्या गेल्या एक दातेरी चाकांचे यंत्र दिसते. हे काय आहे ते मला शेवटपर्यंत कळले नाही. आंतरजालावरही त्याबद्दल काही माहीती नाही.

किल्ल्याचा अंतर्भाग बघा च्यायला काय मेंन्टेन केलाय.

प्लॅस्टिकचे कप्स, पाण्याच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटे काहीही नाही. पान खाऊन पण कुणी थुंकत नाही राव

किल्ल्याचा इतिहास - ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीच्या काही तुकड्या थलासरी येथे उतरल्या आणि वखार सुरु केली. त्याच्या संरक्षणासाठी म्हणून टेकडीवर तात्पुरती गढी बांधली. हळूहळू त्याच गढीचा विस्तार करत त्यांनी भक्कम किल्ला निर्माण केला. याच किल्ल्याने आर्थर वेलस्लीला मोठा हात दिला आणि हैदर अली विरुद्धच्या लढाईत त्यांनी म्हैसुरच्या सैन्याचा मोठा पराभव करत या प्रदेशावर वर्चस्व निर्माण केले. पुढे तर याच किल्ल्याला राजधानी मानून केलेल्या लष्करी चालींनी टीपू सुलतानलाही हा प्रदेश सोडून देणे भाग पडले.

पुन्हा एकदा या इंग्रज लोकांबद्दल कौतुक वाटले. भले त्यांनी आपल्याला पारतंत्र्यात ठेवले, अन्वनित अत्याचार केले पण जम बसवण्यापूर्वी हजारो किमीचा सागरीप्रवास, इथले भयानक उष्ण हवामान, पाणी याचा सामना करत, इथल्या राजकर्त्यांची मर्जी सांभाळत, कधी चुचकारत कधी दरडावत तर कधी समोरासमोर युद्ध करत जो काही जम बसवला ते करायला दम पाहीजे बॉस. असो.

मला सायकलची आणि त्यावरच्या पॅनिअर्सची चिंता असल्यामुळे मी घाईगडबडीतच फेरी उरकली आणि घामाने नखनिखांत डबडबून बाहेर आलो. सुदैवाने सायकल आहे तशीच होती आणि सामानही. पटापटा नळावरच तोंड धुणे वजा आंघोळ सदृश प्रकार करत सायकलवर टांग मारली.

गडफेरीत माझा नाही म्हणले तरी अर्धा पाऊण तास गेला होता. त्यामुळे आमचे मंडळ साधारण १५-२० किमी अंतर पार करून गेले असणार असा अंदाज केला आणि सपाट्याने पॅडल मारत निघालो.

साधारण एक चौदा पंधरा किमी अंतर गेल्यावर माहे गाव लागले आणि गावात गेल्या गेल्या वाईन्स शॉप्सची गर्दी दिसली. जसा जसा पुढे जाऊ लागलो तसे तसे वाईन शॉप्स लाईनीने दिसायला लागली. इतकी की इथे दारू सोडून बाकीचे काहीच विकत नसावेत असे वाटायला लागले. हा काय प्रकार आहे ते कळेना. इतक्या संख्येने दारूची दुकाने एकवटलेली मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. इथले काय दारू पितात का चेष्टा असा विचार करत पुढे आलो आणि नंतर उलगडा झाला तो असा.

आख्ख्या केरळात दारूबंदी आहे आणि माहे गाव हे युनियन टेरीटरी अॉफ पॉँडीचेरीचा भाग आहे. त्यामुळे आख्या केरळात फक्त माहे मध्ये दारू मिळते. त्यामुळे इथे गर्दी होणे स्वाभाविकच होते.

उन्हाचा तडाखा जाणवत होताच पण आता एकट्याने सायकल चालवताना ते जास्तच जीवावर येत होते. कितीही प्रयत्न केला तरी आपण ग्रुपला गाठू शकणार नाही हे माहीती होतेच पण तरीही जलदीने अंतर काटायचा प्रयत्न करत होतो. आणि पुढे २५ किमीवर वडाकराला सापडले की. मस्त रस्त्याच्या कडेला बसून उसाचा रस प्राशन करणे सुरु होते. अजून इथेच कसे काय विचारणा केली. मला वाटले की ते माझ्यासाठी थांबून राहीले, मग थांबायचे तर किल्ल्यापाशीच थांबायचे ना, असे म्हणणार तोच कळले की उन्हाच्या काहीलीमुळे त्यांचा वेगच मंदावला होता. चला निदान सोबत तर मिळाली असे म्हणत पुढची वाटचाल सुरु केली.

