भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या आजारावर त्यावर उपयुक्त नसणारा उपचार जर त्यावर विश्वास ठेऊन केला तर यात जे वेळेचे नुकसान होते ते त्या आजाराची तीव्रता वाढण्यास घातक ठरू शकत नाही का?

बाकी मला सायन्स वायन्स कळत नाही, पण लोजिक माझे पक्के आहे.

पिंपळाचे पान अथवा इतर वनस्पतींचे औषधी उपयोग सांगतात यात काही नवीन नाही. प्रत्येकात एकतरी औषधि द्रव्य(Alkaloids) आहेत. फक्त त्याची मात्रा कशावर किती प्रमाणात लागू पडते हेच आयुर्वेदात खूपशा वनस्पतींचे दिले आहे.
बकऱ्या पिंपळाची पाने फार आवडीने खातात व त्यामुळेच त्या चपळ राहतात या अनुषंगाने म्हाताऱ्यांसाठी त्याचा पुरस्कार करत असतील. शिवाय डॉक्टर साठेंना प्रबंध संशोधनासाठी 'सांपल्स' वाटसापच्या माध्यमातून फीडबैकसह आयतीच मिळत असावीत.आणखी काही विषय देऊ इच्छितो.

ऋन्मेऽऽष,

>>
एखाद्या आजारावर त्यावर उपयुक्त नसणारा उपचार जर त्यावर विश्वास ठेऊन केला तर यात जे वेळेचे नुकसान होते ते त्या आजाराची तीव्रता वाढण्यास घातक ठरू शकत नाही का?
>>

प्रचंड सहमत!! उशीर हानिकारकच असतो.

पिपळपानाला हिंदू संस्कृतीत महत्त्व नाही. कदाचित बौद्धांमधे असेल तर माहीत नाही. त्यामुळं असे फॉर्वर्डस लोक मनावर घेतील असं वाटत नाही. तसंच हिंदू धर्मातलं जे चुकीचं आहे ते लोक टाकून देतात, पण त्यामुळं सगळंच चुकीचं असा अंधविश्वास पसरवण्याला मदत करू नये. काय चुकीचं आहे आणि का हे सांगितलं तर लोक विरोध करत नाहीत असा अनुभव आहे.

ड्येंग्यू या तापासाठी अ‍ॅलोपॅथी मधे औषध नाही. रुग्णाचे शरीर आजाराविरुद्ध लढण्यासाठी सप्लीमेंट म्हणूनच औषधयोजना करतात तरी पण लोक अ‍ॅलोपॅथी च्या मागे लागतात. ही पण भोंदूगिरीच की (अंधश्रद्धा हा शब्द वापरायचा होता पण इथे भोंदूगिरी हा शब्द वापरायचा असल्याने फक्त).

याउलट पपईच्या कोवळ्या पानाचा रस घेतला तर प्लेटलेट्स कमी होत नाहीत असा अनुभव आहे. पण ते सिद्ध करावे लागते. डेंग्यु मधे पतंजलीची औषधे घेतली असता रोगप्रतिकार शक्तीमधे वाढ होते. पतंजलीकडून डेंग्युवर औषध असल्याचा दावा केला जात नाही.

दुसरं उदाहरण काविळीचं काविळीवर सुद्धा अ‍ॅलोपॅथीत औषध नाही. याउलट परंपरागत दह्यात औषध टाकून देणा-यांकडून सूर्य उगवण्याच्या आधी सलग तीन दिवस औषध आणल्यास कावीळ बरी झाल्याची कितीतरी उदाहरणे पाहीलेली आहेत.

यात देवाधर्माचं काही नाही, अंधश्रद्धा नाही. अनुभवाचे बोल आहेत. इतकंच की शास्त्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी शास्त्रोक्त चाचण्या, परीषदा असं काही केलेलं नसतं. अशा केसेस मधे संवेदनशील दृष्टीकोण ठेवून त्यात काही तथ्य आहे का हे पाहून त्याला शास्त्र म्हणून मान्यता देता येऊ शकेल का असा दृष्टीकोण न बाळगता भोंदुगिरी म्हणून झोड्पणे याला काय म्हणायचे ?

अशाच प्रकारे ९९ रोगांवर इलाज म्हणून इंडीयन नोनी हे औषध विकले जाते. हा मल्टी लेव्हल मार्केटिंगचा प्रकार आहे. पण आधुनिक पद्धतीने मार्केटिंग केल्याने लोकांचा विश्वास बसतो. अ‍ॅमवे या कंपनीनेही हेल्थ प्रॉडक्ट्स बाजारात आणली आहेत. या प्रॉडक्ट्सना एफडीए , एमआयए ची मान्यता आहे की नाही हे सुद्धा पाहीले जात नाही. त्याविरुद्ध कुणी ब्र काढत नाही. ही पण भोंदुगिरी नाही का ?

