ड्रॅगनच्या देशात ०६ – शियान : एकत्रित चीनची पहिली राजधानी

Submitted by इस्पीकचा एक्का on 3 December, 2014 - 02:14

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

शियान चीनच्या महत्त्वाच्या प्राचीन शहरांपैकी आणि एकत्रित चीनच्या चार पैकी पहिली राजधानी आहे. ह्या शहराचा इतिहास सध्याच्या माहितीप्रमाणे जवळजवळ ३१०० वर्षे जुना आहे. इसवीसनाच्या ११०० वर्षे अगोदर झाऊ राजघराण्याने (Zhou Dynasty) सघ्याच्या शियानच्या आसपास आपली राजधानी स्थापली आणि तिचे नांव फेन्घाओ असे ठेवले.

इसवीसनपूर्व ३१०० ते २११ पर्यंत सध्याच्या चीनचा भूभाग अनेक छोट्यामोठ्या, एकमेकांशी सतत लढाया करणाऱ्या राजे आणि सरदारांच्या मध्ये विभागलेला होता. हा कालखंड काहीसा प्रमाणित इतिहास आणि बराचसा अतिरंजित लोककथांमध्ये (mythology) जिवंत आहे. यातला इसवीसनपूर्व ४०३ ते २२१ हा भाग Warring States Period म्हणून ओळखला जातो. २२१ मध्ये चीन (Qin) राजघाण्याचा पहिला सम्राट "चीन शी हुआंग" (याचा नांवाचा अर्थ 'चीनचा पहिला सम्राट' असाच आहे) याने चीनचा जवळजवळ सर्व भूभाग एकछत्री सत्तेखाली आणला. त्याने झियानयांग येथे आपली राजधानी वसवली. हे ठिकाण सध्याच्या आधुनिक शियानच्या उत्तरपश्चीम भागात होते. याच चीन सम्राट व त्याच्या राजघराण्याच्या नांवावरून या देशाचे चीन हे नांव पडले ते आजतागायत टिकून आहे. शिवाय शियानचे जगप्रसिद्ध मातीचे सैनिक आणि घोडे बनवणारा सम्राट तो हाच.

याच्या राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध रेशीममार्ग (Silk Route) या प्राचीन काळातील सर्वात लांब आणि सर्वात श्रीमंत व्यापारी मार्गाची सुरुवात झाली. चीनला त्या काळाची व्यापारी महासत्ता बनवण्याचे मुख्य श्रेय या रेशीममार्गालाच आहे. हा मार्ग शियानला सुरू होऊन त्याच्या अनेक ऊपमार्गांनी त्या काळात माहीत असलेल्या सर्व जगाला चीनशी जोडत होता. याच मार्गावरून शेकडो वर्षे व्यापाराबरोबर आचारविचार, धर्म आणि राजसत्तांचा प्रभावही प्रवास करत राहिले आणि आशिया, युरोप व आफ्रिकेच्या जडणघडणीवर प्रभाव पाडीत राहिले ते अगदी युरोपियन वसाहतवादाचा उदय होऊन त्याने जगावर आपले वर्चस्व कायम करेपर्यंत.

रेशीममार्ग (Silk Route)

प्राचीन काळात या शहराला चांगआन या नांवाने ओळखत असत. १३६८ मध्ये मिंग राजघराण्याने हे नाव बदलून शियान असे केले ते आजतागायत आहे. परंतू आजही या शहराचे नागरिक चांगाआनच्या नांवाची आणि व वैभवशाली इतिहासाची मोठ्या आस्थेने जपणूक करून आहेत. त्या काळचे साहित्य, संगीत आणि नृत्य यांची झलक नंतर येणार्‍या प्रकाशचित्रांमधून बघायला मिळेलच.

