पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ९ गुरुवायुर - हत्तींच्या देशा

Submitted by आशुचँप on 29 May, 2015 - 18:28

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी

http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड

http://www.maayboli.com/node/53330 - दिवस ४ अंकोला

http://www.maayboli.com/node/53394 - दिवस ५ मारवंथे

http://www.maayboli.com/node/53751 - दिवस ६ मंगळुरु

http://www.maayboli.com/node/53944 - दिवस ७ पय्यानुर

http://www.maayboli.com/node/54041 - दिवस ८ कोईकोडे

=======================================================================

आजच्या दिवशीही एक सेंच्युरी राईड नशिबात होतीच. पण रोज मरे त्याला कोण रडे याप्रमाणे आता १०० किमी म्हणजे काही वाटेनासे झाले होते. उलट आज फक्त १०० च किमी जायचे आहेत अशी भावना सकाळी निघालो तेव्हा मनात होती.

कोईकोडेतून बाहेर पडून हायवेला लागेपर्यंतच रस्ता इतका झकास गुळगुळीत आणि सरळ होता की सुसाट स्पीडने तो १३ किमी चा पॅच संपवून हायवेला कधी लागलो ते कळलेच नाही. आणि हायवेला गेल्या गेल्या पुन्हा एकदा चढउतारांचे सत्र सुरु झाले. आणि २० एक किमी नंतर तर जो काही तुफान चढ सुरु झाला तो संपायचे नावच घेईना. पुन्हा एकदा घाटवाटांचा फील. बर चढ म्हणजे साधेसुधे नाहीत. डायरेक्ट आभाळातच जायचे आणि तो उतरतोय तोच पुढे वळून त्याच डोंगरावर गेल्यासारखे.

मागचा चढ बघा म्हणजे कळेल मी एवढा बारीक कसा झालो ते.... Happy
फोटो @ वेदांग

त्यामुळे सकाळचे चांगले अॅव्हरेज पडलेले अगदीच ढप्प झाले आणि जेमतेम १५-१६ च्या स्पीडने पुढे जात राहीलो. पण आज असेही वाटेत बघण्यासारखे काही नव्हते आणि अंतरही जेमेतम १०० होते त्यामुळे निवांत झाडाच्या सावलीत थांबत, टाईमपास करत जात होतो. फोटो काढायलाही मुबलक अवसर होता आणि तसे निसर्गसौंदर्यही.

फोटो @ वेदांग

गॉड्स ओन कंट्रीमध्ये आल्याची पुरेपूर साक्ष पटावी असे रस्ते होते. एकदम मस्त गुळगुळीत, बाजूला सुरेख झाडी. त्यामुळे त्रास असा काही होत नव्हता. पांथिरनकावू (Pantheerankavu), रामानट्टूकरा (Ramanattukara), चित्रमंगलम अश्या लंब्याचौड्या नावाची गावे पार करत करत मजेत चाललो होतो. तिरूरच्या पुढे भरतपुझा नदीच्या मुखापाशी एक लांबच्या लांब ब्रिज लागला. चमावतारम अय्यपा देवळाच्या बाजून जाणारा म्हणून ब्रिजचे नावपण चमवातरम ब्रिज.

फोटो @ वेदांग

एकदमच सिनीक लोकेशन. दोन्ही बाजूला विस्तिर्ण पात्र, त्यात हिरव्या पाचूसारखी दिसणारी बेटे, त्यावर स्वच्छंद विहार करणारे बगळे, स्टॉर्क आणि वाराही झकास. झाडीचा हिरवागर्द रंग, पाण्याचा निळसर, आकाशाचा फिकट निळा, त्यावर पांढऱ्या ढगांची स्केचेस, अधुनमधुन वीज लखलखावी तसा पक्ष्यांचा थवा उडत जात होता.

