जाहिरातींमधले रवीन्द्रनाथ

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

दिडेक वर्षांपूर्वी ’केसरी’चे जुने, स्वातंत्र्यपूर्व काळातले अंक चाळत होतो. काही तत्कालीन संदर्भ शोधण्यासाठी. त्या पिवळ्याजीर्ण कागदांमध्ये ओळखीच्या आणि अनोळखी अशा अनेक व्यक्ती आणि घटना नेहमीच भेटतात. शिवाय प्रत्येक पानावर भरपूर जाहिराती असतात. या जाहिराती वाचणंही मौजेचं. आयुर्वेदिय चूर्णं, मोटारगाड्या, पातळंपंचे, वजन वाढवण्याची औषधं आणि लंडनच्या सफरी असं कायकाय त्या जाहिरातींमध्ये असतं. त्या दिवशीही मी सावकाश एकेक पान वाचत बसलो होतो. एका जाहिरातीनं माझं लक्ष वेधून घेतलं. कॅडबरीच्या बोर्न-व्हिटाची ती जाहिरात होती. १९३७ सालच्या ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेली. सन लाइफ इन्श्यूरंस, कॅडिलॅक, शेवरोले, लक्स अशा अनेक परदेशी कंपन्यांच्या जाहिराती मराठीत त्या काळी नियमितपणे वर्तमानपत्रांमधून प्रकाशित होत होत्या. त्यामुळे बोर्न-व्हिटाची जाहिरात प्रसिद्ध होणं काही नवलाचं नव्हतं. मला महत्त्वाचा वाटला तो या जाहिरातीतला एक फोटो आणि फोटोवरचा मजकूर. जाहिरातीत रवीन्द्रनाथ ठाकूरांचा फोटो होता. 'एका मित्राच्या आग्रहावरून मी बोर्न-व्हिटा कांही दिवस घेतले आणि तें माझ्या प्रकृतीस चांगलें मानवलें', असं या जाहिरातीत सर्वांत वर लिहिलं होतं. खाली रवीन्द्रनाथांची इंग्रजीत सही. सहीखाली 'विख्यात कवी आणि नाटककार रवीन्द्रनाथ ठाकूर' असं छापलं होतं. 'बोर्न-व्हिटा प्रकृतीस चांगलें मानवतें हें हजारो लोकांच्या अनुभवानेच सिद्ध झालें आहे, ह्या विधानास हिंदुस्थानाच्या ह्या नाणावलेल्या लेखकाच्या संदेशाने पुष्टि मिळत आहे. शारीरिक वा मानसिक कामें करण्याकरितां प्रमुख पौष्टिक सत्त्वांचा योग्य पुरवठा होणे अत्यावश्यक असतें. बोर्न-व्हिटा हें परिपूर्ण व उत्तेजक पेय असून त्यायोगें उत्साह आणि जीवनशक्तीचा भरपूर संचय वाढविण्यास लागणारा सर्व पौष्टिक गुणांचा पुरवठा होतो' या मजकुराखाली बोर्न-व्हिटाच्या डब्याचं चित्र, मग बोर्न-व्हिटाचा लोगो आणि शेवटी 'दिवसभर उत्साह राहण्याकरितां कॅडबरीचें बोर्न-व्हिटा घ्या' असं सांगून जाहिरात संपली.

Tagore-ad-1.jpg

१९३७ साली ही जाहिरात प्रकाशित झाली त्यावेळी प्रसिद्ध व्यक्तींचा जाहिरातींसाठी वापर करणं अजिबातच नवीन नव्हतं. त्याच वर्षी बोर्न-व्हिटानंच आपल्या एका जाहिरातीत फिरोज खान या बॉम्बे कस्टम्स आणि भारतीय संघ या दोघांकडून खेळणार्‍या हॉकीपटूचा फोटो छापला होता. 'हॉकी आणि फुटबॉलसारख्या जोरकस खेळानंतर बोर्न-व्हिटा हें पेय हितावह ठरतें अणि तें घेण्याचा परिपाठ ठेवणें सर्वस्वी श्रेयस्कर आहे. कांही दिवस घेतल्यानंतर त्यामधील गुणांची माहिती समजून येते. आपल्या देशांतील खेळाडूंना घेण्यालायक असें हेंच काय तें पेय आहे', अशी हमी खानसाहेबांनी दिली होती. जनरल मोटर्स ही कंपनी आपल्या शेवरोले गाड्यांची दर महिन्याला एक नवी जाहिरात सादर करत असे. १९३४ सालापासून अशा अनेक जाहिरातींमध्ये तत्कालीन भारतातल्या शेवरोले गाडी वापरणार्‍या प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींचे फोटो असत. यात कुचबिहार, जुनागढ या संस्थानांचे राजे होते, सिंध प्रांतांतले धनिक होते. पुढे चित्रपटव्यवसायाला बरकत आल्यावर नटनट्या जाहिरातींमध्ये झळकू लागल्या. १९३८ साली शोभना समर्थ यांनी 'लक्स' साबणाची जाहिरात केली होती. कुंदनलाल सैगलांची छबी 'लिप्टन' चहाच्या जाहिरातीत होती.

मात्र याच्या कितीतरी आधीपासून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, काँग्रेस पक्ष यांचा जाहिरातींमध्ये वापर होत होता. हा वापर मुख्यत: सुरू झाला १९०५ सालापासून. म्हणजे स्वदेशी चळवळीनं जोर पकडल्यापासून. १९०५ साली ब्रिटिश सरकारनं बंगालच्या फाळणीची घोषणा केली आणि बंगाल पेटलं. महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी अगोदरच स्वदेशी चळवळीची बीजं पेरली होती. लोकमान्यांनी 'केसरी'त लेख लिहून स्वदेशी वस्तूच वापरण्याचं आवाहन तमाम जनतेला केलं होतं. १२ डिसेंबर, १९०५ रोजी त्यांनी लिहिलेला स्वदेशीचा पुरस्कार करणारा खास लेखही बराच गाजला होता. तिकडे बंगालातही स्वदेशी चळवळीनं जोम धरला होता. या चळवळीमुळे भारतीय उद्योगस्थापनेला चालना मिळाली. मुंबईत गिरणीकामगार स्वदेशी गिरण्यांमध्ये राबू लागले. साखर, आगपेट्या, कापड आता भारतात तयार होऊ लागले. प्रफुल्ल चंद्र रॉय यांचं बेंगाल केमिकल वर्क्स्‌, टाटांचे कारखाने स्वदेशी उत्पादनांमध्ये भर टाकू लागले. साहजिकच वर्तमानपत्रांमध्ये अशा उत्पादनांच्या जाहिराती सुरू झाल्या. 'केसरी'त स्वदेशी जाहिरातींसाठी स्वतंत्र पान राखून ठेवलेलं असे. आमचं उत्पादन कसं शंभर टक्के स्वदेशी आणि या स्वदेशीपणाची खात्री अमूक एका नेत्यानं किंवा काँग्रेस कमिटीनं कशी दिली आहे, हे प्रत्येक जाहिरातीत सांगितलेलं असे. 'देशी धंद्यास उत्तेजन द्या!!!', 'सपोर्ट इंडियन इंडस्ट्रीज', 'हिंदी उद्योगधंद्यांस उत्तेजन द्या' असे या जाहिरातींचे मथळे असत. 'महात्माजींचें आज्ञेप्रमाणें परदेशी सुतावर बहिष्कार घालून आता शुद्ध स्वदेशी सुताची लुगडी तयार करत आहोत' ही सोलापूर टेक्स्टाईल मिलची जाहिरात होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गुळाच्या एका कारखान्यास भेट देऊन अभिप्राय दिला होता. हा अभिप्राय सावरकरांच्या फोटोसकट जाहिरात म्हणून वापरला गेला. गांधीजींच्या तुरुंगातून सुटण्याची अचूक भविष्यवाणी करणारे ज्योतिषी आपल्या जाहिरातींत गांधीजींचा फोटो वापरायचे. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला अनेक जाहिरातींमध्ये त्यांचा फोटो असे. पुण्यातल्या एका फोटोग्राफरानं वर्तमानपत्रातल्या त्याच्या जाहिरातीतल्या लोकमान्यांच्या फोटोचं कात्रण घेऊन येणार्‍याला सूट देण्याचं जाहीर केलं होतं. सुभाषचंद्र बसूंनी 'डकबॅग' या रेनकोट बनवणार्‍या कंपनीची जाहिरात केली होती, आणि १९३५ साली ती मराठीत छापून आली होती.

