पूर्व युरोप भाग ३ - व्हिएन्ना

Submitted by मनीष on 21 December, 2014 - 13:16

भाग पहिला: http://www.maayboli.com/node/50524
भाग दुसरा: http://www.maayboli.com/node/50544

बुडापेस्टहून सकाळची रेलजेट पकडून व्हिएन्नाला परत आलो. ट्रेनमधे ज्या बोगीत चढलो ती नेमकी भरली होती आणी मी नेमक्या सीटस बूक केल्या नव्हत्या. पण शेवटी आम्हाला एकत्रित चार सीटस मिळाल्या त्याही नेमक्या 'चाइल्ड कॉर्नर' जवळच्या. चाइल्ड कॉर्नर ही एक मस्त कन्सेप्ट आहे. तिथे मुलांसाठी स्क्रीन असते आणि मुलांचे कार्टून्स किंवा चित्रपट चालू असतात.
व्हिएन्नाला उतरून आम्ही आमच्या बूक केलेल्या अपार्टमेंटवर पोहोचलो. घाईगडबडीत अपार्टमेंटवर जायचा बरोबर मॅप घेतला नव्हता. शेवटी एका दुसर्‍या हॉटेलमधेच पत्ता शोधायला मदत मागितली आणि अपार्टमेंटवर पोहोचलो. फ्रेश होउन व्हिएन्ना बघायला बाहेर पडलो. व्हिएना मधली सार्वजनिक वाहतूक फारच मस्त आणि फास्ट आहे. मेट्रोनी आम्ही 'हॉफबर्ग' या 'इंपिरीयल पॅलेस' ला गेलो. हॅब्सबर्ग राजांचे हिवाळी निवासस्थान. ऑस्ट्रियन आणि युरोपियन इतिहासातले दिग्गज इथं रहायचे. सध्या ऑस्ट्रियाच्या अध्यक्षांचे निवासस्थान आहे. शिवाय काही ऑस्ट्रियाची काही महत्त्वाची कार्यालयं आता इथं आहेत. संध्याकाळ झाली होती त्यात थोडा पाऊस सुरू होता. त्यामुळं फोटो एवढा चांगला आला नाहिये.

या राजवाड्यात अनेक विभाग आहेत जे पर्यटकांसाठी खुले आहेत (अर्थात तिकीट काढून). त्यातलेआम्ही इंपिरीयल अपार्टमेंटस, सिसी म्युझियम आणि इंपिरीयल सिल्व्हर कलेक्शन बघितलं. ऑस्ट्रियन सम्राट फ्रांझ जोसेफ (ज्याने हंगेरीवर पण राज्य केले आणि पेस्ट शहर परत वसवले) आणि महाराणी एलिझाबेथ (हिलाच सिसी असंही म्हणत) हे इंपिरीयल अपार्टमेंटसमधे, जे १९ दालनांनी बनलंय, रहायचे. सिसी म्युझियममधे महाराणी एलिझाबेथच्या व्यक्तिगत वस्तू आणि तिच्या आयुष्यातील घटनांची माहिती आहे. इंपिरीयल सिल्व्हर कलेक्शनमधे भव्य डिनर सेटस आणि तत्सम वस्तूंचं डोळे दिपवून टाकणारं प्रदर्शन आहे.त्यातल्याच काही वस्तू खालच्या फोटोमधे आहेत.

हॉफबर्ग पॅलेस बघून आम्ही व्हिएन्ना प्रॅटर बघायला गेलो. प्रॅटर हे जगातले सगळ्यात जुने अम्युझमेंट पार्क आहे. दुसर्‍या जोसेफनं हे पार्क सर्वांसाठी १७६६ मधे खुले केले त्यानंतर इथले बरेचसे खेळ (मेरी-गो-राउंड, बोलिंग अ‍ॅले, इ.) सुरू झाले. याच प्रॅटरमधले सर्वात मोठं आकर्षण आहे इथलं जायंट व्हील (पाळणा). हे एका दृष्टीनं व्हिएन्नाचं लँडमार्क आहे. हा पाळणा १८९७ मधे बांधला होता. दुसर्‍या महायुध्दात बाँबमुळं जवळजवळ बेचिराख झालेला पाळणा १९४५ मधे परत उभारला गेला.

पुढच्या दिवशी आम्ही व्हिएन्नामधलाच अजून एक पॅलेस बघायला गेलो. हा श्कॉनब्रून (Schonbrunn) पॅलेस म्हणजे हॅब्सबर्ग राजांचे उन्हाळ्यातील निवासस्थान. हाही एक सुंदर पॅलेस आहे. पॅलेसमधेच खूप सुंदर बाग आहे.

पॅलेसच्या प्रवेशद्वाराजवळचा कारंजा..

राजांची व्यक्तिगत बाग

नेपच्यून कारंजा आणी त्याच्या मागं ग्लोरिएट

पॅलेसच्या भिंतीवरचं एक घड्याळ..

जगातलं सगळ्यात जुनं प्राणीसंग्रहालय याच पॅलेसच्या आवारात आहे. पॅलेस आणि बाग बघून आम्ही प्राणीसंग्रहालय बघून आलो. मुलींनी तिथं भरपूर मजा केली.

