Submitted by -शाम on 2 January, 2015 - 00:11
"अवकाळी"
_________________________
अवकाळी तो येतो आता
अवकाळी गातो गाणी
माघारी फिरतात पाखरे
चोचीचे गिळुनी पाणी
पानांसोबत झिम्मा खेळुन
कणसे सारी आसडतो
मुळाखालच्या ईच्छा सार्या
मुळापासुनी हासडतो
झुकता झुकता मोडुन पडतो
धांड्यांचाही ताठ कणा
पाण्यावरती उरती केवळ
हिरवाईच्या जन्मखुणा
बघता बघता चिल्यापिल्यांचा
घास माखतो चिखलाने
हक्काने लुटल्या रानाचे
कोण ऐकतो गार्हाणे
जन्मच ज्याचा पाण्याचा अन्
हातपायही पाण्याचे
त्याला कैसे दु:ख कळावे
स्वप्ने वाहून जाण्याचे
_________________________-शाम
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जन्मच ज्याचा पाण्याचा
जन्मच ज्याचा पाण्याचा अन्
हातपायही पाण्याचे
त्याला कैसे दु:ख कळावे
स्वप्ने वाहून जाण्याचे >>> खरं आहे - लिहिलंय सुरेखच - पण विषयच अनेकांच्या जीवन-मरणाचा असल्याने सुंदर तरी कसे म्हणू याला ??
तीव्र विषाद किती संयत शब्दात
तीव्र विषाद किती संयत शब्दात व्यक्त केलास! फार सुंदर रचना.
काल प्रवासात असताना बाहेरची भुरभूर बघून मनात असाच विचार येत होता. मला हे वातावरण आल्हाददायक वगैरे वाटतंय पण पिकांसाठी आणि पिकवणा-यांसाठी किती भयंकर, निराशा आणणारं.. आणि कसलाही इलाज हातात नसलेलं! नुसतं हातावर हात धरून बघत बसण्याशिवाय कसलाही पर्याय नसलेलं
अतीशय नेमकी रचना फार आवडली
अतीशय नेमकी रचना
फार आवडली कविता शामजी
जियो !!
कविता आवडली ! धांड्यांचे जागी
कविता आवडली !
धांड्यांचे जागी दुसरा शब्द योजला पाहीजे होता.
मुळाखालच्या ईच्छा
मुळाखालच्या ईच्छा सार्या
मुळापासुनी हासडतो...>>> मुलायम वाचायची सवय जडलेल्या मनास हिसकाच बसतो ..
खरोखर अवकाळी पाउस काहीं शेतकऱ्यांसाठी दु:खाचे अमाप पिक घेऊन येतो .कविता आवड्ली.
पानांसोबत झिम्मा खेळुन कणसे
पानांसोबत झिम्मा खेळुन
कणसे सारी आसडतो
मुळाखालच्या ईच्छा सार्या
मुळापासुनी हासडतो
अप्रतिम. कविता फार आवडली.
धन्यवाद दोस्तांनो!! आभारी
धन्यवाद दोस्तांनो!! आभारी आहे.
अतिशय सुंदर कविता.
अतिशय सुंदर कविता.
नि:शब्द !
नि:शब्द !
बाप रे !
बाप रे !
सुंदर.
सुंदर.
अप्रतिम कविता! सुंदर म्हणायचे
अप्रतिम कविता! सुंदर म्हणायचे आहे पण म्हणता येत नाहीए
..........
..........