ड्रॅगनच्या देशात १५ - लेशानचा बुद्ध आणि चोंगचिंग

Submitted by इस्पीकचा एक्का on 25 December, 2014 - 01:17

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

सहलीचा सोळावा दिवस उजाडला. लवकरच सगळे आटपून लेशान शहराशेजारच्या डोंगरातील बसलेल्या अवस्थेतील भव्य बुद्धमूर्ती बघण्यास निघालो.

ही बुद्धमूर्ती तांग राजघराण्याच्या काळात (इ. ६१८ - ९०७) एमेई पर्वताच्या एका उभ्या कड्यांमध्ये कोरीवकाम करून बनवली गेली. अजूनही सुस्थितीत असलेली ही ७१ मीटर उंच मूर्ती ही बसलेल्या अवस्थेतील बुद्धाची जगातील सर्वात उंच मूर्ती आहेच पण प्राचीन काळातील सर्वात उंच एकाष्म शिल्प म्हणूनही तिला ओळखले जाते. या मूर्तीच्या समोरच, तिच्या पायाजवळ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचा संगम आहे. १९९६ पासून या स्थळाला UNESCO World Heritage Site चा दर्जा मिळाला आहे.

या मूर्तीची कथा मोठी रोचक आहे. वर सांगितलेल्या तीन नद्यांचे प्रवाह फार वेगवान होते आणि त्यामुळे त्यांच्या संगमाच्या ठिकाणी जहाजे नेहमी दुर्घटनाग्रस्त होत असत. हैतांग नावाच्या बौद्धभिख्खूने स्थानिक गव्हर्नरला असे पटवून दिले की येथे बुद्धमूर्तीची उभारणी केल्याने ही जागा सतत बुद्धाच्या नजरेसमोर राहून या आपत्ती टळतील. सरकारी पाठिंब्याने व हैतांगच्या पुढाकाराने या मूर्तीचे काम इ. ७१३ ला सुरू झाले. काही काळाने गव्हर्नरने मदत बंद केली आणि काम बंद पडले. त्याचा निषेध म्हणून आणि स्वतःची मूर्तीसंदर्भातली तीव्र भावना दाखवण्यासाठी हैतांगने स्वतःचे डोळे फोडून घेतले आणि तो त्या अर्धवट अवस्थेतील मूर्तीशेजारच्या गुहेत राहू लागला. काही काळाने त्याचा मृत्यूही झाला. त्यानंतर ७० वर्षांनी जिएदुशी नावाच्या गव्हर्नरने या प्रकल्पाला पाठिंबा आणि अर्थबळ देऊन तो पुरा केला. गंमत अशी की एवढी प्रचंड मूर्ती कोरताना कपारीतून मोठ्या प्रमाणात दगड निघत असत आणि ते नद्यांच्या संगमाच्या पात्रांत टाकले जात असत. या भरीमुळे ती मूर्ती बनेपर्यंत नद्यांचे प्रवाह खरोखरच संथ होऊन जहाजांचे अपघात होणे थांबले !

आठव्या शतकाच्या पूर्वार्धातला हा ७१ मीटर उंच आणि २८ मीटर रुंद खांदे असलेल्या मूर्तीचा बांधकाम प्रकल्प वास्तुशात्राचाही एक उत्तम नमुना आहे. त्यात पावसाच्या पाण्याने मूर्तीची झीज होऊ नये व पाणी सहज वाहून जावे यासाठीही नलिकायोजना होती. मूर्ती तयार झाल्यावर तिच्यावर १३ मजली उंच लाकडी छत बांधले गेले आणि छताला व मूर्तीला सोने व माणकांनी सजवले गेले. नंतर युवान राजघराण्याच्या शेवटाला मंगोल आक्रमकांनी या छताची मोडतोड केली आणि सोने माणके लुटून नेली. तेव्हापासून ही मूर्ती ऊनपावसाचा मारा सहन करत उघड्यावरच आहे. आजूबाजूच्या प्रदूषणाचाही प्रभाव तिच्यावर पडू लागला आहे.

चेंगदूहून येथे पोहोचायला चारचाकीने दीड तास लागला. मूर्तीच्या आजूबाजूची १८ चौरस किमी जागा ऐतिहासिक संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक मूर्ती आणि कोरीवकामे आहेत... आणि अर्थातच त्यांच्याशी निगडित इतिहास, लोककथा व दंतकथा.

