निरंजनाची कविता
झोप येईना येईना, कविता सुचली निरंजना |
शब्दापुढे रचणे शब्द, हाचि लागला तया नाद|
निरंजनाचा कपडा भगवा, आत निरंजन रे नागवा ||
कौतुक, स्तुती, वाद- विवाद, उपेक्षा आणि अपेक्षा ह्याहीपलिकडे जाणार्या शाश्वत परिमाणाशी नातं जोडू शकणारी रॉय किणीकरांची कविता. गहिर्या चिंतनशीलतेशी नातं सांगणारी, अचूक मोजक्या शब्दांच्या सहाय्याने विलक्षण असा कायमस्वरुपी असर मनावर टाकणारी आणि मनाला चुटपूट लावणारी. काही उमजलं आहे, समजलं आहे ही जाणीव होता होता, पार्यासारखा निसटून गेला, अशा अर्थांची काहीशी अनुभूती देणारी. गूढ आणि तितकीच मोहिनी घालणारी समर्थ शब्दकळा ल्यायलेली, पण काहीशी अस्थिर वाटणारी. वाचता, वाचता प्रत्येक शब्दामागे अस्वस्थ करुन सोडणारी. तिच्याकडे आयुष्याची एक कणवयुक्त, समंजस अशी समज आहे. अबोल अशी सहनशीलता आहे, तिला ठाऊक आहे की,
हा मार्ग कठीण पण आहे रे कनवाळू
जरी पायाखाली रुते जराशी वाळू..
एक भंगलेपणाचा, उध्वस्त, तरीही खानदानी असा भाव आपल्या सभोवताली लपेटून आपल्याच नादात शब्दांच्या आधाराने वावरणारी, आणि शब्दांच्या पलिकडे काही अव्यक्त खेद, रुखरुख उराशी जपणारी ही कविता.
काजळरेखेवर लिहिले गेले काही
मौनाची फुटली अधरावरती शाई..
खेद, विषाद आणि त्यातूनही कधीतरी हळूच डोकावणारा, आयुष्यासंबंधीच्या प्रगल्भ आणि मनस्वी अशा चिंतनातून निर्माण झालेला, स्नेहशील, तरीही थोड्याश्या उदासपणाची झालर असलेला असा मिश्किल भाव ल्यायलेली अशी ही कविता. जीवनातल्या विसंगतींवर, मानभावीपणावर आणि एकूणच आयुष्याच्या क्षणभंगुरतेवर एक प्रकारच्या उदासीन आणि अलिप्त वृत्तीने भाष्य करणारी. कशाला काही शोधायचे? तिला कसलीच अपेक्षा नाही, आशा नाही. सारे काही शेवटी लय पावणार आहे ह्याची एक पक्की खूणगाठ तिने बांधली आहे, पण तरीही, तिच्या वेदनेमध्येच तिच्या बेहोषीची धुंदीदेखील तिने जपली आहे.
बघ चाफा सुकला मावळला तो गंध
दे सोडून वेड्या शोधायाचा छंद..
ह्या कविता म्हणजे जणू विविध रंगाचे फटकारे. कधी जमलेले, कधी विस्कटलेले, पण तरीही अंगभूत सौंदर्यामुळे ल़क्ष वेधून घेणारे. एकटेपणाची, मृत्यूची जाणीव झालेली, व्यवहारी मानभावीपणाचा उबग आलेली आणि त्या अनुभवांबद्दल कडवट भाष्य करणारी ही कविता. आयुष्य जगताना आलेल्या अनुभवांतून, पाहिलेल्या विसंगती आणि सर्वच बर्या वाईट अनुभवांच्या जाणिवा सोबतीला घेऊन आपल्या आयुष्याचा जमाखर्च शब्दकळेतून मांडायला बसलेली आणि तरीही 'लिहिशील किती रे, स्पंदनक्षण श्वासांचे' हे भान बाळगणारीदेखील हीच कविता. तिला मौनाचे सौंदर्य उमजले आहे, मौनातले अर्थ ती उमगून गेली आहे आणि शब्दांचे क्षणभंगुरत्वदेखील.
