मी तो एकलव्य शिष्य - श्री. श्रीराम रानडे

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
1’

'गीतरामायण' या महाराष्ट्रवाल्मिकी ग.दि.माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके या द्वयीने अजरामर केलेल्या कलाकृतीचं हे हीरक-महोत्सवी वर्ष! गेली साठ वर्षं महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही 'गीतरामायण' रसिकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवत आहे. गीतरामायणातून प्रेरणा घेऊन श्री. श्रीराम रानडे यांनी 'रामचरितगुणगान' ही स्वतंत्र गीतरचना केली.

गदिमा, बाबूजी यांच्या प्रतिभेला आणि गीतरामायणाला अभिवादन करण्याचा त्यांचा प्रयत्न, त्यांच्या गीतलेखनाचा हा प्रवास, त्यांच्याच लेखणीतून...

***

‘गदिमा’ माझ्या आयुष्याच्या अगदी पोरवयात हृदयात विराजमान झाले; माझ्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा झाला तरीही माझ्या मनातल्या गदिमांच्या स्थानाला कणभरही धक्का लागलेला नाही. प्रासादिक गीतरचना, भावपूर्ण शब्दकळा आणि संत-पंत-तंत कुळींची गीतलेखनाची सहजता एकाच लेखणीमधून कागदावर मांडणारी गदिमांची प्रतिभा! सारेच विलक्षण...१९५५ साली आकाशवाणीच्या माध्यमातून साकारलेल्या गीतरामायणाने यावर कळस चढवला. मी यावेळेस इंग्रजी सहावीत (आताची दहावी) होतो. रेडियो घेण्याची घरी ऐपत नव्हती. मिरजेतील ब्राह्मणपुरीतील महाबळ वाड्यात आमचं बिऱ्हाड होतं. महाबळांकडे फिलिप्स कंपनीचा मोठा रेडियो होता. गीतरामायणातील गाणं प्रसारित व्हायचं त्या दिवशी त्या खोलीत आणि खोलीबाहेर माणसांची दाटी व्हायची. सर्वांचे कान आकाशवाणीकडे लागलेले. धीरगंभीर आवाजातील निवेदन आणि त्यानंतर प्रसंगाला अनुरूप चालीत, शब्दांना प्राधान्य देऊन म्हंटलं गेलेलं गीत! ‘अश्रुनीर वाहे डोळा’ अशी अवस्था कधी व्हायची ती उमजायाची नाही. विविध काव्यरस गीतामधून अखंड पाझरत असायचे आणि दर आठवड्याला आता कोणते प्रसंग, नवी कोणती गीतरचना, नवीन कोण गायक, नवीन कोणती स्वररचना असा प्रश्न चर्चेला यायचा. ‘केसरी’मध्ये निवेदनासकट गीत प्रकट व्हायचं. त्याचं सामूहिक वाचन आणि वहीत ते गीत चिकटवून ठेवण्याची प्रचंड धडपड! या गीतरामायणामुळं माझं बालपणातलं सांस्कृतिक जीवन बहरलं, समृद्ध झालं.

आधीच मी नाटक-सिनेमावेडा... त्यात वाचनाची आवड. ग. दि. माडगूळकरांची - मासिकातली, दिवाळी अंकातील, कथा - कविता - कादंबरी - शब्दचित्रे - आठवणी अगदी प्रत्येक साहित्यकलाकृती माझ्यासाठी मेजवानीच असायची. त्यांची चित्रपटगीते जिभेवर कशी रुजली हे समजलेच नाही. गदिमा भरभरून देत होते आणि ते मी माझ्या फाटक्या झोळीत साठवण्याचा ध्यास घेतला होता. ग. दि. माडगूळकर, राजा परांजपे, आणि सुधीर फडके या त्रिमूर्तीचे चित्रपट वारंवार पाहणे ही माझ्यासाठी आनंदपर्वणीच असायची. 'पेडगावचे शहाणे', 'लाखाची गोष्ट', 'पुढचे पाउल', 'ऊनपाऊस', 'जशास तसे', 'रामजोशी' हे सारे चित्रपट शालेय वयातच अधाशासारखे पाहिले होते. या चित्रपटातले अनेक संवाद मला आजही मुखोद्गत आहेत. 'झांजीबार झांजीबार झांजीबार' हे 'पेडगावचे शहाणे'मधलं गाणं अभिनयासह एकपात्री स्वरूपात वर्गात करून दाखवायचो आणि हमखास टाळ्या घ्यायचो. भर वर्गात कानावर हात ठेऊन मी ठसक्यात लावणी म्हटली आणि शिक्षकांनी माझ्या कानाखाली वाजवली. त्यातून किंचितही शहाणपण न शिकता मी नाटक, सिनेमा, तमाशा आणि कलेच्या अधिकच प्रेमात पडलो. आपणही असं काहीतरी चांगलं लिहिलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे अशी ऊर्मी निर्माण झाली, काहीबाही लिहूही लागलो, पण प्रसिद्धीसाठी कुठेही पाठवले नाही.

