प्लम्स ची चटणी - असाच एक प्रयोग!

Submitted by maitreyee on 20 February, 2015 - 07:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२-३ प्लम्स, किसलेला गूळ किंवा ब्राउन शुगर किंवा साखर - अर्धा ते पाउण वाटी, मीठ , हिरव्या मिरच्या २-३ , तेल , हळद, तीळ अर्धा चमचा.

क्रमवार पाककृती: 

ही अशी कुठली खास पाककृती वगैरे नाही, एक प्रयोग केला अन रिझल्ट आवडला म्हणून इथे देतेय Happy
नवर्‍याने अचानक प्लम्स चा एक बॉक्स आणून टाकला. इंपल्सिव्ह शॉपिंग !! Happy तसेही ते घरात कुणाचं फेवरेट फळ नाही, त्यात हे प्लम्स होते आंबट, २ दिवस ठेवून जरा मऊ झाले पण आंबट ते आंबटच!! इथे सध्या इतकी थंडी आहे, आंबट काही खायचा विचार पण करवत नाहीये ! म्हणून म्हटलं फेकून द्यायच्या ऐवजी काहीतरी वापर करावा. या प्रयोगाचे फळ (की फळावरचा प्रयोग ?) ही चटणी! Happy
तर छोट्या पॅनमध्ये २-३ चमचे तेल गरम करून जिरे, हळद घाला, हि. मिरच्यांचे तुकडे अन २-३ प्लम्स चे बारीक तुकडे करून त्यात सुमारे दोन मिनिटे परता. मी सालासकटच घेतले प्लम्स. प्लम्स शिजल्यावर/ परतले गेल्यावर गॅस बंद करून ब्राउन शुगर / साखर / किसलेला गूळ घाला अन नीट हलवून मिक्स करा. दुसरीकडे तीळ भाजून त्याची पूड करा. मग थंड झालेलं प्लम्स चे मिक्स्चर, तिळाची पूड, चवीप्रमाणे मीठ हे मिक्सर मधे फिरवा. पाणी घालायची गरज नाही. चटपटीत चटणी तय्यार !

plumchutney.JPG

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणाची चटणी साधारण एक ते दीड वाटीभर होते. प्रमाण आपल्या आवडीनुसार !
अधिक टिपा: 

याची चव साधारण टोमॅटोच्या चटणीसारखी लागते , पण एक किंचित फ्रूटी फ्लेवर येतो तो मस्त लागतो.
रंगावरून जरा क्रॅनबेरी सॉस / चटणीची पण आठवण येते - चव तशी नाही.
होल व्हीट ब्रेड वर , पोळीशी , कोल्ड कट सॅडविचेस मधे अशी कुठेही वापरता येते.

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतेय. प्लम्स आमच्याकडेही एरवी येत नाहीत. ह्या चटणीकरता म्हणून मुद्दाम आणावे लागतील.
सध्या घरात क्रॅनबेरीची चटणी आणि कारल्याची चटणी अशा दोन्ही केलेल्या उरलेल्या आहेत.

या प्रयोगाचे फळ (की फळावरचा प्रयोग ?) ही चटणी .. Happy

मस्त प्रयोग! ती हळद का घातलीस? मला ती प्लमशी संयुक्तिक नाही वाटली.

भारी दिसतेय चटणी. प्लम्स आंबट निघाले की बिचारे शहीद होतात. आता पुढल्यावेळी आणले गेले की करून बघेन नक्की.

रच्याकने, प्लमला मराठीत/हिंदीत आलु बुकारा/बुखारा म्हणतात ना? शब्दखुणांमध्ये घालून ठेव.

क्रॅनबेरीज माझ्यासाठी टू मच आंबट कॅटेगरीत येतात त्यामुळे ती चटणी खपत नाही घरी. पण ही छान वाटतेय. करून बघीनच.