झाडपाल्याची औषधे कित्येक शतकांपासून चालत आलेली आहेत. आजीबाईचा बटवा, हळदीचे गुणधर्म हे पूर्वापार चालत आलेले आहेत. जखम झाल्यावर हळद लावताना आपण तपासत बसतो का की आधुनिक वैद्यकशास्त्राने मान्यता दिलीय की नाही म्हणून ? आता आधुनिक वैद्यकशास्त्राला ते नुसतंच पटलंय असं नाही तर हळदीचे पेटंट परस्पर ढापले होते आणि आपल्या परंपरागत ज्ञानावर डल्ला मारला होता. जे हळदीचे तेच लिंब्याचं. हापूसचा विषय अस्थानी आहे, पण पेटंट घेतेले गेले होते.

आपल्या परंपरागत ज्ञानाचा अनादर,, थट्टा करणे, ते चुकीचंच आहे असा समज करून घेणे आणि त्याला खतपाणी घालणे याला आळा बसायला हवा. पिंपळपानाच्या उधारणात सुद्धा जर हार्ट अ‍ॅटॅक टाळण्यासाठी देवाचं नाव घेऊन कुणी पथ्य सांगत असेल तर मूळ उद्देश चांगलाच म्हणायला पाहीजे. पिंपळाच्या पानाना हार्ट अ‍ॅटॅक टळतो का हा वादाचा मुद्दा आहे. पण आजही वैद्यकीय सेवा ज्या देशात सर्वत्र मिळत नाहि तिथे देवाधर्माचा दाखला देऊन कुणी अचूक पथ्य पाळायला सांगत असेल तर लोकांची मानसिकता लक्षात घेऊन हार्टॅटॅक पासून दूर ठेवणे हाच त्या इलाजामागे हेतू असेल असं वाटलं. त्या डॉक्टरांची माहीती वाचली. ते सध्या अध्यात्माकडे वळालेले आहेत असं दिसलं. डॉक्टर झाल्यानंतर अध्यात्माकडे वळावंसं वाटावं यातच सर्व आलं.

स्वाती २
पिंपळावर मुंजा राहतो एव्हढंच त्याचं महत्व. हिंदू संस्कृतीत वटवृक्षाला पूजतात. बौद्ध पिंपळाला बोधीवृक्ष म्हणतात. ती पण हिंदू संस्कृतीच आहे म्हणायला, पण वेगळी.

एखाद्या आजारावर त्यावर उपयुक्त नसणारा उपचार जर त्यावर विश्वास ठेऊन केला तर यात जे वेळेचे नुकसान होते ते त्या आजाराची तीव्रता वाढण्यास घातक ठरू शकत नाही का? >>> प्रचंड सहमत. याचकरिता हा धागा एकदम योग्य आहे.

मला अनेक आयुर्वेदिक औषधांचा चांगला अनुभव आलेला आहे - छोट्या आजारांबद्दल. पण हे Anecdotal आहे. मला आला म्हणजे ती औषधे 'इन जनरल' लागू होतील असे नाही. मॉडर्न मेडिसीन हे एका सर्वमान्य पद्धतीने केल्या जाणार्‍या कडक कसोटीवर घासून सिद्ध झालेली औषधेच वापरते.

आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत ही कसोटी कशी केली जाते? पूर्वी दळणवळणाची साधने फारशी नसताना अमुक आजारावर अमुक औषध हे सर्वत्र लागू आहे हे कसे ठरवले जात होते? यातील अनेक औषधे उपयुक्त आहेत असे मला वाटते. पण आयुर्वेदिक औषधांबद्दल चे तज्ञ, त्यांची कॉलेजेस व पूर्वीपेक्षा सध्या जास्त अनुकूल असलेले सरकार यांनी काहीतरी कसोटी तयार करायला पाहिजे - एकतर डबल ब्लाईण्ड टेस्ट सारखी, जी मॉडर्न मेडिसिन वापरते, किंवा तितकीच कठोर्/सक्षम असलेली दुसरी एखादी पद्धत.

हे न करता नुसतेच "आपल्याकडे सगळे आहे" किंवा "हे सगळे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे" या भ्रमात राहिले तर हा वाद कधीच मिटणार नाही, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे जतन केले गेलेले हे ज्ञान पुढे कसे टिकेल? हे कोणी करत आहे का?