अशी थोर राजकीय व्यक्तिमत्त्वं जाहिरातींमध्ये नियमितपणे झळकत असली, तरी रवीन्द्रनाथांची बोर्न-व्हिटाची जाहिरात मला विशेष वाटली, कारण राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या, एक मोठा लोकसमूह ज्याच्याकडे अतीव आदरानं बघतो अशा, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वर्तमानाला वेगळं वळण लावू शकणार्‍या लोकनेत्यानं एका परदेशी कंपनीची, स्वत:च्या हस्ताक्षरात जाहिरात करणं तसं नवीन होतं. १९०५ सालापासूनच्या वर्तमानपत्रांमध्ये अनेक राजकीय नेत्यांचा, काँग्रेससारख्या राजकीय पक्षाचा जाहिरातींमध्ये झालेला उल्लेख मी बघितला असला, तरी तोवर रवीन्द्रनाथांच्या जाहिराती बघण्यात आल्या नव्हत्या. रवीन्द्रनाथांच्या पत्रांमध्ये त्यांनी लिहिलेले काही अभिप्राय मला सापडले होते. हे अभिप्राय जाहिरात म्हणून वापरले गेल्याची शक्यता होती. असे अभिप्राय आणि रवीन्द्रनाथांची काही पत्रं मी गोळा केली. रवीन्द्रनाथांनी अक्षरश: हजारो पत्रं लिहिली. त्यांपैकी अनेक पत्रं ही खाजगी स्वरूपाची नव्हती. या पत्रांचाही जाहिरात म्हणून वापर केला गेला असणार. कारण काही पत्रं ही खरोखर जाहिरात करण्याच्या हेतूनंच लिहिली गेली असावी, हे कळत होतं. मग नंतर कोलकात्याच्या श्री. अरुण कुमार रॉय यांच्याबद्दल कळलं. श्री. रॉय हे संशोधक आणि लघुपटदिग्दर्शक. 'रवीन्द्रनाथ ओ चलचित्र', म्हणजे 'रवींद्रनाथ आणि चित्रपट' या त्यांच्या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी सत्यजित रे, रवीन्द्रनाथ यांच्या आयुष्यावर अनेक लघुपट तयार केले आहेत. श्री. रॉय यांनी मला रवीन्द्रनाथांच्या या जाहिरातींचे काही संदर्भ पुरवले आणि जाहिरातींची कात्रणंही पाठवली.

भारताच्या घडवणुकीबद्दल बोलताना नेहमीच रवीन्द्रनाथांच्या साहित्याचा उल्लेख केला जातो. त्यांची पत्रं, त्यांच्या कविता, त्यांच्या कथाकादंबर्‍या, त्यांची भाषणं सर्वांनाच चटकन आठवतात. पण यांव्यतिरिक्त रवीन्द्रनाथांच्या आयुष्याचा एक कोपरा तसा अजूनही अंधारातच आहे. त्यांचं समाजात असलेलं स्थान, समाजाचं त्यांच्यावर असलेलं प्रेम ध्यानात घेऊन त्यांच्या छबीचा, त्यांच्या पत्रांचा अनेकांनी जाहिरातींमध्ये वापर केला. रवीन्द्रनाथ उंच होते. पांढर्‍याशुभ्र दाढीतले रवीन्द्रनाथ अनेकांना संत वाटत. उत्पादनाची जाहिरात करणारी व्यक्ती लोकांच्या मनांत स्थान मिळवलेली असावी. रवीन्द्रनाथांचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या कविता, गाणी, त्यांचे विचार आणि समाजातलं त्यांचं स्थान यांमुळे त्या काळच्या उद्योजकांना, व्यापार्‍यांना ते आदर्श मॉडेल वाटले नसते तरच नवल. तिसेक वर्षांच्या काळात रवीन्द्रनाथांच्या असंख्य जाहिराती बंगाली, इंग्रजी, मराठी, तमीळ, हिंदी वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या. ग्रामोफोन रेकॉर्डस्‌, चेहर्‍याला लावायची क्रिमं, डोक्याला लावायची तेलं, वाद्यं, सिनेमे, नाटकं अशा अनेकांच्या जाहिरातींत रवीन्द्रनाथ होते. त्यांपैकी अनेक जाहिरातींचा मजकूर त्यांनी स्वत: लिहिला. या जाहिरातींची भाषा फार सुंदर आणि लालित्यपूर्ण. नेमक्या, मोजक्या शब्दांत उत्पादनाबद्दल ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण करणारी.

रवीन्द्रनाथांनी भारतीय समाजावर जाहिरातींमधून टाकलेला प्रभाव फार महत्त्वाचा आहे. या जाहिराती एका लोकोत्तर पुरुषाच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकतातच, पण शिवाय गेल्या काही दशकांत भारतीय समाज किती बदलला, हे लक्षातही आणून देतात.

रवीन्द्रनाथांच्या काही जाहिराती फार मजेशीर होत्या. १९२९ साली रवीन्द्रनाथ जपानला गेले होते. तिथे त्यांच्या विनंतीवरून तोक्यो कोदोकान्‌ या ज्युदो शिकवणार्‍या विद्यालयानं शिंझो ताकागाकी या शिक्षकाला शांतिनिकेतनात ज्युदो शिकवायला आमंत्रित केलं. त्याआधी १९०५ साली त्यांनी भारतात सर्वप्रथम सानो जिन्नोसुके या शिक्षकाला बोलावून ज्युदो शिकवण्याची व्यवस्था केली होती. यावेळी रवीन्द्रनाथांची योजना जरा वेगळी होती. संपूर्ण बंगालात या क्रीडाप्रकाराचा प्रसार व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. या खेळाला लोकाश्रय लाभेल, आणि आपल्याला याचा आर्थिक भार सोसावा लागणार नाही, अशी त्यांची अटकळ होती. पण नेहमीप्रमाणे रवीन्द्रनाथ काळाच्या पुढचा विचार करत होते. बंगाली समाजाला ज्युदोचं महत्त्व काही पटलं नाही. मग रवीन्द्रनाथांनी सुभाषचंद्र बसूंचं लक्ष वेधून घेण्याचं ठरवलं. बसू त्यावेळी कलकत्त्याचे मेयर होते. आपल्या विद्यार्थ्यांचं आणि श्री. ताकागाकी यांचं प्रात्यक्षिक बसूंसमोर सादर करावं, असं रवीन्द्रनाथांच्या मनात आलं. त्यांनी सुभाषचंद्र बसूंना तसं पत्र लिहिलं आणि या प्रात्यक्षिकासाठी गर्दी जमावी म्हणून वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली. या जाहिरातीत त्यांनी ज्युदोचं महत्त्व रंगवून सांगितलं होतं. हे प्रात्यक्षिक कलकत्त्याच्या एंपायर थेटरात १६ मार्च, १९३१ रोजी झालं. भरपूर गर्दी जमली. पण ज्युदो हा खेळ बंगाली समाजानं स्वीकारला मात्र नाही.