पुण्यात आलो आणि माझ्या या वेडाला चांगलंच खतपाणी मिळालं. व्याख्याने, चर्चा, परिसंवाद, नाटकं, तमाशे, कीर्तने, आणि अनेक उपक्रमांना पुण्यात काय तोटा? माझ्या सारख्या हौशी कलाकाराला हे मुक्तविद्यापीठच होते. त्या विद्यापीठाचा मी भरपूर लाभ घेतला. आजही घेतोच आहे. 'अस्सल तेच तरतं - नक्कल ते काळाच्या प्रवाहात चोळामोळा होऊन कधी आणि कुठे वाहून जातं हे कळतसुद्धा नाही' याची खोलखोल जाणीव याच काळात झाली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गदिमांनी लिहिलेलं आणि सुधीर फडक्यांनी सादर केलेलं गीतरामायण! रामनवमीच्या उत्सवाप्रसंगी शिवाजी मंदिर, नुमवि प्रशाला या ठिकाणी होणारी आणि प्रतिवर्षी अधिकाधिक वाढणारी पुणेकर रसिकांची मांदियाळी... याची ओढ आणि गोडी वाढत जाणारी. गीतरामायण दरवर्षी असं माझ्या मनात मुरत होतं, रुजत होतं, फुलत होतं, वाढत होतं.

सुधीर फडक्यांनी गीतरामायण महाराष्ट्रात, भारतात आणि जगातल्या अनेक देशांत पोहोचवलं. स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य विनोबा भावे, राष्ट्रपती अशा मान्यवरांनी गीतरामायणाचं भरभरून कौतुक केलंच, पण हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेनंही ते उत्स्फूर्तपणे स्वीकारलं, हे गीतरामायणाचं वैशिष्ट्य ! गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव साजरा झाला. गावागावातले गायक, वादक गीतरामायण सादर करण्यात धन्यता मानू लागले. महाराष्ट्रवाल्मिकी ग. दि. माडगूळकर हे बिरूद गदिमांनी सर्वार्थाने सार्थ केलं. त्यांच्या विषयीचा माझा आदरभाव अधिकच वाढला. मी स्वत:ला त्यांचा एकलव्य शिष्य समजू लागलो.

२००५ सालची गोष्ट... गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता-समारंभ न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथील मैदानावर भव्यपणे साजरा झाला. घरी येण्यासाठी मी आणि माझी पत्नी बसची प्रतीक्षा करीत स्टॉपवर उभे होतो. मनातल्या मनात गीतरामायणाची पारायणे सुरू होती. सुरेख शब्दकळा, काय अप्रतिम संगीत, किती सहजता, किती चित्रमयता – एकेक गीत आठवून गदिमांना आणि बाबूजींना साष्टांग वंदन करीत होतो. बसची प्रतीक्षा संपत नव्हती आणि माझी अस्वस्थता वाढत होती - "तू स्वत:ला गदिमांचा एकलव्य शिष्य म्हणवतोस ना? तुलाही थोड्याफार रचना करता येतात ना? मग एखाद्या तरी रामायणातील प्रसंगावर गीतरचना करण्याचा प्रयत्न का नाही करीत? तू कसला त्यांचा शिष्य? तू फक्त गुरूंच्या काव्याची स्तुतिसुमने गाणारा पढीत पोपट!" मनात स्वतःशीच संवाद चालू होता.
"अहो, उद्या हनुमान जयंती आहे. घरी लवकर गेलं पाहिजे. या बसची वाट पाहण्यात अर्थ नाही", सौभाग्यवतीच्या या शब्दांनी मी भानावर आलो. 'उद्या हनुमान जयंती' हे शब्द तीरासारखे काळजात घुसले. रामभक्त हनुमान- महाबली हनुमान - भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती – मारुतीस्तोत्र मेंदूत पिंगा घालू लागले. रिक्शेत बसलो, घरी आलो, तोवर

माय अंजनी पवनपुत्र हा ज्येष्ठ दास बलवंत
चिरंजीव हे नाम जगती या जय जय हनुमंत |

या ओळी तयार झाल्या होत्या. त्या आधी भराभर कागदावर उतरवल्या. उद्या हनुमान जयंती ! काहीही करून गीत पूर्ण करायचं आणि सूर्योदयाला हनुमान टेकडीवर जाऊन बलभीमाच्या पायावर अर्पण करायचं असा मनाशी निर्धार केला. प्रभू रामचंद्राला, रामभक्त हनुमानाला, गुरुदेव गदिमांना मनोमन वंदन केले आणि बैठक मारली. लेखणीतून ओळी झरू लागल्या. गीत रात्री तीन वाजता पूर्ण झालं. सूर्योदयाला ते मारुतीरायाच्या चरणी अर्पण केलं. मी समाधान पावलो... हातून काहीतरी लिहून तर झालं.

