सुक्या घोळीचा रस्सा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 December, 2014 - 05:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुक्या घोळीच्या तुकड्यांचे छोटे तुकडे.
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
मसाला २ चमचे जर मिरची पुड वापरणार असाल तर पाऊण ते १ चमचा पुरे.
२ चमचे तांदळाच पिठ
फोडणी साठी तेल २ मोठे चमचे
लिंबा एवढी चिंच
गरजे नुसार मिठ
थोडी चिरलेली कोथिंबीर
१ हिरवी मिरची

क्रमवार पाककृती: 

१) सुक्या मशाचे एक ते दिड ईंचाचे तुकडे करून ते पाण्यात ठेवावेत ५ मिनीटांनी खवले जरा मऊ पडली की खवले काढून टाकावी व तुकड्या स्वच्छ धुवुन घ्याव्या.

२) भांड्यामधे तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा गुलाबी रंगावर परतवावा.

३) आता त्यात हिंग, हळद, मसाला घालून गरजेनुसार पाणी घाला. माश्याच्या तुकड्या घाला. १० मिनीटे हा रस्सा उकळू द्या.
४) ह्या रश्यात मिठ (तुकड्या खारवलेल्या असतात त्यामुळे मिठ थोडे कमीच घालायचे), चिंचेचा कोळ व तांदळाचे पिठ पाण्यात पेस्ट करून सोडा. आता अजून ५ मिनीटे उकळू द्या. वरून मोडलेली मिरची व कोथिंबीर घाला उकळताना व गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

सुक्या माश्याचे कालवण अगदी तोपासू लागते. अशाच रावस, पापलेट वगैरे मोठ्या माशांच्या तुकड्याही मिळतात. ह्याच पद्धतीने त्याचे कालवण करता येते.

तांदळाचे पीठ दाटपणासाठी वापरले जाते.
ह्या तुकड्यांना खाराचे मासेही म्हटले जाते.
सुक्या घोळीच्या तुकड्या बाजारात मिळतात. सुकी घोळ नीट पारखुन घ्यावी. चांगली कडकडीत सुकलेल्या व खाली फोटोत अशी मोठी खवले दिसतात तशा खवले असलेल्या तुकड्या घ्यायच्या. खवल्यांमुळे मासा घोळीचा आहे की दुसरा ते लक्षात येत. घोळीची खवले खाली फोटोत देत आहे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतोय. तूमच्याकडे सुके मासे पण आवडीने खातात ? मालवणला आमच्या घरी फक्त पावसाळ्यात ( श्रावण, गणपति सोडून ) खात असत. एरवी फक्त ताजेच !

मस्तच गं , गेल्यावर्षी सुकी घोळ घेउन ठेवली होती पण जास्त केलीच नाही. आता मे महिन्यात बाजारात मिळेल तर पावसाळ्यासाठी स्टॉक करायाला हवा.

दिनेशदा नेहमीच नाही करत पावसाळ्यात आणून ठेवले जातात आणि कधीतरी चेंज म्हणून पण त्या दिवशीही पर्वणी वाटते.

कविता असेच चेंज म्हणून कर.

साती धन्स.

मस्तच!

दिनेशदा, बहुधा आपण सुक्या माश्यांना पर्याय म्हणून बघत असल्याने असावे, मी मात्र सुक्या भाजलेल्या बोंबलास पापडाला पर्याय म्हणून बघतो आणि गरमागरम पिठीभाताबरोबर हादडतो.. सोबत चवीला लालतिखट ठेचा घ्यायचा.. पावसाळ्याच्या दमटकुंदधुंद वातावरणात याची मजा काही औरच पण थंडीतही मजा येतेच..

जागू, ते धुतलेले तुकडे तू फोडणीत नाही घातलेस? बाकीच्या साहित्याचा रस्सा केला आहेस. बघ मी चूक काढली नॉनव्हेज रेसिपीत Wink Proud

मी कट्टर शाकाहारी आहे.. पण बघायला आणि करायलाही आवडते नॉन व्हेज
...
शप्पथ... हे जमवू शकणारे माझ्या आयुष्यात पाहिलेले आपण पहिलेच! हे संतांचे लक्षण आहे Happy

अश्वे Lol आता टेस्ट पण करून पाहा.. शीक काही दक्षी कडून Wink

दिनेश , आता बघ हाँ , तू पब्लिकली जाहीर केलंयस हे :), तुला रॉ मटीरियल मी पुरवीन !!!
जागु, तोंपासुये... पण सुके मासे, कोळंबी मी जर्राही खाऊ नाही शकत Sad

अश्विनी , भारीच चूक काढलीस.
आम्ही त्या फोटोच्या रंगात इतके वहावलो की रस्सा नुसत्या मसाल्याचा झालाय हेच विसरलो.
आता हा नुसता रस्सा पण भारी लागेल यात शंका नाही पण घोळ रश्शाच्या पातेल्यात न घालता जागूने घोळ घातलाय.
Happy

मी ताजी घोळ खात नाही पण सुकी खाते(खायचे म्हणावं लागेल. शेवटची खाऊन १५ वर्षे झाली)

एकत्र जमताना वेळेचा घोळ घालु नका म्हणजे झाल.:डोमा::फिदी:

जागु ते मासे भारी दिसतायत. माझ्या दोन्ही मैत्रिणी कायम सुकवलेले मासे खातात. पण ते बोम्बिल वगैरे होते, घोळ कधी बघीतला नाही मी त्यान्च्याकडे. पण प्रकरण भारी दिसतय.

