जोश्या

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
1’

"जोश्या, काय रे कसा आहेस?"
- सोन्या मी ठिक आहे की तु काय म्हणतोस? जेवलीस काय? काय केलं आज कमल नं?

शनीवार/रविवारी हा ठरलेला संवाद, माझ्यात आणि माझ्या वडलांच्यात Proud
धक्का बसला का? अहो माझ्या वडलांना सगळे जोश्याच म्हणतात. मग मी कसं काय म्हणणार नाही? लाजे काजेस्तव कधी तरी अहो बाबा म्हणते. म्हणजे तसं अलिकडे अहो जाहो च करते, पण मध्यंतरी बरीच वर्ष कधी मी अहो म्हणालेच नाही त्यांना.. कायम 'अरे जोश्या'च.. कधी चुकून अहो जाहो म्हटलंच तर 'रागवलीस काय पद्मे?" अस प्रश्न यायचा...

आजच का बाबा इतके आठवतायत? कारण उद्या म्हणजे २८ मार्चला त्यांचा वाढदिवस. ७१ पुर्ण होऊन ते ७२ व्या वर्षात पदार्पण करणार. मनात अनेक विचार आले. आपण लहानाचे मोठे झालो... ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांच्याबद्दल मनात अनेक भावना असतात. त्या ना कधी त्यांना बोलून दाखवल्या ना कधी शब्दबद्ध केल्या. त्या निमित्ताने आज दिवसभर मन मागं मागं जात राहिलं आणि मी मला दिसलेले बाबा आठवत राहिले.

मला त्यांचं पहिलं जे रूप आठवतंय ते बर्‍यापैकी रागिट आणि शिस्तबद्ध. सगळं वेळच्या वेळी. तेव्हा आई पण होती. घरात टिव्ही नव्हता आणि बुधवारचा चित्रहार पहायला आम्ही गल्लीच्या पा$$$र त्या टोकाच्या एका घरात गेलो.... बरं ८.३० ला परतावं ते नाही, ९ पर्यंत तिथेच वेळ घालवून हातासरशी ये जो है जिंदगी पाहूनच घरी परतलो. तेव्हा आम्ही एकाच खोलीत रहात होतो,आणि ती खोली माळ्यावरची होती. त्याला पाडायचा दरवाजा होता. आम्ही घरी जाईतो दरवाजा पाडलेला होता. आम्ही जेवलो सुद्धा नव्हतोच. वडलांनी वरूनच सांगितलं 'जिथे टिव्ही पाहिलात, तिथेच जेवून या.' पण आईने मोठ्या विनंत्या करून आम्हाला घरात घेतलं आणि जेवू घातलं. पुन्हा चित्रहार पाहण्याचं नावही काढलं नाही. तितका धाकच होता त्यांचा.

पण आईचं ८१-८२ साली खूप मोठं आजारपण झालं आणि त्यात त्यांनी स्वतःला झोकूनच दिलं. मिरजेला मिशन हॉस्पिटलमध्ये एक वर्ष आई काविळीमुळे अजारी होती. तेव्हा तिथे त्यांनी ऑलमोस्ट वर्षभर मुक्कामच केला होता. वरचा प्रसंग हा आईच्या त्या अजारपणा नंतरचा.
आईचं दुखणं जेव्हा पुन्हा उद्भवलं तेव्हा तिने फार काळ तग धरला नाही, अवघ्या ४ दिवसात ती गेलीच. आम्ही समाजाच्या दृष्टिने अगदीच आईविना उघड्या पडलो .पण आम्हाला वडिल होते आणि तेच आमचं
सगळं काही होते आणि अजूनही आहेतच.

