२० – बगीच्यांचे गाव सुझू आणि पूर्वेचे व्हेनिस झोउझुआंग

Submitted by इस्पीकचा एक्का on 4 January, 2015 - 01:37

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

सहलीचा बाविसावा दिवस बर्‍याच उत्सुकतेने उजाडला. सुझू बद्दल शियानच्या सहप्रवाशांनी बरीच उत्सुकता जागवली होती. Water Town झोउझुआंग बद्दलही चांगले बोलले गेले होते. माझ्या इटिनेररीमध्ये झोउझुआंगचा समावेश नव्हता. पण उद्याचा पूर्ण वेळ माझ्या मनात काय येईल ते बघायला मोकळा ठेवला होता. तेव्हा आज जरा जास्त माहिती काढून उद्या जमल्यास तेथे जाऊ असा विचार केला होता.

सुझू शांघाईपासून १०० किमी वर आहे. बसने साधारण दीड तासाचा प्रवास होता. जसजसे शांघाईपासून दूर जाऊ लागलो तसे चारचाकींची संख्या कमी होत गेली आणि दुचाक्यांची संख्या वाढत गेली. गावाच्या सीमा सुरू झाल्या झाल्या एक उड्डाणपूल लागला. पुलावरच रस्त्याच्या दोन लेन अडवून दोन रांगांत दुचाक्या उभ्या केलेल्या पाहून "आपल्या गल्लीत" आल्यासारखे वाटले +D.

जरा पुढे गेल्यावर उभ्या दुचाक्यांच्या गर्दीत भाजीविक्यांनी त्यांची दुकाने थाटलेली दिसली आणि चीन भारताचा खरा शेजारी असल्याचा पुरावाच मिळाला Wink

सुझूची स्थापना इ. पू. ५१४ ला झाली. यांगत्सेच्या दक्षिणेचा सर्वच भाग बगिच्यांकरिता प्रसिद्ध आहेच पण त्यांत सुझूमधील बगिचे सर्वोत्तम समजले जातात. या एका गावात जवळजवळ ६० बागा आहेत. पण त्यांच्या संख्येपेक्षा त्याच्या सौंदर्यपूर्ण मांडणीमुळे सुझू जास्त प्रसिद्ध आहे. या रसिक वातावरणात चीनचे अनेक नावाजलेले चित्रकार, कवी व कॅलिग्राफीचे कलाकार होऊन गेले यात आश्चर्य ते काय?

गाइडने सर्वात जास्त लोकप्रिय असलेले दोन बगिचे पाहू असे सांगितले. अर्ध्या दिवसाच्या सहलीत सगळ्या बागा पाहणे तर शक्य नव्हते. तेव्हा अर्थातच ते सगळ्यांनी मान्य केले. अगोदर आम्ही "विनम्र प्रशासकाची बाग" (The Humble Administrator's Garden) बघायला गेलो. वांग शियानचेन नावाच्या सरकारी अधिकार्‍याने निवृत्त झाल्यावर राहण्यासाठी व भाजीपाल्यासाठी ही खाजगी बाग बांधल्याने तिला हे नाव पडले आहे. एक जुने मंदिर, तळे, चित्रविचित्र आकाराचे दगड आणि छोटेसे जंगल याचा इतका सौंदर्यपूर्ण वापर केला आहे की ही चीनमधील चार सर्वोत्तम बागांपैकी एक गणली जाते. १५०९ मध्ये बांधलेल्या अंदाजे १३ एकरावर पसरलेली ही बाग World Cultural Heritage Site दर्जाची जागा आहे. मिंग राजघराण्याच्या काळात बांधल्यामुळे अर्थातच मिंग वास्तुशिल्पकलेचा पगडा हिच्या बांधणीवर आहे.

बागेतली काही विशेष स्थळे

.

.

.

.

.

.

फर्निचर व शोभेच्या वस्तू

.

नंतर चालत पंधरा मिनिटाच्या अंतरावर असलेली दुसरी बाग बघायला गेलो. ही बाग एका विद्यार्थ्याने आपल्या गुरुला भेट देण्याकरिता बांधली. या बागेच्या दर्शनी भागात चिंग आणि मिंग राजघराण्याच्या काळातील वास्तू व शोभावस्तू आहेत.

.

खास खिडक्या आणि त्यातून दिसणार्‍या बागेची रचना फारच कलापूर्ण आहे.

 .....................

.

या बागेत चित्रविचित्र आकाराच्या दगडांच्या अनेक रचना आहेत.

बागेची अजून काही चित्रे

.

.


.

