स्वच्छता दिन

Submitted by परदेसाई on 15 December, 2014 - 09:29

“हे मोदीसाहेब खरोखरच ग्रेट आहेत. वा...वा... आधी काय तर सगळा भारत झाडून काढा,” पेपरातलं आपलं डोकंबाहेर काढत अण्णाभाऊ उद्गारले. सकाळचा पेपर अगदी अथपासून इतिपर्यंत वाचून काढल्याशिवाय ते खाली ठेवत नसत. पण पहिल्याच पानावर असताना त्यानी पेपरातून डोकं बाजूला काढलेलं पाहून स्नेहाताई , म्हणजे अण्णाभाऊंच्या अर्धांगिनी आश्चर्यचकित झाल्या. असं यापूर्वी दोनदाच झालेलं त्याना आठवत होतं. एकदा हिमेश दालमियाला सर्वोत्कृष्ट गायक म्हणून "पद्मश्री" मिळाली तेव्हा वैतागून, आणि एकदा पाखी सावंत महाराष्ट्राची मुख्यमंत्री होणार हे वाचून.

"एकदा ह्यांनी पेपरातून डोकं बाहेर काढलं की लगेच दुसऱ्या चहाचा तगादा लागणार," असं मनाशीच म्हणत त्या थबकल्या.
"अगं, थांब. काय करतेस?" ग्रीलमधून केसाचा गुंता बाहेर टाकत असलेल्या पत्नीवर ते खसकले. हातातला गुंता बाहेर ढकलत, "मी काय केलं?" एवढंच त्या म्हणाल्या.
"मोदी म्हणताहेत भारत झाडून काढा असं मी तुला सांगतोय आणि तू खाली गल्लीत कचरा टाकतेस?"
"ऐकलं हो मी. भारत झाडून काढा म्हणाले, गल्ली नाही काही. आणि केस टाकतेय कचरा कुठेय?"
"अगं पण रोज असेच केस टाकलेस तर गल्लीत कचरा नाही का होणार? आणि गल्ली भारतातच आहे ना?" ते वैतागत म्हणाले.
"माझे केस म्हणजे कचरा नव्हे. आणि मी नाही टाकले तर बाकीच्या बायका टाकतात, त्यांचे येणारच ना? आणि तुमचं काय जातंय मी गुंता खाली टाकला तर. तुम्ही थोडेच जाताय गल्ली झाडायला?"
"तेच... तेच तर करणार आहे मी," ते म्हणत होते तेवढ्यात दारावरची बेल वाजली. पेपरवाला गेल्यानंतर कुणी लॅच लावली नसावी. शेजारचे साने तसेच दरवाजा ढकलून आत आले. त्यांच्या मागून रेगेही घरात शिरले.
"कुठे झाडायला जाताय?" सान्यानी अण्णाभाऊंना डिवचलं.
"गल्ली... गल्ली झाडायला निघालेत... मोदी म्हणाले ना? म्हणून निघालेत," स्नेहाताई म्हणाल्या.
"गल्लीच नाही, तर गल्ली झाली की रस्ता... रस्ता झाला की हायवे, सगळंसगळं झाडून काढणार मी,” भाऊंचा आवेश वाढला.
"पण अण्णाभाऊ, मोदी म्हणाले म्हणून एकदम सगळी मुंबई झाडायची की काय?"
"तर काय हो? उद्या पवार म्हणाले ‘शेती करा’ तर लगेच गच्चीत शेती करणार की काय तुम्ही? आणि समजा केलीत तर एका दोन झाडे लावून एकदम २००० कोटींची मालमत्ता होणार की काय त्यांच्या शेतात होते तशी?" रेग्यानी शंका काढली.
"रेग्या .... उगाच तुझ्या नावावर पिक्चर आला म्हणून हुरळून जाऊ नकोस," अण्णाभाऊ ओरडले. हल्ली रेगे सगळ्यांना ‘रेगे’ पाहिलात का? असं मुद्दाम विचारायचे हे अण्णाभाऊंच्या लक्षात आलंच होतं.
"माझ्या नावाचं जाऊ देत. पण तुमच्या नावाचं काय?"
"आता माझ्या नावाचं काय?"
"अहो तामिळमध्ये अण्णा म्हणजे मोठा भाऊ... म्हणजे तुमचां नाव मोठा भाऊभाऊ नाय झालां? आणि भाऊंची बायको कोण? तर ताई?" रेग्यानी टेक्निकल मुद्दा काढला. अण्णाभाऊ त्यांच्याकडे बघतच राहिले .
