The Romanov Sisters - हरवलेल्या जीवनाची कहाणी

Submitted by वेदिका२१ on 7 January, 2015 - 00:28

इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने १८३७ ते १९०१ या काळात इंग्लंडवर (आणि भारतावरही!) राज्य केलं. मुंबईतील व्ही.टी. स्टेशन - व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), कलकत्याचं व्हिक्टोरिया मेमोरियल आदी वास्तूंना याच व्हिक्टोरियाचं नाव दिलं गेलं होतं. या व्हिक्टोरियाने आपल्या मुलानातवंडांची लग्नं युरोपातील विविध राजघराण्यात लावून दिली. म्हणूनच तिला ’युरोपची आजी’ (Grandmother of Europe) असंही म्हणतात. पहिल्या महायुध्दाच्या वेळचा इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज हा व्हिक्टोरियाचा नातू (मुलाचा मुलगा) होता तर समोरच्या बाजूला जर्मनीचा Kaiser Wilhelm हाही व्हिक्टोरियाचा सख्खा नातूच (मोठया मुलीचा मुलगा) होता. इंग्लंडची सध्याची राणी एलिझाबेथ द्वितिय ही याच व्हिक्टोरियाची खापरपणती (पंचम जॉर्जची नात).

लेखिका Helen Rappaport च्या The Romanov Sisters या पुस्तकातील Romanov sisters या व्हिक्टोरियाच्या पणत्या- तिच्या दोन नंबरच्या मुलीच्या मुलीच्या मुली. पण त्यांचं नशिब एलिझाबेथ द्वितियपेक्षा खूप वेगळं निघालं.

रोमानोव्ह वंशाचा रशियाचा शेवटचा राजा (झार) निकोलस द्वितिय याच्या या चार मुली. ओल्गा, तातियाना, मरिया व ॲनास्तासिया. हे पुस्तक म्हणजे या चौघींची कलेक्टिव्ह बायोग्राफी आहे. निकोलस झारचा २०-२२ वर्षांचा शासनकाल, १९१७ सालची रशियन राज्यक्रांती आणि १९१८ साली या मुली, त्यांचे आईवडील व भाऊ यांचा झालेला रक्तरंजित शेवट - या सर्व काळाचं थरारक चित्रण या पुस्तकात आहे.

मुळात हेलन ही इतिहासाची आणि त्यातही व्हिक्टोरियन व रोमानोव्ह इतिहासाची अभ्यासक आहे. या विषयांवर आणखीही पुस्तकं तिने लिहिली आहेत. त्यामुळे हे लिखाण माहितीपूर्ण आणि अतिशय डिटेल्ड झाले आहे.
रशियन राज्यक्रांती, त्यानंतरची तिथली कम्युनिस्ट राजवट, दुसरं महायुध्द, कोल्ड वॉर, सोव्हिएत युनियनचे विघटन आणि आता पुतीन यांचा रशिया- हा इतिहास आधीपासून माहिती होता. पण त्याअगोदर कसा होता तो देश? तिथे क्रांती का झाली? या सर्वाबद्दल या पुस्तकात सहज सोप्या शब्दात बरीच माहिती मिळते.

झार निकोलस हा त्या काळचा जगातील सर्वात श्रीमंत माणूस समजला जात होता. त्याची पत्नी अलेक्झांड्रा ही आईकडून इंग्लिश राजवंशातील आणि वडिलांकडून जर्मन राजवंशातील. (भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटनची अलेक्झांड्रा ही सख्खी मावशी.)

श्रीमंत राजाच्या या चार मुली. सुंदर, ग्लॅमरस राजकन्या. पण राजघराण्यात जन्मणं हे त्यांच्यासाठी एकाचवेळी भाग्याचं आणि दुर्भाग्याचंही होतं. आपण पुस्तक वाचताना तो काळ जणू जगायला लागतो- राजप्रासादातील वैभव दिसायला लागतं, त्यावेळच्या राजेरजवाडयांचं रोजचं आयुष्य कसं होतं ते आपल्यासमोरच घडू लागतं, या रॉयल्सचे फोटो आणि बातम्या छापणाऱ्या तत्कालीन गॉसिप मॅगझिन्सच्या आवृत्या निघत राहतात, या मुलींसोबत आपण हसतो, एन्जॉय करतो, पण मग आपण मध्येच गंभीर होतो, अशुभाची काळी छाया आपल्याला जाणवू लागते..बरोबर १०० वर्षांपूर्वी (२८ जून १९१४) ऑस्ट्रियाचा आर्चडयूक फ्रान्झ फर्डिनाण्डची हत्या होते आणि पहिल्या जागतिक महायुध्दाला तोंड फुटतं..त्यातच सत्यकथेचा प्रवास अटळ अशा शोकांतिकेकडे सुरु होतो..शेवटच्या चॅप्टरमध्ये ती शोकांतिका घडते आणि शेवटी आपण सुन्न होऊन बसतो. एखादं थ्रिलर वाचण्याची अनुभूती हे कथानक देतं पण हा काल्पनिक थ्रिलर नाही..हे सगळं शंभर वर्षांपूर्वी प्रत्यक्ष घडलंय.