दोन दिशेला तोंड करून काय बघत होतो देव जाणे

फोटो @ ओंकार

कितीतरी वेळ आम्ही भान विसरून ते दृश्य बघत बसलो होतो. इतके दिवस ओझे बाळगून एसएलआर आणल्याचे आज खरे सार्थक होत होते. पण कितीही प्रयत्न केला तरी समोरची रंगसंगती म्हणावी तशी कॅमेरात कैद करताच येईना. त्यामुळे नाद सोडून दिला आणि डोळ्यांनीच ते सौदर्य पीत राहीलो ते भुकेनी गुरगुर करून जाणीव करून देई पर्यंत. आणि ब्रिज संपताच एक हॉटेल असल्याचे दिसले. एरवी आम्ही दुपारी हेवी जेवण करायचो नाही, सुस्ती येईल या भीतीने. पण आज अर्धेअधिक अंतर संपले होते आणि उरलेले अंतर सरळ रस्ता असल्याचे नकाशात दिसत होते. त्यामुळे मी अक्षरश सगळ्यांना भंडावून सोडत त्या हॉटेलमध्ये जायला भाग पाडले.

तिथे सायकली पार्क करत असताना धमाल आली. एक पोरगेलासा असा एक जण आला आणि काहीतरी अगम्य भाषेत बोलायला लागला. बर काही चौकशी करतोय म्हणावे तर स्वर म्हातारी उडता नयेची तिजला असा. त्याला कन्नडा इल्ले, मल्यालम इल्ला असे सांगून झाले, हातवारे करून सांगितले की बाबारे काही कळून नाही राहीले. तरी बाब्या काही थांबायला तयारच नाही. मग माझ्यातला वात्रट पोरगा जागा झाला. आणि त्याच्या मल्यालमला मी मराठीत उत्तरे द्यायला सुरुवात केली.

त्यामुळे पुढचे संभाषण हे असे झाले....

"ഐ ഹാവ് സൊ മണി പ്രോബ്ലെംസ്"

"होय रे पोरा, कळतय मला तुझं दुख, तुझे डोळेच सांगतायत बघ,"

നോ വാട്ട്‌ ടോ ദോ, ഐ ഡോണ്‍'ടി ഉണ്ടെര്സ്ടന്ദ്‌

"काय करणार आता, हे आयुष्यच असे आहे बघ. आपल्या हातात काही नाही.
(वरती हात करून) हे सगळे त्याच्या हातात"

"കാൻ യു ഹെല്പ് മി ഔട്ട്‌"

"केली असती रे तुला मदत, पण आता काय आम्ही आलो पुण्यावरून आणि जायचे कन्याकुमारीला. काय काय म्हणून ओझे वहायचे माणसाने.."

(आम्ही दोघे इतक्या गंभीरपणे बोलत असल्याचे पाहून आजूबाजूची एक दोन लोकंपण थांबून उत्सुकतेने ऐकायला लागली. त्यांना काय अर्थबोध झाला असेल तो अय्यपाच जाणे) Proud Proud

"ഐ അം ഇന് ഫിനഞ്ചിഅൽ റ്റ്രൗബ്ലെ"

"भूक तर मलापण लागलीये रे. काही पैसे वगैरे असतील तर बघ ना भाऊ". (डोळ्यात अगदी केविलवाणे भाव आणून, पोटावर हात मारून, पैशाची खूण केली)

एवढे झाल्यावर मग त्याला कळले की मीच त्याच्याकडे पैसे मागतोय आणि मग एकदमच पसार झाला.

कहर म्हणजे सुहृदला पण हे प्रकरण झेपले नाही. त्याने मला अगदी गंभीरपणे विचारले, काय म्हणत होता रे तो....आता बोला. Proud Proud

असो, भूक तर कडकडून लागलीच होती आणि बसायची व्यवस्था एकदम नामी होती.

त्यामुळे आख्ख्या प्रवासात पहिल्यांदाच आम्ही दुपारी भरपेट थाळी हाणली. वर आईसक्रीम खायची हुक्की आली. त्या मालकाला मोडके तोडके हिंदी येत होते त्यामुळे आईस्क्रीम कुठले आहे विचारल्यावर म्हणे हा सबकुछ मिलेगा.

मग आम्ही काय, एक मँगो, एक बटरस्कॉच असे सांगायला सुरुवात केली. सगळे ऐकून घेतले आणि सगळ्यांना एकच हे असे आईस्क्रीम आणून दिले.