"अहो नावांचं जाऊ द्या हो... भाऊ सफाईला निघालेत त्याचं काय ते बोला," सान्यानी विषयाची गाडी परत रुळावर आणली.
"तमिळमध्ये नाही तर मराठीत ... चांगली मराठीत स्वच्छता करीन मी... आणि मीच नाही तर... तर सगळ्याना सफाई करायला लावीन मी," भाऊ परत सफाईकडे वळले.
"अगं, गल्लीची सफाई करायचीय, तयारी कर... " अण्णानी पेपरबरोबर आलेल्या जाहिरातींचा बोळा करून खुर्चीखाली टाकला.
"सफाई करणार तुम्ही... आणि तयारी मी करू? बरं करते... " स्नेहाताई म्हणाल्या. रेगे पेपरातल्या भविष्यात गुंतले होते. स्नेहाताईंनी फोन उचलला...
"अरे वॉचमेन, वो सफाईवाला पोऱ्या आता है ना, वो है क्या उदर?"
"नाही ताईजी... वो तो घर चला गया. अभी तो कल आयेगा वो..." सोसायटीचा गुरखा त्याच्या हिंदीत म्हणाला.
"बरं काम के Time घर जाते ये लोग..." असं म्हणत त्यांनी फोन ठेवला आणि , "अहो गल्ली झाडायला आज कोण मिळत नाहीय. आता उद्यापासून सुरु करा, " त्या भाऊंना म्हणाल्या.
“पेपर वाच... परत एकदा वाच. त्यात मोदीजींनी ‘इतरांकडून सफाई करून घ्या’ असं सांगितलय का? सांगितलाय का?”.
“अहो पण आता तो पोऱ्या घरी गेला तर माझ्यावर का वैतागताय तुम्ही?”
“सफाई मी करणार आहे... पोऱ्या नाही...,” पेपरातल्या मोदीजींच्या फोटोकडे निर्देष करत ते म्हणाले.
"मग मी काय तयारी करू ते तरी सांगा. पेपर वाचायला मला वेळ नाहीय. तो तुम्हीच वाचा."
"मला एक झाडू आणून दे. साने तुम्ही तुमच्या घरून झाडू आणा. आणि रेगे... तुमच्याकडे टोपली आहे का?"
"टोपली? ती कशाला? म्हणजे मी कोकणी म्हणून माझ्याकडे टोपली असणारच असा काय समज बिमज आहे की काय तुमचा?" रेग्यानी शंका घेतली.
"टोपलीचा आणि कोकणाचा काय संबंध?" भाऊ पुन्हा वैतागले.
"काय संबंध?"
"काय संबंध?"
"संबंध काय तो तुम्हीच सांगा. सोसायटीचे सेक्रेटरी असलात म्हणून उगीच ऐकून घेणार नाही मी. काय? "
"अहो रेगे. कचरा उचलायला टोपली हवीय. म्हणून विचारतोय. उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नका."
"तू. झाडू आण आधी...,” भाऊंचा रोख पुन्हा बायकोवर आला.
"मी माझी झाडू देणार नाही. सांगून ठेवते... किचन झाडते आपली कामवाली बाई त्याने.”
"हेच ... हेच.... म्हणतो मी... तिकडे मोदीजी म्हणतात सफाई करा आणि इकडे..."
"अहो पण भाऊ... घरातली झाडू घेऊन गल्ली कशी झाडता येईल? त्यासाठी खराटे लागतील ना?" सान्यांनी दोघानाही शांत केलं.
"मी तेच म्हणतेय. खराटा लागेल.... ह्या रेग्यांकडे खराटा आहे का ते विचारा"
"तूच विचार. नाहीतर त्याला पुन्हा कोकणाचा अपमान करतोय असं वाटेल."
"खराटा? म्हणजे वाडवण की खुटावरा? वाडवण वापरून जुनी झाली की मग त्याचा खुटावरा होतो. तसला एक आहे माझ्या घरात, पण तो बाथरूम घासायला वापरतो आम्ही... आणू?"
"शी... तुमच्या बाथरूममधला खराटा मी गल्ली झाडायला घेऊ की काय? काही नकॊ."
"अहो पण बाथरूममधला खराटा असला म्हणून काय? गल्लीच झाडायचीय ना?" सान्यानी विचारले.
"त्याचा खराटा त्यालाच वापरू दे. तू दुकानातून मागवून घे एखादा खराटा," भाऊनी स्नेहाताईना बजावलं.
स्नेहाताईनी लगेच वाण्याला फोन लावला.
"मै स्नेहाताई बोलते... अथश्रीमेसे...”
“हां बोला ताई. काय आपू?” दुकानदार गुजराती होता.