तिसर्‍या दिवशी आम्ही व्हिनेयार्ड्स बघण्यासाठी व्हिएन्नाजवळच्याच काहलेनबर्गला गेलो. काहलेनबर्ग व्हिएन्ना शहराअंतर्गतच आहे. व्हिएन्ना हे जगातलं एकमेव महानगर आहे ज्याच्या शहराच्या हद्दीतच व्हिनेयार्डस आहेत.

काहलेनबर्गच्या डोंगरावरून खाली येताच Heiligenstad मधे बीथोवनचे स्मारक आहे. बीथोवनने Heiligenstädter Testament इथेच लिहिलंय.

तिथून आम्ही बेलवेदर (Belvedere) पॅलेसला गेलो. हे बरोक शैलीतलं प्रिन्स युजिनचं उन्हाळ्यातील निवासस्थान जे १८व्या शतकात बांधलंय.

तिथून जवळच असणारं सोव्हिएत वॉर मेमोरियल

ऑस्ट्रियन संसद

हे व्हिएन्नामधले आम्ही बघितलेले शेवटचे आकर्षण. दुसर्‍या दिवशी ब्रसेल्सला परत आलो.

ऑस्ट्रियाबद्दल -
राजधानी - व्हिएन्ना
चलन - युरो
भाषा - जर्मन

ऑस्ट्रियाला युरोप आणी जागतिक इतिहासात बरेच महत्त्वाचं स्थान आहे. चांगलीच सुबत्ता असलेला पुढारलेला देश आहे. व्हिएन्नामधे ही सुबत्ता बरीच जाणवते. इन्सब्रूक आणि साल्झबर्ग ही इतर दोन ठिकाणं बरीच प्रसिध्द आहेत.

समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे! सुंदर फोटो आहेत. वर्णनही वाचतो. आर्किटेक्चर ची स्टाईल आम्ही व्हर्साय चा राजवाडा पाहिला होता त्याच्याशी बरेच साम्य वाटले.

आवडले वर्णनही. त्या विनयार्ड्स पैकी एक थोढा चढउतार असलेला फोटो तर एकदम मोने (Monet) वगैरेंच्या पेंटिंग्ज प्रमाणे दिसतोय :).

फ्रांझ जोसेफ हे नाव नुकतेच न्यूझीलंड मधेही दिसले होते. तेथे फ्रांझ जोसेफ ग्लेशियर आहे. तो हाच की काय माहीत नाही. तेथील इतिहासात ऑस्ट्रियन संदर्भ काही दिसला नाही.

दुसरे म्हणजे सिसी-एलिझाबेथ ही इंग्लंडच्या राजघराण्यातीलच कोणीतरी का (सध्याची राणी ती नसेल याची कल्पना आहे).

धन्यवाद फारेंड, सेनापती आणि चनस..

फ्रांझ जोसेफ हे नाव नुकतेच न्यूझीलंड मधेही दिसले होते. तेथे फ्रांझ जोसेफ ग्लेशियर आहे. तो हाच की काय माहीत नाही >> विकीपीडिया वरील माहिती नुसार तो हाच फ्रांझ जोसेफ. The first European description of one of the west-coast glaciers (believed to be Franz Josef) was made from the steam ship Mary Louisa in 1859.[5] The glacier was later named after Emperor Franz Joseph I of Austria by the German explorer, Julius von Haast in 1865.

सिसी-एलिझाबेथ >> ती जर्मनीमधल्या बव्हेरिया प्रांतातली होती.

धन्यवाद दिनेश आणि जिप्सी..

बरीच गॅप पडली कि ! >> Happy मुहुर्तच लागत नव्हता शेवटचा भाग टाकायचा.. Happy

आहा! काय फोटो आहेत! Happy
पराग +१

ते पुतळ्यांनी युक्त नेपच्यून कारंजं खूप आवडलं.

सोव्हिएत वॉर मेमोरिअल व्हिएन्नात कसं काय?

धन्यवाद प्रीति..

सोव्हिएत वॉर मेमोरिअल व्हिएन्नात कसं काय? >> दुसर्‍या महायुध्दात जर्मनीच्या ताब्यातून व्हिएन्ना सोडवण्यासाठी (बॅटल फॉर व्हिएन्ना) ज्या १७००० रशियन सैनिकांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मरणार्थ हे मेमोरियल आहे.

मस्त रे मनीष.
तुझ्याकडून सहकुटुंब फिरण्याच्या टिपा घ्यायला पाहिजेत.

मला विनेयार्ड एकदम आवडले. ते प्राचीन मेरीगोराउंड एकदम सावकाश जाणारे आहे का? लंडन आय स्टाइल? की पोटात गोळा स्टाइल?

धन्यवाद अरूंधती, सिंडरेला, मृ आणि श्री..

अजून भाग येणार आहेत का? >> Happy या ट्रीपचे नाही Happy पुढच्या ट्रीप्सचे भाग टाकीन लवकरच.

ते प्राचीन मेरीगोराउंड एकदम सावकाश जाणारे आहे का? >> हो. खूपच हळू फिरतं ते आणि एका की दोन फेर्‍यात बास करतात. तसं ते खूप हाइप्ड अ‍ॅट्रक्शन आहे आणि महाग Wink

तुझ्याकडून सहकुटुंब फिरण्याच्या टिपा घ्यायला पाहिजेत. >> नक्की.. जेवढ्या लवकर फिरायला चालू कराल तेवढ्या लवकर मुलं सरावतात Wink