फोटो @ वेदांग

मग आम्हाला कळले की सबकुछ मिलेगा म्हणजे सब को कुछ तो मिलेगा असावे. Proud Proud

भरल्या पोटानी पुढचा प्रवास सुरु केला आणि सुदैवाने पुढचा रस्ता बऱ्यापैकी सरळ होता. त्यामुळे सकाळचा वेग पुन्हा एकदा पकडता आला. त्याआधी चर्मावट्म जंक्शनपाशी एक तिढा उभा राहीला. तिथून गुरुवायूला जायला दोन रस्ते होते. एक मरनचेरी (maranchery) वरून आतून जाणारा आणि दुसरा पोन्नानी समुद्रकिनाऱ्यावरून जाणारा. चौकशी केली असता अातून जाणारा रस्ता कमी अंतराचा असला तरी बऱ्याच गावातून जातो आणि वेडावाकडा असल्याचे कळले त्यामुळे दुसऱ्या पर्यायाची निवड केली. आणि तो निर्णय चांगलाच ठरला. कारण किनाऱ्याच्या बाजूने चालवताना येणाऱ्या झुळकांमुळे सायकलींग थोडे सुखद झाले. आणि हायवे असल्यामुळे रस्त्याची कंडीशनही उत्तम होती.

नंतर मग पुढे वळून पुन्हा गुरुवायुरसाठी आत वळावे लागल्यानंतर जागोजागी रस्ते विचारत जाणे भाग पडले. आमचे हॉटेल प्रसिद्ध गुरुवायुर देवस्थानच्या अगदी बाजूला असे निवडले होते त्यामुळे गावात जाऊन ते शोधणे ही एक मोठी टास्क होती. पण अगदी त्या परिसरात जाऊनही ते सापडेना त्यामुळे वैताग येऊ लागला. त्यातून एलीट गुरुवायुर हॉटेलचा उच्चार न चुकता येलाईटा असा होत असल्याने आपण नक्की काय शोधतोय हेच कळेना.

एका दुकानात विचारले तेव्हा माझ्याबरोबर वेदांग होता. बाकीचे वेगवेगळ्या गल्यांमधून फिरत शोधत होते. त्यामाणसाने येस येस, गो स्ट्रेट आणि सुबुरु दुबुरु लेफ्ट असे सांगितले.
म्हणलं कम अगेन...
पुन्हा त्याच सुरात...गो स्ट्रेटा अँड सुबुरु दुबुरु लेफ्ट...

म्हणलं आधी स्ट्रेट तर जाऊ मग असेल कदाचित डावीकडे. आणि प्रत्यक्षात पुढे गेल्यानंतर ते सापडले ते उजवीकडे.

मग माझ्या लक्षात आले की सुबुरु दुबुरु लेफ्ट म्हणजे डावीकडे जाउ नका .... Proud Proud

हॉटेलचे नाव अगदी एलीट वगैरे असले तरी प्रत्यक्षात ते अगदीच सुमार दर्जाचे निघाले. रिसेप्शन तर इतके ऐटदार होते त्यामुळे खोल्यापण तशाच असतील असे वाटले होते. पण बहुदा सगळे पैसे रिसेप्शनच्याच सजावटीत संपल्यामुळे असेल कदाचित उरल्यासुरल्या रकमेतून कशातरी खोल्या बांधल्या होत्या. मारवंथेनंतर पुन्हा एकदा एक भीषण अनुभवाला तोंड द्यावे लागणार असे वाटायला लागले.

एका जेमतेम १० बाय १२ च्या खोलीत एक डबलबेड आणि बाथरूमच्या समोर ट्रेनचा बर्थ असतो त्या आकाराची एक कॉट. दुर्दैवाने नेमकी तीच माझ्या वाट्याला आली. बाथरुमचा दरवाजा त्या कॉटला इतका खेटून होता की जाताना येताना माझ्या अंगावरूनच पलिकडे जावे लागत होते. त्यात हाईट म्हणजे एक डायनिंग टेबल आणि त्यावर एक खोक्यात ठेवलेला टीव्हीपण होता.

