फ्लॉवर - बटाटा सुकी भाजी.

Submitted by आरती on 6 May, 2015 - 06:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- १ लहान गड्डा फ्लॉवर
- २ मध्यम आकाराचे बटाटे
- २ हिरव्या मिरच्या
- १/२ चमचा गोडा मसाला
- २ चमचे एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला
- १ लसूण पाकळी
- फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग
- चवीप्रमाणे मीठ, साखर (एक चिमटी)

क्रमवार पाककृती: 

फ्लॉवर-बटाट्याचे मोठे-मोठे तुकडे करून धुवून निथळून घ्या. मिरचीला उभे काप देऊन घ्या. (मी लाल ओली मिरची वापरली आहे)
तेल तापवून, त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर आच एकदम कमी करा. आता जिरे, हळद, हिंग, हिरवी मिरची घाला. लसूण पाकळी किसून, गोडा मसाला आणि बिर्याणी मसाला सगळे तेलात घालून थोडे परतून घ्या. साखर-मीठ घालून एकत्र करा. फ्लॉवर-बटाटा घाला. आच मोठी करून भराभर हलवा. धुतलेल्या भाजीत जे थोडे पाणी राहिले असेल ते सगळे निघून जाईल. आता पुन्हा आच कमी करून २ मिनिट झाकण घालून आणि नंतर झाकण न घालताच नुसती तेलावरच शिजू द्या. खुप मऊ शिजवायची नाहीये. हवी असल्यास कोथिंबीर घाला.

ही भाजी केवळ त्या बिर्याणी मसाल्यामुळे एकदम शाही होते. पार्टीला सुकीभाजी म्हणून करावी इतकी मस्त लागली. (आणि म्हणूनच अगदीच साधीशी असून इथे टाकावीशी वाटली). शिवाय सकाळच्या गडबडीतही करता यावी इतकी झटपट झाली.

शेवटची ताटात वाढुन घेतल्यावर फोटो काढायचे सुचले.
fllower bhaji.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांना एक वेळच्या जेवणाला पुरली.
अधिक टिपा: 

मी सगळे घटक अंदाजे घातले होते. इथे प्रमाण लिहिताना साधारण आठवून लिहिले आहे.
भाजी करताना ती इतकी मस्त लागेल असे वाटले नव्हते त्यामुळे मोजले नव्हते.. नेहमीच्या मिरची-काडीलींब फोडणीतला फ्लॉवर-बटाटा खाऊन कंटाळा आला म्हणून हा प्रयोग केला.

ही भाजी थोडी चमचमीत होते. कमी तिखट खाणार्‍यांनी मिरची एकच वापरावी आणि बिर्याणी मसाला पण थोडा कमीच घालावा.

माहितीचा स्रोत: 
माझाच प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा मैत्रीणीला डबा पाठवायचा होता म्हणून ही भाजी केली. मस्त झाली होती. मी एवरेस्टचा बिर्याणी/पुलाव मसाला वापरला. पिवळ्या रंगाचे फ्लॉवरचे तुरे आणि चौकोनी कापलेले लाल बटाटे यामुळे भाजी दिसतही छान होती. धन्यवाद आरती. Happy

Pages