ही बाग बघून झाल्यावर वाटेत पोटपूजा आटपली आणि एका रेशीम कारखान्याला भेट दिली. त्यांत रेशमाच्या कापडावर काढलेली काही सुंदर चित्रे खूपच मनात भरली.

.

 .....................

माझी सहल संपली होती. गाईड म्हणाली, "आता आम्ही Water Town बघायला निघणार आहोत. चायना हायलाइटने तुमच्याकरता फक्त सुझू टूर बुक केली आहे. पण तुम्हाला Water Town सुद्धा बघायचे आहे का?" अर्थातच आयती चालून आलेली संधी मी थोडीच सोडणार? हो म्हणून मी पैसे काढायला खिशात हात घातला तर ती म्हणाली, "नो चार्ज, सहलीचा हा भाग तुमच्याकरिता आमच्या कंपनीची भेट (on the house) आहे !" अशा तर्‍हेने स्थानिक टूर कंपनीच्या सौजन्याने आमची झोउझुआंग बघण्याची इच्छा पुरी झाली +D. धन्यवाद जाहीर करून आनंदाने सहल पुढे चालू केली.

झोउझुआंग सुझूपासून ३० किमी दूर आहे. १२४ एकरांवर वसलेल्या या गावात चौदाव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत बांधल्या गेलेल्या मिंग आणि चिंग राजघराण्यांच्या काळातल्या अनेक इमारती जतन करून ठेवलेल्या आहेत. हे गाव एका मोठ्या कालव्याने वेढलेले आहे आणि सबंध गावात मानवनिर्मित कालव्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे या गावाचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे या गावातील त्यांतील अरुंद रस्त्यांपेक्षा जास्त पाण्याच्या कालव्यांतून इटालियन व्हेनिसमधील गोंडोलासारख्या होड्यांतून होणारी वाहतूक. यामुळेच या शहराला पूर्वेकडचे व्हेनिस असेही म्हटले जाते.

या गावाची अजून एक खासियत आहे, ती म्हणजे डुकराचे गोड मांस (sweat pork). गावात शिरताच एका दुकानात हा पदार्थ दिसला.

गावातील कालव्यांचे काही फोटो

.

.

 .....................

गोंडोलाने या गावातील इमारती आणि वेगवेगळ्या १४ पुलांचे मजेदार दर्शन करता येते. थोडा वेळ पायी फिरल्यावर आम्ही गोंडोलाने झोउझुआंगची सफर केली. त्यावेळी काढलेली काही कालव्यांची नयनरम्य चित्रे...

वरच्या पुलाचा एक फोटो एका चिनी वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या प्रवाशाने अमेरिकेतील सान दिएगो येथील एका मासिकात प्रसिद्ध केला... आणि काही काळातच झोउझुआंग पूर्वेचे व्हेनिस म्हणून जगप्रसिद्ध झाले !

.

.

.

.

झोउझुआंगचा मुख्य चौक !

अरुंद कालव्यातून चालक सफाईने गोंडोला वलव्हत होते... बर्‍याचदा गोंडोला एकमेकाच्या इतक्या जवळून जात असत की शेजारच्या गोंडोलातील प्रवाशांशी आरामात हस्तांदोलन करता यावे !

गोंडोलाची सफर संपल्यावर, जुन्या शैलीतली अनेक सुंदर घरे बघायला गावात थोडावेळ पायी फेरी मारली.

परत येईपर्यंत सहा वाजले होते. रात्री व्हाईट मॅग्नोलिया थिएटरमध्ये शो बघायला गेलो. शोमध्ये फोटो काढायला बंदी असल्याने या सुंदर कार्यक्रमाचे फोटो नाहीत याबद्दल दिलगीर आहे. आता इतके अ‍ॅक्रोबॅटीक कार्यक्रम पाहिल्यावर या कार्यक्रमात काय फार वेगळे नसणार असा माझा कयास या कार्यक्रमानेही पार मोडीत काढला. आतापर्यंतचा प्रत्येक ठिकाणचा कार्यक्रम... मग तो कसरतीचा असो किंवा नृत्याचा असो... आपले वैशिष्ट्य राखून होता. कसरतीच्या अथवा नृत्याच्या एकाही प्रकाराची पुनरावृत्ती अख्ख्या चीनभर बघायला मिळाली नाही, हे विशेष आश्चर्यकारक होते !

आज चायना हायलाइटची इटिनेररी संपली. उद्याचा दिवस शांघाईमधला राखीव दिवस म्हणून ठेवला होता. टूर बुकिंग कन्फर्म झाल्यावर अजून काही आकर्षणांची यादी केली होती. आता त्यांना कशी भेट द्यावी याचा विचार करत झोपी गेलो.

(क्रमशः)

===================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users