म्हणलं मरूं दे एक रात्रच काढायची आहे, काढू कशीतरी आणि पटापटा आंघोळी उरकून गुरुवायुर देवळाकडे निघालो. सुदैवाने ते अगदी चालत जाण्याच्या अंतरावर होते. पण जाण्यापूर्वी लुंगी खरेदी आवश्यक होती. देवळात लुंगीशिवाय प्रवेश नव्हता. एरवी मी तीव्र नापसंती दर्शवली असती पण लुंगी खरेदी करण्याच मोह झालाच. खरेदी झाल्यानंतर भर रस्त्यात कपडे बदल करण्यापेक्षा दुकानातच करण्याचे ठरले आणि मग प्रत्येकाने आपापले डोके चालवून लुंगी नेसण्याचा प्रयत्न केला.

स्कर्ट, मिनिस्कर्ट, पैलवानी धोतर अशी नानाविधे रुपे ते लुंगीने घेतल्यानंतर मात्र दुकानदाराला राहवेना आणि शेवटी त्यानेच आम्हाला लुंग्या नेसवून दिल्या. (त्याला तोपर्यंत पैसेच दिले नव्हते, त्यामुळेही असेल कदाचित :P) आणि एकदम थाटातच देवळाकडे निघालो.

फोटो @ ओंकार

देश तैसा वेश म्हणतात ते अगदी खरेय. त्या लुंगीत इतके मोकळे ढाकळे वाटत होते की का म्हणून इथले लोक ने नेसत असतील त्याची प्रचिती आली. पुढचा सायकल प्रवासही लुंगी नेसून करावा का काय असाही एक विचार मनात आला.

देवळात गेलो आणि एका अतिप्रचंड रांगेने स्वागत केले. अर्धा किमी पसरलेली रांग पाहूनच पोटात गोळा आला आणि मी काही इतका वेळ उभा राहून दर्शन घेणार नाही असे जाहीर केले. पाठोपाठ बाबुभाई आणि वेदांगनेही माघार घेतली. मग बाकीचेही गळाले. मग आम्ही उगाचच इकडे तिकडे भटकत राहीलो. देवस्थानाच्या हत्तीचे फोटो काढले. हा हत्ती सुपरस्टारपेक्षा कमी नव्हता. नंतर आम्हाला आख्ख्या केरळभर याचे फोटो आणि पोस्टर दिसत राहीले.

वाईट म्हणजे आमच्या वाटेतच हे होते पण आम्हाला पत्ताच नव्हता आणि आता गुरुवायुरला आल्यावर पुन्हा तिकडे जाणे अशक्य होते. फार हळहळ झाली. मस्त हत्ती बघायला मिळाले असते.

वेदांगला म्हणले बाबारे इकडे तिकडे फिरू नकोस, लोकांमधून तुला ओळखून काढणे शक्य व्हायचे नाही Happy

तिथेच एका सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी चालली होती.

तिथल्याच एक उपहारगृहात गेलो आणि काहीतरी केरळीयन पदार्थ मागवायचे ठरले. पण वेटर जमातीची काय दुष्मनी होती ते कळेना. काहीही सांगितले तरी फक्त डोसाच आहे असे उत्तर यायचे. आजूबाजूला लोक काय काय चेपत होती आणि आम्हाला फक्त डोसाय. शेवटी मी त्याला बोलावून बाजूच्या टेबलवरचा पदार्थ द्या असे सांगितले तरी बधेनात. ओन्ली डोसायचा घोष कायचम ठेवला. म्हणलं, बहुदा बाहेरच्या लोकांना अलाऊड नसेल.

कहर म्हणजे रात्रीचे जेवण सर्वान्ना भवन इथे करायचे ठरले. मला असेही केव्हाचे एकदम पारंपारिक केरळी जेवण घ्यायचेच होते. अगदी केळीच्या पानावर वगैरे. पण प्रत्यक्षात जेव्हा केरळी थाळीची अॉर्डर दिली तेवा वेटरसाहेबांनी नो केरळ थाली, यु वॉँट गोबी मंचुरीयन असे विचारले तेव्हा आडवाच झालो.