वॉव! मैत्रेयी मस्तच दिसतीये चटणी . करून पहायला हवी.
(प्लमची एक जरा सेन्टी आठवणः माझी आई माझ्याकडे रहायली आली होती तेव्हा मी तिला प्लमचा साखरांबा करून खायला घातला होता. तो तिला खूप आवडला होता पोळीशी खायला. गंमत म्हणजे तिला थोडं( खरं म्हणजे बर्‍यापैकीच )विस्मरण होतं पण पुढील वर्षी जेव्हा पुन्हा जेव्हा तिला माझ्याकडे आणलं तेव्हा ती मला म्हणाली: मागील वर्षी तू काहीतरी लाल फळाचं गोड काहीतरी केलं होतं ते आहे का? मग मी पुन्हा बाजारातून प्लम आणून ते गोड करून तिला घातलं. नंतर काही ती पुन्हा माझ्याकडे येऊ शकली नाही.)

मस्त पाककृती. माझ्या सासूबाई अशीच चटणी करतात, फक्त त्या प्लम्स शिजवत नाहीत. तीळ न घालता त्या या चटणीत सुके खोबरे घालतात. प्लम्स आंबट नसतील तर चाट मसाला / आमचूर सुद्धा घालतात.
अशीच चटणी लाल द्राक्षांची सुद्धा करता येते, यम्मी लागते Happy

मानुषीताई, अजून २-३ प्लम्स उरलेत माझ्याकडे, साखरांब्याचा विचार करायला हरकत नाही!
संपदा, तुझ्या त्या चाट मसालाच्या उल्लेखाने अजून एक आयडिया परवा मास्टरशेफ बघताना कळली ती आठवली. एका मुलीने त्यात स्ट्रॉबेरी वापरून पाणीपुरीचं पाणी बनवलं होतं. प्लम वापरून ते पण मस्त होईल असे वाटत आहे!! Happy
वेका, हो पीच पण वर्क होईल असे वाटतेय.

ओह कूल मैत्रेयी! :). मास्टर शेफचा तो एपिसोड बघायला हवा. पण स्ट्रॉबेरीज घातलेलं पाणीपुरीचं पाणी कसं लागेल? ट्राय करायला हवं. मागे पुण्यातील खादाडीवर रसम वगैरे टेस्टचं पाणीपुरीचं पाणी मिळतं असं वाचलं होतं. ते सुद्धा ट्राय केलं पाहिजे.

अग त्या एपिसोड मधे २-३ इन्ग्रेडियन्ट्स दिले होते आणि त्यांचा मुख्यतः वापर करून मील बनवायचं होतं, तिला स्ट्रॉबेरी मिळाली होती , तेच वापरून स्टार्टर बनवणं अपेक्षित होतं. असो, गप्पा भरकटायला लागल्या Happy

आज थोड्या वेगळ्या पद्धतीनं ही चटणी केली. तेलात आलं बरीक चिरून परतलं, त्यात हिंग, भाजलेल्या जीर्‍याची पूड आणी तिखट घालून छान हलवून बारीक चिरलेले प्लम्स घातले. प्ल्म्स चांगले शिजल्यावर त्यात मीठ, काळं मीठ आणि ब्राऊन शुगर घातली. एक वाफ काढून गॅस बंद केला. गार झाल्यावर मिक्सरमधे वाटली. आलं खिसून घेतल्यास आणि प्लम्स अगदी बारीक चिरल्यास मिक्सरमधे वाटायची गरज पडणार नाही. कढईतच मॅश करता येतील. खूप मस्त किंचीत आंबट, गोड, चटपटीत चव आली आहे. प्लम्सच्या चटणीची आयडीया दिल्याबद्दल धन्यवाद मैत्रेयी :).

मी पण केली, चटणी साठीच खास प्लम आणले होते, त्यातला एक पिकलेला होता त्यामुळे गोड जॅम सारखी चव आलिय.. सगळ्याना खुप आवडली,स्पेशली लेकिला काल ब्रेफा,लन्च्,डिनर सगळ्याला प्लम चटणी जिन्दाबाद होत.

फोटो काढला नाही आता परत आणलेत्,केली की फोटो काढते.

Pages