(बाय द वे, बाळकृष्णाचा ही पिंपळपानाशी काहीतरी संबंध आहे ना? पूर आल्यानंतर विश्व तरले वगैरे असे काहीतरी वाचल्याचे आठवते)

हे सगळे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे >> मला उद्देशून असल्यास माझ्या प्रतिसादात मी तरी असं म्हटलेलं नाही.

वीणा सुरु,
'अश्वत्थः सर्ववृक्षाणां ' असा उल्लेख भगवत गीतेत येतो - १०:२६
विष्णू आणि कृष्णाच्या संबंधाने पिंपळाला हिंदू संस्कृतीत महत्व. इतर संदर्भ मी वर दिलेल्या लिंकमधे.
फारेंड,
>>बाय द वे, बाळकृष्णाचा ही पिंपळपानाशी काहीतरी संबंध आहे ना? पूर आल्यानंतर विश्व तरले वगैरे असे काहीतरी वाचल्याचे आठवते)
>>
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे - या ओळी त्याच संदर्भातल्या.

आयुर्वेदिक औषधोपचार पद्धती वेगळी आणि उगाच कुणी पाठवलेले भोंदू मेसेजेस वेगळे.

इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे <<
जर पिंपळाचा आकार हृदयासारखा म्हणून ते गुणकारी असे कारण होऊ शकते तर या गीताचा किंवा बाळकृष्णाच्या कथेचा दाखला देऊन ते अजून कशावर तरी गुणकारी आहे असे फॉर्वर्डस येऊच शकतात. Happy

वीणा ,

उत्तम प्रतिसाद,

कावीळ ह्या रोगावर फार काळा पासुन अ‍ॅलेपॅथी मध्ये औषध नाहीय. माझा एक कलिग ज्याला हेपीटायटीस बी डीटेक्ट झाला होता. त्याला मी केरळला त्याच्या घरी पाठवुन दिला, तो ज्या दिवशी पोहोचला त्याच पहाटे सर ळ वैद्याकडे गेला, वैद्याने त्याच्या नाकात गाईच्या तुपात औषध टाकुन त्या तुपाचे ३ थेंब त्या पेशंटच्या प्रत्येक नाकपुडीत सोडले आणी आपल्या दु कानी थांबवुन ठेवले. २ तासाने त्याला आंघोळ करायला सांगीतले. ३ दिवस तो पेशंट त्या वैद्याकडे गेलेला, त्यानंतर च्या त्याच्या मेडीकल रिपोर्ट मध्ये तो क्लिअर झालेला. त्या वैद्याने त्याच्या कडुन केवळ २००-३०० रु घेतले होते.

शां.का - आमचाही काविळीबाबत सदाशिव पेठेतील एक वैद्य आहेत त्यांचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच या सगळ्याचे "अधिकृतीकरण" होणे आवश्यक आहे.

स्वाती२ - हो बरोबर आहे. पण असे उपचार "आयुर्वेदिक" आहेत असे लोक समजतात म्हणून ते लिहीले.

आयुर्वेदाचे अधिकृतीकरण होणे आवश्यक आहे याबाबत पूर्णपणे सहमत! मधला एक काळ डिग्री आयुर्वेदाची मात्र प्रॅक्टिस अ‍ॅलोपॅथीची असा प्रकार फार मोठ्या प्रंमाणात झाला त्यानेही या शाखेचे नुकसान झाले. माझे आजोबा निष्णात वैद्य होते. काविळीवर ते ही उपचार करायचे. मात्र या शाखेच्या मर्यादा त्यांनी नेहमीच लक्षात घेतल्या. निदान केल्यावर अ‍ॅलोपथी उपचारांची गरज असल्यास ते प्रसंगी पदरचे पैसे खर्च करुन रुग्णाला योग्य डॉक्टरकडे पाठवायचे.

माझा एक कलिग ज्याला हेपीटायटीस बी डीटेक्ट झाला होता. त्याला मी केरळला त्याच्या घरी पाठवुन दिला,

.....

अग्गोबै , खरे की काय ! आमच्याकडे हेप . बी आणि सी चे रोज एक दोन रुग्ण असतात. पाठवु का तुमच्याकडे ?

डोळ्यात केर आणि कानात फु़ंकर ... हे ऐकुन आहे.

पण लिव्हरला सूज आणि नाकात तूप .. हे आजच ऐकले.

हा उपचार इतका गुणकारी आहे तर तो १०० रुग्णात सिद्ध करुन ते काविळीवरचे औषध म्हणुन रीतसर जाहिर का नै करत ?