जलयोग मिष्ठान्न भाण्डार हे कलकत्त्यातलं मिठाई विकणार जुनं दुकान. यांच्या मिठाया अप्रतिम चवीच्या आणि म्हणून रवीन्द्रनाथांच्या आवडत्या. त्यांनी या दुकानासाठी स्वत:च्या हस्ताक्षरात जाहिरात लिहून दिली. ही जाहिरात वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली, शिवाय अनेक वर्षं ती दुकानाच्या दर्शनी भागात फ्रेम करून लावली गेली होती. या जाहिरातीत रवींद्रनाथ लिहितात - 'जलयोग मिष्ठान्न भाण्डाराच्या मिठाया मी अनेक वर्षं चाखतो आहे. दरवेळी इथली मिठाई खाल्ल्यावर मी तृप्त होतो. या दुकानातल्या मिठाया अप्रतिम आहेतच, पण इथलं दहीसुद्धा फार चविष्ट आहे. म्हणून मला इथे यायला आवडतं. या दुकानाची अशीच भरभराट होओ'. अनेक जाहिरातींप्रमाणे या जाहिरातीतही अभिप्रायाचं पत्र कधी लिहिलं, याची तारीख नाही. कलकत्त्यात श्री घृत नावाची तूप तयार करणारी कंपनी होती. आचार्य प्रफुल्ल चंद्र रॉय, श्यामाप्रसाद मुखर्जी, सुभाषचंद्र बसू आणि रवीन्द्रनाथ यांनी या कंपनीची जाहिरात केली होती. मराठीत प्रसिद्ध झालेली रवीन्द्रनाथांची बोर्न-व्हिटाची जाहिरात मूळ बंगालीत 'दीपाली' मासिकात प्रसिद्ध झाली होती. बंगाली जाहिरातीत ३ मार्च, १९३७ अशी तारीख आहे, जी मराठी जाहिरातीत नाही. या जाहिरातीचं इंग्रजी भाषांतर 'आनंदबाजार पत्रिके'त त्याच महिन्यात छापून आलं. १९३६ साली रवीन्द्रनाथ पाटण्याला गेले होते. तिथे पिंटू हॉटेलात ते जेवले. तिथलं जेवण त्यांना अतिशय आवडलं म्हणून त्यांनी तिथल्या तिथे हॉटेलमालकाला एक अभिप्राय लिहून दिला - 'माझ्या विद्यार्थ्यांबरोबर नुकताच मी पाटण्यास आलो होतो. पिंटू हॉटेलात आम्ही सगळे जेवलो. इथल्या जेवणाची चव, दर्जा उत्कृष्ट आहेत. जेवण रुचकर आहे, सर्वत्र स्वच्छता राखली आहे. शिवाय ते फार तेलकटही नाही. या हॉटेलाच्या व्यवस्थापनाप्रती मी शुभकामना व्यक्त करतो'.

tagore-ad-2.jpg

रेडियम लेबॉरटरीनं काही सौंदर्यप्रसाधनं बाजारात आणली होती. या कंपनीच्या संचालकांनी रवीन्द्रनाथांना गळ घातली आणि रवीन्द्रनाथांनी त्यांना जाहिरात लिहून दिली - 'स्नो आणि क्रीम आणि ओ-द-कोलॉइन वापरण्याची सवय असणार्‍यांनी रेडियम लेबॉरटरीची उत्पादनं अत्यंत आवडतील. ही उत्पादनं कुठल्याही परदेशी उत्पादनांच्या तोडीची आहे. या स्वदेशी उपक्रमास पाठिंबा देणं हे मी माझं कर्तव्य समजतो'. कुंतलिन तेलाची जाहिरातही अशीच गमतीशीर होती. या इंग्रजी आणि बंगाली जाहिरातीत रवीन्द्रनाथांनी लिहिलं होतं - 'आम्ही ठाकूर कुटुंबीय गेले दोन महिने कुंतलिन हेअर ऑइल वापरत आहोत. माझ्या एका नातेवाइकाचे केस फार गळत होते, पण आता कुंतलिन तेल वापरायला सुरुवात केल्यापासून त्याच्या डोक्यावर नवे केस उगवायला सुरुवात झाली आहे. हे तेल सुगंधी आहे आणि हा सुगंध बराच काळ टिकतो'. रवींद्रनाथांनी अशा अनेक स्वदेशी कंपन्यांना जीव तोडून मदत केली. स्वदेशी चळवळीनं त्यांचा मोठा भ्रमनिरास केला असला तरी.

tagore-ad-6.jpg

रवीन्द्रनाथांनी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून पूर्व बंगाल आणि ओडिशातल्या आपल्या जमीनदारीचा ताबा घेतला होता. शेलिदाह आणि शहझादपूर्व या लहानशा खेड्यांमध्ये आणि पद्मा नदीत एका हाउसबोटीवर ते राहत होते. सुरुवातीला त्या अशिक्षित आणि गरीब शेतकर्‍यांमध्ये राहण्याचा त्यांना विलक्षण कंटाळा आला होता. पण नंतर या वास्तव्यामुळे आपलं अख्खं आयुष्य बदललं, हे त्यांनी मान्य केलं. त्यांनी तिथे काही उत्कृष्ट कविता आणि लघुकथा तर लिहिल्याच, पण महत्त्वाचं म्हणजे दारिद्र्यात राहणार्‍या तिथल्या कष्टकरी जनतेबद्दल त्यांच्या मनात करुणा निर्माण झाली. कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही, सर्वांना समान वागणूक द्यायची हे त्यांनी तेव्हाच ठरवलं. खेड्यांनी आत्मनिर्भर व्हायला हवं, स्वत:ची अर्थव्यवस्था त्यांनी निर्माण करायला हवी हे त्यांच्या लक्षात आलं आणि हे साध्य करण्यासाठी ते लगेच कामालाही लागले. स्वदेशीचा प्रसार आणि प्रचार त्यांना यासाठी योग्य पर्याय वाटले. सुरुवातीला रवीन्द्रनाथांचा स्वदेशी चळवळीला पाठिंबा होता. किंबहुना या चळवळीचं नेतृत्वही त्यांच्याकडे आलं होतं. बंगालची आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक भरभराट व्हावी, या हेतूनं त्यांनी ब्राह्मो समाजाच्या कामाकडे दुर्लक्ष करून स्वदेशी चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. ठाकूर कुटुंब स्वदेशी मेळे आयोजित करू लागलं. जोडाशांकोच्या घरात स्वदेशी आगपेट्या आणि साबण तयार करण्याचा कारखाना सुरू झाला. ब्रिटिश बोटकंपन्यांना टक्कर देण्यासाठी ज्योतिरिंद्रनाथ ठाकूरांनी खुलन्याहून बरिसालपर्यंत स्टीमरसर्व्हिस सुरू केली. रवीन्द्रनाथांनी अनेक गाणी रचली. कविता लिहिल्या. पण या चळवळीचं मूळ स्वरूप फार काळ टिकलं नाही. खेड्यांना स्वयंपूर्ण बनवणं, स्थानिक उद्योगांधंद्यांचा विकास घडवून आणणं हे उद्देश मागे पडले आणि 'परदेशी मालावर बहिष्कार घालणे' हा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. 'नकारावर आधारलेली चळवळ' राबवणं रवीन्द्रनाथांना पसंत नव्हतं. पौर्वात्य आणि पाश्चात्त्य ज्ञानाचा वापर करून स्वयंपूर्ण होणं, हे त्यांना अपेक्षित होतं. पण स्वदेशी चळवळीत तसं काही घडत नव्हतं. उलट आता या चळवळीला जातीय स्वरूप प्राप्त झालं होतं. पूर्व बंगालातले गरीब मुसलमान दुकानदार परदेशी मालाचा व्यापार करत. त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी या निमित्तानं हिंदूंनी घेतली आणि जाळपोळीला सुरुवात झाली. मग नंतर ब्रिटिशांवर बाँबही फेकले गेले. रवीन्द्रनाथ चळवळीतून बाजूला झाले आणि १९०१ साली स्थापन केलेल्या शांतिनिकेतनावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं.