“वो, खटारा होता है ना?”
“अगं खटारा नाही... खराटा...”
“वोईच. खराटा... खराटा आहे क्या?”
“खराटा? तुम्हाला झाडू हवीय का? भेटेल ना...”
“झाडू नही. गल्ली झाडनेका है... खराटा और टोपली मांगता है”
“खराटा तर नाय भेटेल... पण झाडू हवा आशेल तर संध्याकाळला भेजतो मी.”
“झाडू चालेल का हो? त्याच्याकडे आहे म्हणे...” फोनवर हात ठेवत त्या भाऊंना म्हणाल्या.
“झाडू? कितीला? आणि टोपलीचं काय?” भाऊ लांबून चौकशी करत म्हणाले.
“तुम्हीच बोला त्यांच्याशी. मी हिन्दीत बोलतेय तरी कळत नाही मेल्याला. या सगळ्यांना आधी हिन्दी शिकवायला हवं आधी, मी चहा टाकते,” फोन भाऊंच्या हातात देऊन त्या बाजूला झाल्या.
“हां वहिनी, फस्क्लास चहा टाका म्हणजे सफाई करायला उत्साह येईल," सानेम्हणाले.
“कितीला दिली रे झाडू?”
“४०० रुपयाला इंडिअन भेटेल , ३०० ला इम्पोर्टेड आहे, कोणची आपू ?”
“इम्पोर्टेड? झाडू पण इम्पोर्टेड?”
“चायनाचा माल येतो. हल्ली सगले तेच वापरते ना?”
“काही नको चिनी माल... त्याची काय guarantee? पण झाडूने गल्ली झाडता येणार का?”
“काय साहेब? तुमी कशाला गल्ली झाडेल? आपण पण झाडत नाय. वरून बायडी लोक कचरा टाकते ना? मग झाडून काय फायदा?”
“म्हणजे तुझ्याकडे गल्लीसाठी झाडू नाही. सरळ सांग ना. ते मोदी गुजरातचे आहेत तरी हीच तर्‍हा,” फोन ठेवत ते म्हणाले. “चहा झाला का गं?”
“होतोय. अजून कामवाली आली नाहीय. त्यामुळे कालची भांडी तिथेच. त्यातून चहाचं भांडं शोधा, ते धुवा... या बायका कधी वेळेवर येतील तर शप्पथ... इतकं सगळं करायला उशीर होणारच ना?”
“आणि खाली काय टाकलंस?”
“आल्याची सालं”
“अगं... आपण सफाई करायला निघालोय आणि तू गल्लीत आल्याची सालं टाक.” भाऊ वैतागून म्हणाले.
“आता गल्ली झाडणारच ना तुम्ही, मग तेव्हा ती सालं पण झाडून टाकालच की. कचरावाला उद्यापर्यंत येणार नाहीय, मग कचरा साठवून ठेऊन काय करू?”
“मी कसली गल्ली झाडतोय? एक झाडू मिळत नाही आपल्या देशात. एक टोपली मागितली तर कोकणाचा अपमान होतो लगेच. ना झाडू, ना खराटा, ना टोपली....”
“त्यापेक्षा आपण चहा घेऊ भाऊ. काय? वहिनी थोडे पोहे पण टाका. आणि भाऊ तुम्ही मोदीजीना एक पत्र लिहा. म्हणावं भारतात कुठेही झाडू मिळेल अशी आधी सोय करा. नायतर जागा वाटपासारखे झाडूवाटप करा म्हणावं. सगळीच जबाबदारी नागरिकांवर टाकायची हे काय बरोबर नाही,” रेगे म्हणाले.
“अहो पण पोहे केले तर तुम्हाला देऊ कशात? कामवाली आल्याशिवाय कालच्या बश्या धुवून मिळणार कश्या?”
“अगं पेपर प्लेट आणल्या होत्यास मागे पार्टीसाठी त्या काढ.”
“पण त्याने अजून कचरा नाही का होणार?”
“नाहीतरी उद्या गल्ली साफ करायची आहेच. तेव्हा त्यात हाही कचरा नेऊन टाकेल कामवाली. एकदा स्वच्छता दिन करायचा म्हटला की त्यातून अजून चार कागद वाढले म्हणून काय फरक पडणार आहे का?,” असं म्हणत भाऊंनी चहाचा कप तोंडाला लावला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन, गोगा Happy 'अनुभव'च्या जानेवारीच्या अंकात हा लेख मायबोलीच्या लिंकसहित प्रकाशित झाला. Happy

(ऑनलाईन लेखनाचं एक नवीन सदर अंकात सुरू झालं आहे.)