===================================================================

शिआनच्या सफरीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात छान न्याहारीने झाली. आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे आठ वाजता लॉबीमध्ये येऊन गाईडची वाट पाहू लागलो. साडेआठ वाजले तरी गाईडचे दर्शन नाही. एअरपोर्ट वरून हॉटेलवर पोहोचवणार्‍या गाईडने सांगितले होते की आज दुसरा गाईड सहलीचे प्रबंधन करणार आहे. वाटले या दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. मला न घेताच टूर निघाली की काय? आता आजचा दिवस खराब होतो की काय? अनेक प्रश्न मनात उभे राहीले. ईटिनेररी बाहेर काढली, त्यात पाहून शिआनमधील लोकल एजण्टचा नंबर लावला. नशिबाने पलीकडून बोलण्यार्‍या व्यक्तीला बर्‍यापैकी इंग्लिश येत होते. त्याच्याकडून कळले की सहल आठऐवजी अकरा वाजता सुरू होईल. मग अगोदर फोन करून हे का सांगितले नाहीस असे विचारले तर मख्खपणे म्हणाला की "विसरलोच की !" (Oh ! I forgot !). नशीब तो समोर नव्हता नाहीतर चिनी दूरदर्शन व वृत्तपत्रांमध्ये Warring States Period परत सुरू झाल्याची बातमी आली असती. हे सर्व चालू असताना अजून एक गोष्ट ध्यानात आली की आजच्या सहलीमध्ये बरीच ठिकाणे आहेत आणि सहल तीन तास उशीरा सुरू झाली तर त्यामधली काही गाळली जातील किंवा नुसती धावपळीत बघायला लागतील... मग परत लांबलचक संवाद झाला आणि ध्यानात आले की त्याने सकाळचा शिलालेखसंग्रहालयाला भेट देण्याचा पहिला कार्यक्रम बाद करून टाकला होता ! म्हणे हा कार्यक्रम तुमच्या इंग्लिश ईटिनेररीमध्ये आहे पण आमच्या चिनी भाषेतील ईटिनेररीमध्ये नाही ! आतापर्यंत माझ्या ध्यानात आले की "मग स्थानिक प्रबंधक म्हणून तुम्ही काय xx xxx होतात?" हेही या महाशयांना विचारण्यात अर्थ नाही. सरळ माझ्या गुईलीनमधील मुख्य टूर मॅनेजरला फोन लावला. छोट्याश्या वादावादीनंतर मी एक उपाय सुचवला की मी स्वतः टॅक्सी करून शिलालेखसंग्रहालय बघून हॉटेलवर टूर सुरू होण्याच्या वेळेपर्यंत परत येईन. मात्र यामुळे माझा होणारा टॅक्सी व संग्रहालयाचे प्रवेशमुल्य असा १०० युवानचा खर्च स्थानिक गाईडकरवी परत करावा कारण माझ्या ईटिनेररीप्रमाणे मी तो अगोदरच भरलेला आहे. टूर मॅनेजरला ही कल्पना मान्य झाली आणि जरादेखील उशीर न करता हॉटेलच्या काउंटरवरच्या एका इंग्लिश समजणार्‍या बाबाकडून टॅक्सीवाल्यासाठी चीनीमध्ये संग्रहालयाचा पत्ता लिहून घेतला आणि निघालो.

आवांतरः
१. चायना हायलाइटची ईटिनेररी आतापर्यंत मी बघितलेल्या ईटिनेररीमध्ये सर्वोत्तम होती. सर्वच ईटिनेररींमध्ये असणाऱ्या नेहमीच्या गोष्टी (क्रमवार ठिकाणे, त्यांच्या माहिती सकट, इ.) होत्याच पण प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक एजंटचे नांव, पत्ता व फोन नंबर्सही होते. शिवाय सर्व हॉटेलच्या नांवांवर टिचकी मारून त्या त्या हॉटेलच्या बुकिंग संस्थळावर जाऊन हॉटेलमधील सर्व सोयीसवलती (वायफाय आहे की नाही, शिवाय ते चकटफू आहे की नाही, इ. सकट) व त्यांचे दरपत्रकही सहल सुरू होण्याच्या अगोदरपासून बघायची सोयही होती.
२. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टूर पॅकेजमध्ये १०० युवानच्या कार्डसकट एक मोबाईल चीनच्या संपूर्ण वास्तव्यात वापरण्यासाठी दिला होता. ही व्यवस्था इतर कोणत्याही ठिकाणी पाहिली नव्हती आणि तिचा उपयोग किती अमूल्य होता हे सांगण्याचीही फार गरज नाही. विशेषतः वर सांगितलेल्या फोनाफोनीकरता तर ही लाईफलाईनच होती. या फोनचा स्थानिक गाईडशी संपर्कात राहण्यासाठी व जागोजागींच्या संध्याकाळच्या शोंचे प्रबंधन करण्यासाठी फार मदत झाली.)

