"अवकाळी"

Submitted by -शाम on 2 January, 2015 - 00:11

"अवकाळी"
_________________________

अवकाळी तो येतो आता
अवकाळी गातो गाणी
माघारी फिरतात पाखरे
चोचीचे गिळुनी पाणी

पानांसोबत झिम्मा खेळुन
कणसे सारी आसडतो
मुळाखालच्या ईच्छा सार्‍या
मुळापासुनी हासडतो

झुकता झुकता मोडुन पडतो
धांड्यांचाही ताठ कणा
पाण्यावरती उरती केवळ
हिरवाईच्या जन्मखुणा

बघता बघता चिल्यापिल्यांचा
घास माखतो चिखलाने
हक्काने लुटल्या रानाचे
कोण ऐकतो गार्‍हाणे

जन्मच ज्याचा पाण्याचा अन्
हातपायही पाण्याचे
त्याला कैसे दु:ख कळावे
स्वप्ने वाहून जाण्याचे

_________________________-शाम

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जन्मच ज्याचा पाण्याचा अन्
हातपायही पाण्याचे
त्याला कैसे दु:ख कळावे
स्वप्ने वाहून जाण्याचे >>> खरं आहे - लिहिलंय सुरेखच - पण विषयच अनेकांच्या जीवन-मरणाचा असल्याने सुंदर तरी कसे म्हणू याला ??

तीव्र विषाद किती संयत शब्दात व्यक्त केलास! फार सुंदर रचना.

काल प्रवासात असताना बाहेरची भुरभूर बघून मनात असाच विचार येत होता. मला हे वातावरण आल्हाददायक वगैरे वाटतंय पण पिकांसाठी आणि पिकवणा-यांसाठी किती भयंकर, निराशा आणणारं.. आणि कसलाही इलाज हातात नसलेलं! Sad नुसतं हातावर हात धरून बघत बसण्याशिवाय कसलाही पर्याय नसलेलं Sad

मुळाखालच्या ईच्छा सार्‍या
मुळापासुनी हासडतो...>>> मुलायम वाचायची सवय जडलेल्या मनास हिसकाच बसतो ..
खरोखर अवकाळी पाउस काहीं शेतकऱ्यांसाठी दु:खाचे अमाप पिक घेऊन येतो .कविता आवड्ली.

पानांसोबत झिम्मा खेळुन
कणसे सारी आसडतो
मुळाखालच्या ईच्छा सार्‍या
मुळापासुनी हासडतो

अप्रतिम. कविता फार आवडली.

..........