ओह, आम्ही विसरलोच आम्ही केरळात आहोत. पुढच्या वेळी आम्ही पंजाबात जाऊ तेव्हा रस्सम -भात अॉर्डर करू, असे अगदी मानभावी पण त्याला सांगितले. त्यावर अगदी तेलकट चेहरा करत आमच्याकडे दुर्लक्ष करत साहेब निघून गेले. जेवण होते चांगले पण केरळात जाऊन गोबी मंचुरीयन काय खायचे. शेवटी राहवेना म्हणून गल्ल्यावरच्या माणसाला तक्रार केली. त्यानेही नुसते दात दाखवले आणि खांदे उडवले. Angry

माझा फ्युज उडायला आलाच होता आणि तो उडालाच. खोलीत गेलो तेव्हा डासांची फौज होती. एकतर भयानक उकडत होते आणि मी अक्षरश शॉर्टस आणि वर उघडाच असा त्या हॉटेलात फिरत होतो. पण तसेच झोपणे अशक्य होते. डासांनी फोडून काढले असते. शेवटी बेल वाजवून माणसाला बोलावले. तो त्रासदायक चेहरा करत आल्यावर मी त्याला सौम्य भाषेत अडचण समजाऊन दिली आणि एक अंगावर ओढायला चादर मागितली. त्याने तत्परतेने कोपऱ्यात रचलेला ढीग दाखवला. तो पाहून मी थक्क झालो. त्या चक्क रजया होत्या, अगदी सिमला कुलु मनालीलाच फक्त वापरता येतील अशा. जिथे बारा महिने उकाडा असतो अशा ठिकाणी त्या कुणी अंगावर घेत असतील अशी कल्पनाही मला करवेना.

मी पुन्हा त्याला समजावले की बाबा रे मला पातळ बेडशीट हवीये. पण पुन्हा त्याने तोच ढीग दाखवला तेव्हा मग मला कंट्रोल करणे अवघड झाले आणि एकदम वरची पट्टी लावली.

देवस्थानच होते म्हणून शिव्या वगैरे दिल्या नाहीत पण त्याला जे काही खडसावला. म्हणलं, इथे घामाच्या धारा वाहतायत, मी उघडाबंब तुझ्यासमोर उभा आहे. आणि तु मला रजई घ्यायला सांगतोय. काही लाजलज्जा असेल तर मला आत्ताच्या आत्ता चादर आणून दे. माझ्या आरड्याओरड्यामुळे बाजूच्या खोलीतलेही बाहेर येऊन डोकावायला लागले. पण त्या माणसावर त्याचा काडीमात्रही फरक पडला नाही. बाकीच्या लोकांनाही हेच दिले आहे हेच सांगत राहीला.

मला आता आवरले नाही तर मारामारी होईल या भीतीने आमचे बाकी लोक मधे पडले आणि शेवटी त्याने एक चादर अगदी ठेवणीतला शालू आणून द्यावा त्या आविर्भाावात आणून दिली. म्हणलं एक नाही, आम्ही सात जण आहोत, प्रत्येकाला एक एक अशा सात चादरी हव्यात म्हणल्यावर तो जो काही पसार झाला तो परत उगवलाच नाही.

फॅन फुल स्पीडवर ठेऊन झोपण्याचा कसाबसा प्रयत्न केला पण माझ्या बरोबर राहत असलेल्या लान्स आणि वेदांग ला पुढे बराच वेळ माझी धुसफुस ऐकत रहावी लागली. हा सगळा देवस्थानचा माजोरीपणा आहे. हेच पर्यटन स्थळ असते तर मुकाट सगळे ऐकले असते कारण त्यांचा धंदा त्यावर आहे. इथे त्यांना माहीती आहे, गोणपाट जरी दिले अंथरायला तरी लोकं येणार कारण त्यांना देवदर्शन घ्यायचे. मूर्ख लोकांच्या भावनेचा गैरफायदा घ्यायला चटावलेत. यांचे देवस्थानचे उत्पन्नच बंद केले की ताळ्यावर येतील. इ. इ. Angry

असो, आजच्या दिवसाचा हिशेब फार काही नाही. १०० किमी केले हीच जमेची बाब. आता किमी चे काऊंटडाऊन सुरु झाले होते. पण मोहीम संपायला अजून बराच अवकाश होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना.....:)

पुढच्या वेळेपासून एक ऑलआऊट /गुडनाईट किंवा तत्समपण टाकून द्या सामानात. >>>>>

त्यापेक्षा ओडोमास परवडले. नंतर मग आम्ही बाजारातून एक विकतच घेतले. त्याचा पुढे कन्याकुमारीला उपयोग झाला. तिथेही हाच प्रकार होता.