tagore-ad-4.jpg

मात्र असं असलं तरी भारतीय उद्योगांना पाठिंबा द्यायचं त्यांचं धोरण कायम राहिलं. बेंगाल स्टोअर, नेपियर पेंट्स्‌, केशवराम कॉटन मिल, हिंदुस्थान कोऑपरेटिव्ह इन्श्युरन्स सोसायटी अशा उद्योगांच्या जाहिराती रवीन्द्रनाथांनी लिहिल्या. प्रचारासाठी आपली भाषणं त्यांनी वापरायला परवानगी दिली. या कंपन्यांमध्ये केलेली भाषणंही जाहिरात म्हणून वापरली गेली. या जाहिरातींची भाषा अतिशय लालित्यपूर्ण आहे. हिंदुस्थान कोऑपरेटिव्ह इन्श्युरन्स सोसायटीच्या जाहिरातीत रवींद्रनाथ लिहितात - 'या कंपनीच्या संचालकांनी पेरलेलं बीज सकस असल्यानं अनेक वादळं सोसूनही हा वृक्ष तरारला आहे. भविष्यात हा वृक्ष अधिकच फोफावेल, या कल्पनेनं माझं मन आनंदित झालं आहे. बंगालचा आर्थिक विकास करण्यात ही कंपनी अग्रेसर असून मी सर्वांना या कंपनीच्या उन्नत वाटचालीत सहभागी होण्याचं आवाहन करतो'. बेंगाल स्टोअरच्या जाहिरातीत रवींद्रनाथांनी स्वदेशी उत्पादनं एका ठिकाणी मिळतील, असं दुकान सुरू केल्याबद्दल संचालकांचं अभिनंदन केलं होतं आणि वस्तूंची मांडणी सौंदर्यपूर्ण असल्याबद्दल समाधानही व्यक्त केलं होतं. नेपियर पेंट्स्‌च्या जाहिरातीत रवींद्रनाथांचं मोठाल्या यंत्रांबद्दलचं कुतुहल दिसून येतं. ते लिहितात - 'इथली मोठी यंत्रं अतिशय देखणी आहेत. या यंत्रांचा तालबद्ध आवाज अतिशय आश्वासक आहे. आपल्या प्रांतात असे कारखाने अजून निर्माण व्हायला हवेत आणि हा उद्योग स्थापन केल्याबद्दल आपण सर्वांनीच संचालकांप्रती आपली कृतद्न्यता व्यक्त करायला हवी'.

स्वदेशी कारखाने स्थापन व्हावेत, त्यांची भरभराट व्हावी, अशी रवीन्द्रनाथांची इच्छा होती. त्यामुळे ते अशा कारखान्यांना उत्तेजन देत. विनातक्रार जाहिराती लिहून देत. पण या जाहिराती करण्यामागे अजून एक कारण होतं. स्वदेशी जीवनशैलीचा एक भाग म्हणून सुरू केलेले शांतिनिकेतन आणि विश्वभारती कायमच आर्थिक अडचणीत असत. त्यांच्यासाठी निधी गोळा करण्यात रवीन्द्रनाथ थकून जात. पैशाच्या कायमच्या तंगीमुळे ते अगदी वैतागून जात. अशावेळी श्रीमंतांपुढे देणगीसाठी त्यांना हात पसरावे लागत. पैसा गोळा करायला ते अक्षरश: अमेरिकेचे दौरेही करून आले होते. भारतातले धनिक त्यांना देणग्या देत. पण देणग्या दिल्यानंतर रवीन्द्रनाथांनी आपल्या घरी, कारखान्यात यावं, तशा बातम्या छापून याव्यात, अशीही त्यांची इच्छा असे. रवीन्द्रनाथ हे जाणून होते आणि म्हणून आपल्या देणगीदारांना ते कधीही नाराज करत नसत. रवीन्द्रनाथांचे असे एक देणगीदार होते सेठ रामकृष्ण दालमिया. दालमियांनी भारतात अनेक कारखाने उभारले. सिमेंट, बिस्किटं, कागद, साखर, सूत, रसायनं, बँका, विमानकंपनी, जहाजकंपनी असे त्यांचे अनेक उद्योग होते. नंतर 'द टाइम्स ऑफ इंडिया'ची मालकीही त्यांच्याकडे आली. आपल्या प्रत्येक नव्या कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी दालमिया रवीन्द्रनाथांना आग्रहानं बोलवत. त्यांचा अभिप्राय लिहून घेत आणि त्यांच्या फोटोसकट तो वर्तमानपत्रात छापून आणत. ते भरपूर देणगीही देत असल्यामुळे कितीही अडचण असली, वेळ नसला तरी रवीन्द्रनाथांना या कार्यक्रमांना जावं लागे. १९३९ साली मात्र रवीन्द्रनाथांनी असं एक आमंत्रण नाकारलं. दालमियांच्या कागदाच्या कारखान्याचं उद्घाटन होतं. 'प्रिय शेठजी, तुमचं आमंत्रण मिळालं. भारतीय उद्योगांची स्थापना व्हावी, ही माझी कायमच इच्छा असते आणि म्हणून मी तुमच्या उत्कर्षाच्या बातम्या काळजीपूर्वक वाचत असतो. मला तुमच्या कार्यक्रमाला यायला नक्की आवडलं असतं, पण आता मार्चअखेर आली आहे. शांतिनिकेतनाचे हिशेब पूर्ण करून मला आमच्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणे पैशाच्या चिंता आहेतच. त्यात आता प्रकृतीही साथ देत नाही. माझ्यासारख्या कवीनं या काळज्या वाहाव्या, हे अजब आहे, पण नियतीची तशीच इच्छा दिसत आहे', असं पत्र लिहून रवीन्द्रनाथांनी कार्यक्रमाला येऊ शकत नसल्याबद्दल कळवलं आणि सोबत अभिप्रायाचा वेगळा कागद जोडला. हा अभिप्राय सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत फोटोंसकट छापून. दालमियांनी शांतिनिकेतनाला देणगी देणं पुढे सुरूच ठेवलं.

tagore-ad-7.jpg

शांतिनिकेतनासाठी पैसा गोळा करण्याच्या हेतूनं रवीन्द्रनाथांनी त्यांची सही असलेले फोटो विकण्याची परवानगी दिली. गांधीजी, टिळक, लाला लजपत राय, सुभाषचंद्र बसू यांचेही असे फोटो विकले जात. १९२७ साली 'इंडियन फोटो एन्ग्रेव्हिंग कंपनी'नं असे फोटो बाजारात आणले होते. एका लहान फोटोची किंमत होती एक रुपया. या कंपनीनं रवीन्द्रनाथांच्या फोटोंची जाहिरात केलीच, पण शिवाय 'इंडियन फोटो एन्ग्रेव्हिंग कंपनीनं माझ्या फोटोच्या काढलेल्या प्रती अतिशय समाधानकारक आहेत' असा त्यांचा अभिप्रायही छापला. 'भारत फोटोटाइप स्टुडिओ'नं रवीन्द्रनाथांना त्यांच्या दोन फोटोंच्या प्रती काढून दिल्या होत्या. त्यांच्यासाठी लिहिलेलं आशीर्वचन 'प्रवासी' नावाच्या नियतकालिकात छापून आलं. 'कर अ‍ॅण्ड महलानोबिस कंपनी'नं १५ इंच x ११ इंच आकाराचे सेपिया प्रिंटमधले रवीन्द्रनाथांचे फोटो विकले. इंग्रजी किंवा बंगाली सही असलेले हे फोटो फ्रेम केलेले होते. एका फोटोची किंमत होती पंधरा रुपये. शांतिनिकेतनातल्या पीअरसन मेमोरियल इस्पितळाच्या मदतीसाठी ही विक्री केली गेली. ही जाहिरात सर्व मोठ्या वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांत प्रसिद्ध झाली. पुढे १९३९ साली रवीन्द्रनाथ खूप थकल्यावर त्यांच्या देणग्या गोळा करण्यावर मर्यादा आल्या. तरीही ते वणवण फिरत असत. त्यांचे हाल न बघवल्यानं गांधीजींनी त्यांना एक मोठं पत्र लिहिलं आणि आपण स्वत: शांतिनिकेतनासाठी निधी जमा करू, पण त्यांनी विश्रांती घ्यावी, असं सुचवलं. गांधीजींनी दोन मोठे देणगीदार लगेच मिळवून दिले, शिवाय निधिसंकलनासाठी स्वत:चे फोटोही विकायची परवानगी दिली. अनेक सभांमध्ये नंतर गांधीजी शांतिनिकेतनाच्या मदतीसाठी स्वतः झोळी घेऊन उभे राहिले.

