Jack-o'-lantern - पमकीन कार्विंग

Submitted by अमितव on 31 October, 2014 - 10:25

थँक्स गिविंग डेच्या सुमारास बाजारात मोठ्या मोठ्या भोपळ्यांच्या राशी दिसायला लागतात. (काही देशांतच थँक्सगिविंग वेळेवर करतात, बाकी आळशीपणा, पण असो :)). पाव किलो भोपळा आणण्याची सवय असलेल्या कुटुंबात वाढलं असल्यानं या भोपळयाचं करायचं काय असा सुरुवातीला प्रश्न पडायचा. पण लोकांनी वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे भोपळे घराच्यासमोर ठेवलेले दिसले आणि भोपळा आणून त्याची बेक्कार भाजी न करता इतरही उपयोग असू शकतात या ज्ञानाने पाश्च्यात्यांबद्दलचा आदर दुणावला.

या भोपळ्यावर स्पुकी चित्र कोरून (कार्व करून) त्यात बारकी मेणबत्ती लावून घराच्या बाहेर ठेवलं की भारी दिसतं हे लवकरच समजलं. गेल्यावर्षी पहिल्यांदा प्रयत्न केला आणि फार कठीण नाही हे जाणवल्यावर या वर्षी परत करून फोटो काढले.

साहित्य: भोपळा, कार्विंग टूल (बारीक करवती सारखं), आयस्क्रीम स्कूप/ मोठा चमचा/ डाव, मेणबत्ती, सुरी, कचऱ्याचा डबा.

१. एक मध्यम आकाराचा भोपळा आणा. बाहेरून भोपळ्याला बघून तो जाड आहे का पातळ (थिन) हे समजत असेल तर पातळवाला (वाली नाही) आणा. नारळ आणताना वाणी अंगठी मारतो तसं ४-५ भोपळ्यावर मारा. फरक काहीच कळणार नाही (वाण्याला तरी कुठे कळतो). मग एक न फुटलेला, जरा गोरा गोमटा दिसणारा, ओबडधोबड न दिसणारा असा भोपळा निवडा. भोपळ्याची रास जरी दुकानाच्याबाहेर पडलेली असेल तरी आता जाऊन पैसे द्यावे लागतात हे विसरू नका. आत सेल्फ चेकआउट असेल तर वरील सगळी स्पेसिफिकेशन विसरून ज्या भोपळ्यावर ४ आकडी नंबर दिसेल तो उचला.

IMG_20141030_204744.jpg

२. हॅलोविनच्या आदल्या दिवशी ऑफिसमध्ये 'पमकीन कार्विग स्टेनसिल' असा सर्च देऊन जे आवडेल/ सोपं वाटेल अशा स्टेस्न्सिलची प्रिंट घ्या. ती न विसरता घरी न्या.

IMG_20141030_210803.jpg

३. आता पेनने भोपळ्याचा देठाकडच्या भागावर एक वर्तुळ काढा. (कंपास शोधू नका) हाताने जसं जमेल तसं काढा.
या वर्तुळाला एका बाजूला एक notch काढा, जेणे करून ते देठ परत झाकण म्हणून ठेवलं तर कसं ठेवायचं ते समजेल.

IMG_20141030_204844.jpg

४. आता मोठ्या सुरीने तो आकार कापून घ्या, झाकण उघडलेला भोपळा असा दिसेल.
IMG_20141030_205321.jpg

५. बिया खायला आवडत असतील तर त्या हाताने आधी काढून घ्या. नंतर आतून भोपळा स्वच्छ करा. आयस्क्रीम स्कूप/ डावेच्या मदतीने आतुन खरवडून काढा. आतला पृष्ठभाग जितका स्वच्छ करता येईल तेवढा करा. आत मेणबत्ती लावायाचेय, भोपळा ग्लो व्हायला हवा तर तो आतून नितळ करा. जास्त स्कूप करायचा आणखी एक फायदा म्हणजे जास्त जाड कोरत बसायला लागत नाही. ज्या बाजूला कार्व करणार आहात त्या बाजूने थोडा जास्त स्कूप करा. साधारण असा दिसेल.

IMG_20141030_210617.jpgIMG_20141030_210625.jpg

६. आता ते स्टेनसिल भोपळ्यावर ठेवून एखाद्या अणुकुचीदार वस्तूने (बारीक स्क्रू-ड्रायवर, पिन) बाह्यारेषांची नक्षी भोपळ्यावर टिंब टिंब काढत उतरवून घ्या. तुम्ही कलाकार असला तर हातानेही काढू शकता. फक्त काय ठेवायचं आणि काय उडवायचंय याचं भान ठेवून चित्र काढा. तयार कार्विग केलेल्या भागाला स्ट्रेन्थ असली पाहिजे इतका तरी भाग जोडलेला असुद्या.
हे ट्रेस करताना कागद हलू देवू नका. हलणार असेल तर सरळ चिकटपट्टीने कागद चिकटवा आणि ट्रेस करा. ट्रेस करून झाल्यावर गोंधळ होत असेल तर पेनने परत एकदा रेषा ठळक काढून घ्या.
IMG_20141030_213503.jpg

७. आता सावकाश जॉईन-द-डॉटस करत, कार्व करा. वरील चित्रातला काळा भाग काढायचाय आणि पांढरा ठेवायचाय.

