उत्तिष्ठत् जाग्रत् - उपनिषदांचा अभ्यास - भाग १

Submitted by पुरंदरे शशांक on 18 January, 2015 - 21:58

उत्तिष्ठत् जाग्रत् - उपनिषदांचा अभ्यास - भाग १

"उपनिषदांचा महिमा अनेकांनी गाइला आहे. कवीने म्हटले आहे, हिमालयासारखा पर्वत नाही आणि उपनिषदांसारखे पुस्तक नाही. पण माझ्या दृष्टीने उपनिषद् हे पुस्तकच नाही. ते एक प्रातिभ दर्शन आहे. शब्दात मांडायचा प्रयत्न केला असला तरी शब्द लटपटले आहेत. पण निष्ठा मात्र उमटली आहे. ती निष्ठा ह्रदयात भरुन आणि शब्दांच्या सहाय्याने शब्द बाजूस सारुन अनुभव घ्यावा तेव्हाच उपनिषद् उमगते.
माझ्या जीवनात गीतेने आईचे स्थान घेतले आहे. ते तर तिचेच आहे. पण मला हे माहित आहे की उपनिषद् ही माझ्या आईची आई आहे. त्या श्रद्धेने उपनिषदांचे मनन-निदिध्यासन गेली बत्तीस वर्षे माझे चालले आहे."

आचार्य विनोबांच्या या जबरदस्त शब्दांनी उपनिषदांची पहिली ओळख करुन दिली गेली. या गोष्टीलाही आता कित्येक वर्षे लोटलीएत. "अष्टादशी" या पुस्तकात विनोबांनी अठरा उपनिषदांतील श्लोकांचे मराठीत भाषांतर केले आहे. (अर्थातच श्रीमती कुसुम देशपांडे यांनीही यातील अनुवादाकरता बरेच कष्ट घेतले आहेत, ज्याचा सविस्तर उल्लेख पुस्तकाच्या सुरुवातीलाच आहे.) हे सारे वाचत असताना केवळ थक्क झालेल्या माझ्या मनाला उपनिषदांची जी भुरळ पडली आहे ती तशीच आहे, किंबहुना वाढतच आहे.

हजारो वर्षांपूर्वी अनेक ऋषि-मुनींनी "सत्य" शोधण्याचा जो अचाट, अफाट आणि अतिशय ह्रदयंगम प्रयत्न केला आहे त्याला काही उपमाच देता येत नाही - इतके हे विलक्षण कार्य आहे. कोणत्या साधनांनी त्यांनी हा शोध घेतला तर - केवळ त्या सत्याचा घेतलेला एक जबरदस्त ध्यास, त्याकरता केलेले सखोल मनन-चिंतन आणि आसपासच्या निसर्गाचे सहाय्य... बस्स. भौतिक साधनांची अजिबात रेलचेल नसलेल्या त्यांच्या जीवनात केवळ निसर्ग, नैसर्गिक रहाणीमान एवढेच असताना त्यांना या सत्याबद्दल कशी काय जिज्ञासा उत्पन्न झाली ? जीवनाच्या मूलभूत गरजा भागवतानाच सर्वसामान्यांची जिथे अक्षरशः फरफट होत असेल तिथे या ज्ञान-जिज्ञासू मंडळींमधे ही सत्य शोधण्याची अनिवार उर्मी कशी काय निर्माण झाली असेल? कुठलीही ज्ञान मिळवण्याची आधुनिक संसाधने (ग्रंथालये, आंतरजाल, इ.) नसताना त्यांची ज्ञानसाधना कशी काय वर्षानुवर्षे चालली ? गुरुकुल पद्धतीमुळे गुरुकडून शिष्याकडे हे सारे ज्ञान जात असणार हे जरी खरे असले तरी पिढ्यानपिढ्या याची कशी काय जपणूक झाली हे देखील मोठे कोडेच वाटते. आजकाल ज्याचा आपण संस्कृती, संस्कृती म्हणून उद्घोष (जो केवळ उद्घोषच राहिला आहे असे कधी कधी विषादपूर्वक म्हणावेसे वाटते !) करतो त्याची किती उदात्त तत्वे त्यांनी सांगून ठेवली आहेत याचेही केवळ आश्चर्यच वाटत रहाते. .

