शिकाम्बा-मशाम्बा

Submitted by आतिवास on 19 February, 2015 - 05:26

कोणत्या गोष्टी कधी आठवतील, काही सांगता येत नाही.

त्या दिवशी मी होते मॅक्वेन्जेरे (Macuenjere) नामक एका गावात. निमित्त होतं ‘स्कूल कौन्सिल’ प्रशिक्षणाचं.

पालकांचा आणि पर्यायाने समाजाचा शिक्षणव्यवस्था सुधारण्यात सहभाग वाढावा, शाळेने कार्यक्रम आखताना आणि राबवताना समाजाचा सहभाग घ्यावा आणि या माध्यमातून “सर्वांसाठी (प्राथमिक) शिक्षण” हे उद्दिष्ट साध्य व्हावे असा मोझाम्बिक सरकारचा प्रयत्न. या स्कूल कौन्सिलमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी असतात, काही शिक्षक असतात आणि काही पालक. दर तीन वर्षांनी स्कूल कौन्सिलची निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच लोक आहेत. पण तो आजचा विषय नाही. मुलींच्या शिक्षणाशी संबंधित एका प्रकल्पावर मी सध्या ‘स्वयंसेवक’ म्हणून काम करते आहे. त्यामुळे या कौन्सिलचं प्रशिक्षण पाहणं; त्याचा आढावा घेऊन त्यात योग्य ते बदल सुचवणं; ते अमंलात येतील हे पाहणं – हे माझं (अनेक कामांपैकी) एक काम.

या गावात जाताना जेव्हा मुख्य रस्ता सोडून आम्ही उजवीकडे वळलो; तेव्हा डाव्या बाजूला ‘शिकाम्बा’ नामक नदीवर बांधलेलं धरण असल्याची आणि त्या धरणाला ‘शिकाम्बा लेक’ म्हटलं जातं अशी माहिती उत्साही सहका-यांनी दिली होती. “आज वेळ नाही आपल्याकडे, पण पुढच्या भेटीत जमवू आणि जाऊ थोडा वेळ तरी ‘शिकाम्बा लेक’ परिसरात” असंही आमचं आपापसात बोलणं झालं. त्यामुळे ‘शिकाम्बा’ शब्द मेंदूत रुजला.

आज माझ्या सोबत स्थानिक एनजीओचे जे सहकारी आहेत, त्यांच्यातल्या कुणालाच इंग्रजी भाषा समजत नाही. त्यामुळे मी पोर्तुगीज भाषा किती आत्मसात केली आहे याची आज कसोटी आहे. प्रशिक्षण सुरु झालं आणि पहिल्याच मिनिटात माझ्या लक्षात आलं की मला स्थानिक लोकांचं ‘पोर्तुगीज’ नीटसं समजत नाहीये. चौकशी केल्यावर स्थानिक भाषा ‘शुटे’ (Chute) असल्याचं कळलं. मग लोक काय बोलतात ते मला पोर्तुगीजमध्ये अनुवाद करून सांगायची आणि माझं पोर्तुगीज लोकांना त्यांच्या भाषेत सांगण्याची जबाबदारी बेलिन्या आणि किटेरिया या दोघींनी घेतली आणि फार अडचणी न येता माझा लोकांशी संवाद सुरु झाला.

लोक काय काम करतात; शेती आहे का; त्यात काय उगवतं; ते पुरतं का कुटुंबासाठी; कुणाकुणाच्या मुली या शाळेत आहेत; माध्यमिक शिक्षणासाठी मुली पुढे कुठे जातात; प्राथमिक शाळेतून मुलींची गळती मोठ्या प्रमाणात होण्याची कारणं; कुटुंबात साधारण किती लोक असतात; स्त्रियांचं आरोग्य ..... असंख्य प्रश्न. मी भारतीय असल्याचं त्यांना सुरुवातीलाच सांगितलं आहे मी; त्यामुळे (मी पाहुणी असल्याने) आमची मस्त चर्चा चालू आहे.

एक सत्र संपून दुसरे सुरु होताना एखादा खेळ घ्यावा म्हणून बेलिन्या पुढे येते. पण स्थानिक स्त्रिया (ज्या स्कूल कौन्सिलच्या सदस्य आहेत) त्या बेलिन्याला थांबवतात आणि माझ्याकडे हात दाखवत काहीतरी म्हणतात – त्यावर सगळा समूह हसत तत्काळ सहमत होतो. मी प्रश्नार्थक नजरेने किटेरियाकडे पाहते. “भारतातल्या मुली खेळतात असा एखादा खेळ तुम्ही घ्या आमचा” अशी त्या लोकांची मागणी आहे.

एक क्षण मी विचारात पडते. प्रशिक्षणात दोन सत्रांच्या मध्ये घेतले जाणारे हे खेळ छोटे आणि गमतीदार असतात. लोकांचा कंटाळा घालवायचा हाच त्याचा मर्यादित उद्देश असतो. आता इथं त्या खेळाचा अनुवाद करत बसले तर मजा जाणार. मला एकदम ‘शिकाम्बा लेक’ची आठवण येते.

मी पुढं येते. सगळ्यांना गोलात उभे राहायला सांगते. ‘शिकाम्बा सगळ्यांना माहिती आहे का’ ते विचारते – अर्थात ते त्या सगळ्यांना माहिती असतं. मी जे शब्द बोलेन त्यानुसार कृती करायची हे मी समजावून सांगते आणि मग मी ‘शिकाम्बा’ शब्द उच्चारून पुढे उडी मारते. त्यांना समजतं; अनुवादाची गरज नाही. मग मी म्हणते ‘मशाम्बा’ आणि मागे उडी मारते. त्यांना समजतं; अनुवादाची गरज नाही. सगळे हसतात. मी ‘शिकाम्बा’ म्हटलं की सगळे पुढे उडी मारतात आणि मी ‘मशाम्बा’ म्हटलं की सगळे मागे उडी मारतात. खिडकीतून अनेक लहान मुलं कुतूहलाने पाहताहेत आमच्याकडं – विशेषत: माझ्याकडं!

दोन चार उड्या झाल्यावर मी ‘मशाम्बा’ म्हणत पुढे उडी मारते ....अनेकजण माझं अनुकरण करतात.
मग हास्याची एक लाट.

आम्ही पुढे काही मिनिटं खेळतो.
“शिकाम्बा–मशाम्बा” म्हणजे आपलं “तळ्यात-मळयात”.
पोर्तुगीज भाषेत ‘मशाम्बा’ म्हणजे शेत.

संध्याकाळी मी तिथून निघते तेव्हा शाळेचा आवारात काही मुलं “शिकाम्बा-मशाम्बा” खेळताहेत.

लहानपणी मी ज्या गावात होते तिथल्या तळ्याची मला फार आठवण येते.
आता लवकारात लवकर ‘शिकाम्बा लेक’ला जायला हवं....
**
('अनुभव' असा वेगळा विभाग न दिसल्याने/ आहे की नाही हे माहिती नसल्याने लेख 'ललित' विभागात प्रकाशित करत आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सुमुक्ता, ललिता-प्रीति, स्वाती२, रांचो, श्री, नंदिनी, सीमंतिनी, पुरंदरे शशांक, कांदापोहे आणि टीना.

मस्त अनुभव. खरच किती वेगवेगळे देश अनुभवता तुम्ही Happy

वरचे प्रतिसाद वाचून तुमच्या ब्लॉगला भेट दिली. अफगाण मालिका एकदम थरारक आहे.

छान Happy