नमस्कार मंडळी!
सांगण्यास आनंद होतो की, दोन वर्षांपूर्वी मायबोलीवर खुले आवाहन करून वंचित व देवदासींच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेला स्पोकन इंग्लिश शिकवण्याचा आपला स्वयंसेवी उपक्रम आजही सातत्याने व यशस्वीपणे चालू आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे मायबोलीकर स्वयंसेवक वेळात वेळ काढून दर शनिवारी नूतन समर्थ प्राथमिक विद्यालयात शिकणार्या इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलामुलींना 'हसत खेळत स्पोकन इंग्लिश'चे धडे देतात. या वर्षी नूतन समर्थ संस्थेने या उपक्रमात सहभागी सर्व स्वयंसेवकांचे व मायबोलीचे कौतुक करायचे ठरविले. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी 'श्री समर्थ पुरस्कारा'चे गौरवचिन्ह व श्रीफळ देऊन या शिक्षकांचा संस्थेने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. पैशांच्या किंवा वस्तूंच्या रूपाने शाळेला व येथील विद्यार्थ्यांना मदत करणारे अनेक हात समाजातून पुढे येत असतात. परंतु आपला वेळ, श्रम व आपले ज्ञान या मुलांसोबत वाटणार्या आणि त्यांना गेली दोन वर्षे सातत्याने, प्रेमाने, आपुलकीने आणि कळकळीने स्पोकन इंग्लिश शिकविण्याचे काम करणार्या स्वयंसेवकांची प्रशंसा संयोजकांनी आपल्या भाषणात केली. मायबोलीचे श्री दीपक ठाकरे, अरुंधती कुलकर्णी, मानसी, सायली व दीपाली या प्रसंगी उपस्थित होते.


या स्नेहसंमेलनात इयत्ता सातवीच्या मुलांनी मानसीने मेहनत घेतलेले आणि ज्योतीने पाठांतर करवून घेतलेले एक इंग्रजीतून बसवलेले लघुनाट्य सादर केले. मुलांनी आपले संवाद धीटपणे व आत्मविश्वासाने म्हटले.
इंग्रजी भाषेचा बागुलबुवा न बाळगता मुलांमध्ये इंग्रजी बोलण्याबद्दल निर्माण झालेला हा आत्मविश्वास हे सर्व स्वयंसेवक शिक्षकांच्या प्रयत्नांचे, तळमळीचे व मुलांच्या मेहनतीचेच फळ आहे.
दिनांक २८ जानेवारी रोजी बुधवार पेठेतील 'पुणे सार्वजनिक सभे'च्या सभागृहात पार पडलेल्या या स्नेहसंमेलनात मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम साजरे केले. अतिशय मर्यादित साहित्य, साधने वापरूनही ही मुले ज्या आनंदात व उत्साहात आपली कलाकारी पेश करत होती त्यांचा तो उत्साह सपशेल वाखाणण्यासारखा होता. उपस्थित माजी शिक्षिका व मुख्याध्यापिकांप्रती असलेला स्नेह व आदरही त्यांच्या वागण्यातून दिसत होता. शाळेचे अनेक माजी विद्यार्थीही या प्रसंगी आपल्या शाळेचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.
मायबोलीवर अनेक उपक्रम सदोदित चालूच असतात. परंतु एकमेकांना अगोदर कधीही न भेटलेले अनेक मायबोलीकर या उपक्रमात प्रत्यक्ष भेटीद्वारे, एकमेकांशी चर्चा विचार करत सहभागी झाले व आजही होत आहेत. समाजाप्रती आपले काही देणे लागते या जाणिवेतून दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले हे कार्य आता त्यांच्याही आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाले आहे. मुलांना शिकवता शिकवता स्वयंसेवकही या मुलांकडून खूप काही शिकून जात आहेत, समृध्द होत आहेत.
कार्यक्रमात टिपलेली ही काही क्षणचित्रे:
(प्रकाशचित्रे सौजन्य: मानसी, सायली, दीपक)
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)


९)

या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा देणारे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत करणारे अनेक मायबोलीकर आज या स्वयंसेवकांच्या मागे भक्कमपणे उभे आहेत, वेळोवेळी त्यांना उत्तेजन देत आहेत. सर्वांच्या शुभेच्छा व साथ या उपक्रमाला अशीच मिळत राहो हीच सदिच्छा!
वा, तुम्हा सर्वांचे खुप
वा, तुम्हा सर्वांचे खुप कौतुक. फोटो छान.>>>> +१
Pages