अनेक भौतिक प्रलोभने आपल्याला सभोवती भूल घालण्यासाठी टपलेली असताना त्यातील श्रेयसकर गोष्टी कशा निवडाव्यात याचा सर्वांगसुंदर विचार या मंडळींनी केला होता, नव्हे जगून दाखवला होता.

सत्याचा शोध घेणारी ही सारी मंडळी अतिशय रसिक होती, जीवनाच्या सर्व कलांना जाणून होती. तत्वविवेचनाबरोबर निसर्गाची सूक्ते गात होती. या मंडळींनी उदाहरणे दिलीत ती आसपासच्या निसर्गातली. यांनी गोडवे गायले ते विविध ऋतूंचे, वसुंधरेचे. एवढेच काय अगदी साध्या गवताचेही त्यांना विशेष कौतुक होते.....
कांडात् कांडात् प्ररोहन्ती परुषः परुषः परि
एवा नो दूर्वे प्रतनु सहस्त्रेण शतेन च

(हे दूर्वे ! कांडा-पेरांनी वाढणारी अशी तू माझ्यासाठी पसर. शेकडो कांडांनी, हजारो पेरांनी !)

शिष्यत्व देताना या ऋषिंना मोल होते ते केवळ ज्ञान-तृषार्त वृत्तीचे, सत्य शोधन व्रताचे (कुठल्याही कुल-वर्णाचे नव्हे ...)

इथे गार्गी सारखी ब्रह्मवादिनी याज्ञवल्क्यासारख्या ब्रह्मज्ञाबरोबर वाद-विवादात उतरताना दिसते.

इथले ज्ञानाचा शोध घेणारे निसर्गातल्या साध्या साध्या घटकातून (ऋषभ, पाणकावळा, अग्नी) यांच्याकडून ज्ञान मिळवताना दिसतात.

या मंडळींनी जीवनाची अध्यात्मिक पातळी अतिशय उंच ठिकाणी नेऊन ठेवली हे जरी खरे असले तरी सामाजिक पातळीचीही चिंता यांनी वाहिली - या सर्वांचे उदात्त चिंतन मन लुभावणारे आहे, बुद्धीला चकित करणारे आहे तसेच अतिशय भावपूर्णही आहे.

उत्तिष्ठत् जाग्रत् असा यांचा हाकारा आपल्या संवेदनशील मनाकरता, चित्ताकरता, बुद्धीकरताच आहे हे आपल्याला नीट जाणून घ्यावे लागेल - हे केवळ शब्द नाहीयेत - चिरंतन सत्य जाणलेल्या क्रांतदर्शी ऋषिंची ही वचने आहेत हे समजून घेण्याकरता आपल्यालाही काही पूर्व तयारी करावी लागेल. कुठलेही पूर्वग्रह बाजूला टाकून केवळ त्या सत्यान्वेषी विचारांचा मागोवा घ्यायचा आहे. विनोबा म्हणतात तसे ती व्यक्त झालेली निष्ठा, तो सद्भाव अंतःकरणात साठवायचा असेल तर आपले ह्रदयही तेवढे संवेदनशील आणि निर्मळ असणे अतिशय गरजेचे आहे.

शब्दांच्या सहाय्यानेच ही सारी उपलब्धि होत असताना त्या शब्दांनाही बाजूला सारुन टाका आणि मुख्य अनुभव घ्या असा घोष जेव्हा ही उपनिषदे करतात तेव्हा आपसूकच डोळे केव्हा मिटतात आणि चित्ताला, ह्रदयाला केवळ एक अनुनूभूत शांति, तृप्ति केव्हा व्यापून रहाते हे कळतही नाही ... याचा अनुभवच घ्यावा लागेल - एकांतात, निसर्गाच्या सान्निध्यात ...