शियान ही चीनच्या शांक्षी राज्याची राजधानी आणि चीनच्या १३ मेगॅसिटिजपैकी एक आहे. शिलालेखसंग्रहालयाकडे जाताजाता झालेले हे नीटनेटक्या, स्वछ आणि सुंदर शियानचे दर्शन.

.

संग्रहालयाचे नांव आहे "Xi'an Beilin Museum" or "Forest of Stone Steles Museum". या ठिकाणी पहिले एक कन्फ्युशिअसचे मंदिर होते. १०४७ साली साँगराज घराण्याने त्याचे नूतनीकरण करून तेथे चीनच्या अनेक भागांतून जमा केलेल्या लेख, चित्रे इतकेच काय पण छोटेखानी दगडी पुस्तके कोरलेल्या ३००० शिलांचे संग्रहालय बनवले. या संग्रहालयातील जमिनीत उभ्या केलेल्या शिलांवरूनच त्याचे नांव शिलांचे जंगल उर्फ Forest of Stone Steles असे पडले.

आजमितीस येथे चार हजारच्या आसपास शिला आहेत. ह्या शिला नुसते कलाकृतींचे नमुने म्हणूनच महत्त्वाच्या नसून त्यांच्यावर चीनचा इतिहास व चिनी भाषेची दोन हजारापेक्षा जास्त काळाची वाटचाल नोंदवलेली आहे. आजमितीला येथे ४००० पेक्षा जास्त शिला आहेत. सर्वात जुनी शिला इसवीसनापूर्वी २०६ वर्षे एवढी जुनी आहे. जरी त्या शिलांवर नोंदविलेली चिनी अक्षरे समजली नाही तरी ९०० वर्षांपूर्वी असा दूरदर्शी आणि कलात्मक विचार करणारा शासक चीनमध्ये होऊन गेला आणि त्यानंतरच्या पिढ्यांनी त्याच्या कर्तृत्वाची आजपर्यंत जपणूक केली आहे हा विचारच चकीत करणारा आहे.

चीनमधली प्रेक्षणीय स्थळे प्रेक्षणीय ठेवण्यात जेवढी काळजी घेतली आहे तेवढेच लक्ष त्यांच्या इमारती व आवारे प्रशस्त, नीटनेटकी, स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्यावर दिल्याचे प्रकर्षाने जाणविते. मुख्य म्हणजे ही सर्व व्यवस्था चिनी सरकार अथवा स्थानिक राज्यसरकारेच करतात. स्वच्छता, नीटनेटकेपण आणि आकर्षकता याबाबतीत सरकारी इमारती खाजगी इमारतींशी स्पर्धा करताना दिसतात.

हे आहे Forest of Stone Steles Museum चे आवार...

.

.

.

हे काही शिलांचे नमुने...

शिलालेख : त्यात्या शिलेवर काय लिहिले आहे असे विचारल्यास उत्तर न देण्याचे हक्क राखून ठेवलेले आहेत ! +D !! )
.

.

.

चित्रलेख

इमारतींचा आराखडा (Building plan)

शहराचा आराखडा (Map of a city / town)

एका व्यापार्‍याने काढवून घेतलेले त्याचे चित्र (आजकालच्या पोर्ट्रेट पेंटिंग / छायाचित्रांचा दगडी पणजोबा !)

धार्मिक चित्र

शिलांचे अशा रीतीने कागदावर काढलेले ठसे चिनी नागरिक मोठ्या आस्थेने विकत धेऊन जाताना दिसले.

केवळ याच नव्हे तर चीनभरच्या संग्रहालयांत प्राचीन चीनवरचा भारतीय प्रभाव व संस्कृतप्रचुर नांवे प्रकर्षाने आढळून येतात, त्यांची काही उदाहरणे पाहू या.