आहाहा! मी कालच सुका बोंबिल + कांदा + बटाटा अशी सुकी भाजी केली होती>>>>. देवा! माझं लाडकं.

विना खोबरे रस्सा/ आमटी कशी होऊ शकते? जागू, वरचं प्रकरण मस्त दिसतंय.

'सुक्या घोळीचा रस्सा' हे शीर्षक वाचून घोळीची सुकवलेली पानं, तेलातल्या लसूण घातलेल्या खमंग फोडण्या, डाळीचं पीठ, असलं काहीकाही पाव सेकंद डोक्यात आलं. पहिला फोटो बघून 'हा घोळीच्या झुडपाचा कुठला भाग' असा बावळट प्रश्नपण डोक्यात आला. मग व्यवस्थीत वाचल्यावर ट्यूब पेटली. Proud

पाककृती आणि फोटो भारी आहेत.

इतक्यातच ओरिएंटल दुकानातून

dryfish-herring-maayboli.jpg

हे हेरिंग मासे आणले आहेत.

इथे बर्‍याच माश्यांची मराठी नावं दिसली. जाएंटहेरिंगकरता 'भिंग' लिहिलंय. पण हे नाव कधी ऐकलं नाही. वरच्या कृतीनं या माश्यांचा रस्सा बरा लागेल का? जाणकारांनी कृपया सांगा.

थँक्यू जागू.

जागुताई माझ्याकडे खारी मांदेली आणि सुकवलेली मुशी आहे.
तीपण अशीच बनवता येईल कि काही बदल करावे लागतील?

प्रथम हो करता येईल असेच त्याचेही कालवण. मुशी जरा जास्त शिजवावी लागेल असे वाटते.

दिनेशदा, मनीमोहोर, अश्विनी तुमचे शाकाहारी आभार Lol

अश्विनी लब्बाड बदलते ग Lol

ऋन्मेष हो पापडाला पर्यायही आहे मांसाहारात हा. सुक्या माश्यांच्या चटण्याही भारी असतात.

वर्षू अरेरे असते काहिंना अ‍ॅलर्जी.

जाई, साती, स्वाती, रश्मी, अनिलभाई धन्यवाद.

देवकी अग सुक्या माश्यात नाही खास लागत खोबर. म्हणूनच दाटपणासाठी पिठ वापरतात तांदळाच.

मृण्मयी फोटो मस्त. आणि घोळीची भाजी चा घोळ पण वाटलाच मला कोणालातरी होईल.

हे कधी खाल्लेलं नाही. मांडेली आणि बोंबील मात्र आवडीचे. त्यातही बोंबील नुसताच भाजलेला असेल तर गर्मागरम तांदाळाच्या उकड्या भातासोबत जे काय लागतो!!!! अहाहा!!!

जागूजी, नेहमीप्रमाणे सलाम. कधीं केला नाही हा प्रकार पण आतां करून बघणं आलंच !
<< मात्र सुक्या भाजलेल्या बोंबलास पापडाला पर्याय म्हणून बघतो आणि गरमागरम पिठीभाताबरोबर हादडतो..>> स्वर्गीय 'काँबिनेशन्स'पैकीं एक; भाजलेल्या सुक्या बांगड्याच्या कांदा, तिखट व कोथींबीर घातलेल्या सुक्या कोशिंबिरीबरोबर भाकरी, सोलकडी-भाताबरोबर कांद्यावर तळलेली सुकट [ सुकी छोटी कोलंबी] इ.इ. इतर स्वर्गीय जोड्या !! अर्थात सुके बोंबिल कोणत्याही फॉर्ममधे प्रियच - भाजून, तळून, कालवण, मसाला घालून सुकं तिखलं वगैरे वगैरे !
<< मीं कट्टर शाकाहारी आहे >> दिनेशदा, गंमत अशी कीं आमच्या वडिलांकडची सर्व मंडळी कट्टर शाकाहारी आणि आईकडची अट्टल मासेखाऊ पण दोघानीही एकमेकाना बाटवण्याचा [!] मात्र प्रयत्न कधींच केला नाहीं ! ! त्यामुळें, मासे व शाकाहारी मंडळी, दोघांवरही आम्हां भावंडांचं जीवापलीकडचं प्रेम !!! Wink

फोटो एकदम कातील आलेत. सुकी घोळ कधी खाल्ली नाही पण इतर सुकी मंडळी आवडीची. माझी आजी सुक्या मोरीचे अतिशय चविष्ट तिखले करायची. दुर्दैवाने मला त्याची अ‍ॅलर्जी असल्याने जास्त खाणे शक्य होत नसे तरीही मी खायचेच. अर्थात आजीची रेसिपी पक्की मालवणी होती. जागुची रेसिपी वेगळी आहे. जागु रेसिपीही एकदा करुन पाहिन.

आधी वाटलं (आम्हा घासफूस खाणार्‍यांचा विचार!)की बहुतेक घोळाची सुकवलेली भाजीच असणार. पण जागूची रेस्पी म्हणून काय आहे बघू म्हणून इथे आले तर नंतर वाटलंच की जागूली असल्या "घोळा"त नाय पडणार!
काय मी तरी?????????????????? Proud

Pages