श्रीमंत घराणं, लाड करणारे प्रेमळ मातापिता, घरातल्या कामांना भरपूर नोकरचाकर, अगणित उंची कपडे व दागिने, लेटेस्ट बनावटीचे कॅमेरा, फोन वगैरे गॅजेट्स, लोकांकडून मिळणारा आदर, देशोदेशीच्या राजांकडून, पंतप्रधानांकडून येणारे नजराणे, आलिशान जहाजावर सुट्टी घालवणे. या राजकन्यांचं आयुष्य वरवर पहाता सुखासीन वाटतं. परंतु हे फार वरवरचं चित्र होतं. मुळात मुली म्हणून भावापेक्षा दुय्यम दर्जा कारण राज्यावर अधिकार युवराजाचा...मुलींचा नाही. शिवाय सतत assassination च्या भीतीमुळे या कुटुंबाच्या हालचालींवर मर्यादा खूप होत्या. चारचौघांत मिसळू शकत नसल्यामुळे समवयस्क मित्रमैत्रिणी जमवणं कठीण होतं. एखादया सामान्य युवकाच्या प्रेमात पडल्यास त्या नात्याला भवितव्य नाही, राजकन्येला तोलामोलाच्या दुसऱ्या राजघराण्यातच अरेन्ज्ड मॅरेज करावं लागेल हे अटळ होतं.

पहिल्या महायुध्दाच्या वेळी या मुलींनी नर्सिंगचं काम केलं, जखमी सैनिकांसाठी हॉस्पिटलमध्ये काम केलं. परंतु एकीकडे युद्ध ऐन भरात असताना रशियात क्रांतीचे वारे वाहू लागले होते. पहिलं महायुध्द हे तर क्रांतीचं एक कारण होतंच. शिवाय इतरही अनेक कारणं होती. आर्थिक समस्या, युध्दामुळे पडलेला अन्नधान्याचा तुटवडा, वाढत्या शहरीकरणामुळे आणि उदयोगीकरणामुळे झालेले बदल. राजाच्या कारभाराबद्दल लोक असमाधानी होते. सिस्टिमला विरोध करणाऱ्यांवर हिंसेचा वापर करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे लोक चिडले होते. राजाला स्वत:ला कारभार जमत नाही आणि लोकांच्याही हाती तो स्वत: सर्वाधिकार देत नाही याचं पर्यवसान क्रांतीत होणारच होतं. राजावर आणि विशेषत: राणी अलेक्झांड्रावर असलेला कुख्यात वादग्रस्त धर्मगुरु ग्रिगोरी रासपुतिन याचा प्रभाव हेही लोकांच्या संतापाचं एक कारण मानलं जातं. राणी जर्मन-इंग्लिश वंशाची म्हणजेच रशियन नाही..तिचं विदेशी असणं हाही या चिघळलेल्या परिस्थितीत एक नाराजगीचा मुद्दा बनला.

१९१७ साली राज्यक्रांतीनंतर रशियात धर्म मानण्यावर बंदी आली. राजघराण्याचं महत्व संपलं. राजा, राणी व त्यांच्या पाच मुलांना स्थानबध्द करुन ठेवण्यात आलं. या सर्व काळात या कुटुंबाने दाखवलेला धीरोदात्तपणा, एकमेकांना दिलेला सपोर्ट, परिस्थितीला सामोरं जाण्यातला खंबीरपणा हे सर्व वाचून थक्क व्हायला होतं. खरंतर सत्ता गेल्यानंतरही या मुलींच्या समोर एक चांगला भविष्यकाळ होता. कदाचित सोन्याच्या पिंजऱ्यातून मुक्त होऊन त्या आता सर्वसामान्य नागरिक बनून नोकरी करु शकतील, पुढे शिकू शकतील, त्यांना मनासारखे जोडीदार निवडता येतील व चारचौघींसारखा सुखी संसार करतील. परंतु तसं व्हायचं नव्हतं. जुलै १९१८ मध्ये राजा, राणी, चार मुली (वयं २२, २१, १९ व १७) व युवराज (वय १३) या सर्वांना ठार मारण्यात आलं.