हा आहे देवराजा (एक प्रकारचा सरदार, सरंजाम)

अकाल वैद्यराजा

मंजुश्री बोधीसत्व

त्रिलोकविजय

अजून खूप काही बघण्यासारखे आहे. पण ही झलक कल्पना येण्यास पुरेशी आहे.

सकाळी सकाळी घातलेल्या वादाने झालेला सहलीचा रसभंग पुरेपूर भरून निघाला होता. साडेअकरावाजता हॉटेलवर पोहोचायचे म्हणून अकरा वाजता संग्रहालयातून बाहेर पडलो तर हा फळविक्रेता समोरच दिसला. त्याला थोडा राजाश्रय देऊन लगेच टॅक्सी पकडली. चीनमध्ये खूप प्रकारची आणि चवदार फळे मिळतात.

हॉटेलवर पोचलो तेवढ्यात स्थानिक गाईडचा फोन आला की बायजींगवरून रेल्वेने येणारे दोन प्रवासी आमच्या शियान शहराच्या टूरमध्ये होते, ते रेल्वेला उशीर झाल्याने १२ ते १ वाजेपर्यंत उशीरा पोहोचतील आणि मगच टूर सुरू होईल. आम्ही सगळे मिळून तीनच लोक या टूरमध्ये होतो. त्यामुळे टूर रद्द करण्याचाही त्याचा विचार चालू होता. परत वादावादी… थोडी गाईडशी, थोडी टूर मॅनेजरशी. पण यावेळी त्यांच्याही लक्षात आले की हे जरा जास्तच होतेय. त्यामुळे सकाळचा टूरचा भाग माझ्या एकट्याबरोबर करावा व इतर दोघे दुपारच्या जेवणानंतर टूरमध्ये सामील होतील असा तोडगा सर्वमान्य झाला. हुश्श !

मग फार वेळ न लावता निघालो. सुरुवात केली शियानच्या नगारखान्याच्या (Drum Tower) दर्शनाने. यातील नगार्‍याच्या आवाजाने शियान नगराची पहाट होत असे.

थोडेसे पुढे गेल्यावर एक वेगळ्याच वस्तीत शिरलो. तिथल्या लोकांची चेहेरपट्टी पूर्णपणे चिनी (मंगोलियन) नव्हती किबहुना बरीचशी मध्य आशियन होती. रेशीममार्गावरून अनेक देशांचे लोक व्यापारानिमित्त शियानला आले. त्यांतील काही मध्य आशियातील मुस्लिम लोकांनी शियानला आपले घर बनवून तेथेच वस्ती केली. त्यांना हुई लोक (Hui people) म्हणून ओळखतात. त्यांची घरे व दुकाने यांची रचना सर्वसामान्य चिनी इमारतींपेक्षा वेगळी होती. चीनमधून एकदम वेगळ्याच देशात गेल्यासारखे वाटले. हा भाग शियानचा हुई क्वार्टर म्हणून ओळखला जातो.

.

येथे एक ७४२ साली बांधलेली १२००+ वर्षे जुनी मशीद आहे. तिच्या बांधणीत चिनी व इस्लामी संस्कृतींचा संगम दिसतो.

.

या मशीदीच्या छपरावर चक्क अनेक ड्रॅगनमहाराज विराजमान झालेले आहेत !

तेथून बाहेर पडतो तोच शियानचे घंटाघर (Bell Tower) दिसले. याच्या घंटेच्या आवाजाने शियानचा दिवस संपल्याची घोषणा होत असे.