आई गेल्यावर ते जे बदलले ते बदललेच. माझे आणि माझ्या मोठ्या बहिणीचे केस आईने मोठ्या हौसेने वाढवले होते. माझे तर चांगले कमरेपर्यंत होतेच सुदैवाने सरळ होते, पण तायडीचे केस अत्यंत जटिल आणि कुरळे. आई गेल्यानंतरचे ८ महिने अत्यंत हालात काढले आम्ही. बाबांना सर्व स्वयंपाक येत असल्याने आमचं जेवण खाणं तेच करत. इतकंच काय वेळप्रसंगी तायडीने घातलेल्या वेण्या (मोस्टली मागचा भांग वाकडा पाडला) यासाठी नेहमी भांडणं होत, मग ती वेणी सोडून बाबा रिबिनी बांधून देत. कधी डबा करायला जमलं नाही तर २ रूपये देऊन 'आज ज्योतिर्लिंगवाल्याकडे भेळ खा' असं सांगायचे. त्यांची आणि आमची शाळा एकाच आवारात असल्याने सुट्टीत जाऊन २ रुपये घेण्याची मुभा असेच.

तेव्हा अत्यंत लहान असल्याने, बायको १३ वर्षाचा संसार अर्धवट टाकून गेलेल्या माणसाला, पदरातल्या दोन मुली वाढवताना मनाचं किती बळ एकवटावं लागलं असेल याची जराही कल्पना नव्हती. आज विचार करण्याची थोडी कुवत आल्याने फक्त विचारच करू शकतेय, कल्पना नाही करू शकत.

खोटं नाही सांगत अजिबात पण खरंच जेव्हा लोक म्हणतात की काहीही असो, मुलिंना आई हवीच. पण मला तसं नाही वाटत. आई तर हवी च पण वडीलही आईपेक्षा कमी नसतात.

त्यांनी कधी आम्हाला मारलं नाही किंवा फार भिती वाटेल असं ओरडलेत असं मला आठवत नाही. फक्त एक मार आठवतोय तो पहिला आणि शेवटचा. त्यांनी एका मासिकातून संत ज्ञानेश्वरांचा फोटो कापून कपाटावर लावला होता. मी त्याला दाढी मिशा काढल्या होत्या आणि बाबांचा प्रचंड मार खाल्ला. तो सोडता आई गेल्यास त्यांनी आम्हाला कधी साधं ओरडलं सुद्धा नाहीच.

संस्कार म्हणून कधी कोणतीही गोष्ट हाताला धरून हे असं कर तसं कर म्हणून शिकवली नाही. जे असेल ते सगळं त्यांच्या कृतीतून शिकवलं. लोकांना माणूस म्हणून वागणूक देणं, राष्ट्राच्या संपत्तीचा आदर आणि योग्य तो उपयोग करणं हे त्यांच्या कृतीतून आम्ही शिकलो. ज्या खोलीत असू त्याच खोलीतला दिवा सुरू ठेवणं. दुसर्‍या खोलितला जर दिवा सुरू असेल तर मध्येच 'थांब मी जरा पलिकडच्या खोलिचा लाईट काढून येतो' असं म्हणत उठून जायचे. बिल्डिंगला कॉमन नळ असल्याने कुणाची बादली वाहताना दिसली तर जाऊन बंद करायचे. कोणती गोष्ट कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही म्हणून अनेक गोष्टी जपून ठेवायचे त्यात खिळ्या मोळ्यापासून जुनी पेनं, अगदी बरण्या पण असत. Happy

देवधर्म आमच्याकडे फार होते असं नाही पण रोजची पुजा अर्चना, आणि गुरूवारी बाबांचा उपास आणि त्या दिवशी संध्याकाळी साईबाबांची धुपाची वेगळी पूजा आणि मग त्यासोबत रात्री गोड पदार्थ प्रसाद म्हणून. गुरूवारी आज प्रसाद काय? असा एक खिरापत ओळखण्याचा असतो तसा कार्यक्रमच असायचा. तेव्हा अंबाबाईच्या देवळात प्रवचनाचे कार्यक्रम होत असत. बाबांचे अत्यंत आवडते शेवडे गुरूजी प्रवचनाला असले की बाबा रोज न चुकता जायचेच. आणि कधी कधी आम्हाला पण घेऊन जायचे. रोजच्या पुजेच्या वेळी म्हटलेली स्तोत्रं अपोआप कानावर पडून पाठ झाली ती अजून पाठ आहेतच.