रवीन्द्रनाथांनी आपल्या जाहिरातींमध्ये काही सुंदर बंगाली शब्द तयार करून वापरले. फाउंटन पेनासाठी त्यांनी बंगाली शब्द तयार केला होता - झरनाकलम. पुढे त्यांनीच एका पत्रात पेनासाठी 'झरनी' हाही शब्द वापरला. बंगालीत 'झरनी' हा शब्द झर्‍यांसाठी प्रचलित होता. रवीन्द्रनाथांनी तो पेनासाठी वापरात आणला. आपण मराठीत 'झरणी' आणि हिंदीत 'झरनी' हे शब्द पेनासाठी वापरतो, त्यांचा उगम हाच. तर, 'भारती फाउंटन पेन कंपनी'ला रवीन्द्रनाथांनी एकदा भेट दिली आणि नंतर अभिप्राय लिहिला. हा अभिप्राय तर कंपनीनं छापलाच, पण शिवाय लिहिलं की, 'तुम्ही अगदी निर्धास्त होऊन भारती फाउंटन पेन वापरू शकता आणि या उत्पादनाची शिफारसही करू शकता. या पेनाच्या गुणवत्तेबद्दल कवींच्या कवीनं अभिप्राय दिला असून त्याला झरनाकलम असं नावही दिलं आहे'. रवीन्द्रनाथांनी या नव्या नावाबद्दल आपल्या सी. एफ. अ‍ॅण्ड्र्यूज या मित्राला पत्रातून कळवलं होतं. बंगाली भाषेत नवे शब्द तयार व्हायला हवेत, या शब्दांचा वापरही वाढायला हवं, असं रवीन्द्रनाथांचं मत होतं. रवीन्द्रनाथांनी शाईच्या दोन उत्पादनांची ब्रॅण्डनावंही उत्पादकांच्या आग्रहावरून सुचवली होती. 'आजन्मकालि' आणि 'काजलकालि' ही ती दोन नावं. त्यांच्या रवीन्द्रनाथांनी केलेल्या जाहिराती अनेक वर्षं प्रकाशित होत राहिल्या. 'काजलकालि'बद्दल रवीन्द्रनाथांनी लिहिलं होतं की, या शाईचा काळेपणा खूप काळ टिकतो आणि कुठल्याही विदेशी शाईपेक्षा या शाईचा काळेपणा तसूभरही कमी नाही. मेसर्स भोलानाथ दत्त अ‍ॅण्ड सन्स यांचा कलकत्त्यात कागदाचा कारखाना होता. कागदाच्या सर्वांत मोठ्या कारखान्यांपैकी एक. या कागदाच्या कारखान्याला भेट देऊन रवींद्रनाथांनी अभिप्राय दिला आणि तो जाहिरातीत छापला गेला.

Arundar Scann Matter-5a.jpg

'तुम्ही जे काम करताय ते उत्तम आहे. हाती घेतलेलं काम असंच सुरू ठेवा. माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत', अशा आशयाची पत्रं रवींद्रनाथांनी अनेक तरुणांना आणि त्यांच्या संस्थांना लिहिली. यात पूर्व आणि पश्चिम बंगालातल्या संस्था होत्या. उदाहरणार्थ, 'युनायटेड न्यूज ग्रूप ऑफ इंडिया'बद्दल त्यांनी लिहिलं होतं - 'ही संस्था फार चांगलं काम करते आहे आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामात गुणवत्ता मिळवली आहे. याचं पूर्ण श्रेय मी या संस्थेचे संचालक श्री. विभूभूषण सेनगुप्त आणि त्यांचे सहकारी यांना देतो'. 'आनंदबाजार पत्रिका', 'द स्टेट्‌स्‌मन' या वर्तमानपत्रांच्या वर्धापनदिनप्रसंगीही रवींद्रनाथांनी लिहिलेले शुभेच्छासंदेश जाहिरात म्हणून वापरले गेले. रिझर्व बँकेच्या संचालकपदासाठी होणार्‍या निवडणुकीच्या वेळी, किंवा हरेन बोस या गायकाला युरोपदौर्‍याला शुभेच्छा देण्यासाठी लिहिलेली पत्रंही सार्वजनिक केली गेली. अनेक संस्थांनी रवीन्द्रनाथांची पत्रं आपल्या माहितीपत्रकांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये आपल्या कामाची माहिती करून देताना वापरली. ही पत्रं कधीकधी विस्तृतही असत आणि काहीही काटछाट न करता ती वर्तमानपत्रांत छापून येत. रवीन्द्रनाथांचा आपल्या कामाला पाठिंबा आहे, आपल्या कामाबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे, हे लोकांना सांगण्याचा त्यामागे उद्देश होता. या संस्थांबद्दल त्यामुळे आपोआपच जनमानसात चांगलं मत होत असे. १९२२ साली रवींद्रनाथ दीर्घकाळ आजारी होते. या काळात डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा आदेश दिला होता. त्यांना विश्रांती मिळावी, म्हणून त्यांचे कुटुंबीय भरपूर काळजी घेत होते. पण त्यांच्याकडे आपलं काम घेऊन येणार्‍या लोकांची गर्दी काही कमी होईना. म्हणून 'रवींद्रनाथांची प्रकृती ठीक नाही, कृपया काही काळ त्यांच्याकडे कामासाठी अथवा अभिप्राय मागण्यासाठी येऊ नये', असं एक निवेदन सर्व बंगाली वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आलं.