प्रथम त्या क्षेत्राचे भव्य प्रवेशद्वार आपले स्वागत करते.

टेकडी चढायला सुरुवात करताच हा जंगलचा राजा तुम्हाला धाक घालायचा प्रयत्न करतो.

सबंध रस्ताभर अनेक बऱ्या स्थितीतली आणि पडझड झालेली कोरीवकामे दिसतात. टेकडीच्या माथ्यावर येऊन कोरून काढलेल्या कपारीच्या टोकाला पोहोचलो की बुद्धाचे भव्य मस्तक दिसू लागते.

मूर्तीच्या उजव्या हाताच्या बाजूच्या कड्यामधून एक वेळेस एक माणूस खाली उतरू शकेल (एक दोन ठिकाणी फार तर ३- ४) असा चिंचोळा नऊ वळणांचा नागमोडी मार्ग आहे. त्याच्यावरून खाली उतरता उतरता संपूर्ण मूर्तीचे डोक्यापासून पायापर्यंत दर्शन घेता येते.

.

 .....................

.

.

संपूर्ण मार्गावर कड्याच्या भिंतीवर कोरीवकाम केले आहे. शेकडो वर्षांच्या ऊनपावसाच्या माऱ्याने त्याचातील बऱ्याच शिल्पांची हानी झाली आहे. पण काही अजूनही सुबकपणा टिकवून राहिली आहेत.

पूर्ण खाली उतरल्यावरच मूर्तीच्या भव्यपणाची खरी कल्पना येते. त्या तांबड्या पाटीजवळ दिसतोय तो मूर्तीच्या उजव्या पायाचा अंगठा आहे.

परतीचा रस्ता प्रथम कड्यातून खोदलेल्या एका छोट्या बोगद्यातून पलीकडच्या बाजूस जातो आणि मग डोंगर चढून जायला पायर्‍या सुरू होतात.

टेकडीच्या माथ्यावर परत आल्यावर हैतांग भिख्खूची गुहा लागते. तिच्या समोर हैतांगचा पुतळा आहे.

त्यानंतर एक बुद्धाचे देऊळ लागते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे लोक तेथे उदबत्त्या आणि दीपप्रज्वलन करून पुजा करत होते.

देवळाच्या दरवाज्यावरचे कोरीवकाम लक्षवेधक होते.

 .....................

डोंगर चढून-उतरून बराच व्यायाम झाला होता. जेवणाची वेळही झाली होती. लेशान शहरात जाऊन पोटपूजा केली. आता परत बुद्धदर्शन करायचे होते पण या वेळी ते नद्यांच्या संगमात उभ्या राहिलेल्या बोटीतून करायचे होते. नदीच्या वेगाने वाहणार्‍या पाण्यात बोटीचा कप्तान मोठ्या कौशल्याने बोट एका जागेवर रोखून धरतो आणि प्रवाशांना पूर्ण बुद्धमूर्तीचे त्याच्या दोन्ही बाजूंच्या व्दारपालांसकट दर्शन होते--- आणि तेही अगदी मान या कानापासून त्या कानापर्यंत न हलवता !! आणि अर्थातच ही फोटो काढण्याचीही उत्तम संधी असते!

हॉटेलवर परते पर्यंत चार वाजले होते. नंतरचा वेळ मोकळा होता. जरा हॉटेलच्या आसपासच्या रस्त्यांवरून फेरी मारली आणि लवकरच जेवण करून झोपी गेलो.

===================================================================

आज सकाळी जरा आराम होता. नेहमी फिरणे साधारण आठ साडेआठला सुरू होत होते. आज चोंगचिंगला जाण्याकरिता पावणेदहाला हॉटेलवरून निघायचे होते. जरा उशीरापर्यंत ताणून दिली. रमत गमत सकाळची तयारी आणि न्याहारी केली. गाईड आल्यावर निघालो आणि गाडी आम्हाला एका देखण्या इमारतीकडे घेऊन आली.

कसली मस्त इमारत आहे नाही का... विमानतळाची... अर्र.. नाही नाही... रेल्वे स्टेशनची? विश्वास बसत नसेल तर हे वेळापत्रक पहा. पहिल्या रकान्याच्या शीर्षकात "Train Number" असे स्पष्ट लिहिलेले आहे !