गेल्या काही वर्षांत आनंद माडगुळकर यांची आणि माझी छान मैत्री जुळली होती. त्यांच्या अनेक प्रकल्पात मी कलाकार, गीतकार, लेखक म्हणून सहभागी झालो आहे. आपोआपच साऱ्या माडगूळकर परिवाराशी माझे स्नेहबंध जुळले. आनंद माडगूळकरांच्या एका लघुपटाच्या चित्रीकरणासाठी आम्ही साताऱ्यात गेलो होतो. अदालत वाड्यात चित्रीकरण होतं. मी त्यात अक्कलकोटच्या गजानन महाराजांच्या आजोबांच्या भूमिकेत होतो. दोन दृश्यांमध्ये चित्रीकरणासाठी काही वेळ लागत होता. आनंद, त्यांचे सहकारी राजू कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी आम्ही गप्पा मारत होतो. विषय गीतरामायणाकडे वळला आणि आनंदजींनी गीतरामायणात समावेश न झालेले पण रामायणात असलेले काही प्रसंग मला सांगितले. त्याक्षणी मनात एक संकल्पना साकारू लागली - आपण या प्रसंगांवर गीतरचना का करू नये? ही संकल्पना साकारली तर महाराष्ट्रवाल्मिकी ग. दि. माडगूळकर, संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी आणि गीतरामायण ह्यांना अभिनव आदरांजली ठरेल...

चित्रीकरण सुरु झालं. आजोबा (म्हणजे मी) आपल्या नातवाला वेदऋचांची संथा देत आहेत असा प्रसंग. माझ्यासमोर काही कागद होते. लेखणी होती. कागदावर आपोआपच अक्षरे उमटू लागली -

हनुमंता मम निरोप घेऊन
ये भरताला सत्वर भेटून ||
एक तपाहूने काळ लोटला
शक्य असे की भाव बदलला
राजलोभही मनी निपजला
सूक्ष्म दृष्टीने घ्यावे उमजून ||
मी नच स्पर्शिन राज्यपदाही
सत्य अंशभर असेल काही
भरत भोगू दे राज्यपदाही
झणी वनांतरी जाई परतून ||

बघताबघता गीत साकारलं आणि मला त्या दिवसापासून विविध रामायणं वाचण्याचा, त्यातील प्रसंग निवडण्याचा आणि त्यावर गीतरचना करण्याचा छंदच जडला.

योगायोगानं त्याच काळात आकाशवाणी मुंबई क्रेंद्राच्या संगीत विभागाचे प्रमुख, सुप्रसिद्ध संगीतकार श्री. प्रभाकर पंडित आणि 'रसिक' या संस्थेचे श्री. विजय केळकर यांचा परिचय झाला. परिचयाचं स्नेहात रूपांतर झालं. माझ्या गीतरचना प्रभाकर पंडितांनी स्वरबद्ध करण्याचं आणि विजय केळकर व त्यांच्या सर्व सहकारींनी सादर करण्याचं ठरवलं. मी गीतरचना करू लागलो. गदिमा, बाबूजी आणि गीतरामायण यांना अभिनव आदरांजली वाहण्याची आम्ही जणू शपथच घेतली. गदिमांच्या विषयी असणारी पूज्य भावना, बाबूजींविषयीचा आदर आणि गीतरामायणाविषयी अपार प्रेम हीच आमची प्रेरणा होती. त्यातूनच

