मला गवसलेली 'एक चतुर नार' ...

Submitted by rar on 25 May, 2015 - 22:52

कोणतं गाणं कोणत्या रूपात कधी, कुठे, कसं भेटेल काहीही सांगता येत नाही... त्यातही काही गाणी परत परत भेटत राहतात. कधी एक हलकीशी झलक दाखवून उत्सुकता चाळवून जातात, आणि मग सुरु होतो शोध. या शोधात तुमच्याही नकळत तुम्ही गुरफटत जाता, गाणं हुलकावणी देऊन निघूनही गेलेलं असतं. काळाच्या ओघात कधीतरी सक्रीय शोधही मागे पडतो. कधी मित्रांबरोबर विषय निघाला तर तुमच्या शोधाबद्दल, उत्सुकतेबद्दल त्यांच्याशी बोललं जातं. मग ते ही काही काळ त्या शोधयात्रेत सामील होतात. कधी उत्तर मिळतं, कधी मिळत नाही. मनात मागे नुसताच त्या गाण्याचा, प्रश्नाचा ठसा उरतो. हलकासा, न जाणवणारा, त्रास न देणारा पण तरीही पुसुन न टाकता येणारा. दिवस, महिने, वर्ष मागे पडतात. नवीन गाणी, नवे प्रश्न, नवा शोध या सगळ्यात आपण नव्याने गुरफटून जातो...
... आणि अचानक ध्यानीमनी नसताना फार सहजपणे एखाद्या क्षणी 'ते' गाणं सामोरं येतं, उत्तर सापडतं आणि एका क्षणात शोध संपतो. मन जबरदस्त सुखावून जातं.
कालच अश्याच एका गाण्याचा शोध माझ्यासाठी अचानक संपला. ते गाणं म्हणजे पडोसन मधलं ' एक चतुर नार करके सिंगार' ! मन्नाडे आणि किशोर ह्या दोघा दिग्गजांची जुगलबंदी. हिंदी चित्रपट संगीतातील 'टॉप ५ कॉमेडी गाणी' अशी यादी केली, तर त्या पाचात हे गाणं नक्कीच असेल इतकी शब्दांची, सूरांची, आवाजाची आणि विनोदासाठी अतिशय आवश्यक अशा 'टायमिंगची' जमलेली भट्टी ! आरडीचं एक जबरी कंपोझिशन....
पण माझ्यासाठी ह्या आवडत्या गाण्याची गोष्ट मात्र इथेच संपत नाही.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. कुठेतरी ऐकलं होतं किंवा कोणत्यातरी लेखात एक ओझरता उल्लेख वाचला होता की 'एक चतुर नार' हे गाणं किशोरच्या आधी अशोककुमारच्या आवाजात आहे म्हणे !
झालं ! आता ते गाणं कोणतं, कोणत्या सिनेमातलं आहे की नॉनफिल्मी अल्बम मधलं, रीलीझ झालं की नाही, असे एक ना भारंभार प्रश्न पडायला सुरुवात झाली.... गाण्याचा शोध चालू झाला.
काही प्राथमिक शोधाशोधीनंतर, अशोक कुमारच्या १९४१ सालच्या ' झूला' या चित्रपटात 'एक चतुर नार करके सिंगार' ही गाण्याची पहिली ओळ असलेलं गाणं आहे, इतकी माहिती मिळाली आणि हा शोध इथेच अडकला.
पुढे काही वर्षांनी आर्डी बर्मनच्या पुस्तकात ह्या गाण्याबद्दल अजूनच इंटरेस्टींग, उत्सुकतावर्धक माहिती मिळाली ती अशी -
" एक चतुर नार हे एक अतिशय चतुरपणे एकत्रीत केलेलं, पटकन लक्षात येणार नाही अशी विविध गाण्यांची मांडणी करून रचलेलं गाणं आहे. गाण्याची पहिली ओळ - एक चतुर नार करके सिंगार - ही झिंझोटी रागातली रचना अशोककुमारच्या झूला (१९४१) चित्रपटातील गाण्यावर बेतलेली आहे. पुढील 'अरे देखी तेरी चतुराई' ही ओळ विष्णूपंत पागनीसांच्या ' वन चले राम रघुराई' ह्या भजनाचं विडंबन आहे. (संत तुलसीदास - १९३९). तर 'काला जा रे जा रे' ही ओळ लता मंगेशकरने गायलेल्या जिद्दी (१९४८) चित्रपटातील ' चंदा रे जा रे जा' या छायानट रागावर आधारीत गाण्यावर बेतलेली आहे. ह्या सगळ्या गाण्यांचं एकत्रीकरण करून कवी राजेंद्र किशन आणि संगीतकार पंचम यांनी एका अजरामर विनोदी गीताची निर्मीती केली"