नंतर आम्ही शियानची शहरभिंत पाहायला जुन्या शियानच्या सीमेवर गेलो. ह्या भिंतीची निर्मिती सर्वप्रथम तांग राजघराण्याच्या काळात (इ ६१८ - ९०७) केली गेली. त्यानंतर आलेल्या शियानच्या अनेक शासकांनी शियानच्या व्यापाराचे आणि संपत्तीचे रक्षण करण्यासाठी तिच्यात वेळोवेळी बरीच भर घालून तिला अधिकाधिक मजबूत बनवले. मिंग घराण्याच्या (इ १३६८ - १६४४) पहिल्या सम्राटाने तिच्या लांबीत भर घालून तिला लक्षणीय पद्धतीने अधिक मजबूत केली. या भिंतीची लांबी १३.७ किमी, उंची १२ मीटर व रुंदी बुंध्याला १५-१८ मीटर तर वरच्या टोकाला १२-१४ मीटर आहे. भिंतीच्या सभोवती खोल पाण्याचा खंदक आहे. या भिंतीला जगातील प्राचीन आणि विशाल सैनिकी संरक्षण प्रणालींपैकी एक समजले जाते (one of the largest ancient military defensive systems in the world). त्या काळी एवढी मजबूत भिंत तोडणारी अस्त्रे नव्हती. त्यामुळे या भिंतीने चिनी राजधानीचे आणि रेशिममार्गाच्या उगमस्थानाचे शेकडो वर्षे यशस्वीपणे रक्षण केले.

या भिंतीला एकूण १८ दरवाजे आहेत. भिंतीकडे जाताना घेतलेले तिच्या दक्षिण दरवाज्याचे छायाचित्र.

आणि हे आतून भिंतीवरून घेतलेले त्याच दरवाज्याचे छायाचित्र.

प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक प्रशस्त मैदान आहे.

भिंतीवर चढल्यावरच भिंतीच्या अवाढव्यतेची खरी कल्पना येते. या भिंतीवरच्या रस्त्यावरून एका बाजूला एक असे ४ -५ रथ धावू शकत असत.

.

भिंतीवर ९६ मनोरे आहेत. दर दोन मनोऱ्यामधले अंतर १२० मीटर आहे, कारण त्या काळी बाणाने साधारण ६० मीटरपर्यंत अचूक मारा करता येत असे. त्यामुळे मनोऱ्याच्या संरक्षणात बसून सैनिकांना आक्रमकांपासून शहराचे रक्षण करता येत असे.

हा दक्षिण दरवाज्यावरचा मनोरा. त्याच्या बाजूला भिंतीवरच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनावरून भिंतीच्या आकारमानाची कल्पना यावी.

भिंतीच्या आतल्या बाजूच्या जुन्या शियानमध्ये प्राचीन वारसा कटाक्षाने जपला जातो व फक्त जुन्या शैलीची घरे बांधण्यास परवानगी आहे.

भिंतीबाहेरचे नवीन शियान मात्र पाश्चिमात्य शहरांशी स्पर्धा करताना दिसते.

भिंतीवरचा फेरफटका आटपून आम्ही दुपारचे जेवण घेतले आणि आमच्या मागे राहिलेल्या दोन मंडळींना घेऊन जंगली हंसमंदीराच्या (Wild Goose Pagoda) दिशेने कूच केले. वाटेत त्या अमेरिकन दांपत्याच्या तोंडून त्यांची चिनी रेल्वेने केलेली हालत सविस्तरपणे कळली. रेल्वे उशीरा सुटणे, वाटेतच तास दोनतास गाडीने बसकण मारणे व हे सर्व रात्रीच्या प्रवासात आणि नवख्या देशात झाल्याने त्याची काय मन:स्थिती झाली असेल याची कल्पनाच करवत नव्हती. शिवाय प्रवास रात्रीचा असल्याने झोपेचे खोबरे झाले ते वेगळेच. हे सगळे कोणालातरी सांगून मनातला सगळा राग थोडासातरी हलका करण्याची त्याची धडपड चालली होती. मीही त्यांच्या सांगणे ऐकत सहानुभूती व्यक्त करण्यापलीकडे काय करू शकणार? पण दु:खात सुख असे की मलाही टूर मॅनेजरने बायजींग-शियान प्रवास रेल्वेने करून बचत करण्याची सूचना केली होती. पण एकंदरीत लांबचे अंतर, दुसर्‍या वर्गातील अपुर्‍या सोयी व पहिल्या वर्गाचे जास्तीचे भाडे असा सर्व विचार करून मी विमानानेच प्रवास करणे पसंत केले होते. त्यामुळे नंतर खरंच योग्य निर्णय घेतला की खर्च कमी करण्याची संधी गमावली असे वाटत राहिले होते. पण त्या दांपत्याची कहाणी ऐकून ती रुखरुख निघून गेली.

