G.I. Brides - परीकथेपासून वास्तवापर्यंतचा प्रवास

Submitted by वेदिका२१ on 27 December, 2014 - 00:41

दुसऱ्या महायुध्दात जर्मनी इंग्लंडवर बॉम्बहल्ले करत होता. फ्रान्सचा आधीच पाडाव झालेला. इंग्लंडने अमेरिकेकडे मदतीची याचना केली आणि अमेरिकन सैनिक मोठया प्रमाणात युरोपात दाखल झाले. यापैकी अनेक ’सैनिक’ हे सैनिकी करीयर असलेले नव्हते तर सर्वसामान्य तरुणांनाही या काळात सैन्यात भरती होणं भाग होतं. दीर्घकाळ चाललेल्या या युध्दात अखेर जर्मनीचा पाडाव झाला. विजयी अमेरिकन सैनिक मायदेशी परतले.

या अमेरिकन सैनिकांनी युध्दासोबत इंग्लंडमधील तरुणींची मनंही जिंकली होती. अमेरिकन सैनिक आणि इंग्लिश मुलींची प्रेमप्रकरणं युध्दकाळात सहजच होत होती. युध्दकाळातील या प्रेमप्रकरणांमध्ये एक वेगळीच धुंदी होती. युध्द किती काळ चालणार, कोण जिंकणार, जगाचा नकाशा नंतर कसा बदलणार- काहीच माहीत नव्हते. आपण जिवंत, हाती-पायी धड अमेरिकेत परत जाऊ की नाही, गेलो तर कधी जाऊ याची शाश्वती नसलेले अमेरिकन सैनिक. इंग्लंडवर तर सतत बॉम्बहल्ले होत होते. आज जिवंत आहोत, उदया काय होईल माहीत नाही अशा मन:स्थितीतील इंग्लिंश तरुणी. अशावेळी ’आहे तो क्षण आपला’ ’फिलहाल जी लेने दो’ असा माहौल असणं आणि passionately कोणाच्यातरी प्रेमात पडावसं वाटणं हे ओघाने आलंच. उत्कट, थरारक प्रेमकहाण्या घडत गेल्या. युध्द संपल्यावर मात्र अमेरिकन सैनिक घरी परतले आणि त्यांच्या इंग्लिश पत्नीही अटलांटिक महासागर पार करुन आपल्या सासरी जायला सिध्द झाल्या. अशाच चार इंग्लिश मुलींची- वॉर ब्राईड्ची ही कहाणी- GI Brides: The Wartime Girls Who Crossed the Atlantic for Love.

Duncan Barrett आणि Nuala Calvi यांनी लिहिलेल्या या चार बायोग्राफीज. खरं तर एकाच पुस्तकात या चार वेगवेगळ्या कहाण्या आहेत. मार्गारेट, सिल्विया, रे आणि लिन या चार इंग्लिश मुली. चौघीही अमेरिकन तरुणांच्या प्रेमात पडून युध्दानंतर अमेरिकेला आल्या. यांच्यासारख्या सुमारे १०,००० मुली त्यावेळी वॉर ब्राईड्स म्हणून अमेरिकेत आल्या. अमेरिका व इंग्लंड दोन्हीकडे या वॉर ब्राईड्सकडे संशयानेच बघितलं जात होतं. युद्धात खिळखिळ्या झालेल्या इंग्लंडपेक्षा अधिक prosperous अशा अमेरिकेत जाण्यासाठी या मुली लग्नाकडे केवळ एक साधन म्हणून बघत आहेत असं दोन्ही देशात अनेकांना वाटत होतं. इंग्लिश तरुण तर अमेरिकन सैनिकांवर जळफळत होते कारण चांगल्या चांगल्या इंग्लिश मुली अमेरिकन मुलांनी पटवल्यामुळे इंग्लिश तरुणांना ’सुयोग्य निवडीसाठी’ कमी स्कोप उरला होता. तिकडे अमेरिकन मुलींनाही सुयोग्य स्थळांचं शॉर्टेज जाणवू लागल्याने त्याही या इंग्लिश मुलींवर चिडलेल्याच होत्या. या इंग्लिश मुलींना (आणि त्यांच्या लहान मुलांना) सरकारी खर्चाने अमेरिकेला आणण्यासाठी अमेरिकन सैन्याने वेगळी व्यवस्था केली होती, खास बोटी सोडल्या होत्या. त्यांच्या हक्कांसंबधी कायदेही केले होते.