या उपनिषदांचे जे प्रसन्न, गंभीर, अर्थपूर्ण शांतिमंत्र आहेत त्याचे स्मरण करुन पुढचे भाग पाहूयात ..

ॐ वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता | मनो मे वाचि प्रतिष्ठितम् | अविरावीर्म एधि | वेदस्य म आणी स्थः | श्रुतं मे मा प्रहासी: | अनेनाधीतेन अहोरात्रान् सन्दधामि |ऋतं वदिष्यामि | सत्यं वदिष्यामि | तन्मामवतु |तद् वक्तारमवतु | अवतु माम् | अवतु वक्तारम् | अवतु वक्तारम् ||
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः |

(ॐ माझी वाणी मनामध्ये प्रतिष्ठित झाली आहे. माझे मन वाणीमध्ये प्रतिष्ठित झाले आहे. हे प्रकाशरूप आत्मन् ! माझ्यासाठी प्रकट हो ! (हे मन आणि वाणी !) माझ्यासाठी वेद आणायला समर्थ व्हा. मी ऐकलेले (ज्ञान) माझा त्याग न करो. या अध्ययनाने मी दिवस आणि रात्र जोडीन. मी ऋत बोलेन. मी सत्य बोलेन. ते माझे रक्षण करोत. ते बोलणाराचे रक्षण करोत. ते बोलणाराचे रक्षण करोत.)

(स्थापिली मनात वाचा, वाचेत मन स्थापिले ।
प्रकट हो आत्मतेजा तू, जाणण्या योग्य जे असे ॥
जाणले जे मी कानांनी, जावो ना कधी सोडून ।
अहोरात्र करीन मी एक, बोलेन इष्ट, सत्य मी ॥
बोलणे इष्ट नी सत्यच ते, रक्षू दे मज सर्वथा ।
बोलतो इष्ट नी सत्यच त्या, रक्षू दे तेच सर्वदा ॥ - श्री. नरेंद्र गोळेकाका)

ही खरे तर साधी प्रार्थना आहे. पण यातील भाव फार अपूर्व आहे. प्रार्थना करताना नुसती वाणीने करायची नाही तर त्यात मन पाहिजे -मनापासून केली जाणारी तीच प्रार्थना - त्यामुळे मन आणि वाणी एकरुप होवो असे म्हटले आहे.

कोणाला उद्देशून ही प्रार्थना आहे - प्रकाशरूप आत्मन् - इतर कोणत्याही देवतेला, ईश्वराला उद्देशून ही नाहीये - ही थेट आत्मन् ला उद्देशून केलेली आहे. आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान.

या ज्ञानाचे साधन म्हणजे मन आणि वाणी. त्यामुळे या साधनाची देखील शुद्धी त्यांना महत्वाची वाटत आहे - म्हणून परत प्रार्थना करीत आहेत - हे ज्ञान मिळवण्यासाठी हे मन, ही वाणी समर्थ असू देत, सजग असू देत - शुद्ध असू देत.

हे अध्ययन म्हणजे सतत घेतलेला ध्यास आहे (आजच्या सारखे ५-६ तासांचे ठराविक अध्ययन नाही).

मी सत्यच सांगेन, सत्यच बोलेन पण ते सत्यच माझे रक्षण करो (इथे त्या सत्याप्रती निर्माण झालेली आदरभावना विलक्षण आहे. ही या प्रार्थनेतील खरी गोडी आहे)