कोल्हापूर तसं शहर म्हणून आत्ता खूपच बदललं असेल तेव्हा मात्र ते वेगळंच होतं. लवकर नीजणे लवकर उठणं ही तर मेजर शिस्त. आत्ता नोकरीत वेळापत्रक अत्यंत विचित्र असल्याने अवेळी जेवणं अवेळी झोपणं/ उठणं झालं की फार अपराधी वाटतं. पण आमच्या लहानपणी सगळं वेळपत्रक अगदी ठरलेलं. वेळच्या वेळी झोप, वेळच्या वेळी खाणं. इतर घरात रात्री ९-१० ला जेवणं होत, आम्ही तर ९.३० झोपेच्या आहारी गेलेलो असायचो. शेजार पाजारचे म्हणायचे 'बामणं लई लवकर झोपत्यात' पण त्याचा फायदा आता कळतोय हे नक्कीच. याचं श्रेय बाबांनाच.

बचतीचा धडा सुद्धा मला बाबांनीच शिकवला. एकदा शाळेत नोटिस आली. शाळेनं संचयिनी सुरू केली आहे ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी नावं व्याघ्राम्बरी सरांकडे द्यावीत. मी बाबांना नोटीस सांगितल्यावर त्यांनी जरूर भाग घे. (त्यावेळी शाळेत काहीही असलं तरी त्यात 'भाग घेणे' हे महत्वाचे असे) तर मुळात ही संचयिनी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मुलीनी बचत खातं उघडायचं होतं शाळेत. आणि शाळेतले शिक्षकच ते पाहणार होते. अभिमान वाटतो सांगताना की बाबांनी मला फार प्रोत्साहन दिलं आणि दर शुक्रवारी २० रूपये/ १० रूपये जे असतील ते आणि पासबूक काढून ते मला हातात देऊन म्हणायचे की आज शुक्रवार आहे ना? मग हे पैसे संचयिनीत भर आणि पासबुकात नोंद करून आण. इयत्ता दहावी पर्यंत ते अकाऊंट सुरू होतं. आणि नवल म्हणजे नियमित बचत करणारी म्हणून मला संचयिनीचं सर्टिफिकिट सुद्धा मिळालं. त्या व्यतिरिक्त सुद्धा मी माझ्या बाबांना कायम प्लॅनिंग करताना पाहिलंय. महिना अखेरिला कधी त्यांचा हात रिकामा झालाय असं चित्र नसे. घरखर्च, दिवाळी, बचत सगळं काही साचेबद्ध. ते काय करायचे ते आम्हाला कधीच सांगितलं नाही. पण कळत नकळत आपण पैशांच्या बाबतीत आपलं अंथरूण पाहून पाय पसरायचे हे आपोआप शिकलोच. नाहीतर आजूबाजूला हफ्त्यावर कपाट्/टिव्ही इ. वस्तू घेणारी कुटूंबं कमी नव्हती. 'ऋण काढून सण साजरे करू नयेत' असं ते नेहमी म्हणायचे, ते तेव्हा कळायचं नाही पण आता कळतंय आणि पटतंय सुद्धा.

आम्ही तुला काय कमी पडू दिलं? असा आजकालचे आईवडील प्रश्न विचारताना दिसतात. हॉटेलिंग्/खेळणी/कपडे/ व्हिडिओगेम्स... आणि अनेक अगणित गोष्टी यात जोडता येतील. आमच्या लहानपणी अशा गोष्टी नव्हत्याच. चैन होती ती फक्त खाण्याचीच. पण ती चैन म्हणजे हॉटेलात जाण्याची नव्हे. माझ्या कोल्हापूरातल्या एकूण आयुष्यात माझ्या आठवणीनुसार आम्ही मोजून बाहेर २ वेळा जेवलेले असू. हो २ वेळाच. नंतर एकदा ११ वीत असताना बाबांनी मला ३०० रूपये देऊन मित्र मैत्रिणींना पार्टी दे. असं सांगितलं होतं तेव्हा मी खास लोकांना चोपदार मध्ये डोसा आणि पाटलांचं कॉकटेल खाऊ घातलं होतं. तो एकच वाढदिवस होता जेव्हा मला ६०० रूपये मिळाले. ३०० ड्रेस ला आणि ३०० पार्टिला. बाकी सर्व वाढदिवसांना फक्त ड्रेस. अन्यथा इतर गोष्टींची कधी कमतरता नाही. सिझनला सर्व फळं अगदी कंटाळा येईपर्यंत. द्राक्षं, कलिंगडं, आंबे अगदी भरपूर. इतर कोणतेही हट्ट पुरवले असतील नसतील पण खाण्याचे हट्ट कधी आडवले नाहीत त्यांनी आमचे.

