झुकिनी (Zucchini) / भोपळा + बटाटा भाजी.

Submitted by आरती on 23 February, 2015 - 13:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

झुकिनी - २,
बटाटा - १,
हि.मीरची+आलं+लसुण पेस्ट - १ चमचा,
गोडा मसाला - १/४ चमचा,
धणे+जिरे पुड - २ चमचे,
मिठ - चवीप्रमाणे,
फोडणीसाठी तेल्,मोहरी,हळद्,हिंग.

क्रमवार पाककृती: 

बटाटा आणि झुकिनी सालं काढुन चिरुन घ्या. तेल-मोहरीची फोडणी करुन त्यात हळद, हिंग घाला. आच कमी करुन धणे-जीरे पुड, गोडा मसाला घाला, डावाने एकदा सारखे करुन बटाटे आणि झुकिनी घाला. मीठ घालुन हलवुन घ्या. झाकण ठेउन शीजु द्या. मउ शिजल्यावर आता त्यात आलं+लसुण्+मिरची पेस्ट घाला, थोडे गरम पाणी घाला आणि एक उकळी येउ द्या. कोथिंबीर घाला.

zucchini.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांना एक वेळच्या जेवणाला पुरते.
अधिक टिपा: 

१. बटाटे पातळ चिरा कारण झुकिनी लवकर शिजते. नाहीतर मग हे आधी, ते नंतर असा सगळा उद्योग करावा लागेल.
२. भाजी शिजताना झाकणावर पाणी ठेउन तेच नंतर भाजीत ओतले तरी चालेल.
३. अशीच दुधी भोपळ्याची पण करता येते. भोपळा न आवडणार्‍यांना पण आवडते असा अनुभव आहे.

माहितीचा स्रोत: 
न्यूजर्सीला माझ्याकडे स्वयपाकाला येणाऱ्या काकू.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळा प्रकार. करून बघते.
मी झुकिनी नेहमी भिजवलेली मुगडाळ + भरपूर लसणाची खमंग फोडणी+ चवीपुरते मीठ + गोडामसाला अशी करते. अंगासरशी रस्सा ठेवते. झुकीनीची सालं कधीच काढत नाही.(पोषणमूल्य वगैरे)

मस्त दिसतेय भाजी. झुकिनी आहे घरी. ट्राय करते आजच.
आमच्याकडे झुकिनीची भजीही आवडतात खूप. घोसाळ्यासारखी लागतात चवीला.

सायो, भजी करण्याचे सुचलेच नाही. करुन बघेन.

वत्सला आणि मराठी कुडी,
दोन्ही पा.कृ छान आहेत. दोन्ही करुन बघेन. बरेच नवीन प्रकार समजले या निमीत्ताने. मी फक्त ही भाजी आणि कधीतरी दाण्याचा कुट, मिरचीची फोडणी, लिंबु पिळुन कोशिंबीर करते.

वेगळंच कॉम्बिनेशन आहे! करून बघते.

>>मउ शिजल्यावर आता त्यात आलं+लसुण्+मिरची पेस्ट घाला, थोडे गरम पाणी घाला आणि एक उकळी येउ द्या.
यात आलं लसूण पेस्ट परतल्या गेली नाहीये. एका उकळीत कच्चा वास जातो का?

एका उकळीत कच्चा वास जातो का? >> पुर्ण जात नाही. पण परतुन चवीत होणारा बदल अपेक्षीत नाहीये. सगळ मिळुन एक चमचा(च) पेस्ट असल्याने फक्त वास लागतो, उग्र नाही होत भाजी.

छान झाली भाजी. पुढल्या खेपेस बटाटा अगदी नावाला टाकेन किंवा नाहीच टाकणार बघु कशी होते. नाहीतर दुसरे काहीतरी घालावे लागेल (त्याचा विचार करत आहे). थँक्स आरती.
आता वत्सलाच्या कृतीचा नंबर.

सायो, सुनिधी
धन्यवाद.

मेधा,
एकदा करुन बघ Happy