चीनमध्ये दोन प्रकारचे लोहमार्ग आहेत. एक जवळजवळ भारतीय रेल्वेच्या वयाचा, प्रतीचा आणि तेवढ्याच बर्‍यावाईट प्रकारे चलवलेला. या मार्गावरून प्रवास स्वस्त पण कधीकधी वरच्या उदाहरणाप्रमाणे महागात पडू शकतो. परंतु याच बरोबर चिनी सरकार देशभर नवीनं बुलेट रेल्वेचे जाळे ज्या वेगाने पसरावीत आहे त्याने पाश्चिमात्य देशही चकीत झाले आहेत. यांचा प्रवास थोडा महाग पण वेगवान आणि आरामदायक असतो. यातील एका बुलेट रेल्वेमधून प्रवास करायला मिळाला त्याबद्दल माहिती प्रकाशचित्रांसह पुढे येईलच.

Wild Goose Pagoda तांग राजघराण्याच्या काळात इ ६५२ मघ्ये बांधला गेला. याला पाच मजले होते आणि भिंती मातीच्या होत्या त्यामुळे काही काळाने तो पडल्यावर इ ७०४ मध्ये सम्राज्ञी वू झेतीआन हिने त्याचा जीर्णोद्धार करून त्याच जागेवर १० मजली इमारत उभी केली. त्यानंतर इ १५५६ मध्ये मोठ्या भूकंपात इमारतीची पडझड होऊन ती थोडीशी पश्चिमेकडे झुकली. त्यामुळे तिचे तीन मजले कमी केले गेले व आता फक्त ७ मजली इमारत उभी आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या इमारतीची एवढी कहाणी मी का सांगतो आहे? त्याचे कारण असे आहे.

तुम्ही कदाचित Xuanzang हे नांव ऐकले असेल नसेल (मीही ऐकले नव्हते) पण शालेय इतिहासात ह्यु एन संग या भारतात येऊन गेलेल्या चिनी प्रवाशाचे नांव खचीतच वाचले असेल. ही दोन्ही नांवे एकाच माणसाची आहेत. हा नुसता प्रवासीच नव्हता तर एक बुद्धधर्माचा मोठा अभ्यासक बुद्धभिख्खू आणि भाषांतरकारही होता. चीनमध्ये त्या काळी अर्धवट आणि चुकीचे अर्थ लावलेले बुद्धाचे तत्वज्ञान प्रचारात होते कारण भारतातून चीनमध्ये येईपर्यंत सर्व ग्रथसंपदा अपभ्रंशित झालेली होती. या गोष्टीचा ह्यु एन संगला तिटकारा होता. त्याने तांग राजघराण्याच्या ताईझोंग या सम्राटाची मदत घेऊन भारताच्या प्रवासाला सुरुवात केली आणि (आताच्या) ताजीजिकीस्तान व अफगाणीस्तानमार्गे भारतात आला . एकूण १७ वर्षांच्या या प्रवासात आलेले सर्व अनुभव त्याने मोठ्या बारकाईने लिहून ठेवले. तसेच त्याने अनेक बौद्ध धर्मग्रंथ (सुत्रे) आणि मूर्ती जमा करून त्या चीनमध्ये नेल्या. Wild Goose Pagoda ची उभारणी ह्यु एन संगने बरोबर आणलेल्या या खजिन्याला सन्मानाने आणि सुरक्षित ठेवण्यासाठी केली गेली. आजही ह्यु एन संग ला त्याच्या संस्कृतप्रचुर "त्रीपीटक" या नावानेही ओळखले जाते असे गाईडने मोठ्या आस्थेने सांगितले. ह्यु एन संगने लिहिलेल्या भारताच्या मूळ प्रवासवर्णनावर आधारीत अनेक कथा, कादंबर्‍या व नाटके चीनमध्ये अजूनही प्रचलित आहेत.

पॅगोड्यातली ग्रंथसंपदा आता जास्त सुरक्षेसाठी संग्रहालयांत हलवली आहे. पण बर्‍याचशा मुर्ती मात्र तेथेच आहेत.