IMG_20141030_221116.jpgIMG_20141030_221245.jpg

८. कार्विंग बऱ्यापैकी सोपं आहे, ढोबळ आकार आले तरी चालेल. झालं. आता आतमध्ये एक छोटी मेणबत्ती लावा आणि ट्रिक-ओ-ट्रिटला लहान पोरांबरोबर कोस्चुम घालून दारोदार भटकून भरपूर chocolates आणा.

IMG_20141030_222044.jpgIMG_20141030_222149.jpg

९. हा Jack-o'-lantern घराबाहेर ठेवतात. आपण केलेला सगळ्यांना कळायला नको का? फोटो काढून फेस्बुकावर, whatsappवर टाकून लोकांना वात आणा.

IMG_20141030_222532.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. मागच्या वर्‍शि बाप-लेक्सांनी एक केला होता. यंदा सगळेच ढीले पड्लेत. आज ट्रीक ऑर्‍ ट्रीटला लोका'चि कारागिरी पाहून आलो.

मामी, रुनी इज म्हणीग राईट. तो ४ आकडी नंबर नसेल तर घेतलेली वस्तू पालेभाजी/ फळभाजी/ फळ आणि त्यांची चित्रे आणि मग त्यांचे शंभर प्रकार या वर्गावारीतून शोधावी लागते, नाही शोधता आली की अटेंडंटला बोलवा किंवा कंटाळून काहीतरी नावापुढे क्लिक करून गोष्ट आणा.
पराग झब्बू मस्त.
सगळ्यांचे आवडल्याबद्दल धन्यवाद. Happy

मस्तच अमित. कार्विंगही छान झालयं! Happy

नारळ आणताना वाणी अंगठी मारतो तसं ४-५ भोपळ्यावर मारा. फरक काहीच कळणार नाही (वाण्याला तरी कुठे कळतो). >>>>>:हहगलो:

आत मेणबत्ती ठेवल्यानं आतून खरपूस भाजून निघालेल्या भोपळ्याच्या काही रेस्प्या नसतात का?>>>>>मामे Proud

पाव किलो भोपळा आणण्याची सवय असलेल्या कुटुंबात वाढलं असल्यानं या भोपळयाचं करायचं काय असा सुरुवातीला प्रश्न पडायचा. >> अगदी खरे आहे अमितव Happy

खूप सुंदर झाले आहे भोपळ्याचे कोरीव काम Happy पण मला त्या आकाराचे महत्त्व नाही कळले. मी हवे तर त्यावर एखादे फुल बिल काढेल Happy

मी पपईचे एक कार्व्हिंग केले आहे ते नंतर डकवेन माझ्या रंगीबेरंगीवर.

ह्या चित्राचं महत्त्व काही नाहीये. अगदी सोपं नको होत, आयतं चित्र हवं होतं, स्पूकी हवं होतं आणि हे मला आवडलं इतकचं. पूर्ण भोक पाडून कोरीवकाम न करता फक्त साल खरवडूनपण करतात, ते पण मस्त दिसतं. बाकी ज्याचीत्याची आवड. हेलोवीनला स्पूकी/ भीतीदायक कार्विंग करायची पद्धत आहे, अर्थात फुलाचं पण स्पूकी करता येईलच. पपई कार्विंग लाव.

मायबोलीवर काही सर्च केलं आणि नाही मिळालं असं होतच नाही. अमीतव, तुम्ही लिहीलय पण मस्त आणि भोपळा कोरलाय पण मस्तच . बाकी ही फोटो छानच.
मी ह्या वर्षी हॅलोविन ला परदेशात होते , घरातले सगळे प्लास्टिक चा आणू या अस म्हणत होते कारण कसा कोरतात ते अजिबातच माहीत नव्हतं . पण दुकानात भोपळे, करवती वैगेरे दिसल्यावर मला राहवलं नाही . मला एकंदर carving मध्ये खूप रस आहे . त्यामुळे मी ही संधी सोडली नाही. माझा पहिलाच प्रयत्न होता , त्यामुळे अगदी सोप्प डिझाइन घेतलं आहे पण जमलं बऱ्यापैकी . भोपळा कोरताना खूप मज्जा पण आली. आत मेणबत्ती लावल्यावर दिसत पण मस्त होत.
हा मी कोरलेल्या भोपळ्याचा फोटो.

IMG-20171028-WA0081.jpg

Pages