अर्थाला असते बंधन का शब्दांचे
कोसळून पडले इमले अक्षरतेचे..
कधीकधी उत्तररात्र वाचताना वाटते, तत्वज्ञान, विज्ञान वा अजून काही, ही कविता काय शोधते आहे? जीवनाचा अर्थ? स्वतःचे अस्तित्व? हरवलेले, शाश्वत असे- निदान तसे भासणारे तरी, प्रेम? गर्दीतही आपला एकलेपणा जपणारी आणि एका विलक्षण धुंदीत त्या एकलेपणाचे सतत राखलेले भान मिरवणारी ही कविता. तिचे प्रेमही असेच आधे- अधुरे, धुंद आहे! सापडता, सापडता कधीतरी हरवलेले, हाती येता येता सुटलेले आणि एका वळणावर जणू मनातल्या सर्व मुलायम, मृदू भावना, संवेदना जपत तसेच गोंधळून दिशाहीन भिरभिरलेले... हाती गवसले नसले तरी तिचे प्रेमाशी राखलेले इमान सुटलेले नाही.
जे दिसते नसूनी, असूनी दिसले नाही,
अंगाई गाते दिक्कालाची आई..
असे सारे मनातले व्यापताप सहन करुनही मस्त कलंदर असणारी ही कविता. तिच्यापाशी भोग आहे, त्यागही आहे. आसक्तीही आहे आणि वैराग्यही आहे. असह्य अविनाशी वेदनाही आहे आणि समंजस वृत्तीने आलेली निवृत्त वृत्तीही आहे. आता तिला कसलीच वांछा उरलेली नाही. तिच्या मनाची वेदना कोणालाच समजू शकत नाही हे तिचे आर्त तिने आता पक्के स्वीकारुन आपल्या मनाशीच बांधून घेतले आहे. तिचे आयुष्य जगली आहे, तिचे लढे तिने पेलले आहेत आणि पराभवही स्वीकारून पचवले आहेत. आता तिला लागले आहेत ते परतीचे वेध, पण तिची तक्रार नाही, सारे हलाहल पचवूनही आयुष्याच्या सुंदरतेवर तिचा चिरविश्वास आहे, लोभ आहे.
तिचे शेवटचे मागणेही अबोल. आर्जवी. आता मिटायचे तर आहे, पण कसे?
ये मिटूनी जाऊ दंश जोवरी ओला,
मृद्गंध पांघरुन घेऊ चंद्र उशाला..
इतकी स्वप्नवत चिरनिद्रा भंग करण्याचे धारिष्ट्य कोणीही करु नये...
साहित्य संस्कृतीच्या ऑक्टोबर- नोव्हेंबर २०१४ च्या अंकात पूर्वप्रकाशित.
खूपच छान.
खूपच छान.
वा! सुरेख!
वा! सुरेख!
छान लिहिले आहेस!
छान लिहिले आहेस!
अतिशय सुरेख निरूपण बरेच
अतिशय सुरेख निरूपण
बरेच वर्षापूर्वी किणीकर वाचले होते, आता पुन्हा एकदा- अधिक जाणतेपणे वाचायला उद्युक्त करेल हे लेखन. अप्रतिम अनुभव दिलात.
अतिशय सुरेख निरूपण > +१ छान
अतिशय सुरेख निरूपण > +१
छान लिहिता तुम्ही.
किती अलवार लिहिलंय शैलजा ....
किती अलवार लिहिलंय शैलजा .... केवळ ग्रेट .... खूपच आवडलं लिखाण...
या कविता प्रत्यक्ष केव्हा वाचणं होणार कोण जाणे .....
धन्यवाद
धन्यवाद
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
शैलजा, तुमचे लिखाण तुमच्या
शैलजा, तुमचे लिखाण तुमच्या विचारांची आणि संवेदनशील मनाची खोली दाखवतात. खुपच सुंदर लिहीता. लिहीत रहा.