.

.

.

प्रवेशमुल्य देऊन पॅगोड्यामध्ये वरच्या मजल्यापर्यंत जाता येते. आम्ही फक्त सहाच मजले चढू शकलो कारण सातव्या मजल्याची डागडुजी चालू होती. पण सहाव्या मजल्यावरून झालेले शियानचे चौफेर दर्शनही खूप मनोहारी होते. हे चार दिशांचे चार फोटो.

.

.

.

आजच्या दिवसाची सुरुवात त्रासदायक झाली होती पण नंतरचा दिवस खूपच छान गेला. पण अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम बाकी होता. नशिबाने सकाळच्या गोंधळात Sun Lido Theater मधील तांग राजघराण्याच्या शो (Tang Dynasty Show) ची तिकिटे काढायला विसरलो नव्हतो. शॉवर घेऊन त्वरित तिकडे कूच केले. तांग राजवटीचा काळ हा खूप समृद्धीचा आणि भरभराटीचा होत. या काळात चीनमध्ये संगीत, नृत्य, पेहेराव व खानपानाच्या अनेक शैली प्रगत झाल्या. या कार्यक्रमामध्ये ते सर्व इतक्या उत्तम रितीने सादर केले आहे की दीड तास आपल्याला प्राचीन चीनमध्ये फेरफटका मारून आल्यासारखे वाटते. स्टेजच्या दोन्ही बाजूस LED screens वर इंग्लिशमधून कार्यक्रमात काय चालले आहेत याचा सारांश दाखवत असल्याने जरा जास्त मजा आली. कार्यक्रम जेवणासहित बुक केला होता कारण हे थिएटर खास चिनी मोदकांच्या (dumplings) जेवणासाठी प्रसिद्ध आहे. गरमागरम चिनी मोदकांचे असंख्य प्रकार बधायला आणि खायला मिळतात. वाफाळणारे मोदक बांबूच्या टोपल्यांतून आणून अगदी अगत्याने वाढतात. मी भारतीय आहे आणि मी गोमांस खात नाही असे सांगितल्यावर मुख्य स्वागतिकेने प्रत्येक मोदकांत काय आहे हे सांगून गोमांसवाले मोदक यात नाहीत असे अगदी दरवेळेस वाढताना सांगितले. शिवाय माझ्या टेबलावरच्या बाजूच्या चिनी मंडळींनाही सांगून मी नजरचुकीने गोमांस खाऊ नये याची अगत्याने व्यवस्था केली... इतकी की मला कसंसंच होईल एवढी!

हे काही चिनी मोदकाचे नमुने. यांच्या आतमध्ये अनेक प्रकारचे चवदार मांसाहारी अथवा शाकाहारी सारण असते.

.

जेवण संपल्यावर शो सुरू झाला. रंग आणि पोशाखांची कल्पना शब्दांनी येणे कठीण आहे. फोटोच थोडीबहुत झलक दाखवू शकतील.

.

सम्राज्ञीचे आगमन

सम्राटाचे आगमन

चांगआन चे संगीत

तांग सैनिकांचे नृत्य. यात नाचाबरोबर सैनिकांना व्यायामही व्हावा अशी याची रचना आहे.

काही प्रसिद्ध प्राचीन कवितांवर आधारीत नृत्ये.

.

.

.

.

तलवार नृत्य

सर्वांचे संरक्षण करणारा व जगाचे चालन करणार्‍या सहस्त्रबाहू रक्षकाचे नृत्य

.

.


.

The Imperial Feather Dance

.

Moonlit view of Kujiang

.

अजून काही दृश्ये

.

.

कार्यक्रमाचा संपूर्ण कलाकार समूह

शियानमध्ये गेल्यावर न चुकता बघावा असा हा कार्यक्रम. तो आपल्याला प्राचीन चीनची स्वप्नसफर करून आणतो.