अशा प्रार्थनेतून असीम शांतिच लाभणार .. अशा शांत वृत्तीनेच या उपनिषदातील सूक्ते समजण्याची शक्यता वाढत जाईल ..
-------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ - अष्टादशी, परंधाम प्रकाशन, संपादन - विनोबा, अनुवाद - कुसुम देशपांडे
--------------------------------------------------------------------------------------------------
सर्व उपनिषदे संस्कृतमधे आहेत. त्यामुळे उत्तम संस्कृत जाणणाराच खरा तर याचा अभ्यासक असणार. माझ्यासारख्या असंस्कृताला, अजाण माणसाला हे काय कळू शकणार ? पण विनोबांनी या अष्टादशीच्या निमित्ताने मजसारख्या अजाण मंडळींना हा सोपा घास भरवण्याचे कार्य माऊलीच्या कनवाळूपणाने केले आहे. संस्कृत जरी कळत नसले तरी या उपनिषदांमधे जे ज्ञान, सत्य सांगितले आहे ते मात्र कोणालाही आकर्षित करणारेच आहे. या शब्दांमधे जे एक पावित्र्य, माधुर्य आणि अर्थगर्भता आहे ते मला माझ्या सद्गुरुंमुळे थोडेफार लक्षात आले. अशा ज्ञानाने, सत्याने परिपूर्ण अशा या उपनिषदांवर काही भाष्य करावे अशी माझी अजिबात पात्रता नाहीये. तरीही मला जे भावले, आवडले ते आपल्यासमोर मांडायचे धाडस करीत आहे ते केवळ उपनिषदांवरील प्रेमापोटीच. हे सारे मांडत असताना आपल्या सारख्या विद्वान, जाणकार मंडळींना जर काही चुका जाणवल्या तर त्या नि:संकोचपणे सांगाव्यात अशी नम्र प्रार्थना.
इति ||
--------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! ही प्रार्थनाच इतकी महान वाटते आहे की केवळ ही रोज मनापासून म्हटली तरी आपल्या अनेक प्रश्नांना उत्तरं मिळतील! ऋत ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? योग्य? अथर्वशीर्षात पण आहे ना ऋतं वच्मि| सत्यं वच्मि|
तुम्ही खूप छान समजावून सांगत आहात. पुभाप्र!

खुप सुंदर धागा.

मला वेद, उपनिषदे आणि त्यासंलग्न इतर साहित्य यांबद्दल खुप कुतुहल आहे. खुप वेळा वाचनात काही सुभाषिते, काही वाक्ये येतात पण त्यांचा अर्थ लागत नाही. या धाग्यामुळे बरीच माहिती मिळेल ही आशा Happy

पुढचे लेख पटापट येऊ द्या .

सर्वांचे मनापासून आभार .... Happy

ऋत ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? >>>>> माझ्या एका संस्कृत-तज्ज्ञ मित्राने सांगितलेला अर्थ
ऋत = वैश्विक सत्य

शशांक सर,
सकाळी सकाळी इतका सुंदर, उत्तम लेख वाचायला मिळाला..it made my day!
उपनिषदांबद्दल आणखी वाचायला निश्चितच आवडेल. प्लीज आणखी लिहा.

शशांक जी...

मनाला विलक्षण अशी शांती लाभत गेली हा लेख वाचत असताना. हजारो वर्षांची अत्यंत अभ्यासपूर्ण अशी परंपरा लाभलेल्या ह्या ज्ञानमूलक ग्रंथांतील सूक्तांना तुम्ही व्यापक रूप देण्यासाठी तयार आहात याचा खूप असा आनंद होतो आहे आणि मला खात्री आहे की आपला हा प्रवास वाचकांच्या दृष्टीने आध्यात्माच्या शोधाचा खजिना सिद्ध होईल.

आचार्य विनोबा भावे अठरा उपनिषदांतील श्लोकांचे भाषांतर केले आहे असा उल्लेख आहे लेखात. मला वाटते उपलब्ध उपनिषदांची संख्या बरीच मोठी म्हणजे १७० च्या आसपासून असून त्यातील बरीचशी अथर्ववेदाला जोडलेली आहे...काळही वेगवेगळा आहे. संहिता आणि आरण्यके यांची प्रकरणे म्हणून नावाजली गेलेली वा माहितीतील उपनिषदे कदाचित जुनी असावी....अर्थात त्या प्रत्येकातील श्लोकभांडार आज सहजी उपलब्ध होईल असे नसावे. सद्यस्थितीत आचार्य विनोबांनी केलेले कार्यच आपल्या अभ्यासाला महत्त्वाचे मानले जाईल यात शंका नाही.