ऑक्टोबर १८७८ ते फेब्रूवारी १८८० या काळात रवीन्द्रनाथ इंग्लंडमध्ये होते. तिथून भारतात परतल्यावर १८८२ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. यानंतर प्रकाशित झालेल्या त्यांच्या सर्व पुस्तकांच्या जाहिराती बंगाली वर्तमानपत्रांमधून नियमितपणे प्रसिद्ध होत राहिल्या. रवीन्द्रनाथांचं नाव सर्वाधिक वापरलं गेलं ते पुस्तकांच्या जाहिरातींच्या संदर्भात. पुस्तक प्रसिद्ध होण्याआधी, झाल्या दिवशी आणि झाल्यानंतर या जाहिराती नियमितपणे प्रकाशित होत असत. यांत पुस्तकाचं नाव, किंमत, रवीन्द्रनाथांचा फोटो आणि पुस्तक मिळण्याचा पत्ता असे तपशील असत. उदाहरणार्थ, १९०७ सालच्या 'भाण्डार पत्रिके'त 'इंग्रजी सोपान' या पुस्तकाची जाहिरात सापडते. 'हा ग्रंथ बोलपूरच्या ब्रह्मचर्याश्रमासाठी लिहिला गेला आहे. आणि इंग्रजी भाषेच्या अभ्यासासाठी सर्वांनी हा ग्रंथ वापरावा', असं तीत रवीन्द्रनाथांच्या हस्ताक्षरात म्हटलं आहे. १९०५ सालच्या फेब्रूवारीत 'शांतिनिकेतन पत्रिके'त एक जाहिरात प्रसिद्ध झाली. 'पंचप्रदीप' या लहान मुलांच्या पुस्तकाबाबत हा अभिप्राय होता. याच पत्रिकेत पुढे दोन महिन्यांनी 'बेलार ठाकूरेर गोल्पो' या लहान मुलांच्या पुस्तकाचीही रवीन्द्रनाथांच्या अभिप्रायासकट जाहिरात प्रसिद्ध झाली. सप्टेंबर, १९३९मध्ये रवीन्द्रनाथांची 'रविवार' ही कथा 'आनंदबाजार पत्रिके'च्या शारदीय संख्येत (शारदीय संख्या म्हणजे आपल्या दिवाळी अंकांसारखे दुर्गापूजेच्या वेळी प्रकाशित होणारे विशेषांक) प्रकाशित होणार होती. दोन महिने आधीपासून या कथेच्या जाहिराती प्रकाशित केल्या जाऊ लागल्या. अंक प्रकाशित झाल्यानंतर महिनाभरानं 'तुमचा अंक उत्तम होता, मला अतिशय आवडला, मी तो एका बैठकीत वाचून काढला' असा रवीन्द्रनाथांचा अभिप्रायही वर्तमानपत्रात छापून आला. 'वैजयन्ति पत्रिके'त प्रसिद्ध होणार्‍या रवीन्द्रनाथांच्या एका लेखाची जाहिरातही याच अंकात छापून आली होती. पुढच्या वर्षी 'आनंदबाजार पत्रिके'त त्यांची 'लाबोरेटरी' ही दीर्घकथा प्रसिद्ध झाली. या कथेचीही तुफान जाहिरात पत्रिकेनं केली. अर्थात रवीन्द्रनाथांचा नंतरचा अभिप्राय जाहिरातींमध्ये होताच. याच वर्षी पत्रिकेत 'आनंदमेला' हा लहान मुलांचा विभाग सुरू झाला. या विभागाच्या जाहिरातीत पहिलं नाव रवीन्द्रनाथांचं होतं. त्यांनी तीन कविता या विभागासाठी लिहिल्या, आणि या कविता छापून येणार त्याच्या महिनाभर आधीपासून त्याची जाहिरात केली गेली.

इतर लेखकांच्या अनेक पुस्तकांसाठी त्यांनी अभिप्राय लिहिले आणि हे अभिप्रायही जाहिरात म्हणून वापरले गेले. 'अनादत' ही कादंबरी श्री. प्रफुल्ल कुमार सरकार यांनी लिहिली होती. तिच्याबद्दल रवीन्द्रनाथांची अनुकूल प्रतिक्रिया 'आनंदबाजार पत्रिके'त जाहिरात म्हणून छापली होती. कवी विजयलाल यांच्या 'मनोहर खेला' आणि 'रिअ‍ॅलिस्ट रवीन्द्रनाथ' या दोन पुस्तकांची, सुरेंद्रनाथ दासगुप्त यांच्या 'साहित्यपरिचय' व 'बंकीमशतवार्षिकीच्या 'वेदान्तसार' यांची जाहिरातही रवींद्रनाथांनी केली. 'ही पुस्तकं फार चांगली आहेत, मी ती वाचली आहेत आणि मला ती आवडली. तुम्हीही ती वाचावीत, असं मला वाटतं', अशा आशयाची पत्रं या जाहिरातींत वापरली आहेत. 'द स्टेट्‌स्‌मन’ या वर्तमानपत्रातर्फे 'वंडरफुल इंडिया' हे पुस्तक बंगाली, इंग्रजी आणि उडिया अशा तीन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. या पुस्तकाच्या मोठाल्या जाहिराती सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून छापून आल्या. बंगाली आणि इंग्रजी भाषेत. या जाहिरातींत रवीन्द्रनाथांनी लिहिलं होतं - 'आपण ज्या देशात राहतो, तो देश किती मोठा, वैविध्यानं नटलेला आणि अद्भुत आहे, याची आपल्यांतल्या फार थोड्यांना जाणीव असते. आपल्या देशातल्या सांस्कृतिक परंपरांविषयीही आपण अनभिज्ञ असतो. या गोष्टी जाणून घेण्यासाठी मदत करणारं कुठलीही साधन हे उत्तमच असतं आणि त्याला शैक्षणिक महत्त्वही असतं. म्हणूनच या सुंदर प्रकाशनाबद्दल मी द स्टेट्‌स्‌मनचं अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की, या देशावर प्रेम करणारे सगळे, आणि सगळ्या शाळा, जिथे भूगोल हा अजून विषय अजून जिवंत आहे, हा ग्रंथ प्रेमानं जवळ बाळगतील'. सुधीर रॉय यांनी संपादन केलेल्या 'कीर्तनपदावली'च्या जाहिरातीत रवीन्द्रनाथांनी कीर्तनपरंपरेचा गौरव केला होता. १० डिसेंबर, १९३९ रोजी 'आनंदबाजार पत्रिके'त बंगीय साहित्यसभेच्या 'बंकिमचंद्ररचनापदावली' या ग्रंथाची जाहिरात प्रसिद्ध झाली. बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. या ग्रंथाच्या जाहिरातीत रवीन्द्रनाथांनी बंकिमचंद्रांचा सुरेख शब्दांमध्ये गौरव केला होता आणि हा देखणा ग्रंथ प्रकाशित केला म्हणून प्रकाशकांचं आणि संपादकांचं अभिनंदन केलं होतं. असाच अभिप्राय रवीन्द्रनाथांनी 'देश'तर्फे प्रकाशित झालेल्या 'ईश्वरचंद्र विद्यासागर स्मृतिग्रंथा'साठीही लिहिला होता.

संगीत हा रवीन्द्रनाथांचा श्वास होता. मात्र पाश्चात्त्य संगीतापेक्षा त्यांचा ओढा भारतीय संगीताकडे अधिक होता. संगीतावर जीवापाड प्रेम करणारे रवीन्द्रनाथ एखादं वाद्य वाजवायला मात्र शिकले नसले, तरी अगदी तरुणपणापासून गात असत. १९८६च्या जानेवारी महिन्यात ब्राह्मो समाजाच्या माघोत्सवात रवीन्द्रनाथ पहिल्यांदा तीन हजार श्रोत्यांसमोर गायले. आजारी असलेले त्यांचे वडील या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, म्हणून रवीन्द्रनाथांनी त्यांच्या शेजारी बसून पुन्हा एकदा त्या कार्यक्रमातली गाणी म्हटली. ही मधुर गाणी ऐकून महर्षी देवेंद्रनाथ इतके आनंदले, की त्यांनी त्या क्षणी एक मोठ्या रकमेचा चेक बक्षीस म्हणून रवीन्द्रनाथांच्या हाती ठेवला. पुढे रवीन्द्रनाथांच्या अनेक ग्रामोफोन तबकड्या प्रकाशित झाल्या. कुंतलिन तेलाचे निर्माते होते हेमेंद्र मोहन बोस. त्यांचीच रवीन्द्रनाथांचं पहिलं सिलिंडर ध्वनिमुद्रण केलं. ही ध्वनिमुद्रणं अगोदर विक्रीस उपलब्ध नव्हती. नंतर १९०६ साली ती बाजारात आली. या घटनेची अर्थातच मोठी जाहिरात केली गेली. पुढे एचएमव्ही, कोलंबिया अशा परदेशी आणि अनेक स्वदेशी कंपन्यांनी रवीन्द्रनाथांच्या भाषणांच्या, गाण्यांच्या, कवितांच्या रेकॉर्ड काढल्या. मात्र खुद्द रवीन्द्रनाथांनी यांच्या जाहिराती स्वत: केल्याचं आढळत नाही. द्वारकिन्स् हार्मोनियमची जाहिरात मात्र त्यांनी अनेक वर्षं केली.