झाडपाल्याची औषधे कित्येक शतकांपासून चालत आलेली आहेत. आजीबाईचा बटवा, हळदीचे गुणधर्म हे पूर्वापार चालत आलेले आहेत. जखम झाल्यावर हळद लावताना आपण तपासत बसतो का की आधुनिक वैद्यकशास्त्राने मान्यता दिलीय की नाही म्हणून ? आता आधुनिक वैद्यकशास्त्राला ते नुसतंच पटलंय असं नाही तर हळदीचे पेटंट परस्पर ढापले होते आणि आपल्या परंपरागत ज्ञानावर डल्ला मारला होता. जे हळदीचे तेच लिंब्याचं. हापूसचा विषय अस्थानी आहे, पण पेटंट घेतेले गेले होते.

---> + १

काउ,

त्याच कायेना !!

काविळीवरची आयुर्वेदीक औषधे खुपच स्वतात वैद्य देतात, उगाच काही मिलीग्रामसाठी पेटंटच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळत नाही, आणि हो ह्या औषधावर कोणाही डॉक्टरचे कमिशन नसते, म्ह्णूनच ते स्वस्त असतय !!

बाकी काविळीवर तुमच्याकडे उपचार नाही हे कबुल केल्याबद्दल धन्यवाद,

जर तुम्हाला या काविळीवर उपचार माहीत नाहीत तेंव्हा तुम्ही रुग्णांना सरळ सांगता का की बाबा तु तुझ काय ते बघ आम्हाला जमायच नाही ? दुसर्या कोणाकडे जाऊन उपचार मिळतात का ते बघ !!
का उगाच भीती घालता त्याला की आता तु वाचायचा नाहीस ?

बाकी काविळीवर तुमच्याकडे उपचार नाही हे कबुल केल्याबद्दल धन्यवाद

.....

Proud

काविळीवर औषध नसते असे मी कुठे लिहिले आहे ? अ‍ॅलोपथीत काविळीच्या प्रकारानुसार औषधे व शस्त्रक्रियाही उपलब्ध आहेत.

पण तुम्ही सुचवलेला पर्याय खूप स्वस्त व सोपा वाटला. हवे तर आमच्या डिपार्टमेंटकडुन तुम्हाला ढीगभर रुग्ण मिळतील. पण मुंबैत काही रुग्णांना औषध देऊ शकलात तर आनंदच वाटेल.

जिथं अमके फॉरवर्ड तमक्या वेळा ढमक्या ग्रुपांना फॉरवर्ड केलेत तर मेसेजमधला लाल घोडा पिवळ्या हत्तीच्या पुढं धावू लागेल, तुमच्या खात्यात आजन्म व्हॉट्सअप फ्री चे पुण्य जम होईल वगैरे मेसेजेस लोक तद्दन भाबडेपणाने पुढे ढकलत राहातात तिथे असल्या मेसेजेसचे काय! फ्रूटी पिऊ नका कारण त्यात एड्सयुक्त रक्त मिसळलंय असा भंपक मेसेज दर आठवड्याला कोणीतरी कुठेतरी पोस्ट करतंच! दिल्ली पोलिसांची वॉर्निंग म्हणे! प्रत्येक ग्रुपात असे मेसेजेस पुढे ढकलणारा/री कोणीतरी असतेच!

मेजवानीतील उरलेले अन्न वगैरे फेकून न देता चाईल्ड हेल्पलाईनवाल्यांना फोन करून बोलावून त्यांना द्या, ते गरजू मुलांपर्यंत पोचवतील, हा असाच एक मूर्ख मेसेज. ज्या अन्नाच्या गुणवत्तेची खात्री नाही ते अन्न चाईल्ड हेल्पलाईनवाले लोक कशाला कोणाला देतील? आणि तेही लहानग्या मुलांना?!! काहीतरी अक्कल वापराल की नाही? त्यात चाईल्ड हेल्पलाईनचा नंबर अशा कॉल्समुळे व्यस्त राहातो, हेल्पलाईनच्या लोकांनाही त्रास होतो हे अजिबात गावी नसते.