जबरदस्त ! सगळंच एकदम भारी वगैरे वाटायला लागलं आणि यातली एक एक गाणी शोधण्याच्या मागे मी लागले.
विष्णूपंत पागनीसांचं 'बन चले राम रघूराई' भजन सापडलं, आणि त्यात 'अरे देखी तेरी चतुराई' स्पष्ट ऐकू यायला लागलं. आधी मनात खुदकन आणि मग चक्क मोठ्याने खदाखदा हसू आलं. माझ्यासाठी त्या भजनाला एक नवीन मीती प्राप्त झाली.
देवआनंदच्या 'जिद्दी' मधलं लताच्या आवाजातलं ' चंदा रे जा रे जा रे' हे गाणं पण सापडलं. आजवर जिद्दी म्हणजे लता - किशोरचं पहिलं रेकॉर्ड झालेलं ड्युएट " ये कौन आया रे " (https://www.youtube.com/watch?v=j6aaQphk1Pg) या गाण्यासाठी माहिती होतं. आता त्या सिनेमाच्या गाण्यांना 'पडोसन' चा एक नवा संदर्भ जोडला गेला.
आता उरलं अशोककुमारच्या आवाजातलं 'एक चतुर नार' ही ओळ असलेलं गाणं. खूप शोधलं पण हे गाणं काही पहायला मिळालं नाही...
बरीच वर्ष झाली... आणि काल अचानक, अगदी अचानक एका मित्रानं ' हे तू आधी पाहिलं आहेस का?' अश्या मेसेजसकट एका गाण्याची लिंक पाठवली... उत्सुकतेनं मी लिंकवर क्लीक केलं आणि हर्षवायू झाल्यासारखी माझी परिस्थीती.
त्या लिंकमधलं गाणं होतं अशोक कुमारच्या आवाजातालं 'एक चतुर नार करके सिंगार' !
निकीत, ती लिंक पाठवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

वर्षानुवर्ष चाललेला 'एक चतुर नार' ह्या गाण्याचा शोध काल माझ्यासाठी अचानक संपला... म्हणजे निदान पुढचे काही प्रश्न , उत्सुकता निर्माण होईपर्यंत तरी !

एक चतुर नार करके सिंगार - झूला (१९३९) - अशोक कुमार
https://www.youtube.com/watch?v=RtthfgNa7YY

बन चले राम रघूराई - संत तुलसीदास (१९३९) - विष्णूपंत पागनीस
http://gaana.com/song/ban-chale-ram-raghu-rai
ही लिंक ओपन झाली नाही तर -
http://www.shazam.com/track/45806835/ban-chale-ram-raghu

चंदा रे जा रे जा रे - जिद्दी (१९४८) - लता मंगेशकर
https://www.youtube.com/watch?v=ghtBSj7rvfw

पुस्तक संदर्भ : R. D. Burman: The Man The Music, अनिरुद्ध भट्टाचार्जी आणि बालाजी विठ्ठल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे... कसला भारी शोध आणि लेखही आहे. मानलं.
लिन्क्स ऐकल्या... फिस्सकन हसू आलंच. खूप मनापासून धन्यवाद... हे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल रार.

कालच झी टीव्हीवर ' पडोसन' पाहिला, ' चतुर नार पाहुन' परत एकदा जाम हसायला आलं , भारी आहे ते गाणं Lol
भारी आहेत वरच्या तिन्ही लिंक्स , संत तुलसीदासच्या पोस्टरवरचा हिरो मात्र उगाचच सुनील दत्त सारखा वाटला Lol

ईसाक मुजावरांनी ह्या गाण्याच्या संदर्भात सांगितलेला किस्सा:

मन्ना डे म्हणायचे की ह्या संगितकारांचे काही कळत नाही. "केतकी गुलाब जुही" (बसंत बहार) में पंडितजी (पं भीमसेन जोशी) से हमे जीताया और किशोर के साथ हरा दिया"

वर पडोसनची सर्व गाणी नमूद केली आहेत, सिवाय एक के "शर्म आती है मगर". लताने थोड लाडीकपणे पण छानच गायिले आहे.

मस्त

Pages