या हत्याकांडाबद्दल पुढे अनेक वर्षं चर्चा व स्पेक्युलेशन सुरु राहिलं. मृतदेह न सापडल्यामुळे रोमानोव्ह कुटुंबिय तिथून निसटले व त्यानंतर नाव बदलून, जुनी ओळख लपवून जगले असाही एक समज आहे. (या पलायन थिअरीवर आधारित इन्ग्रिड बर्गमनचा ’ॲनास्तासिया’ हा चित्रपट १९५६ साली आला व त्यासाठी तिला अभिनयाचं ऑस्करही मिळालं.) १९९० नंतर रशियात काही मृतदेह सापडले व जेनेटिक टेस्ट्स करुन ते रोमानोव्ह कुटुंबियांचेच असल्याचं आता मानलं जातं. १९९८ साली रशियात तत्कालिन अध्यक्ष बोरिस येल्तसिन यांच्या उपस्थितीत रोमानोव्ह कुटुंबियांसाठी एक funeral आयोजित करण्यात आलं. रोमानोव्ह कुटुंबियांचे नातेवाईक व अनेक देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहिले. ’आपण सर्वजण गुन्हेगार आहोत, जे झालं ते लाजिरवाणं होतं..’ असं त्यावेळी येल्तसिन म्हणाले.

राजा व राणीचे काही निर्णय खूपच चुकले व त्याची किंमत त्यांना चुकवावीच लागणार होती पण रीतसर खटला चालवता आला असता तर ते योग्य झालं असतं. आणि त्यांची मुलं? त्या पाच मुलांचा काय दोष होता..हा प्रश्न अस्वस्थ करतो.
पंचम जॉर्ज हा या मुलींच्या आईचा सख्खा मामेभाऊ. झार निकोलस त्याचा सख्खा मावसभाऊ. म्हणजे झार पती-पत्नी दोघंही त्याचे जवळचे नातेवाईक होते. परंतु रशियातील नवीन राजवटीशी असलेले संबंध बिघडायला नकोत आणि झारची मदत केली म्हणून आपल्या देशातील रॅडिकल्सनी उदया आपल्याच विरोधात उठाव करायला नको या भीतीने पंचम जॉर्जने रोमानोव्ह्जची मदत केली नाही असे म्हटले जाते. राजसत्तेपुढे रक्ताची नाती फिकी पडली ती ही अशी.

हा haunting, अस्वस्थ करणारा इतिहास वाचकांच्या मनात दीर्घकाळ घर करुन राहील यात शंका नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेदिका....

झार आणि झारशाही (त्याहीपेक्षा झारिना अलेक्झांड्राशाही) यांच्या राजघराण्यापेक्षा मोठे कुणी नाही या प्रवृत्तीमुळे समाजवादाचा रशियात प्रचार आणि प्रसार झाला हे मान्य करावे लागेल, म्हणजेच शेतकरी आणि कामगार वर्ग यांच्या अत्यंत हलाखीच्या स्थितीवर उन्नतीसाठी उपाय हवा असेल तर झारशाहीचे (आणि जमिनदारीचेसुद्धा) उच्चाटन होणे प्राधान्यक्रमाने समोर आले ते रशियन राज्यक्रांतीसाठी अथक प्रयत्न करणार्‍या बोल्शेव्हिक तसेच रेव्होल्युशनरी सोव्हिएत ऑफ वर्कर्स अ‍ॅण्ड सोल्जर्स डेप्युटीज या संघटनेच्या कार्यामुळे आणि त्यांच्यासमोर रशियात समाजवाद आणण्याबरोबरच झारशाहीचे नामोनिशाण मिटवून टाकणे हाही अग्रक्रमाने विषय होता. शेतकरी वर्ग बोल्शेव्हिकांना सतत पाठिंबा देत राहिला कारण त्या पार्टीने शेतकर्‍यांना जमिनीचे हक्क परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले....(एक लक्षात घेतले पाहिजे की झार आणि त्याचे सरंजामदार आणि जमिनदार अशा वीस हजार लोकांकडे रशियातील १८ कोटी एकर जमीन होती तर कोटीपेक्षाही अधिक छोट्या शेतकर्‍यांकडे तुकड्याशिवाय काही नव्हते. एक तृतीयांश शेतकरी भूमिहीन होते त्यामुळे जमिनदारांच्या शेतावर जनावरासारखे राबून आपले साताठ व्यक्तींचे घर कसेबसे चालविणे हे नशिबी आले तर कामगारही तसाच हवालदील.....या सर्वांपुढे आपल्या हलाखीला जबाबदार म्हणजे झार, झारिना (आणि अर्थातच रासपुतिनही) होतेच....शिवाय त्या अनुषंगाने त्या चार मुली आणि अलेक्सी हा राजकुमार. रशियात अनेक वंशाचे, अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे होते. ज्यू, पोलिश, फिन, तार्तार, आर्मेनियन. यातील प्रत्येक गटाची स्वत:ची अशी संस्कृती, भाषा, चालीरीती होत्या. तरीही या सर्वांवर रशियन्सचे....म्हणजेच पर्यायाने झारचे....वर्चस्व असल्याने अन्यत्र गटांना (जे अल्पसंख्यांक म्हणून ओळखले जात असत) राज्यकारभारात तसेच आर्थिक धोरणात कवडीचीही किंमत नव्हती.....