लुन्गी डान्स केला की नाही मग? >>>>

लुंगी डान्स नाही केला कारण लुंग्या किती घट्ट आहेत याचा अंदाज नव्हता आला....

आशुचँप,

हा भागपण उत्कंठावर्धक झालाय. पुढचे भाग लवकर टाका. Happy

गुरुवायूर मंदिरातली स्वच्छता नजरेत भरली. तुम्हा त्रिमूर्तींचा लुंगीमंगलम फोटू झक्कास आलाय.

आ.न.,
-गा.पै.

गामा बरोबर पॉँईट पकडलाय तुम्ही....खरेच आपल्या इथल्या देवळांच्या तुलनेत केरळात खरंच खूप स्वच्छ आणि शांत आहे. आपल्या इथे सगळा पैसा फक्त देवाला सोन्याने मढवण्यात आणि देवस्थानाची प्रॉपर्टी करण्यातच जातो. स्वच्छता वगैरे कशाला हवी. ज्यांना यायचे ते येतील घाणीत बरबटून...

अगदी चित्रमय तसेच जणू काही वाचक तुमच्यासमवेत वा तुमचा पाठलाग करीतच गुरुवायूरचा प्रवास करत आहे अशी आनंदमयी जाणीव करून देणारे हे लक्षणीय असे प्रवासवर्णन वाचताना जाणवत होते....ही किमया आशुचॅंप यांच्या लेखनकौशल्याची जितकी तितकीच सायकल प्रवाससाहसाची त्याला जोड असल्याने वाचक सोबतीला असलेल्या प्रकाशचित्रांच्या मायेत गुरफटला जातोच जातो.

कोईम्बतूरला गेलो असताना (अर्थात जीपने...सायकल प्रवासासाठी सोबतीही तुम्हाला जसे लाभले तसे न लाभल्यामुळे तो विचार मनी आला नव्हता...शक्यही नव्हतेच म्हणा) त्या ठिकाणी मित्रांत "गुरुवायूरला जावे की मीनाक्षी मंदिरकडे ?" या प्रश्नावरून काहीसे वाद झाले होते. वास्तविक पलक्कड पर्यंत आलोच होतो तेव्हा गुरुवायूर होईल असे ठरले होते पण तो लुंगी प्रकार आणि राहाण्याची अडचण (मी १९९५ ची गोष्ट करीत आहे) याबाबत बरेचसे काही कानावर आले होते म्हणून त्यापेक्षा मीनाक्षी मंदिराला प्राधान्य दिले गेले आणि गुरुवायूर राहिलेच. आज तुमच्याकडून तेथील वर्णन वाचून वीस वर्षापूर्वीच्या आम्हा मित्रांतील संवाद आठवला आणि तुमच्या २०१५ तील "..मूर्ख लोकांच्या भावनेचा गैरफायदा घ्यायला चटावलेत. यांचे देवस्थानचे उत्पन्नच बंद केले की ताळ्यावर येतील..." या मताचा उल्लेख आम्हीही त्यावेळी असेच उच्चार केल्याची प्रकर्षाने जाणीव झाली....काळ बदलला तरी स्थिती बदलणार नाहीच....देव तरी काय करेल ?

इतक्या उशीराने लिहूनही आठवून आठवून कसले झकास लिहिले आहेस रे ! अगदी प्रसंग डोळ्यासमोर उभा रहातो, जोडीला छान छान फोटोही. अगदी मेजवानी आहे प्रवास वर्णनाची..... अन बराचसा हेवाही. कारण आम्हाला नुसते शब्दातूनच अनुभवायला /अनुभुती घ्यायला लागत्ये.
इथे देत असल्याबद्दल धन्यवाद.

त्याच्या मल्यालमला मी मराठीत उत्तरे द्यायला सुरुवात केली.

त्यामुळे पुढचे संभाषण हे असे झाले.... >> आशु पार हाणलस बिचार्याला Proud
बाकी मी चेन्नेईला रिक्षावाल्याशी मराठीत केलेला संवाद मला आठवला.