tagore-ad-3.jpg

रवीन्द्रनाथांनी अनेक नाटकं लिहिली, पण त्यांनी जाहिरात मात्र एकाच नाटकाची केली. हे नाटक म्हणजे 'गोरा'. या नाटकाच्या काही प्रयोगांमध्ये त्यांनी स्वत: काम केलं होतं. रवीन्द्रनाथांच्या आयुष्याची एक रंजक बाजू म्हणजे त्यांचं चित्रपटमाध्यमाविषयी असलेलं आकर्षण. रवीन्द्रनाथांचा सहभाग असलेल्या अनेक चित्रफिती तयार केल्या गेल्या. या चित्रफिती मुख्य चित्रपटांबरोबर अनेकदा बंगालातल्या चित्रपटगृहांमध्ये दाखवल्या जात. रवीन्द्रनाथांनी त्यासाठी काही प्रसंगी स्वत: जाहिराती लिहिल्या आहेत. टॉलस्टॉयच्या 'रिझरेक्शन' या चित्रपटाबरोबर रवीन्द्रनाथांची राष्ट्रगान गातानाची फिल्म दाखवली गेली. 'मिडनाईट साँग' या इंग्रजी आणि 'अपराधी' या बंगाली चित्रपटाबरोबरही रवीन्द्रनाथांची 'जन गण मन'ची क्लिप दाखवली गेली. या चित्रपटांच्या जाहिराती रवीन्द्रनाथांच्या फोटो-अभिप्रायासह अर्थातच वर्तमानपत्रांमध्ये रोज प्रकाशित होत होत्या. 'रूपवाणी' या चित्रपटगृहाचं रवीन्द्रनाथांच्या हस्ते उद्घाटन केलं. या उद्घाटनाच्या वेळी रवीन्द्रनाथांचं भाषण पुढे कित्येक दिवस वर्तमनपत्रांमध्ये जाहिरात म्हणून छापलं गेलं. 'अछूतकन्या' या चित्रपटात रवीन्द्रनाथांची नात, देविकाराणी, यांचा अभिनय होता. साहजिकच रवीन्द्रनाथांना जाहिरातीसाठी गळ घातली गेली. रवीन्द्रनाथ चित्रपटाच्या पहिल्या खेळाला उपस्थित राहिलेच, शिवाय चित्रपटाचं 'असे चित्रपट अधिकाधिक तयार व्हायला हवेत' अशा शेवटाचं एक परीक्षणही लिहिलं. 'चोखेर बाली' या चित्रपटाचं परीक्षणही रवीन्द्रनाथांनी लिहिलं आणि ते जाहिरात म्हणून वापरलं गेलं. रवीन्द्रनाथांच्या मृत्यूनंतर पंधरा दिवसांनी 'रूपवाणी'तच त्यांच्या अंत्ययात्रेचं, त्यांच्या भाषणांचं चित्रीकरण असलेला लघुपट दाखवला गेला. रवीन्द्रनाथांची कदाचित ही शेवटची जाहिरात असावी.

आपल्या अतिशय व्यग्र आयुष्यात या जाहिराती आणि पत्रं लिहिणं रवीन्द्रनाथांना क्वचित त्रासदायक ठरे. विजयलाल चट्टोपाध्याय या आपल्या मित्राला त्यांनी लिहिलं होतं - 'रोज अभिप्राय लिहिणं, जाहिराती लिहिणं, पुस्तकांच्या प्रस्तावना लिहिणं, पत्रांना उत्तरं देणं, लहान मुलांच्या बारशासाठी नावं सुचवणं हे सारं मला थकवणारं आहे. मी एक साधा कवी आहे. लोक माझ्याकडून जरा जास्तच अपेक्षा करतात, असं मला वाटतं. पण हे काम मला करायलाच हवं. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. मी जर अभिप्राय लिहिले नाहीत, तर या स्वदेशी उद्योगांना कोण पाठिंबा देईल?'

पंडीत रवीशंकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात रवींद्रनाथांची तुलना केली आहे ती जर्मन विद्वान जोहान वोल्फगँग फॉन ग्योथ याच्याशी. ग्योथनं कादंबर्‍या आणि नाटकं लिहिली, गाणी रचली, चित्रं काढली, भाषणं केली, पत्रं लिहिली. वनस्पतिशास्त्रावर पुस्तकं लिहिली आणि राजकारणावर मतंही मांडली. रवीन्द्रनाथांची प्रतिभाही अशीच सर्वस्पर्शी. तिनं अवघ्या बंगालला, नव्हे भारताला भुरळ घातली. आधुनिक बंगालवर रवीन्द्रनाथांइतका प्रबळ प्रभाव कोणीही टाकू शकलं नाही. बंगाली समाजानं रवीन्द्रनाथांवर टिकाही केली. त्यांचे विचार पटले नाहीत तेव्हा निषेधही नोंदवला. पण तरीही त्यांचं 'गुरुदेव' हे स्थान कधीही डळमळीत झालं नाही. कवी सुभाष मुखोपाध्याय लिहितात - 'एक काळ असा होता की, रवीन्द्रनाथांचं साहित्य, त्यांचे विचार आपल्यापुरतं मर्यादित ठेवण्या्साठी उच्चभ्रूंची प्रचंड धडपड सुरू होती. टागोरांचं तत्त्वज्ञान सामान्यांना कसं उमजणार, असा त्यांचा सवाल होता. याच वेळी टागोर हे सामान्यांचे कवी आहेत, टागोरांच्या तत्त्वज्ञानामुळे उच्चवर्गीयांची वैचारिक पातळी खालावू नये, म्हणूनही समाजाचा एक लहान हिस्सा कार्यरत होता.' समाजातल्या सर्व घटकांना आपलंसं करणारे रवीन्द्रनाथ म्हणूनच आधुनिक भारताचं सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकले.

रवीन्द्रनाथ स्वत:ला कवी मानत. पण लोकांच्या मनांतल्या त्यांच्या ओळखी सतत बदलत राहिल्या, तरी त्यांच्या शब्दाला किंमत आहे, हे सगळे जाणून होते. म्हणूनच विसाव्या शतकाची पहिली तीन दशकं रवीन्द्रनाथांच्या जाहिरातींनी गाजवून सोडली. 'मी कोण?' या प्रश्नाचं उत्तर कायम रवीन्द्रनाथांनी 'आमि कवि', म्हणजे 'मी कवी' असंच दिलं. बंगाली जनतेनं मात्र त्यांना कायम वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं. रवीन्द्रनाथांची थोरवी ही की, त्यांनीही या भूमिका सहज स्वीकारल्या. काहीशा अनिच्छेनं का असेना.