....हा इतिहास पाहिला तर शेतकरी आणि कामगार यानीच रशियन क्रांतीची ज्वाला पेटविली असे नसून रशियेतर वंशांच्या लोकांवरही झार वंशजाकडून जी जुलूमजबरदस्ती झाली त्या सार्‍या असंतोषाचा पाक म्हणजेच झार कुटुंबियांचे करण्यात आलेले शिरकाण होय.

विषय फार मोठा आहे....विविध अंगे आणि इतिहास आहे त्या हत्याकांडाला. केवळ राजाराणी याना या दुनियेतून घालवून ही प्रचंड असंतोषी झालेली जनता स्वस्थ बसू शकत नव्हती. राजकन्या राजकुमार याना मारले म्हणजे खर्‍या अर्थाने एक अध्याय संपला अशी उठावकर्त्यांची मागणी होती. संपूर्ण कुटुंबियांवर एकत्रितरित्या गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यातून कुणी वाचू नये म्हणून प्रेतावर बायोनेटसनी वार केले गेले. पुढे ज्या काही चौकश्या व्हायच्या त्या झाल्या तरी क्रांतीच्या धुमश्चक्रीत तमाम रशियन्स आणि अल्पसंख्याकांनी ती आनंददायी घटनाच मानली होती....हे सत्यच. ट्रॉटस्कीने या हत्येबाबत थेट लेनिनने आदेश दिले होते असे जरी म्हटले नसले तरी "व्हॉईट गार्डस" ह्या सरंजामशाहीच्या बाजूने स्थापन झालेल्या गटाला अधिकचा वाव मिळू नये यासाठी झार व कुटुंबातील सर्वांचा यांचा नाश करावा अशीही आपल्या रोजनिशीत नोंद केली होती.

कांती ही रक्तरंजीत असते....ती ज्या परिस्थितीत झाली वा ज्यानी ती केली त्यांच्याकडे आपल्या भूमिकेच्या बदल्यात उत्तर देण्यासाठी पुराव्यांच्या जंत्री असतात....शिवाय अन्यायापोटी साठत गेलेला तीव्र संताप आंधळा असतो आणि त्यातून निर्माण झालेला उन्माद संबंधितांचे वाहते रक्त पाहिलाशिवाय शमत नाही....अशीही स्थिती क्रांतिकर्त्यांच्या अंगी भिनलेली असते....त्या नशेत (होय, नशेतच म्हणू या) ज्याला वा जिला मारायचे आहे ती आयुष्यभर आपली शत्रूच आहे, राहाणार आहे....या तार्किकातून मग पिस्तुलाची गोळी सुटते. अस्वस्थ आणि हॉन्टिंग आहे हे सारे, पण लोकमानसिकतेचे एक प्रखर असे सत्यही.

बाकी Helen Rappaport यांच्या The Romanov Sisters या पुस्तकाविषयी इतकी सविस्तर माहिती तुम्ही इथल्या सदस्यांना दिली आहे त्याबद्दल धन्यवाद.

@अंकु- हे पुस्तक २०१४ मध्ये आलंय...अजून मराठी भाषांतर झालं नसावं.