आमच्या जोश्यांच्यात कोणी गायक नाही पण आवाज बरे सगळ्यांचे, त्यातून गाण्याची आवड. आईकडे तर पक्के गायक सगळे. खुद्द आई सुद्धा. त्यामुळे आम्ही बरं गायचो/गातो. इयत्ता ६ वीत शाळेच्या स्नेहसंमेलनात भावगीत गायनाच्या कार्यक्रमात 'मी भाग घेऊ का हो बाबा?' असं म्हणल्यावर एक मोठा 'हो' आला. आणि तु आशा भोसलेंचं एका तळ्यात होती बदके पिले सुरेख म्हण... असं ही सांगितलं. ते गाणं मी कधीच ऐकलं नव्हतं. पण बाबांनी ते गाणं मला शिकवलं आणि तयार करून घेतलं. त्या वर्षी भावगीत गायनात माझा २रा नंबर आला आणि मला एक पेन बक्षिस मिळालं. Happy जुन्या हिंदी गाण्यांची आवड सुद्धा त्यांनीच लावली.

अशा किती आणि कोणत्या गोष्टी आठवू आणि लिहू? संपता संपणार नाहीत, पण आज आयुष्य थोडं फार का होईना जे कळलंय ते त्यांच्या नकळत घालून दिलेल्या धड्यांमुळेच. मोलकरणीला आपल्या बरोबर बसवून चहाचा कप देणारे बाबा आठवू का ती भांडी घासत असताना तिच्या मुलिचा अभ्यास घेणारे बाबा आठवू? पैशापेक्षा माणसं अधिक जोडणारे बाबा, नकळत पणे धार्मिक गोष्टी शिकवणारे बाबा, लहान वयातच पैशाची बचत शिकवणारे, गाणं शिकवणारे आणि रात्री ७ नंतर बाहेरून आलं तर धारेवर धरणारे सुद्धा.

आता माणूस म्हणजे सगळंच चांगलं असतं असं नाही, काळानुसार काही गोष्टीत मतभेद ही होतात/ खटके पण उडतात. पण त्यांचं वय आणि ते ज्या परिस्थितीत वाढले किंवा आम्ही वाढलो ती लक्षात घेता त्यांच्या काही सवयी खटकत असल्या तरी त्या योग्य वाटतात. जसं की गणेशोत्सवात गणेशाची मुर्ती घेऊन कुंभारगल्ली पासून घरापर्यंत चालत जाणे हे पण या वयात. अहो रिक्षा करायची ना बाबा. असं म्हटलं की 'हूं रिक्षावाले ३० रूपये घेतात.' अहो मग बिघडलं कुठं? एखाद वेळेस घेऊ दे की... पण त्याला त्यांची हरकत असणारच. प्रमाणबद्ध खर्च केले म्हणूनच आम्ही पुण्यात राहू शकलो. त्यांच्या नकळत केलेल्या संस्कारामुळेच बचत करून घर घेऊ शकलो.

आज आयुष्यात जे काही उभे आहोत ते निव्वळ त्यांच्यामुळेच. अनेक वर्ष फक्त विचारच केला बाबांचा पण आज खरंच त्यांना सर्व गोष्टींचं श्रेय जाहिरपणे द्यायचं आहे.

उद्या येणारा वाढदिवस, येणारी सर्व वर्षं, जोश्याला निरोगी आणि आनंदी आयुष्य देवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

2015_01_11_17.43.21__1427486551_77194 (1).jpg

अतिशय सुरेख लिहिलं आहेस. पाणी आलं डोळ्यांत वाचता-वाचता !
तुझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो Happy

बाबांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा! Happy
लेख अगदी मस्त, ओघवत्या भाषेत लिहिला आहे. व्यक्तीरेखा फार छान चितारली आहेस...