वैश्विक प्रेमाचा संदेश देणारे, प्रेमाची, मानवतेच्या खर्‍या धर्माची गाणी गाणारे बंगालातले बाऊल रवींद्रनाथांचं प्रेरणास्थान होते. या बहुमुखी आणि बहुप्रसव प्रतिभेच्या लोकोत्तर पुरुषानं आयुष्यभर 'मी फक्त एक कवी' असं सांगत मानवतेची गाणी गायली. या गाण्यांतून दिलेल्या प्रेमाच्या संदेशामुळे रवीन्द्रनाथ समस्तांना कायम आपलेसे वाटत राहिले. रवीन्द्रनाथांच्या हृदयात वसलेला तो एक बाऊल सतत जागा राहिला. लोकांना प्रेम देत. लोकांचं प्रेम मिळवत. या स्नोच्या, सिनेम्यांच्या, पुस्तकांच्या, मिठायांच्या जाहिराती करताना रवीन्द्रनाथ थकले असतील, चिडलेही असतील. पण त्या बाउलामुळे त्यांना कळलं असावं, की हाही लोकांपर्यंत जाण्याचाच एक मार्ग आहे; त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी हे काम करणं आपल्याला भाग आहे. रवीन्द्रनाथांच्या जाहिराती विस्मृतीत गेल्या तरी त्यांच्या इतर कवितांप्रमाणे, गीतांप्रमाणे त्याही त्यांच्यातल्या बाउलाची एक निशाणी आहे, हे आपण विसरता कामा नये.

tagore-ad-5.jpg

***

विशेष आभार - केसरी मराठा ट्रस्ट, श्री. अरुण कुमार रॉय, वरदा खळदकर

***

लेखातल्या जाहिरातींचे तपशील -

१. बोर्न-व्हिटा - 'केसरी'तली जाहिरात

२. रेडिअम क्रीम - श्री. अरुण कुमार रॉय यांच्या सौजन्याने

३. कुंतलिन हेअर ऑइलची जाहिरात - श्री. अरुण कुमार रॉय यांच्या सौजन्याने

४. नेपिअर पेंट्‌स्‌ची जाहिरात - श्री. अरुण कुमार रॉय यांच्या सौजन्याने

५. रवीन्द्रनाथांच्या फोटोंची जाहिरात - श्री. अरुण कुमार रॉय यांच्या सौजन्याने

६. मेसर्स भोलानाथ दत्त यांच्यासाठी केलेली जाहिरात - श्री. अरुण कुमार रॉय यांच्या सौजन्याने

७. द्वारकिन्स हार्मोनियमची जाहिरात - श्री. अरुण कुमार रॉय यांच्या सौजन्याने

८. गोदरेज साबणाची जाहिरात - श्री. अरुण कुमार रॉय यांच्या सौजन्याने

***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०१३)

***

हा लेख मायबोलीवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल मेनका प्रकाशन, श्री. आनंद आगाशे व श्रीमती सुजाता देशमुख यांचे आभार.

***
प्रकार: 

खरेच वेगळा विषय आणि माहितीपुर्ण, कित्येक गोष्टी नव्यानेच समजल्या. अगदी रवींद्रनाथ आणि जाहीरातीपासून.

लेख आवडला. खूप माहिती मिळाली. तुमचे ह्या लेखासाठी अनेक धन्यवाद!

============

अवांतर - त्या काळी समाजात सकारात्मक वैचारीक परिवर्तन घडवून आणणारे थोर लोक जाहिरातींमध्ये घेतले जात होते असे दिसते. ह्या उलट आज अनेक अभिनेते / अभिनेत्री किंवा क्रिकेटपटू हेच प्रामुख्याने जाहिरातींत दिसतात. ह्या लोकांचे खासगी आयुष्य किंवा सामाजीक आयुष्यही मोठे आदरणीय असेल असे नाही, अनेकदा नसतेही. शिवाय, आजच्या काळात एखाद्या नेत्याचा संदेश देऊन जाहिरात करणे हे व्यावसायिकरीत्या तर अपयशी ठरेलच पण त्या नेत्यावर नाही नाही ते आरोप होतील. त्याहून महत्वाचे म्हणजे लोकांना मनापासून आदर वाटावा असा नेताच अस्तित्वात नसणे हीसुद्धा एक विचित्र शोकांतिका / अवस्था म्हणावी लागेल.

हे लिहिण्याचा उद्देश इतकाच, की रवींद्रनाथ, सावरकर, टिळक, गांधीजी ह्यांचा वापर जाहिरातीत करणे येथपासून ते आज जाहिराती करण्यास योग्य असा नेता नसणे व ग्लॅमरक्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा जाहिरातीत मुबलक वापर केला जाणे हे एक प्रकारे आपल्या सांस्कृतीक अधःपतनाचे लक्षण मानता येईल असे वाटले.

>>नेहमीप्रमाणेच वेगळ्या विषयावरचा सखोल सविस्तर लेख>> ++
बेफी -१. अजिबात पटलं नाही. त्याकाळी जे फॉलो करणं इन होतं ते जाहिरातीत वापरलं आजही तसचं. हे अती-अवांतर झालंय. क्षमस्व.

अतिशय मनोरंजक माहिती. पत्रांचा जाहिरात म्हणून वापर करण्याची पद्धत वाचून मजा वाटली.

माहेरमध्ये वाचला होता, तेव्हाही लेख आवडलाच होता, आताही आवडला.

चिनूक्सचं लेखासाठीचं डीटेलिंग नेहमीसारखंच अफलातून आहे.

अतिशय सुंदर लेख आणि महत्वपुर्ण माहीती.लेख खुप आवडला.माझ्यामते नोबल पारितोषिक विजेते असणार्‍या महान व्यक्तीने जाहीरातीत काम करणे दुर्मीळ असावे ! इतकी सविस्तर व जाहीरातींचा सुंदर इतिहास सांगणारी माहीती पहिल्यांदाच वाचली. यासाठी तुमचे धन्यवाद.

लेख इंटरेस्टिंग आहे खूपच. माहिती तर खूपच डिटेल्ड आहे.
देशी उत्पाद्नांसाठी तत्कालिन पुढारी व महत्वाच्या व्यक्तींनी जाहिरात करणं हे स्वदेशी मालाच्या चळवळीच्या अनुषंगाने स्पष्ट होतंय.
पण टागोरांनी बोर्नव्हिटाची जाहिरात - एका परदेशी कंपनीची जाहिरात करण्यामागे कारण काय ते स्पष्ट होत नाहीये. प्रॉडक्ट आवडत होतं व इतरांनी वापरावं असं वाटत होतं? कोणीतरी विनंती केली म्हणून? त्यांना या जाहिराती लिहून देण्याचं काही मानधन मिळत होतं का?

माहेरमध्ये वाचला होता लेख. तेव्हाही आवडला होता. लेखासाठी घेतलेले कष्ट जाणवतात. तपशीलांत खोलवर शिरून रसाळ पध्दतीने विषय ज्या प्रकारे मांडला आहेस त्याबद्दल खूप कौतुक वाटते.

एकदमच वेगळी ओळख रविन्द्रनाथांची. लेख छान झाला आहे.

रवीन्द्रनाथांच्या काही जाहिराती फार मजेशीर होत्या हा उल्लेख आल्यानंतर पुढे ती जाहीरात येइल असं वाटलं होतं.

भाषेची गोडी, लालित्य इ. गोष्टी ज्या वर्णनात आल्यात त्या मराठीत दिलेल्या जाहिराती वाचताना जाणवत नाहीत. भाषांतरात हरवल्या का?

अफाट माहिती आहे ही! बारीकसारीक तपशीलांसहित वाचायला मजा आली.

वाचून कांहींतरी भरीव पदरीं पडलं असं वाटायला लावणारा छानच लेख ! धन्यवाद.

मला वाटतं जाहिरात युगाची सुरवातच अशा प्रशस्तिपत्रांपासून [' टेस्टीमोनीअल अ‍ॅडस' ] झाली असावी. पण आतांसारखं केवळ पैसे घेवून कोणत्याही उत्पादनाची जाहीरात करण्याऐवजीं, उत्पादन व उत्पादक यांची विश्वासार्हता जाहिरात देण्यापूर्वीं या सन्माननीय व्यक्तीकडून पूर्वीं पारखली जात असावी.

अतिशय आवडला लेख.

लहानपणापासूनच रवींद्रनाथ टागोरांबद्दल खूप आपुलकी वाटत आली आहे. झरनाकलमच्या उल्लेखानं शाळेतल्या शाईपेनाच्या आठवणी जाग्या झाल्या.

आधीही आवडला होता, आताही आवडला. नेहेमीप्रमाणेच खूप तपशील, संदर्भ यांनी भरगच्च भरलेला. शिवाय शैलीदार. नाहीतर निव्वळ तपशिलांनी लिखाण जंत्रीवजा व्हायचा धोका असतो. पण आपले लेख याला अपवाद.

Pages