या चार मुलींची मन:स्थिती त्यावेळी काय होती? एकीकडे नवऱ्याची ओढ, अमेरिकेतील नवीन आयुष्याची रंगवलेली स्वप्नं होती. दुसरीकडे पाय माहेरच्या उंबऱ्याशी अडखळत होता कारण आपला देश, आईवडील, मित्रमैत्रिणी सर्व सोडून इतक्या दूर जायचं होतं. तो काळही वेगळा होता. फोन, इंटरनेट, बजेट एअरलाईन्सचा जमाना नव्हता. आईवडिलांशी संपर्क ठेवायचा तो पत्राद्वारे, माहेरी जायचं तर तिकिटासाठी पैसे जमवून व बोटीने आठवडाभर प्रवास करुन. चौघींचेही नवरे युध्दानंतर सैनिकी पेशा सोडून सिव्हीलियन नोकरीधंदा करणारे. कोणी कॅलिफोर्नियात, कोणी जॉर्जियात, कोणी बाल्टीमोरमध्ये.

या चौघींच्या कहाण्यांत आपणही नकळत वाचताना गुंतत जातो. या कहाणीत युध्दाचा थरार आहे, कोवळ्या प्रेमातली निरागसता आहे, आणि मग आयुष्याचं रखरखीत वास्तवही आहे, संघर्ष आहे. आनंदाचे क्षण आहेत, हार्टब्रेकही आहेत. चौघींपैकी दोघींवर नवऱ्यांच्या वागण्यामुळे कालांतराने घटस्फोटाची वेळ आली. एकीने रडतखडत ॲडजस्ट करत संसार केला. एकीचा संसार अगदी सुखाचा झाला. घटस्फोटित दोघींचे पुनर्विवाह झाले व ते यशस्वी ठरले.

वास्तविक एका युनिक परिस्थितीतील या मुली. पण त्यांचं मायदेश सोडणं, नवीन देशात व संस्कृतीत सामावण्याचा प्रयत्न करणं हे स्थळकाळापलीकडे कोणीही रिलेट करु शकेल असं आहे. एकेठिकाणी रुजलेल्या रोपटयाचं असं दुसरीकडे पुन्हा रुजणं व संघर्ष करत वाढणं...-विवाह, शिक्षण, नोकरी कोणत्याही कारणामुळे आपलं घर सोडून दूर गेलेली स्त्री यात कुठेतरी आपल्या भावनांना जोडू शकते. मग त्यात सासूचं मुलाने ’आपल्यातली’ बायको केली नाही म्हणून परदेशातल्या सुनेशी फटकून वागणं, तिच्या स्वयंपाकावर, हाऊसकिपिंगवर टीका करणं आहे. त्याच सासूने नातू झाल्यावर विरघळणं, कालांतराने सासू-सुनेचे सूर जुळणं आहे. अमेरिकन पध्दतीचं जेवण बनवायला शिकणं, डॉलर-डाईम-सेन्ट करन्सीचं कोष्टक समजून घेणं- यांतली गंमत आहे. ’इथे साधा चहासुध्दा धड मिळत नाही राव! कॉफी काय पितात हे लोक सकाळी उठून’ हे फ्रस्ट्रेशन आहे. ’हाच तो माणूस का ज्याच्यासाठी आपण घरदार, आईबाप, देश सगळं सोडून आलो? हा इतका कसा बदलला?’ असा प्रश्न पडायला लागेल इतकं धक्कादायक वागणारा एक नवरा आहे. त्याचसोबत बायकोच्या पाठीमागे कायम खंबीरपणे उभे असणारे, जिवापाड प्रेम करणारेही नवरे आहेत. मातृत्व लाभण्यासाठी केलेली वयाच्या चाळिशीपर्यंतची प्रतिक्षा आहे. निवृत्त व्हायच्या वयात जिद्दीने मास्टर्स डिग्री घेण्यातली चिकाटी आहे. दुर्धर आजाराशी दिलेला लढा आहे. ’सगळं संपलं आयुष्यात..आता काही उरलं नाही’ असं वाटायला लावणारी संकटं आहेत, मग ते सहन करुन त्यातून वाट काढून पुढे जाणं आहे. कोणी पुन्हा परतोनी ’ओल्ड वर्ल्ड’ मध्ये सेटल झालं आहे. जेवायला यॉर्कशायर पुडिंग करुन, घरी ’स्टार्स एन्ड स्ट्राईप्स’ च्या बाजूला युनियन जॅकही लावून इंग्लंडच्या आठवणी कायम ठेवणं आहे. ’There'll always be an England, And England shall be free’ हे गाणं चौघींना जगण्याची उर्मी देत राहिलं आहे. युध्दात ज्या stoic English character चा कस लागला त्या इंग्लिश कॅरेक्टरच्या या मुली जीवनातल्या पर्सनल बॅटल्समध्ये ’we shall go on to the end' हे English spirit विसरत नाहीत.