हा आणखी एक भोंदू फॉरवर्ड : हार्टअटॅक अणि विठ्ठल
उभ्या महाराष्ट्रात "विठ्ठल" पुजला जातो. विट्ठालाचे हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत.पंढरपुरची, विट्ठलवाडीची विठ्ठलाची मूर्ति नीट बघतली तर हातचे पंजे वरील बाजुस आहेत. नीट वैद्यकीय दृष्टया निरिक्षण केले तर उजवा तळहात लिव्हर वर अणि डावा तळहात स्प्लीनवर आहे. शरीराच्या चुम्बकीय शास्त्राचा विचार करता उजवा तळहात म्हणजे दक्षिण ध्रुव अणि डावा तळहात म्हणजे उत्तर ध्रुव. पोटात गैसेस होवून ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखते व् त्यातून हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. अशावेळी विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवल्यास गैसेस लिव्हरकड़े येतात अणि बाहेर पडतात. छातीत शिरत नाहीत.
तसेच "ward vibration therapy" चा विचार करता 'ट' अणि 'ठ' ही अक्षरे अनुस्वार देवून म्हटली की हार्ट चे संरक्षण होते. अणि विट्ठल म्हणताना ठ डबल आहे. म्हणून छातीत दुखु लागले किंवा प्रेशर आले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे. म्हणजे ५-१० मिनिटात रिलीफ मिळतो. हे श्री वैद्य यांचे कड़े चर्चा करताना सांगितले. श्री वैद्य यांचा प्रेस आहे. आमच्या 'षटचक्रे अणि आरोग्य' हे पुस्तक छापून शेवटची डिलिव्हरी देताना त्यानी अनुभव संगीताला. ते म्हणाले, "जोशी साहेब परवाचा अनुभव सांगतो. पर्व रात्री ११ वाजता छातीत जबरदस्त दुखायला लागले. (वैद्य यांचे ५-७ वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जेरी केली होती). बायको वा आईला सांगितले असते तर माला हॉस्पिटलमध्ये नेले असते. कही नहीं उठलो बाल्कनीत गेलो अणि तुम्ही संगता तसा विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्याखाली हात ठेवून उभा राहिलो अणि 'जय हरी विट्ठल' म्हणायला लागलो. पाच मिनिटात दोन जोरदार गैसेस सुटले अणि छातीत दुखणे थांबले. नंतर पुन्हा छातीत दुखले नाही, तुम्हाला धन्यवाद.
मी सातारच्या एका बाईना छातीत दुखले तर ट अणि ठ ही अक्षरे अनुस्वार देवून म्हणा असे सांगितले. त्या म्हणल्या ही अक्षरे लक्षात कशी राहणार? मी म्हणालो 'विट्ठल' म्हणा. ही चर्चा येथे संपली. दोनच दिवसानी त्या बाईच्या छातीत दुखले. त्यावेळी त्याना आठवला तो चर्चेतला विट्ठल! नुसते विट्ठल विट्ठल म्हनू लागल्या.अणि छातीत दुखणे थांबले. त्यानी माज्या मुलीला (ती सातारला असते) हा अनुभव फोन करुन सांगितला.

सासुबाईचा हार्टअटॅक
१० ओक्ट २००१ च्या रात्री १.३० वाजता सासु बाई नि छातीत खुप दुखते आहे म्हणून आम्हाला उठवले त्याना सर्वांगाला घाम आला होता म्हणून पंखा जोरात लावला होता त्या पंख्याचा आम्हाला त्रास वाटत होता. त्यांचा डावा हात दुखत होता. (ही हार्टअटैकची लक्षणे आहेत) मी त्यांच्या लिव्हर ला चुम्बकाचे दक्षिण ध्रुव अणि स्प्लीन ला उत्तर ध्रुव लावले. त्यांना अपानवायु मुद्रा करायला सांगितली व् तोंडाने जय हरी विट्ठल असे जोर जोरात म्हणायला सांगितले १५-२० मिनिटात घाम थांबला अणि त्यांनी पंखा बंद करण्यास सांगितले. डावा हात अणि छातीत दुखणे थांबले. २ वाजता त्या व् आम्ही सर्वजण झोपलो. त्या घाबरू नये म्हणून हा हार्ट अटैक असल्याचे त्यांना चार दिवसांनी सांगितले.
महाराष्ट्रात आषाढ़ महिना हा भरपूर पावसाचा त्यामुळे पाचनशक्ति मंदावाते, गैसेस होतात. म्हणून पंढरीची वारी. म्हणजे विट्ठल नामाचा गजर.
आमचे पूर्वज किती बुद्धिमान होते ते पहा - राम, कृष्ण, विट्ठल, व्यंकटेश ही सर्व विष्णुचीच रुपे पण महाराष्ट्रातील हवामानानुसार दैवत विट्ठल. - सामान्यांचे सहज आरोग्य.

फ़क्त ह्या माहिती पासून त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?
-अरविंद जोशी
०२०२४३४७०२१

Pages