अजून ४० किमी अंतर बाकी होते आणि ते आता डोंगराएवढे वाटायला लागले होते. रस्ता चांगला होता, झाडी छान होती पण चढ उतार आणि कमालीचा उष्मा सगळा जोश आटवून टाकत होता. सुदैवाने वरचेवर थांबून पाणी, नारळपाणी, उसाचा रस असे जे काही द्रवपदार्थ दिसत होते ते ढकलत होतो त्यामुळे त्रास कुणालाच झाला नाही पण या निथळत्या घामाचे काय करायचे ते कळत नव्हते. पण त्यातही मी शंकराच्या जटेत जशी गंगा तशी आपल्या डोक्यात घामगंगा आहे आणि सूर्याने बाण मारून तिला वाहती केलीये अशी कैच्याकै कल्पना करून त्रास सुसह्य केला.

आजचा अजून एक महत्वाचा टप्पा म्हणजे आज आम्ही १००० किमी अंतराचा पल्ला पार करणार होतो.

हीच ती जागा

आणि हाच तो क्षण..

आता आम्ही खऱ्या अर्थाने घरापासून हजारो किमी अंतरावर होतो. या विचाराने एकदम घरच्यांची आठवण गडद झाली. घरचे जेवण, टीव्ही समोर तंगड्या पसरून लोळणे, पिल्ल्याने झोपेत घुसळाघुसळी करून अंगावर हात पाय टाकणे सगळे सगळे एकदम फील झाले. पण अजून होमसीक व्हायच्या आधीच तो विचार झ़टकून टाकला आणि उमेदीने पुढच्या प्रवासाला लागलो.

फोटो वेदांग

संध्याकाळ होता होता कोईकोडे गाठले. आजचेही हॉटेल गावातच होते. इस्ट अॅव्हेन्यू सूट्स म्हणून. त्यामुळे जाताना आम्ही सगळे सिग्नल कसोशीने पाळले आणि लोकांच्या कौतुकभरल्या नजरा झेलल्या.

रात्री मग जेवणादरम्यान, मी सगळ्यांना माझी पहिल्या पावसावरची कविता म्हणून ही
तुझ्या माझ्या मीलनाची ती वेळ
ऐकवली. त्यावरच्या प्रतिक्रिया फारच मजेशीर होत्या. तेवढ्यात वेदांगने तुला माहीती असलेले सगळे अवघड शब्द एकाच कवितेत वापरलेस का असे विचारत पुणेरी शालीतला हाणला...

म्हणलं, उद्या जरा सोपी कविता ऐकवतो आणि मग बोल. त्याला काय माहीती माझी पुढची कविता
सरहद्द
ही असणार होती. Happy Lol

आजच्या दिवसाचा हिशेब म्हणजे अजून एक उत्तम किल्ला खात्यात जमा झाला आणि मागे पडूनसुद्धा ग्रुप गाठू शकलो. आत्मविश्वास कमालीचा वाढल्याचे ज्ञोतक होते, फक्त तो अति होऊन नडू नये याची खबरदारी घ्यावी लागणार होती. रात्री मी आणि बाबुभाई खोबरेल तेल घेऊन पेन्शनर लोकांसारखे गुढगे चोळत बसलेलो आणि वयाच्या दुपट्ट असलेले काका धावाधाव करत होते ते पाहून थोडे लाजल्यासारखे झाले खरे पण नाईलाज होता.

रस्ता बहुतांशी सरळ आहे पण कसला काटेरी आहे आणि हेच काटे नको त्या जागी टोचून राहीले होते...:) पुण्यापासून आम्ही १०५३ किमी अंतरावर होतो आता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशु
फोटो सुंदर, लिखाण खुसखुशीत आणि माहितीपूर्ण!

थाकरे-बारफर्ड ढेकूळफोडे >>> Happy

हुश्श.. खूप उशीरा वाचायला सुरवात केली.. नि एका दमात सगळे भाग वाचून काढ ले... मस्त लिहीतो आहेस.. गुड गोइंग !!! तुझ्याबरोबरच सायकल चालवतोय असे वाटत राहते..

झकास भाग !

(मला येक बावळट्ट प्रश्न कधीचा विचारायचाय, तो विचारु का?
कन्याकुमारीहून परत येताना परत पुण्यापर्यंत सायकली चालवत आणल्या?)

(मला येक बावळट्ट प्रश्न कधीचा विचारायचाय, तो विचारु का?
कन्याकुमारीहून परत येताना परत पुण्यापर्यंत सायकली चालवत आणल्या?)
>>>
Proud अगं रेल्वे/बशीत घालून आणल्या असतील

Pages