"...उपनिषदांमधे जे ज्ञान, सत्य सांगितले आहे ते मात्र कोणालाही आकर्षित करणारेच आहे...." ~ पूर्णपणे सहमत.

शशांकराव,

लेखमाला अप्रतिम होणार हे दिसतंच आहे! Happy

जाताजाता : मी ऐकलेला ऋतं चा अर्थ 'मनातलं सत्य' असा होता.

आ.न.,
-गा.पै.

चांगले आहे. उपनिषदांची ओळख होणे आवश्यकच आहे. हा ज्ञानयज्ञ यशस्वी होवो!

स्थापिली मनात वाचा, वाचेत मन स्थापिले ।
प्रकट हो आत्मतेजा तू, जाणण्या योग्य जे असे ॥
जाणले जे मी कानांनी, जावो ना कधी सोडून ।
अहोरात्र करीन मी एक, बोलेन इष्ट, सत्य मी ॥
बोलणे इष्ट नी सत्यच ते, रक्षू दे मज सर्वथा ।
बोलतो इष्ट नी सत्यच त्या, रक्षू दे तेच सर्वदा ॥

सुंदर!

express track वर घ्या ही लेखमाला Happy

पुढच्या भागाबरोबरच उपनिषदांची तांत्रीक (technical) ओळख करून दिली तर खूप उपयुक्त ठरेल.

उपनिषद्कालीन ऋषिंची जी पवित्र व अद्भुत वाणी आहे यामुळेच आपणा सर्व जाणकार, रसिक मंडळींकडून या पहिल्या भागाचे मनःपूर्वक स्वागत झाले आहे.

श्री. अशोकराव पाटील व श्री. गोळेकाका यांसारख्या ज्येष्ठ, अनुभवी व तज्ज्ञ मंडळींचे प्रेमाशीर्वाद लाभल्याने मी बराच आश्वस्त झालो आहे. हे आशीर्वाद सदैव असेच पाठीशी असोत. तसेच या अभ्यासात काही चूक आढळल्यास जरुर माझा कान धरावा ही प्रेमाची विनंती. Happy

श्री. गोळेकाकांनी उपनिषदातील शांतिमंत्राचा जो अप्रतिम गेय अनुवाद दिला आहे याच्या वर्णनाकरता माझ्याकडे शब्दही अपुरे आहेत - इतका तो जमलेला आहे. हा अनुवाद मूळ लेखात समाविष्ट करीत आहे.

सर्वांना शतशः धन्यवाद.

या सर्व उपक्रमात कोणाला काही भर टाकायची असल्यास स्वागतच आहे.

शशांक पुरंदरे.. हा धागा वाचायला खरोखर विलंब झाला माझ्याकडुन. अतिशय सुंदर मांडलय तुम्ही. खरच मी असा धागा असेल का किंवा असावा याची वाट पहात होते. कारण उपनिषद ही इतका मोठा खजिना म्हणुयात आपण आहे. आपल्याजवळ..काही गोष्टींमुळे काहीदे दुर्लक्ष झाले पण पुनश्च लोकांना महती पटेल अन ते या मौलिक ज्ञानाचा नक्कीच लाभ घेतील..पुनश्च आभार आपले Happy

ऋत = त्रिकालाबाधीत सत्य
असा अर्थ चालू शकेल काय?

नानबांमुळे धागा वरती आल्याने आज हा लेख वाचला. _/\_

खूप छान लिहिलं आहे. फक्त एक सुधारणा सुचवतो: ते 'उत्तिष्ठत जाग्रत' असं आहे. त्यात त चा पाय मोडलेला नको आहे.