आत शिरलो आणि थक्क झालो. अनेक छान छान रेल्वे स्थानके बघितली आहेत पण विमानतळाच्या थोबाडीत मारेल असे रेल्वे स्थानक प्रथमच पाहत होतो.

.

अगदी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जायलासुद्धा विमानासारखी गेट्स होती ! विमानासारखेच वेळ झाल्याशिवाय आणि तिकीट असल्याशिवाय आत सोडत नव्हते.

गाईड म्हणाला प्लॅटफॉर्मवर तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही कारण ही बुलेट ट्रेन आहे... बुलेट ट्रेन ???!!! टूर गाईडने दिलेले सर्व रेल्वेचे पर्याय मी नाकारले होते... केवळ हा सोडून आणि तोही प्रवास फक्त अडीच तासाचा आहे असं म्हणाली म्हणून ! पण आमच्या सगळ्या चर्चेत हा प्रवास बुलेट ट्रेनचा आहे हे ती कधीच म्हणाली नव्हती. सुखद आश्चर्याचा धक्का का काय म्हणतात तो हाच ! कारण आजपर्यंत बुलेट ट्रेनबद्दल ऐकले, वाचले होते पण तिने प्रवास करण्याचा योग आला नव्हता. दिल खूश हुवा ! त्वरित गाईडला बरोबर घेऊन मॅक आणि कोस्टा कॅफेला राजाश्रय दिला. तोपर्यंत गाडीची वेळ झाली होती. गेटमधून खाली प्लॅटफॉर्मवर आलो. एवढा निर्मनुष्य रेल्वे प्लॅटफॉर्म पहिल्यांदाच बघितला. स्वच्छता कर्मचारी गाडी चकाचक करत होते.

माझी पहिली बुलेट ट्रेन सफर त्यामुळे मुलांना पहिल्यांदा रेल्वेत बसताना होतो तसाच आनंद झाला होता ! दोन्ही बाजूला फक्त दोन दोन आरामदायक खुर्च्या; बाहेरचा सगळा नजारा पाहण्यासाठी मोठ्या काचांच्या खिडक्या; सतत बदलती माहिती देणाऱ्या LED पाट्या... अगदी अदलाबदल करीत चिनी/इंग्लिश माहितीसकट. प्रथमदर्शनीच सकारात्मक मत झाले.

.

.

प्रत्येकजण आपापल्या सीटवर विराजमान झाले. दहा मिनिटात गाडी सुरू झाली आणि हा हा म्हणता पाच सहा मिनिटात गाडीने १९६ किमी प्रती तास वेग पकडला !

घासून पुसून चकचकीत केलेल्या रेल्वेच्या डब्यात कोणी 'चुकार बाळा'ने जर काही कचरा केला-- अगदी छोटासा चॉकलेटचा कागद टाकला तरी-- चौकस नजर ठेवून त्वरित आपली आयुधे घेऊन धावून येऊन तो कचरा डबाबंद करणारी ललना होती.

नंतर एक रेल-सुंदरी "लंच घेणार का?" असा पुकारा करीत आली !

पण अरे देवा, रेल्वेत खिडकीजवळची जागा बुक करायला सांगायला विसरलो होतो ! माझ्या शेजारच्या खिडकीजवळच्या खुर्चीवर एक वीस-बावीस वर्षाचा तरुण बसला होता. न राहवून त्याला जागा बदलण्यासाठी विनंती केली. त्याने नकार दिला :-(. रेल्वे जसजशी पुढे जाऊ लागली तसे चिनी निसर्गाचे रूपरंग दिसायला लागले. विमानातून उडताना जो वळ्यांवळ्यांचा डोंगरांचा प्रदेश पाहिला होता तो जमिनीवरून प्रवास करताना दिसायला लागला होता... न संपणार्‍या एकामागोमाग एक येणार्‍या डोंगर आणि दर्‍या. न राहवून मी कॅमेरा बाहेर काढला आणि माझ्या खुर्चीवरून जमेल तसे फोटो काढू लागलो. शेजारच्या तरुणाला माझी दया आली असावी, त्याने स्वतःहून जागा बदलायची तयारी दाखवली ! त्याला कामचलाऊ इंग्लिश येते होते त्यामुळे आमचे थोडेबहुत बोलणे झाले. तो चोंगचिंगच्या एका विद्यापीठात विद्यार्थी होता आणि सुट्टीवरून परत चालला होता.