कार्यक्रमाच्या फोटोंमध्ये एक गोष्ट लक्षात आली कां? तांग काळात चिनी स्त्रिया (निदान राजघराण्यातल्या आणि सरदारघराण्यातल्या) कपाळावर तांबडी टिकली लावीत असत ! प्राचीन चीनमध्ये इतर काही ठिकाणीही ही प्रथा असल्याचे आढळले.

(क्रमशः)

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान. सविस्तर लिहिल्यामूळे खुप आवडले. फोटो तर सुंदरच आहेत. आमच्याकडच्या चिनी चॅनेलवर हे नृत्यांचे कार्यक्रम कधी कधी दाखवतात. संगीत, कपडे पण खुप छान असतात.

सुंदर दर्शन घडवता आहात एक्का साहेब.

बाकीच्या माहीती बरोबर प्रत्येक ठीकाणची खर्चाची बाजू जर टाकलीत तर बरे होईल. आपल्याला काय काय झेपू शकेल ह्याचा अंदाज येइल. तसेच हॉटेल ची नावे आणि फोटो पण सांगा.

सर्वात जुनी शिला इसवीसनापूर्वी २०६ वर्षे एवढी जुनी आहे. जरी त्या शिलांवर नोंदविलेली चिनी अक्षरे समजली नाही तरी ९०० वर्षांपूर्वी असा दूरदर्शी आणि कलात्मक विचार करणारा शासक चीनमध्ये होऊन गेला आणि त्यानंतरच्या पिढ्यांनी त्याच्या कर्तृत्वाची आजपर्यंत जपणूक केली आहे हा विचारच चकीत करणारा आहे. >>> खरोखरीच चकित करणारा .... Happy

केवळ याच नव्हे तर चीनभरच्या संग्रहालयांत प्राचीन चीनवरचा भारतीय प्रभाव व संस्कृतप्रचुर नांवे प्रकर्षाने आढळून येतात, >>>>> हे ही एक आश्चर्यच .... Happy

सुरेख लेख आणि मस्त फोटोज ... Happy

हा भाग खरंच एकदम मस्त झाला आहे. फोटो सुध्दा खुप सुंदर, विशेषतः पॅगोडावरून काढलेले शहराचे फोटो आणि शोमधील फोटो.

सविस्तरपणे लिहिल्यामुळे खुप आवडले. >>>> + १००.

डॉक्टर साहेब तुमचे विशेष कौतुक की तुम्ही काढलेले फोटो तर अप्रतीम आलेतच पण तुम्ही प्रत्येक ऐतिहासिक माहिती अतीशय रोचक पणे लिहीत आहात.:स्मित: फारच सुन्दर आहे चीन. या फोटोन्मध्ये त्या स्त्रीयान्ची पिस्ता, गुलाबी, पिवळ्या रन्गाची वस्त्रे अतीशय सुन्दर आहेत. मस्त झळाळी आहे त्याना. दिसायला पण सुन्दर आहेत.

हो ती लाल रन्गाची टिकली बघुन आश्चर्य वाटले.

आणी तुमचे फोटो पण छान आलेत. मस्त आहे तुमची ट्रिप. युरोप, अमेरीकेचे भरपुर्र फोटो व वर्णन पहायला मिळाले पण आपल्या शेजारील देशाचे फोटो आणी रोचक माहिती पहिल्यान्दाच बघीतली.

दिनेशजी तुम्ही पण चीन ला जाऊन या. मी एन जीओ वर डोन्गर दर्‍याचा चीन बघीतला होता, अप्रतीम आहे.

फारच मस्त लेखमाला!!! वर्णन आणि फोटो सुंदर आहेत. गेल्या काही वर्षांपासून चीनबद्दल माझी उत्सुकता वाढली आहे Happy , त्यामुळे ह्या लेखमालेचे महत्व जास्त जाणवतेय. प्रवासाचे प्लॅनिंग कित्ती विचारपूर्वक केले आहेत!!!

मस्त चालू आहे मालिका.

हा भाग तर सुंदरच झालाय - फोटो आणि वर्णन दोन्ही सुंदर.

जुन्या शियानमधली जुन्या पद्धतीची नविन इमारत फारच मस्त आहे.

एका नृत्यात नर्तिकेने कपाळावर कुंकू लावलेले बघून गम्मत वाटली.