खुप छान लिहिलं आहेस. तू फार मोजकं लिहितेस पण जे काही लिहितेस ते अगदी आतून आलेलं असतं आणि वाचकाच्या आतपर्यंत उतरतं देखिल!

बाबांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा! हा लेख हा फक्त तू आणि तुझे बाबा यांच्यापुरताच सीमित नाही. पुढे अनेक वर्षांनी माझ्या लेकिच्या मनात असं काहीसं वाटायला हव, तर मी तिचा बाबा म्हणुन आज कसं वागायला हवं हे सांगणारा धडा आहे.

फार सुंदर लिहिलंय. बाबांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा.
आई वडिलांच्या लहान-सहान आणि त्या वेळी त्रासिक वाटणार्‍या गोष्टी (सल्ले, ठराविक पद्धतीने वागण्याचे धडे वगैरे) किती योग्य होत्या हे आपण मोठं झाल्यावर जाणवतं.... स्वतः आई-बाबा झाल्यावर तर अधीकच Happy

खूप छान लिहिले आहेस दक्षिणा. अगदी मनापासून.
बऱ्याच ठिकाणी माझ्या बाबांची आठवण आली.:)

काकांना खूप खूप शुभेच्छा.
जीवेत् शरद: शतम्.

खूप सुंदर. मनाला भिडलं अगदी.

तुझ्या वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

खूप छान लिहीले आहे. आवडले.
धाक वाटणाऱ्या बाबांना "ए जोश्या" म्हणायला तुम्ही कशी सुरुवात केली असेल याबद्दल कुतूहल वाटते.
प्रश्न खूप खाजगी किंवा आगावू वाटला तर क्षमस्व.

दक्षुताई, वडिलांबद्दलचा आदर आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता प्रत्येक शब्दातून प्रतित होत आहे. नितांत सुंदर लिखाण.

तुमच्या वडिलांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

मस्त लिहिले आहेस दक्षे वाचुन डोळ्यात . पाणी आले .बाबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभो ..

Many Happy Returns of the day.

Best wishes not only for the day or a year but forever!

फार छान लिहीलस दक्ष्स. धुसर दिसायला लागल वाचता वाचता.. तुझ्या बाबांना वा.दि.च्या शुभेच्छा. Happy
तुझ्या उलट आमची केस.. अन आई वडील दोघे सारखेच असतात हे अगदी पटले.

वाचता वाचता डोळे भरून आले... खुप छान लिहीलं आहेस! + १११११
येणारी सर्व वर्षं, वडिलांना निरोगी आणि आनंदी आयुष्य देवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

खुपच छान लिहिलं आहेस.
मनापासुन. Happy

आवडलच.
बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy

प्यारको प्यारही रहने दो कोई और नाम ना दो ! ...

अतिशय सुन्दर...

जोशीबुवांना वाढदिवसाच्या भयंकर शुभेच्छा......

खूप छन लिहिले आहेस दक्षीणा. बाबा.ंना खूप शुभेच्छा.
तुझा आणि बाबांचा हा फोटो खूप छान आहे. सदैव असाच हात तुझ्या डोक्यावर राहो.

अतिशय सुंदर लिहीलं आहेस. ग्रेट आहेत तुझे बाबा! फोटोही फार मस्त आला आहे.
तुझ्या बाबांना निरोगी आणि दीर्घ आयुष्याकरिता अनेक शुभेच्छा!

खुप छान लिहिलय बाबांबद्दल..
देव त्यांना शतायुषी करो.. वाढदिवसाच्या त्यांना भरपूर शुभेच्छा .. फोटो मस्तच Happy

सगळ्यांत आधी, बाबाना खुप खुप शुभेच्छा!
किती सुंदर लिहीलायस! वाचताना डोळ्यात पाणी आलं. पप्पांची खुप आठवण आली! आणि खरं बोललीस आई वडील सांगुन संस्कार करण्यापेक्षा ते आचरणात आणुन संस्कार करतात, ते मनावर बिंबतं!

Pages