अयोध्यापती रघुकुल दीपक सीताराम महान
गाऊया रामचरितगुणगान ||

हे प्रारंभीचं गीत, रामजन्माचं गीत आणि तीनचार गीतं कागदावर उतरली. प्रभाकर पंडितांनी ती स्वरबद्ध केली आणि अचानक मला अमेरिकेला माझ्या मुलींकडे जावं लागलं. आता कार्यक्रमाचं काय? देहानं मी अमेरिकेत होतो, पण मनानं आणि बुद्धीनं रामायणात आकंठ बुडालो होतो. जाताना रामायणावरील आवश्यक पुस्तकं बरोबर घेतली होतीच. प्रसंग निवडणं, त्यावर रचना करणं, ई-मेल माध्यमाद्वारे मुलींच्या मदतीनं विजय केळकरांकडे पाठवणं आणि त्यांनी गीतं प्रभाकर पंडितांकडे सुपुर्त करणं, त्यांनी ती स्वरबद्ध करणं, गायकांकडून बसवून घेणं हा सिलसिला सुरूच होता. बघताबघता पंधरा-सोळा गाणी पूर्ण झाली. 'आता भैरवीचं गीत लिहा' असा पंडितांचा आदेश आला. मी गीतरचना केली -

हृदयमंदिरी राम जपावा, असो जीवनी राम
श्रीराम जयजय राम , श्रीराम जयजय राम ||
प्रातःकाली राम स्मरावा
माध्यान्हीला राम विसावा
संध्यासमयी रामच ध्यावा
अखेरच्या श्वासात असावा
जानकी जीवन राम ||

मी अमेरिकेत असतानाच पुण्यात मनोहर मंगल कार्यालयात 'रामचरितगुणगान' चा पहिला कार्यक्रम रंगला. पुणेकर रसिकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पुढे त्याचे विविध गावी २५ प्रयोग झाले. मध्यंतरी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रामचरितगुणगानचे संगीतकार श्री. प्रभाकर पंडित, २८ डिसेंबर २००५ रोजी अचानकपणे हे जग सोडून निघून गेले. आम्ही त्यांना श्रद्धांजली म्हणून 'रामचरितगुणगान' ही ध्वनीमुद्रीत सीडी काढली. पुढे मुंबई दूरदर्शनवर M2G2 या कार्यक्रमात रामचरितगुणगानचा कार्यक्रम रामनवमीच्या प्रसंगी सादर झाला. आमच्या भारद्वाज प्रकाशनातर्फे 'श्रीरामायण गीतकथा' हे सचित्र पुस्तक प्रकाशित झालं. एक एक करत आमच्या मनीच्या इच्छा सफल-संपूर्ण झाल्या. गदिमांचा मी 'एकलव्य शिष्य'. अल्पांशानं का होईना, मी काही रचना करू शकलो ह्या जाणिवेनं मनात समाधान दाटून आलं.

बालपणापासूनच गदिमा, सुधीर फडके आणि गीतरामायण यांनी माझ्यावर जे कलासंस्कार केले त्याचेच हे फळ आहे, अशी माझी श्रद्धा आहे. माझ्यासरखेच गदिमा, बाबूजींचे अनेक 'एकलव्य शिष्य' गावोगावी आहेत, याची मला खात्री आहे. या अनेकांची धारणा हीच आहे - गदिमा, बाबूजी स्कूलचे आम्ही नम्र विद्यार्थी !

गाणी आणि आठवणींचे
मनी उतरले अलगद पक्षी
स्मृतीजलावर पदचिन्हांची
नाजूक हळवी तरंग नक्षी
चैत्रबनातील नाद वेणूचा
तनामनातील मोर नाचवी
अभंग अक्षर साहित्याची
सुरेल गंधित नित्य पालवी
गदिमा तुमच्या प्रतिभास्पर्शे
गीतामधुनी अमृतधारा
गाणी आणि आठवणींनी
उजळून गेला मनगाभारा

गुरुवर्य गदिमा आणि सुधीर फडके - माझा मनगाभारा तुमच्या गीत नंदादीपाने सतत उजळत राहो, मनी मानसी गीतरामायणाची अनेक पारायणे घडोत, आपल्या ह्या 'एकलव्य शिष्याच्या मस्तकावर आपली आशीर्वचने असोत, हीच विनम्र प्रार्थना !

प्रकार: 

<<
माझ्यासरखेच गदिमा, बाबूजींचे अनेक 'एकलव्य शिष्य' गावोगावी आहेत, याची मला खात्री आहे. या अनेकांची धारणा हीच आहे - गदिमा, बाबूजी स्कूलचे आम्ही नम्र विद्यार्थी !
>>

Very True! There are teachers that we formally learn from. There are teachers that we get inspired and choose to learn from!

Good Article as always!

'रामचरितगुणगान' च्या वरील ओळी किती सहजसुंदर आणि लयबद्ध आहेत. >> +१ गदिमांची सहजसुलभता आठवण्याएव्हढ्या ! एकदम मनापासून उतरलेल्या वाटतात.