त्या तरुणाच्या सौजन्याने खिडकीजवळ बसून काढलेले हे चीनच्या डोंगराळ भागांचे काही फोटो.

.

.

हिरवागार निसर्ग, टेकड्या आणि दर्‍या; मधूनच दिसणारी खेडेगावे, एकादे एकांडे घर, शेते, नद्या नाले आणि तलाव... सर्व दिसता दिसता पटकन नजरेआड होत होते. गगनचुंबी इमारतींनी चोंगचिंग आल्याचे जाहीर करायला सुरुवात केली आणि ध्यानात आले की अडीच तासाचा प्रवास संपला होता. थोड्या नाखुशीने खाली उतरलो.

बायजींगच्या केंद्रीय सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या चार महानगरपालिकांपैकी चोंगचिंग एक आहे. साधारणपणे आपल्याकडच्या केंद्रशासित प्रदेशांसारखी (उदा. पाँडिचेरी, दीव व दमण, इ.) ही व्यवस्था आहे. चोंगचिंग हे चीनमधील (आणि जगातील) सर्वाधिक लोकसंखेचे शहर आहे. यांगत्से आणि जियालींग नद्यांच्या संगमावर वसलेल्या व ८२,४०० चौ किमी क्षेत्रफळाच्या या शहराची लोकसंख्या २.७ पासून ३.५ कोटीपर्यंत असल्याचे सांगितले जाते. ३,००० वर्षांचा इतिहास असलेल्या या शहराचे नामकरण Jiangzhou, Yuzhou व Gongzhou असे होत होत शेवटी ८०० वर्षांपूर्वी ते चोंगचिंग (Chongqing) असे झाले ते आजपर्यंत कायम आहे. चीन राजघराण्याच्या काळापासून (इ. पू. २२१ - २०६) हे शहर एक मुख्य प्रशासकीय व सांस्कृतिक केंद्र आहे आणि ते चीनच्या औद्योगीकरणात महत्त्वाचे योगदान देत आहे.

आम्ही पहिला मोर्चा वळवला चोंगचिंगच्या भव्य पिपल्स असेंब्ली हॉलकडे. चीनमधला हा सर्वात मोठा असेंब्ली हॉल आहे असे गाईड म्हणाला. चिनी शैलीत बांधलेली ही आकर्षक वास्तू कामकाज चालू नसल्याने पर्यटकांना खुली होती. त्याचा फायदा घेऊन सर्व इमारत फिरून पाहता आली. अगदी मुख्य सभागृहात जाऊन खुर्चीवर बसूनही घेतले. ह्या ६५ मीटर उंच इमारतीतील मुख्य सभागृहात ४,००० खुर्च्या आहेत.

.

.

.

.

असेंब्ली हॉलसमोरच थ्री गॉर्जेस संग्रहालय आहे. येथे चीनचे जगप्रसिद्ध थ्री गॉर्जेस धरण आणि त्याच्या परिसरातील इतिहास आणि भूगोलाशी संबद्धीत माहिती व वस्तू संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. हे संग्रहालय बघायला अख्खा दिवसही कमी पडेल त्यामुळे फक्त महत्त्वाचे विभाग पाहिले.

राजघराण्यातल्या चिनी स्त्रियांकरिता पालखी

चियांग कै-शेक आणि माओ झेडांग यांचे एकत्रित दुर्मिळ छायाचित्र

एक पारंपरिक "हनीमून स्वीट"

मंजुश्री बोधिसत्व.........................आणि................................मारिची

 ................

संग्रहालयातून निघालो आणि या प्रचंड महानगरीचे दर्शन घेत जवळच्या सिचिकू नावाच्या प्राचीन गावाला भेट द्यायला गेलो.

हे सिचिकूचे प्रवेशद्वार आणि इतर काही फोटो

.

.

नुकत्याच झालेल्या पावसाने यांगत्सेला पूर येऊन नदीकाठच्या अनेक इमारती पाण्याखाली गेल्या होत्या. ह्या पाठमोर्‍या बसलेल्या स्त्रीचे रेस्तरॉं संपूर्ण पाण्याखाली गेल्याने ती एका स्टूलावर बसून विमनस्कपणे पुराच्या पाण्याकडे बघत होती.

वाटेत बरीच पारंपरिक चिनी फास्ट फूड दुकाने लागली पण फार धाडसी न बनता गाइडच्या सल्ल्याने रेस्तरॉं निवडले.

