लच्छा पराठा

Submitted by saakshi on 4 December, 2014 - 08:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१. गव्हाचे पीठ - २ वाट्या
२. मैदा - अर्धी वाटी
३.तूप/बटर - ४ मोठे चमचे
४.जिरा - १ चमचा पूड करून
५.धने - १ चमचा पूड करून
६.गरम मसाला - चिमूटभर
७.हळद - १ छोटा चमचा
८.अंडे - १
९.कणीक मळण्यासाठी पाणी
१०. साखर आणि मीठ - १ छोटा चमचा

क्रमवार पाककृती: 

१.मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून घ्यावे. त्यात अंडे फोडून टाकावे. त्यातच २ चमचे तूप/बटर टाकून मिसळून घ्यावे.
२.वरच्या मिश्रणात जिरेपूड, धनेपूड, हळद, मीठ, गरम मसाला आणि साखर टाकून नीट मिसळावे.
३.कोमट पाणी हळूहळू टाकत मळून घ्यावे. मळलेली कणीक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी.
४.अर्ध्या तासानंतर कणीक बाहेर काढून तुपाचा हात लावून चांगली तिंबून घ्यावी.
५.कणकेचे चपातीला करतो त्यापेक्षा थोडे मोठे गोळे करावेत. वरच्या मिश्रणाचे ७ ते ८ गोळे होतील.
६.एक गोळा घेऊन घडी न घालता लाटून घ्यावा. त्यावर एक चमचा तेल पसरून लावावे. वरून मैदा भुरभुरावा. या मैद्यामुळे पराठ्याला छान पदर सुटायला मदत होते.

lp1.jpg

७.मग लहानपणी जसे कागदाचे पंखे करताना घड्या घालायचो तशा या लाटीच्या घड्या घालाव्यात.
घड्या घालताना असे दिसेल

lp2.jpg

सर्व घडया घातल्यावर असे दिसेल

lp3.jpg

८. आता ही घडया घातलेली पट्टी दोन्ही बाजून हलकेच ओढून लांबवावी. मग तिची गुंडाळी करावी.
गुंडाळी करताना

lp4.jpg

शेवटचे टोक खेचून गुंडाळीच्या मध्यावर दाबावे.

९.असे सर्व गोळे तयार करून घ्यावेत.
तयार गोळे

lp5.jpg

१०.हलक्या हाताने पराठे लाटावेत. तूप/ बटर टाकून खरपूस भाजावेत.

तयार पराठे

lp6.jpglp7.jpglp8.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना भरपूर.
अधिक टिपा: 

पराठे भाजताना तव्याचे तापमान मध्यम ठेवावे. कमी झाल्यास पराठ्याचे पदर सुटत नाहीत.
तूप वापरताना हात आखडता घेऊ नये, त्याची चव अप्रतिम लागते.
बटाट्याची तिखट गोड भाजी/ चटणी/दही/सॉस सोबत गट्टम करावेत. Happy

माहितीचा स्रोत: 
तूनळी आणि स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नेहमीच्या पोळी आणि पराठ्यांच्या कणकेचे करून बघितले. खुसखुशीत झाले होते. पराठ्याच्या कणकेचे केले त्याला लेयर्स दिसत नव्हत्या अजिबात पण पोळीच्या कणकेचे केले त्याला लेयर्स दिसत होत्या मस्त. घड्या घालायची पायरी महत्त्वाची आहे.

सिंडी + १.
आज गार्लिक पराठे केले या पद्धतीने... पराठे भाजल्यावर गोल गोल रेषा दिसल्या पण पदर नाही सुटले. पण छान खुसखुशीत झाले होते पराठे.

मी शनीवारी केले. सुरेख खुसखुशीत झाले पण पदर सुटले नाहीत. मैद्या ऐवजी गव्हाच पिठ वापरल म्हणून का?

कधीतरी नाश्त्याला किंवा भाजीशी खायला चण्याच्या पुडीसारख्या घड्या घालून पराठे करते. रविवारी असे पंख्यासारख्या घड्या घालून केले. आतून पापुद्रे मस्त सुटले. हळद आणि लाल तिखटही घातले होते. मी तेल/तूप कमी घातले होते तरी तोंडात विरघळत होते. थँक्स.

lachcha paratha.JPG

Pages