मूर्ख लोकांच्या भावनेचा गैरफायदा घ्यायला चटावलेत >>>बाकी सर्व देवस्थानांच्या आजुबाजुला अशीच स्थिती अनुभवायला मिळते. Sad

मस्त खुशखुशीत लिहितोयस मजा येतेय वाचायला. पुलेशु Happy

अप्रतिम फोटोज च्या जोडीने खुसखुशीत कॉमेंट्री..... खूपच मजा येतीये..

सुपर ग्रेट अनुभव..

.'एवढे झाल्यावर मग त्याला कळले की मीच त्याच्याकडे पैसे मागतोय आणि मग एकदमच पसार झाला.' Rofl

जनरली माझं मत असं होतं ( अर्थात तिथे प्रत्यक्ष जाणं नाही झालंय अजून पर्यन्त) कि केरळी लोकं बर्‍यापैकी

सोज्वळ, अगत्यशील असतात वागा बोलायला..तुझे अनुभव वाचून तसे काही नसतात तर..

अशोकजी तुमचे प्रतिसाद नेहमीच इतके सुंदर असतात ना की मी वाटच पाहत असतो.

काळ बदलला तरी स्थिती बदलणार नाहीच....देव तरी काय करेल ?
>>>>>
अगदी खरेय

देवाच्या दारी ऐहिक सुखांचा विसर पडावा म्हणून हो >>>>>

मग पैसै पण घेऊ नयेत ना. पैसे घेणार टिच्चून आणि वर पुन्हा असा आविर्भाव की बघा तुमच्यावर किती उपकार करतोय ते

इतक्या उशीराने लिहूनही आठवून आठवून कसले झकास लिहिले आहेस रे ! >>>>>

काही काही प्रसंग अगदी जशेच्या तशे कोरले गेले आहेत. वेळ लागेल डोक्यातून जायला


बाकी मी चेन्नेईला रिक्षावाल्याशी मराठीत केलेला संवाद मला आठवला.
>>>>>

लई भारी...म्हणजे मी एकटाच नाही तर

जनरली माझं मत असं होतं ( अर्थात तिथे प्रत्यक्ष जाणं नाही झालंय अजून पर्यन्त) कि केरळी लोकं बर्‍यापैकी

सोज्वळ, अगत्यशील असतात वागा बोलायला..तुझे अनुभव वाचून तसे काही नसतात तर.. >>>>>>

मलाही असेच वाटत होते. पण एखाद दुसरा प्रसंग सोडला तर एकंदरीत अनुभव फार काही सुखद नव्हता. अर्थात तामिळनाडूच्या लोकांपेक्षा केरळीयन परवडले असे नंतर वाटून गेले

नेहमीप्रमाणे मस्तच!

केरळी मुलाशी मराठी संवाद तर भारीच! प्रवासानंतर एवढे डीटेल्स आठवून लिहिणे म्हणजे कौशल्य आहे बर का. मला एवढ सगलं नसतं आठवलं. Happy

>>>> वेळ लागेल डोक्यातून जायला <<<< नको नको.... अरे याच आठवणी तर जपायच्या अस्तात. आयुष्यभर पुरतात.

धन्यवाद सर्वांना..

अजून सगळ्या आठवणी ताज्या आहेत पण वाटत नाही काही गोष्टी विसरल्या जातील म्हणून....

लिंबूकाकांनी म्हणलेय तसे या आठवणी आयुष्यभर जपल्या जातात...

एकच नंबर रे !!

भाग नऊ पर्यंतची सगळी लेखमालिका एका बैठकीत वाचुन काढली अत्ताच !

फोटो ही मस्त आलेत Happy

पुढील भागांची आवर्जुन वाट पहात आहे !!

Ashu mast lihila aahes! maja aali vachyala! mala ethe mi hya French lokanshi boltana honarya gondhalache chitra dolyasamor ubhe rahile!
Pan evhadi lungi vikat gheun nesli , aani shevti devadershan kelech nahis! Happy
Tu tyachya ekda paya padala astas ter tuze pudhache kashta vachale asate bagh! :)) haha!

Pages