सुक्या घोळीचा रस्सा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 December, 2014 - 05:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुक्या घोळीच्या तुकड्यांचे छोटे तुकडे.
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
मसाला २ चमचे जर मिरची पुड वापरणार असाल तर पाऊण ते १ चमचा पुरे.
२ चमचे तांदळाच पिठ
फोडणी साठी तेल २ मोठे चमचे
लिंबा एवढी चिंच
गरजे नुसार मिठ
थोडी चिरलेली कोथिंबीर
१ हिरवी मिरची

क्रमवार पाककृती: 

१) सुक्या मशाचे एक ते दिड ईंचाचे तुकडे करून ते पाण्यात ठेवावेत ५ मिनीटांनी खवले जरा मऊ पडली की खवले काढून टाकावी व तुकड्या स्वच्छ धुवुन घ्याव्या.

२) भांड्यामधे तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा गुलाबी रंगावर परतवावा.

३) आता त्यात हिंग, हळद, मसाला घालून गरजेनुसार पाणी घाला. माश्याच्या तुकड्या घाला. १० मिनीटे हा रस्सा उकळू द्या.
४) ह्या रश्यात मिठ (तुकड्या खारवलेल्या असतात त्यामुळे मिठ थोडे कमीच घालायचे), चिंचेचा कोळ व तांदळाचे पिठ पाण्यात पेस्ट करून सोडा. आता अजून ५ मिनीटे उकळू द्या. वरून मोडलेली मिरची व कोथिंबीर घाला उकळताना व गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

सुक्या माश्याचे कालवण अगदी तोपासू लागते. अशाच रावस, पापलेट वगैरे मोठ्या माशांच्या तुकड्याही मिळतात. ह्याच पद्धतीने त्याचे कालवण करता येते.

तांदळाचे पीठ दाटपणासाठी वापरले जाते.
ह्या तुकड्यांना खाराचे मासेही म्हटले जाते.
सुक्या घोळीच्या तुकड्या बाजारात मिळतात. सुकी घोळ नीट पारखुन घ्यावी. चांगली कडकडीत सुकलेल्या व खाली फोटोत अशी मोठी खवले दिसतात तशा खवले असलेल्या तुकड्या घ्यायच्या. खवल्यांमुळे मासा घोळीचा आहे की दुसरा ते लक्षात येत. घोळीची खवले खाली फोटोत देत आहे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ, एकमेकांचा आदर म्हणतात तो हाच कि...
आता मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळावर देखील व्यवस्थित पॅक केलेले सुकट विकायला असते. ( माझे विमान सकाळचे असते. मी रात्रीच तिथे जातो त्यामूळे रात्रभर असे संशोधन करता येते. ) त्यामूळे परदेशी जाणार्‍या मस्यप्रेमींची सोय झालीय.

मानुषी Lol

साधना धन्स.

दिनेशदा तुम्ही म्हणताय त्या विचारांचा उल्लेख माहेरच्या सुक्या माश्यांच्या लेखात केला आहे. माझी नणंदही लंडन वरून आली की मी तिला जाताना सुके मासे पॅक करुन देते.

स्वर्गीय 'काँबिनेशन्स'पैकीं एक; भाजलेल्या सुक्या बांगड्याच्या कांदा, तिखट व कोथींबीर घातलेल्या सुक्या कोशिंबिरीबरोबर भाकरी, सोलकडी-भाताबरोबर कांद्यावर तळलेली सुकट [ सुकी छोटी कोलंबी] इ.इ. इतर स्वर्गीय जोड्या !! अर्थात सुके बोंबिल कोणत्याही फॉर्ममधे प्रियच - भाजून, तळून, कालवण, मसाला घालून सुकं तिखलं वगैरे वगैरे !>>>>>> अहाहा!
केरळवरून मुंबईला येताना एके ठिकाणी सुक्या माशांचा वास आल्याबरोबर आमची नाके मांजराला लाजवतील अशी स्फुरु लागली, तर डब्यातील सहप्रवासी 'ई कसला वास येतोय' करायला लागले.

एके ठिकाणी सुक्या माशांचा वास आल्याबरोबर आमची नाके मांजराला लाजवतील अशी स्फुरु लागली, तर डब्यातील सहप्रवासी 'ई कसला वास येतोय' करायला लागले.
,......,.........

संध्याकाळची वेळ, बंदरावर, समुद्रावरून येणारे खारे वारे आणि सोबतीला मिसळलेला हलकासा सुकटाचा वास.... कमालीची तरतरी यावी असे जादूई वातावरण असते हे..

पण ज्यांना सुकटाचा वास झेपत नाही अश्यांना तो किती डोक्यात जात असेल याचीही कल्पना आपण सहज करू शकतो.. असला प्रामाणिक वास आहे तो !

घरी मासे, कोलंबी साफ केल्यावर त्या कचर्याचा, लगेच टाकला नाही तर थोड्या वेळाने येणारा वास आणि तव्यावर चरचरणार्या तळलेल्या तुकडीचा वास हे एकाच खाद्यपदार्थाच्या वासाची दोन कमालीची टोके आहेत..

Pages