जेवण झाल्यावर चोंगचिंगच्या धक्क्यावर यांगत्से क्रूझची बोट पकडायला जायचे होते. पण गाइडला फोन आला की यांगत्सेला आलेल्या पुरामुळे बोट चोंगचीगपासून एक तासाभराच्या अंतरावरच्या बंदरावर थांबली आहे. गाईड म्हणाला काळजीचे कारण नाही, क्रूझ कंपनीने बसची सोय केली आहे. मी तुम्हाला बसमघ्ये बसवूनच मग तुमचा निरोप घेईन.

बोटीवर पोचेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले. प्लेझर क्रूझ आणि क्रूझ बोटींबद्दल वाचले होते. पण क्रूझ शीपमधून तीन चार दिवसाचा प्रवास करण्याची ही माझी पहिलीच वेळ असल्याने मनात बरीच उत्सुकता होती. दुरूनच त्या सहा मजली तरंगत्या हॉटेलचे दर्शन झाले आणि केव्हा एकदा बोटीत पाय टाकतो असे झाले.

(क्रमशः)

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!!!!!!!!!

डॉक्टरसाहेब, अनपेक्षितपणे बुलेट ट्रेनच्या प्रवासाचे सुख, लॉटरीच लागली तुम्हाला.

एवढा प्रचंड बुद्धाचा पुतळा पाहून अग्दी 'बुद्धं शरणं गच्छामि' झाले ...
<<< आठव्या शतकाच्या पूर्वार्धातला हा ७१ मीटर उंच आणि २८ मीटर रुंद खांदे असलेल्या मूर्तीचा बांधकाम प्रकल्प वास्तुशात्राचाही एक उत्तम नमुना आहे. >>>> हे वाचून तर थक्कच झालो - किती कुशल कारागीर असतील हे ...

बाकीचे वर्णनही भारीचे - मस्त चीन यात्रा चालू आहे तुमच्याबरोबर ... Happy

बुद्धाचा एवढी प्रचंड मुर्ति पाहून थक्क व्हायला झाले.

कारागीरांच्या कुशलतेला सलाम! पुढिल भागाच्या प्रतिक्षेत..

त्या बुद्धमूर्तीबद्दल फक्त वाचले होते त्यावरून तिची कल्पना आली नव्हती आता मात्र हे फोटो बघून ती आली.
आणि बुलेट ट्रेन.. क्या बात है !!

मस्त वर्णन आणि फोटो.

रेल-सुंदरी <<< हा हा हा. छान वाटला हा शब्दप्रयोग.

असेंब्लीची वास्तुही सुंदर आहे.

एक प्रश्न - हे सगळे चीनी पावसाळ्यातले फोटो आहेत का? कारण ट्रेनमधून घेतलेले फोटो हे आपल्याकडे पावसाळ्यात जसे असते तसे छान हिरवळ आणि मधूनच पावसाच्या (काहीशा गढूळ) पाण्याची डबकी असतात तसेच दिसतेय.

आणि हो, बुद्धाच्या मूर्तीबद्दल नमूद केली नाही तर हा प्रतिसाद अपूर्ण राहील. केवढी भव्यता!!!

एक प्रश्न - हे सगळे चीनी पावसाळ्यातले फोटो आहेत का? कारण ट्रेनमधून घेतलेले फोटो हे आपल्याकडे पावसाळ्यात जसे असते तसे छान हिरवळ आणि मधूनच पावसाच्या (काहीशा गढूळ) पाण्याची डबकी असतात तसेच दिसतेय.>>>

सहलिची वेळ ऑगस्ट-सप्टेंबर म्हणजे पावसाळ्याचा शेवट होता. बहुतांश वळ्यावळ्यांचा डोंगरदर्‍यांनी भरलेला हा चीनचा पूर्व व दक्षिण भाग "भौगोलिक प्रेशर कुकर" परिणामाने सतत बर्‍यापैकी उष्ण आणि बरेच घामाघूम करणारा दमट असतो. अश्या वातावरणामुळे तो जवळजवळ वर्षभर हिरवागार असतो. तेथील जमीन सुपीक आहे. चीनच्या सांस्कृतिक आणि राजकिय जडणघडणीच्या इतिहासात या भौगोलिक फार परिस्थितीचा मोठा वाटा आहे.