अरे मस्त आहे हे.
रामचरितगुणगान' च्या वरील ओळी किती सहजसुंदर आणि लयबद्ध आहेत. >> +१ गदिमांची सहजसुलभता आठवण्याएव्हढ्या ! >> +१ गदिमांच्या गीतरामायणाची असंख्य पारायण केल्येत, आणि जवळजवळ सगळी गाणी पाठ आहेत. हे पुस्तक वाचायची उत्सुक्ता आहे. कुठे उपलब्ध होईल?

सुरेख लेख... आणि खरच काव्य अगदी सहज, ओघवतं... प्रासादिक वाटतं आहे.
कुठे मिळेल पुस्तक, रे चिनुक्स?

वाह! सुंदर काव्य आहे..गदिमांची आठवण करून देणारं! ह्या लेखाबद्दल आभार चिनूक्स!

चिन्मय

खुप छान. लेखनशैली अगदी ओघवती आहे श्री. रानडयांची.

एका चांगल्या साहित्याची आणि कवी ची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद.

प्रिया

खुपच सुरेख. संपूर्ण लेख हा गदिमा व बाबुजींच्या प्रेमापोटी व त्यांच्या एकलव्यासारख्या शिष्यानी लिहीलेला जाणवत आहे. सर्व रचना तर अप्रतिमच.

गदिमा भरभरून देत होते आणि ते मी माझ्या फाटक्या झोळीत साठवण्याचा ध्यास घेतला होता. ग. दि. माडगूळकर, राजा परांजपे, आणि सुधीर फडके या त्रिमूर्तीचे चित्रपट वारंवार पाहणे ही माझ्यासाठी आनंदपर्वणीच असायची. 'पेडगावचे शहाणे', 'लाखाची गोष्ट', 'पुढचे पाउल', 'ऊनपाऊस', 'जशास तसे', 'रामजोशी' हे सारे चित्रपट शालेय वयातच अधाशासारखे पाहिले होते.>>
वा!! हे वाचल्यावर मला माझे वडिलच लिहीत आहेत असे वाटले. वडिलांच्या आवडीमुळे व Ecko Radio/सिलोन मुळे लहान वयातच अशा कला ऐकायचे भाग्य लाभले. विविधभारतीवरील अनेक कार्यक्रम, बिनाका/सिबाका गीतमाला/गीतरामायण्/कुंदनलाल सहगल यांची गाणी व बरोब्बर एक तारखेला 'खुश है जमाना आज पहेली तारीख है' हे गाणे लागणारा काळ अनुभवणार्‍या लोकांचा हेवा करावा तेव्हढा कमी आहे. तुमच्यासारख्या एकलव्यांमुळेच ते आमच्या पुढच्या पिढीला थोडेफार ऐकायला मिळाले व अनुभवायला मिळाले. हा वारसा असाच पुढे चालत राहो. Happy

सुंदर लेखन ..

गीतं ऐकण्याची आणि पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे .. Happy

अज्ञानाबद्दल माफी, पण "प्रासादीक" म्हणजे काय?

आणि

पुढचे/पुढचं पाऊल अशा नावाचे दोन पिक्चर होते का मराठी?

(नविन कलर पुढचं पाऊल म्हणजे यशवंत दत्त, मानसी मागीकर असलेला आव्हान मालिकेसारखा ना? एकाच या जन्मी जणू गाणं असलेला? अशाच नावाचा राजा परांजप्यांचाही पिक्चर होता का? मला माहितच नव्हतं .. आय मिस मराठी चित्रपट टेलीकास्ट फ्रॉम मुंबई दूरदर्शन .. स्मित)

एकाच या जन्मी जणू गाणं असलेला? अशाच नावाचा राजा परांजप्यांचाही पिक्चर होता का?..>>
असावा. एकाच या जन्मी गाणे असलेला सिनेमा १९८५ सालचा तर राजा परांजपे यांचा १९५० सालचा आहे.

गीतरामायण … अहाहा काय ते शब्द काय ती गीतं आणि काय त्यांच्या चाली . हनुमंतावरची 'असा हा एकच श्री हनुमान' आणि 'पेटवी लंका हनुमंत' हि २ गाणी माझी फेवरीट .

माय अंजनी पवनपुत्र हा ज्येष्ठ दास बलवंत
चिरंजीव हे नाम जगती या जय जय हनुमंत |>>>

हे गीत पूर्ण झालं असेल तर कृपया audio ची लिंक द्यावी

भरत भोगू दे राज्यपदाही
झणी वनांतरी जाई परतून ||>>>
म्हणजे रामाला राज्याची हाव नवती वाटतं . मग सीतेला वनात सोडताना हि हाव निपजली कि काय ?