हे पुस्तक वाचताना हे फिक्शन असावं असं वाटत राहतं पण या सत्यकथा आहेत. सहलेखिका Nuala Calvi ही मार्गारेटची नात आहे. इतिहास आणि त्यातही दुसऱ्या महायुध्दाचा इतिहास आणि त्यांत गुंफलेली ही personal memoirs हे combination अतिशय वाचनीय झालं आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पुस्तक वाचताना हे फिक्शन असावं असं वाटत राहतं पण या सत्यकथा आहेत.
>>

मनाला भावल एकदम. दुसऱ्या महायुद्धातल्या कैक गोष्टी वाचल्या कि वाटता कि हे फिक्शन असाव, पण नाहि. नवीन विषय अन पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

कल्पनेपेक्षाही सत्य किती कठोर असू शकते ते अशा युवतींच्या सत्यकथातून प्रकट होत असते. युद्धाच्या काळात सैनिकांना, त्यातही विजेत्यांना, लाभलेली प्रचंड लोकप्रियता आणि सर्वसामान्यच नव्हे तर संबंधित सरकारदेखील युद्धोत्तर काळानंतर त्यांच्या उन्नत जीवनासाठी करीत असलेले प्रयत्न (जे सार्थच मानले गेले पाहिजेत) सारे पाहाता सैनिकी जीवनाला प्राप्त झालेली झळाळी या तरुणींना आकर्षित करीत होती यात संदेह नाही...मला वाटते किंबहुना ते नैसर्गिकच मानले जावे.

"वॉर टाईम गर्ल्स" च्या बरोबरीने सरकारतर्फेही मुलींना "जॉईन वूमेन्स लॅण्ड आर्मी" साठी विविध आश्वासने देण्यात आली होती...."वुई कुड डू वुईथ थाऊजन्डस लाईक यू"....असे युद्धभूमीवर जाणार्‍या सैनिकांना हसर्‍या मुद्राने सांगणार्‍या ललनांची पोस्टर्स त्या काळात खूप लोकप्रिय झाली होती...साहजिकच मोठ्या संख्येने "बिहाईंड द वॉर लाईन" कामासाठी त्यांच्या नियुक्त्या होत गेल्या. मग वेदिका यानी उल्लेख केल्यानुसार आपल्या देशापासून अशा परदेशातील भूमीवर मुख्यत्वे नर्सिंगचे काम करणार्‍या या मुली अमेरिकन सैनिकांच्या सहवासात आल्यानंतर दोन्ही बाजूंकडून गरज बनलेली प्रेम नामक छाया हवीहवीशी वाटणे नैसर्गिक म्हणावे लागेल. गाजेलेले चित्रपट "पर्ल हार्बर"..."द इंग्लिश पेशंट" अशी काही नावे आता नजरेसमोर आली या संदर्भात.

इंग्लंडमधून स्थलांतर कायमचे स्थलांतर झाल्यानंतर जे विवाह यशस्वी ठरले त्यामध्ये दोन्ही घटकांकडून समजूतीच्या गोष्टीं घडल्या गेल्या. जे अयशस्वी ठरले त्याची कारणमीमांसा वरील आत्मचरित्रात असल्याची उदाहरणे आहेतच. अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतरही ह्या मुलींनी "’स्टार्स एन्ड स्ट्राईप्स’ च्या बाजूला युनियन जॅकही लावून इंग्लंडच्या आठवणी कायम ठेवणं आहे...." दाखविलेली ही वृत्तीही आपल्या मूळ मातीला न विसरण्याची ग्वाही देते ते स्वागतार्ह.

खूप छान परिचय करून दिला आहे वेदिका यानी.

छान परीचय!
कॉकेशियस वंशाच्या वार ब्राईडसची परीस्थिती खूपच बरी म्हणावी अशा दिव्यातून जपानी वॉर ब्राईड्सना जावे लागले . बर्‍याच अमेरीकन राज्यातून इंटररेशिअल लग्नालाच बंदी असलेला काळ. त्यात जपान शत्रू पक्ष. जपानी लोकांच्या दृष्टीने त्या 'फॉलन वुमेन' आणि अमेरीकन लोकांसाठी ' एलियन एनिमी' .

सर्वांनी परिचय आवडल्याचे सांगितल्याबद्दल धन्यवाद!

@अशोकमामा - अभ्यासपूर्ण पोस्ट व माहितीसाठी खूप आभार! तुम्ही मेन्शन केलेले चित्रपट बघायच्या यादीत टाकून ठेवले आहेत. तुम्ही जे इंग्लिश तरुणींचं बिहाईन्ड द वॉर लाईन काम करण्याबद्दल लिहिलंय त्यासंदर्भात या पुस्तकातही बरंच काही लिहिलेलं आहे.

@स्वाती - जपानी वॉर ब्राईड्सची परिस्थिती कठीणच असणार. या पुस्तकात म्हटलंय की जर्मन (ज्यू/नॉन ज्यू दोन्ही) मुलीही अशाच लग्न करुन अमेरिकेत आल्या होत्या. त्यात मग ज्यू मुलींना वॉरमुळे पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर, जर्मन मुलींच्या मनात अमेरिका-इंग्लंडबद्दल 'शत्रू' अशी भावना हेही प्रॉब्लेम होते.