@मामा- धन्यवाद डिटेलमध्ये लिहिल्याबद्दल. तुमची प्रतिक्रिया खूपच विचार करायला लावणारी आहे. जे झालं ते खरंच खूप दुर्दैवी झालं. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे २००८ मध्ये रशियन सुप्रीम कोर्टाने या मंडळींना ’victims of Bolshevik repression' म्हणून जाहीर केलं. यातून लोक शिकतील व पुढे ज्या क्रांती होतील त्यावेळी पालकांच्या गुन्ह्यांची शिक्षा लहान मुलांना देण्यात येणार नाही हीच देवाकडे प्रार्थना.

वेदिका२१,

पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद! Happy

अशोकमामांनी त्याकाळीचे बरेच विवेचन केले आहे. ते वाचनीय आहे. झार निकोलस रोमानोव्ह व त्याच्या कुटुंबियांची हत्या धक्कादायक होती. स्वत: झारला त्याची किंचितही अपेक्षा नव्हती. एकातेरीनबर्ग नगरात इपात्येव हाउस मध्ये सर्वांना कैदेत ठेवलं होतं. जेव्हा सर्वांना रात्री दीड वाजता उठवण्यात येऊन खाली तळघरात नेण्यात आलं तेव्हा काहीतरी घोषणा होणार असा त्याचा अंदाज होता. ती बहुधा सुटकेची असावी कारण व्हाईट आर्मी त्यांना सोडवायला झपाट्याने येत होती. पण नेमका त्यामुळेच घात झाला. आरोप आणि शिक्षा वाचून दाखवल्यावर झारची प्रतिक्रिया आश्चर्याची होती.

पण दैवासमोर कुणाचंच काही चालत नाही. Sad ज्या बोल्शेविकांनी ही शिक्षा सुनावून अंमलात आणली ते हंगेरियन यहुदी होते. ज्यू लोकं रशियातदेखील फारसे लोकप्रिय नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

Romanov Sisters नि ते हत्याकांड हा western साहित्यामधे एक आवडता विषय आहे. त्या अनुषंगाने बर्‍याच conspiracy theories नि त्यावर आधारित fictions आहेत. रास्पुतीन vampire होता, शेवटची राजकन्या कॅनडामधे पळून जाउ शकली वगैरे.

हे पुस्तक माझ्या लिस्ट मधे होते. वरचा परीचय वाचून वरती ढकलतो.

छान लिहिलंय. आवडलं.

'रोमानोव्ह सिस्टर्स' हे टायटल अजूनही कुठेतरी वाचलं होतं. पण कुठे, कुठल्या संदर्भात ते अजिबात आठवत नाहीये.

@ वेदिका, 'दि रोमानोव्ह सिस्टर्स' बद्द्ल माहीती दिल्याबद्दल थॅक्स. काही वर्षापासुन Anastasia नावाची कार्टून फिल्म खुपवेळा बघुन झालेय, अजुन देखील ती माझी फेवरेट आहे. पण डिस्कवरीवर ॲनास्तासिया बद्द्ल रिअल स्टोरी समजली तेव्हाच sad feeling आली होती..

ललिता 'रोमानोव्ह सिस्टर्स' पुस्तकाचा review good reads वर बरेच दिवस होता, मी तिथेच वाचले होते त्या नंतर Time नि week मधे त्यावर आले होते.

सर्वांचे धन्यवाद प्रतिक्रियांबद्दल!

Romanov Sisters नि ते हत्याकांड हा western साहित्यामधे एक आवडता विषय आहे. त्या अनुषंगाने बर्‍याच conspiracy theories नि त्यावर आधारित fictions आहेत.
खरं आहे. मला स्वत:ला हे पुस्तक वाचण्याआधी रोमानोव्हजबद्दल काहीच माहीत नव्हतं. प्रसिकने उल्लेख केलाय ती ’ॲनास्तासिया’ कार्टून फिल्म ऐकून माहीत होती पण बघितली नाहीये. रासपुतिन म्हणून कोणीतरी होता (त्याच्यावरही खूप बुक्स व मुव्हीज आहेत) हेही असंच ऐकून माहीत होतं. पुस्तक वाचल्यावर सगळी टोटल लागते! मग नेटवर सर्च केलं तेव्हा कळलं की या घटनांबद्दल युरोप-अमेरिकेत खूप चर्चा, साहित्य, रिसर्च वगैरे अजूनही चालूच असतो.

@ललिता आणि असामी- या पुस्तकाला गुडरिड्सचं बेस्ट हिस्टरी ॲन्ड बायोग्राफी (२०१४) ॲवॉर्डही मिळालेलं आहे.